आज मी काही जिव्हाळ्याच्या गोष्टी तुमच्याशी बोलू इच्छितो. तुम्ही सर्व कार्यकर्ते आणि तुमची वैचारिक बैठक हा आपल्या संघटनेचा मूलाधार आहे. ह्या हजारो खांबावर संघटनेची इमारत उभी आहे. ह्यातील एकही खांब आता अकाली कोसळणार नाही ही खबरदारी आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
माझ्या सहकार्याने तुम्ही घोषणा देत आहा ‘…. आम्ही सारे दाभोलकर!’ मित्रांनो माहित आहे ना मी कधीही शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही. अगदी प्रवासात असतानासुद्धा! त्यामुळे आजारपणात माझे दिवस कधी वाया गेले नाहीत. वाचनासाठी मी आवर्जून वेळ काढला. किमान वार्तापत्राचे आणि विचार कृती पत्रिकेचे अंक तरी वाचलेच पाहिजेत तुम्ही. आपल्या जाहीर भाषणात आशय आणि मांडणी कशी चोख पाहिजे. हे सारे त्या घोषणेबरोबर आले बरे का मित्रांनो!
संघटना बांधणीमध्ये शाखांच्या बैठकांना असाधारण महत्व आहे. नियमित बैठका आणि नियमाप्रमाणे बैठका होणे गरजेचे आहे. अंनिसचे बहुतेक कार्यक्रम शाखांमार्फत होतात. सर्वांशी जमवून घेऊन एक संघटीत शक्ती निर्माण करणे ही संघटनेच्या वाढीसाठी आवश्यक गोष्ट आहे. वैयक्तिक रूसव्या फुगव्यांना तेथे जागा नाही. आपल्याला विचार पुढे न्यायचा आहे, व्यक्ती नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.
मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे की, आपल्या कर्तव्यात नोकरी-धंदा आधी येतो. त्यावरच तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट अवलंबून असते. त्यानंतर येते कुटुंब. पुरेसा वेळ कुटुंबासाठी द्या. त्यात हयगय करू नका. आपण अंनिसच्या कामासाठी आपले रविवार, आपल्या सुट्ट्या आणि आपला फावला वेळ देतो. कधी कधी आपण ‘जादूटोणा कायदा प्रचार यात्रा’ वा अन्य मोहिमांत दिवस दिवस बाहेर असतो. आपल्या अनुपस्थितीत आपले घर चालू ठेवणारे चूल पेटती ठेवणारे आपले कुटुंबच असते. ह्याचा विसर होऊ देऊ नका. नाहीतर आपलंही ‘काम धाम सोडूनी करितो वारी…’ असे होईल.
आपले काम समाज बदलाचे म्हणून आपण सतत समाजाबरोबर, समाजात राहणे गरजेचे आहे. सतत नव्या लोकांशी संपर्क ठेवणे हे करायला हवे. समाजाशी त्यांना समजेल, रूचेल अशा भाषेत संवाद साधायला हवा. आम्ही आपल्या संत आणि समाजसुधारकांचा वारसाच पुढे चालवीत आहोत अशी मांडणी केली की विरोधाची धार कमी होते. आता नव्या राजवटीत आपण आवर्जून विचारले पाहिजे, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर काय सांगत?’ सावरकर विज्ञाननिष्ठ होते. निरर्थक यज्ञयाग, पूजापाठ आणि कर्मकांड ह्याच्या विरोधात होते.
हे समजून घ्या की, धर्माचा आणि धर्माच्या नावाखाली आलेल्या अंधश्रद्धांचा इतिहास सुमारे पाच हजार वर्षां इतका जुना आहे. तर विवेकाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार फक्त गेली जेमतेम पाच सहाशे वर्षे सलगपणे मांडला जात आहे, हा इतका जुना आजार सहजासहजी बरा होणे दुरापास्त आहे. तशी वेडी आशा बाळगून तुम्ही निराश होऊ नका. इथे शतकांचा विचार करायला हवा आपले समाजप्रबोधनाचे काम न डगमगता चालू ठेवायला हवे. सरकारी व्यासपीठावरून विकासाची बात करायची तर पक्षाच्या इतर संघटनांची दमदाटीची, घटनेवर घाला घालणारी हिंदुत्वाची बात करायची, इतिहास आणि मिथके ह्यात घोळ निर्माण करायचा, पुष्पक विमान आणि रामसेतू प्रत्यक्षात आणून वैज्ञानिक दृष्टिकोनाची ऐशीतैशी करायची ह्या सगळ्या प्रकाराने मी पण धास्तावलो आहे. मित्रांनो, हे सरकार निवडणुका लढवून गादीवर आले आहे. घटनेने प्रत्येकाला उच्चार स्वातंत्र्य दिले आहे. तेव्हा त्रागा करून चालणार नाही. आपल्याला अभिप्रेत बदल मतपेटीतूनच आणायचा आहे. जनजागृतीचे आपले काम आता अधिक अवघड झाले आहे.
माझे ज्येष्ठ साहित्यिक मित्र रा.ग.जाधव सर मोठ्या मनाने मला अजातशत्रुत्व बहाल करतात ते म्हणतात,
‘विरोधकांशी तू शांतपणे जाहीर वादविवाद केलेस,
हसत खेळत रक्तदाब न वाढविता
(हे खास माझा पत्रकार मित्र निखीलसाठी बरं का)
तुझे हे अजातशत्रुत्व अपूर्वच!
मित्रा तुला विचारले असते
तुला गोळी मारणारेही तुझे मित्रच काय?
तर तू म्हणाला असतास ‘हो’!
पण एवढीही उसंत त्या गोळ्यांनी तुला दिली नाही.’
खरंच ते मारेकरी जाणत नव्हते आपण कुणाला, का मारीत आहोत. त्यांचे खरे कर्तेकरविते मला उघडपणे धमकावीत होते. संत बसवेश्वरांचा अनुभवमंडप जाळणारे, तुकारामाची गाथा पाण्यात बुडविणारे आणि गांधींना संपविणारे हे सारे सूत्रधार एकाच सनातन कुळीतले आहेत.
माझ्या पश्चात तुमचा अदम्य उत्साह, तुमचे अथक परिश्रम आणि निर्धार बघून खूप समाधान झाले. आपल्या लाडक्या नेत्याच्या निर्घृण हत्येचं तुम्ही उट्टं काढलंत दुप्पट तिप्पट काम करून! माझा आत्मविश्वास वाढला आहे.
-प्रभा पुरोहित