नव्या परिस्थितीत विचारांचा विकास होणे नेहमी गरजेचे असते आणि कुठल्याही चळवळीत ते काम होणे गरजेचे आहे. नाहीतर मग विचारांची एक पोथी बनते आणि ते वर्तमानातील आव्हानांकडे एक तर दुर्लक्ष करते किंवा त्याचे आकलन होत नाही. चळवळीला विचारांची दिशा देणारा, त्या विचारांवर आधारीत नवे नवे कार्यक्रम सुचवणारा, एक तत्ववेत्ता, एक भाष्यकार आणि कुशल संघटक सनातन्यांनी डॉक्टरांची हत्या करून आपल्यापासून हिरावून नेला त्याची एक भलीमोठी पोकळी आपल्याला अनुभवास येते आहे. ही पोकळी कशी भरून निघेल याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.

कुठलाही समाज हा परस्परविरोधी हितसंबंध असणार्या जनसमुहांची गोळाबेरीज या स्वरूपातच अस्तित्वात असतो आणि सामाजिक व्यवहारात हे हितसंबंध कायम राहावेत म्हणून कायमस्वरूपी एक संघर्ष सुरू असतो. या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, समर्थन करण्यासाठी काही विचार अस्तित्वात येतात ज्यांना आपण ‘तत्वज्ञान’ असे म्हणतो. मानवी समाजाच्या विकासक्रमात ढोबळ मानाने अशा तत्वज्ञानाच्या पातळीवर पाहू गेल्यास आपल्याला दिसून येते की, प्रस्थापित व्यवस्थेला कायम टिकू पाहणारे तत्वज्ञान विरूद्ध या व्यवस्थेला उलथवून नवी अधिक चांगली समाज व्यवस्था आणू इच्छिणारे, पुरोगामी प्रस्थापित विरोधी परिवर्तनवादी तत्वज्ञान असा संघर्ष आपल्याला दिसून येतो. या तत्वज्ञानाची व्यावहारिक रूपे आपल्याला अनेक सामाजिक संघर्षात दिसून येतात. एखादी साधी दंगल जेव्हा घडते त्यामागे काही एक विचार असतो. त्या विचाराला एक इतिहास परंपरा असते आणि यात काही जनसमुहांचे हितसंबंध दडलेले असतात. वर्गसंघर्ष ही खूप व्यापक आणि समग्र अशी संकल्पना आहे ज्यामध्ये समाजातील वेगवेगळ्या पातळ्यांवर चाललेल्या सूक्ष्म आणि व्यापक, दृश्य आणि अदृश्य अशा संघर्षाचा समावेश होतो. प्रत्येक संघर्ष हा वेगळा सुटा सुटा वाटत असला तरी त्याचे अंतिम रूप, त्याचा अंतिम उद्देश, तो कोणती मूल्ये पुढे आणतो, तो समाजातील कुठल्या वर्ग-जातींचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करतो यावरून त्या संघर्षाचे स्वरूप ठरते. म्हणजे तो प्रस्थापित(जो सत्ताधारी असतात-जे समाजातील साधन संपत्तीचे मालक असतात) त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करतो आहे की, समाजातील कष्टकरी जात वर्गाचे त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करतो यावरून त्या संघर्षाचे स्वरूप ठरते. उदा.भारतात सनातनी वैदीक तत्वज्ञान हे उच्च जात वर्गाचे म्हणजे ब्राम्हणी वर्णवर्चस्वाचे समर्थन करणारे आहे. आणि नीच समजल्या गेलेल्या जातींच्या जातींचे गुलामगिरीचे समर्थन करणारे आहे. या जाती-वर्ग अडाणी रहाव्यात, अंधश्रद्ध राहाव्यात, देवधर्माच्या प्रभावाखाली राहाव्यात असाच या तत्वज्ञानाचा हेतु असतो. अध्यात्म वगैरे सोज्वळ शब्द वापरले जातात. परंतु त्यांचा उद्देश स्पष्टपणे कष्टकरी जातवर्गाचे शोषण बिनबोभाट चालू राहावे हाच असतो. म.फुले यांनी त्यांच्या ‘ब्राम्हणाचे कसब’ या ग्रंथात याचा चांगला सविस्तर असा भांडाफोड केलेला आहे. आजही हे सनातनी वैदिक तत्वज्ञानवाले अंधश्रद्धांचे समर्थक आहेत इतके की, अखेरीस त्यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घातल्या. कारण त्यांचे देवा-धर्माचे सगळे थोतांडच अंधश्रद्धेवर उभे आहे.
