Categories
व्यक्तिविशेष

जग बदलायला निघालेला नंगा फकीर

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

एका रशियन क्रांतीकारकाचे ‘क्रांतीत आम्ही तरूण होतो आणि त्यात आम्ही सहभागी होतो, हे आमचे भाग्य होते.’ अशा आशयाचे प्रसिद्ध वाक्य आहे. त्याचप्रमाणे आम्ही तरूण होतो, आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या योद्ध्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलनाची अवघड लढाई लढत होतो असे सांगताना जशी छाती फुलून येते तसेच हा योद्धा या लढाईत शहीद झाला असं म्हणताना उर आणि डोळे भरून येतात.

डॉ. दाभोलकर नेहमी लढाई आणि युद्ध यातील फरक आम्हा कार्यकर्त्यांना समजावून सांगताना म्हणायचे की, आम्ही लहान-मोठ्या लढाया लढतोय अजून युद्ध बाकी आहे. विवेकाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, मानवतावादाचा निर्णायकपणे विजय होईल, त्यावेळी हे युद्ध आपण जिंकले असे होईल आणि आपण ते जिंकणारच असा मानवी इतिहास सांगतो. तोपर्यंत लहान-मोठ्या लढाया आपण लढतच राहिल्या पाहिजेत.

तासगावमधील अतुल वाघने डॉ. दाभोलकरांची ‘भ्रम आणि निरास, विचार तर कराल’ आणि ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ ही पुस्तके टप्प्याटप्प्याने वाचायला

दिली. वर्षानुवर्षे सांभाळलेले श्रद्धेचे गड धडाधडा कोसळू लागले. साफ झाले. राहिलेली जळमटे अतुलने साफ केली. वाचनाची आवड होती. निवड निर्माण झाली याच डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकांनी. त्यामुळे या पुस्तकाच्या लेखकाला, विचारवंताला आणि मुख्य म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अत्यंत अवघड लढाईतील योद्ध्याला भेटायची तीव्र ओढ लागली होती. ती पूर्ण केली प्रताप घाटगे आणि सहकारी यांनी. मे 1997 साली तासगाव अंनिसने 10 दिवसांची सायकल यात्रा काढली होती. उद्घाटनाला डॉ. नरेंद्र दाभोलकर येणार होते. ठरल्याप्रमाणे डॉक्टर आले त्यांनी बैठक घेतली. यात्रेबाबत अनेक मार्गदर्शन केले. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी. याबाबत डॉक्टरी सल्ला दिला. बाहेर पडताना प्रतापकडे सोबत आणलेली औषधांची पाकीटे दिली. त्यामध्ये सर्दी-खोकला, ताप हागवण इ. पासून ते इलेक्ट्रोलाईटच्या पुड्या होत्या. माझ्या लक्षात आले. त्यांचा सल्ला फक्त डॉक्टरी नव्हता, तर कृतीशीलपणे काळजी घेणार्‍या वडीलधार्‍याचा होता. या डॉक्टर असणार्‍या लेखक-विचारवंताबद्दलच्या माझ्या सगळ्या कल्पना गळून पडल्या. सुटाबुटातला, गॉगल-गाडीतला हा नेता नव्हता. तर अत्यंत साध्या खादीतल्या कपड्यातला, एस.टी.तून फिरणारा कोणताच आव न आणता जग बदलायला निघालेला नंगा फकीर होता. ही माझी डॉक्टरांची पहिली भेट.