दुसर्या बाजूला अवैदिकांचे तत्वज्ञान कष्टकरी जनतेच्या बाजूचे तत्वज्ञान आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हा अवैदिक तत्वज्ञानाच्या परंपरेत मोडणारा आहे. वर्ग संघर्ष-वर्गजाती अंत संघर्ष असं म्हटलं की काही “विवेकवादी” लोकांना घाबरल्या सारखं होतं. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हा कष्टकरी जनतेच्या हिताला पुढे घेऊन जाणारा. त्यांना त्यांच्या वास्तव स्वरूपाची ओळख करून देणारा असल्यामुळेच तो कष्टकरी जनतेच्या मुक्तीसाठी चाललेल्या ‘वर्गसंघर्षाचाच’ भाग आहे. चार्वाक, बुद्ध, महावीर, बसवेश्वर, चक्रधर, कबीर, तुकाराम ते थेट फुले-आंबेडकर लोहिया आणि मार्क्स यांची विचार परंपरा आधुनिक काळात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमागील तात्विक बैठक निर्माण करण्यासाठी आधारभूत आहे. डॉ.दाभोलकरांनी या विचारांचा गाभा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची तात्विक बैठक अगदी पूर्ण केली. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ एक स्वायत्त चळवळ असली तरी त्याचा पक्का सांधा त्यांनी समाजात बदल घडून यावा यासाठी चाललेल्या समग्र सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडला. ती त्यांनी सर्वांपासून वेगळी ठेवली नाही. म्हणूनच जेव्हा सनातनी विचारांच्या शक्तींनी त्यांची हत्या केल्यानंतर पुरोगामी राजकीय पक्षांपासून सर्वच छोट्या मोठ्या परिवर्तवादी चळवळींनी रस्त्यात उतरून या हत्येचा निषेध करीत या हत्येमागील विचारसरणीचा प्रतिकार करण्याची तयारी ठेवली.
डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी त्यांच्या संपूर्ण लिखाणातून आणि भाषणातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचे एक तात्विक स्वरूप पुढे आणले आहे. जगाच्या निर्मितीपासून देव, धर्म, संस्कृती, परंपरा या सर्व गोष्टींची उकल आपल्या कार्यकर्त्यांना व्हावी आणि कार्यकर्ता हे अंतिमत:, समग्र परिवर्तनाच्या चळवळीचे भाग व्हावेत यासाठीही तत्वज्ञानीय बैठक जाणीवपूर्वक घडवली. समाजात चाललेल्या समग्र परिवर्तनवादी चळवळीचा एक भाग म्हणूनच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे पाहिले. त्यामुळेच ती टिकाऊ आणि व्यक्ती महात्मे नाकारून समाजात घट्ट उभी राहिली. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला विरोध करणार्या प्रतिगामी सनातनी शक्तींना असे वाटत असेल की, डॉक्टरांना संपवले की, चळवळ आपोआप संपेल. पण तसे घडले नाही कारण डॉक्टरांनी या चळवळीला दिलेली विचारांची बैठक आणि इतर परिवर्तनवादी चळवळीशी तिचा जोडून दिलेला सांधा. आज डॉक्टरांच्या हत्येचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांनी जी विचारांची बैठक घडवली त्यातून एक परिवर्तनवादी विचारांचे जे एक तत्वज्ञान पुढे आणले ते येणार्या भविष्यात आणि आताच्या वर्तमानात पुढे घेऊन जाण्यासाठी एक नवा भाष्यकार पुढे येण्याची गरज आहे. आज तरी ही पोकळी प्रकर्षाने जाणवते. नव्या परिस्थितीत विचारांचा विकास होणे नेहमी गरजेचे असते आणि कुठल्याही चळवळीत ते काम होणे गरजेचे आहे. नाहीतर मग विचारांची एक पोथी बनते आणि ते वर्तमानातील आव्हानांकडे एक तर दुर्लक्ष करते किंवा त्याचे आकलन होत नाही. चळवळीला विचारांची दिशा देणारा, त्या विचारांवर आधारीत नवे नवे कार्यक्रम सुचवणारा, एक तत्ववेत्ता, एक भाष्यकार आणि कुशल संघटक सनातन्यांनी डॉक्टरांची हत्या करून आपल्यापासून हिरावून नेला त्याची एक भलीमोठी पोकळी आपल्याला अनुभवास येते आहे. हे आजच्या घडीचे वास्तव आहे. या दृष्टीनेच ही पोकळी कशी भरून निघेल याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
1917 साली लेनीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रशियन क्रांती बद्दल अमेरिकी पत्रकार असलेल्या आणि या क्रांतीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या ‘जॉन रीड’ यांनी या क्रांतीचा ‘आँखो देखा हाल’ त्यांच्या ‘जगाला हादरवणारे दहा दिवस’ या जगप्रसिद्ध पुस्तकात सादर केला आहे. या पुस्तकाचा यासाठी उल्लेख केला तो म्हणजे जॉन रीड यांनी या पुस्तकात लेनीन यांचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, “काही लोक उत्तम संघटक असतात. तर काही लोक उत्तम तात्विक विचार करणारे, त्याची मांडणी करणारे असतात. ज्या लोकांना उत्तम संघटन करता येते ते तत्वविचारांची नीट मांडणी करू शकतील असे नाही. त्या आधारे जनतेला दिशा देण्याचे काम करू शकतील असेही नाही. ज्यांना तत्वविचारांची मांडणी करता येते. जे जनतेला योग्य दिशा दाखवू शकतात त्यांना संघटन कौशल्य असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या ठायी संघटन कौशल्याचा अभावच असतो. पण ‘लेनीन’ यांच्या मध्ये मात्र हे दोन्ही दुर्मिळ असे गुण होते. ते तत्ववेत्ते होते आणि ते उत्तम संघटक होते. जनतेला प्राप्त परिस्थितीत योग्य दिशा दिग्दर्शन करण्याचे त्यांचे तात्विक कौशल्य आणि त्या आधारावर जनतेला संघटीत करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते”
डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा प्रथम दर्शनी विचार करताना जॉन रीड यांनी लेनीन यांचे जे वरील वैशिष्ट्ये सांगितले आहे तेच समोर येते. डॉक्टर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे भाष्यकार, तत्त्ववेत्ते होते आणि ते एक कुशल संघटक होते. परत दाभोलकर जी चळवळ चालवित होते ती काही ‘सत्ते’साठी चालणारी चळवळ नव्हती. अगदी शुद्ध प्रबोधनाची, पूर्ण त्यागवृत्तीवर आधारलेली चळवळ होती. आणि अशा चळवळीचे संघटन ही अधिक अवघड गोष्ट असते. जिचे अंतिम ध्येय इतके विशाल की, ते साध्य करण्यासाठी भारतासारख्या देशात ज्या देशाने बुद्ध, महावीरांसारखे महापुरूष पचवले त्या देशात हजारो पिढ्यांपर्यंत चालू राहणारे कार्य आहे. मंगळावर यान पाठवणारे शास्त्रज्ञ जेथे या अंधश्रद्धेतून मुक्त नाहीत अशा देशात अंधश्रद्धा निर्मूलन करणे म्हणजे एक पराकोटीचे अवघड कार्य आहे. अशा साध्यासाठी जे साध्य तुम्हाला अमुक इतक्या काळात अमुक एक अवस्था पूर्ण झाली की, साध्य होईल असे सांगणे केवळ अवघड आहे अशा चळवळीचे नेतृत्व करणे केवळ जनतेबद्दल असणारे प्रेम आणि नैतिक आत्मबळ यावरच शक्य आहे आणि अर्थातच ते डॉक्टरांकडे उदंड होते.
या अर्थाने पाहू गेल्यास प्रतिगामी सनातनी शक्तींनी परिवर्तनवादी चळवळीचे किती मोठे नुकसान केले आहे हे कळून येईल. अर्थात हजारो कार्यकर्त्यां मध्ये या नैतिक आत्मबळाची आणि जनतेबद्दलच्या प्रेमाची जी भावना डॉक्टरांनी पेरून ठेवली आहे. त्यामुळे ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ’ ही काही सेनापती धारातीर्थी पडल्याबरोबर मागे पळत सुटणारी मराठा सैन्याची फौज नाही. सर्व कार्यकर्ते या लांब पल्ल्याच्या ध्येयाच्या दिशेने जाणार्या ‘लाँगमार्च’ मध्ये तेवढ्याच आत्मविश्वासाने पाय रोवून उभे आहेत. ही डॉक्टरांच्या जीवन ध्येयाला, त्यागाला, दिलेली मानवंदनाच आहे.
कार्ल मार्क्स यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “मानवी समाज पोकळी राहू देत नाही” म्हणजे समाजाच्या गरजेनुसार नवे नेतृत्व उभे राहतेच. मानव जातीचा आजवरचा इतिहास पाहता हे सत्य आहे. त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. अर्थात हे नेतृत्व आभाळातून पडत नाही तर ते चळवळीतून, आंदोलनातून आणि समाजाच्या गरजेतूनच उभे राहते. आपण वर म्हटल्याप्रमाणे कुठल्याही चळवळीला एका भाष्यकाराची, तत्ववेत्त्याची गरज असते. विचार ही गोष्ट किंबहुना समाजातील कुठलीही गोष्ट ही स्थिर नसते ती सतत विकास पावत असते, बदलत असते. अधिक उन्नत होत पुढे सरकत असते. भाकरी का जळाली, घोडा का अडला या प्रश्नाला ‘न फिरवल्यामुळे’ असे उत्तर आपण देतो. तीच गोष्ट विचारांची आहे. विचारांचा नव्या परिस्थितीत विकास करण्याची गरज असते. त्यामधील कालबाह्य गोष्ट टाकून देऊन त्याला प्राप्त परिस्थितीतील नवे आयाम जोडण्याची आणि तो आजच्या भाषेत ‘अप टू डेट’ करण्याची गरज असते.
कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या ऐतिहासिक अशा कम्युनिस्ट जाहिरनाम्याच्या नव्या आवृत्तीला प्रस्तावना लिहिताना म्हटले आहे की, “यात मांडलेली विचारांची दिशा आजही बरोबर असली तरी तपशिलात अनेक गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. त्या बदलण्याची गरज आहे. परंतु या जाहीरनाम्याला आता ऐतिहासिक महत्व प्राप्त झाल्यामुळे तसे करता येत नाही.” म्हणजे कम्युनिस्ट जाहिरनामा लिहिला गेला 1848 मध्ये आणि मार्क्स यांचे निधन झाले 1883 मध्ये. म्हणजे केवळ 35 वर्षांच्या कालखंडामध्ये मार्क्स यांनी कम्युनिस्ट जाहीरनाम्यातील तपशीलात कालबाह्यता आल्याचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ सामाजिक परिस्थिती किती झपाट्याने बदलत असते हे दिसून येईल. त्यामुळे अशा झपाट्याने बदलणार्या परिस्थितीत विचारांची मूलभूत चौकट कायम ठेवून विचारांचा विकास करणे ही अतिशय अवघड स्वरूपाची गोष्ट आहे. डॉक्टरांनी ही कामगिरी अगदी चोख बजावलेली आहे. एक तर त्यांनी नव्या परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलनाची तत्वज्ञानीय बैठक घडवली आणि चळवळीच्या ओघात आणि बदलत्या परिस्थितीत तिचा यथायोग्य विकास करत हे तत्वज्ञान कायम ताजे आणि आव्हानात्मक ठेवले.
आज या पातळीवर काम होणे गरजेचे आहे. आज परिस्थिती अधिक अवघड आणि गंभीर बनली आहे. ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा आपण विचार करीत आहोत त्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे आज सत्तेवर आले आहेत. केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांची सत्ता आली आहे. अशा परिस्थितीत विचारांची आणि प्रत्यक्ष व्यवहाराची लढाई अवघड बनली आहे. या सगळ्या परिस्थितीचे नीट आकलन करून आपली लढाई पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. सत्तेवरील अंधश्रद्धा समर्थक शक्तींचा मुकाबला आपण कसा करणार याची तात्विक मांडणी आणि व्यवहारात आपण कसे कार्यक्रम घेणार. याची आखणी करणे गरजेचे आहे. वरवर एखादी चळवळ सामाजिक वाटत असली तरी कुठलीही चळवळ शेवटी एक राजकारण पुढे आणत असते आणि ते ‘राजकारण’ ओळखणे गरजेचे आहे. ज्या शक्तींनी डॉक्टरांची हत्या केली त्याच शक्तींच्या समर्थक शक्ती आज सत्तेवर आहेत याचे भान ठेवून आपल्या चळवळीचे गांभीर्य समजून घेणे गरजेचे आहे.
– सुभाष थोरात
लेखक संपर्क: 9869392157
(लेखक डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)