यथावकाश मी अंनिसचा पक्का कार्यकर्ता झालो. पूर्ण बंद पडलेली तासगाव शाखा 2005 नंतर पुन्हा जोमाने सुरू केली. माझा आणि डॉक्टरांचा संपर्क वाढला. मे 1997 च्या सायकल यात्रेत मी नवखा कार्यकर्ता होतो. आता माझ्या इतर सहकार्‍यासोबत एक जबाबदार जुना कार्यकर्ता म्हणून दुसरी सायकल यात्रा काढली. डॉक्टरांनी यावे असा माझा आग्रह होता. परंतु कायद्याबाबतच्या पूर्व नियोजित बैठकीमुळे डॉक्टर येऊ शकले नाहीत. यात्रा झालेनंतर त्यांनी यात्रेचा संपूर्ण तपशील माझ्याकडून घेतला. या यात्रेत आम्ही अंनिसच्या कामाबाबत थेट तीन प्रश्न विचारून जनमत तपासले होते. प्रश्न आणि लोकांचे मत पुढीलप्रमाणे होते. 1) अंनिसने अजून जोमाने काम करायला पाहिजे-90% लोकांचे मत होते. 2) अंनिस बरोबर काम करते – 10% लोकांचे मत.3) अंनिस चळवळीची गरज नाही ती ताबडतोब बंद करावी. -0%

लोकांचे मत यामध्ये अंनिसची गरज नाही ती बंद करा आणि उगाचच अंधश्रद्धा निर्मूलन-अंधश्रद्धा निर्मूलन असं बोंबलत फिरू नका असं एकाचेही मत नव्हते. उलट बुवाबाजी अंधश्रद्धा प्रचंड वाढत आहेत. ते रोखण्यासाठी तुम्ही अजून जोमाने काम करा हेच मत 90% लोकांनी मांडले. सदरचे सर्वेक्षण डॉ. दाभोलकरांनी जुलै 2009 च्या अंनिवाच्या कव्हरपेजवर घेण्यास सांगितले. या सर्वेक्षणाचा ते अनेकदा उल्लेख करत.

तासगावमध्ये डॉक्टरांच्या अनेक सभा-व्याख्याने झाली. शाळेच्या एका सभागृहात डॉक्टरांचे व्याख्यान होते. 400-500 चे सभागृह लोकांनी खचाखच भरलेले होते. या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा उल्लेख प्रास्ताविकामध्ये केला. डॉक्टरांनी हाच धागा पकडून आपले व्याख्यान सुरू केले. ते म्हणाले, हे खचाखच भरलेले सभागृह नरेंद्र दाभोलकरांच्या सभेसाठी उपस्थित राहिलेले पाहून मलादेखील आनंदच झाला. पण माझ्याच नावाचे एक महाराज जर या ठिकाणी आले असते तर बाहेरचे 10-20 हजाराचे मैदान तर पुरले असते काय? असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला. एक-दोन सेकंदानंतर लक्षात आल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि डॉक्टरांनी आपल्या समयसूचकतेने नेहमीप्रमाणे ती सभाच जिंकली.

ऑक्टोबर 2012 मध्ये काही हितचिंतक कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मानसिक आरोग्याबाबतचे व्याख्यान असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉक्टरांनी 13 तारीख दिली होती व त्यानुसार आम्ही कार्यक्रम पत्रिका छापली होती. कार्यक्रमपत्रिका छापून नुकतीच हातात पडली आणि डॉक्टरांचा फोन आला की, चुकून 13 तारीख तुम्हाला दिली आहे. 13 ला पूर्वीचा नियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे 19 तारखेला कार्यक्रम तासगावला घ्या. कार्यक्रमास अजून वेळ होता. डॉ. प्रमुख वक्ते होते. त्यांना फक्त बदललेली तारीख सांगून थांबता आले असते. पण डॉक्टरांना चळवळ चालवायची होती. कार्यकर्ते पण त्यांच्या हाडामासात-रक्तात भिनलेले होते. म्हणूनच त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा तपशील विचारला आणि कार्यक्रम पत्रिकेची छपाई झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी कार्यक्रमपत्रिका दुसरी छापा मी त्याचा पूर्ण खर्च देतो असे सांगूनच फोन ठेवला. प्रवासखर्च आणि 15-20 हजार रूपये घेऊन वक्ता म्हणून मिरवणारे अनेक बघितले परंतु चळवळीच्या रूपयाची किंमत किती अमूल्य आहे. ती वाया जाऊ नये याची जाणीव करून देणारा हा कर्ता समाजसुधारक वेगळाच. डॉक्टर ठरल्याप्रमाणे कार्यक्रमास आले. माझ्याकडे मुक्काम केला. त्यादिवशी आणि रात्री मारलेल्या गप्पा आणि झालेली भेट हीच शेवटची ठरली.

जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून 2007 साली त्यांच्यासोबत पाच दिवसांचा जिल्हा दौरा केला. रात्रं न दिवस त्यांच्या सोबत राहण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. पहाटे 5 ला सुरवात होणारा दिवस रात्री 11-12 वाजता संपायचा. दिवस कितीही वाजता संपू दे. चालू मात्र पहाटे पाचलाच व्हायचा. कितीही दमछाक होऊ दे. उत्साहाचं लोड शेडींग कधीही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे टोकाच्या विरोधाला सामोरं कसं जायचं. विरोध जाणवू लागला की, भल्याभल्यांचा तोल सुटतो, पारा चढतो. पण कितीही विरोध असला तरी आपला सत्यावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. आपलं म्हणणं निर्भिडपणे, ठामपणे पण शांतपणे कसं मांडायचं याचा एक चांगला अनुभव या दौर्‍यात आला. डॉ. दाभोलकरांचं भाषण आहे म्हटलं की, अनेक सनातन्यांनी अगोदरच संयोजकांना, पोलीस स्टेशनला अर्ज दिलेले असायचे. संयोजक कच्चा असला की, अडचण व्हायची. परंतु आमच्या दौर्‍यात बहुतांशी कार्यक्रम शाखानीच आयोजित केलेले होते. त्यामुळे त्याची अडचण नव्हती. पण डॉक्टरांना याबाबतीत कोणताच तणाव जाणवायचा नाही. मिरजेच्या एका कॉलेजमध्ये तर प्राचार्याच सनातनी विचारांच्या, जरा नाखुषीनेच त्यांनी कार्यक्रमास परवानगी दिली होती. डॉ. दाभोलकरांसोबत आम्ही 4-5 जण प्राचार्य मॅडमच्या केबीनमध्ये गेलो. त्यांनी नाखुषीनेच चहा मागवला. तुमची अंनिस कशी देवा-धर्माच्या विरोधात आहे. तुमचे विज्ञान कसे अपूर्ण आहे आणि आमचा धर्म कसा श्रेष्ठ आणि परिपूर्ण आहे याचा पट्टा त्यांनी लावला. प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अर्धा तास वरील पट्टाच जोरात चालवला आणि त्यानंतर डॉ. दाभोलकर बोलायला उभे राहिले. आपल्या 50-55 मिनिटांच्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या व्याख्यानात मॅडमच्या अंनिसवरील एकाही आरोपांचे डॉक्टरांनी खंडन केले नाही. फक्त विज्ञानावरील आरोपांचे खंडन केले ते पण 2-3 मिनिटात. विरोधकांच्या प्रत्येक मतांचे, आरोपांचे निराकरण करण्यात वेळ न घालवता आपले म्हणणे प्रभावीपणे त्यांनी मांडले आणि त्याचा परिणामस्वरूप विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांनी असला वक्ता ऐकल्याचे मान्य केले आणि संपूर्ण दौर्‍यात सर्वात जास्त पुस्तके तेथेच विकली गेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मॅडमनी पहिल्यांदा 10 व दुसर्‍यांदा 30 मिनिटे असा विरोधाचा भडीमार केला होता त्यांनीच कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या मनाने डॉक्टरांना तुमच्याबद्दल गैरसमज झाल्याचे कबूल करून, माफी मागून अगदी आग्रहाने आणि खुशीने जाताना दुसराही चहा दिला. शत्रूंनादेखील मित्र करण्याची हीच कला चळवळ वाढवण्यासाठी झाली आणि हीच कदाचित डॉक्टरांचा घात करणेसाठी कारणीभूत ठरली असावी.

2000 साली डॉक्टरांना मी पहिले पत्र लिहिले. त्यामध्ये मुख्यत: तीन मुद्द्यांबाबत मी त्यांना विचारले होते. 1)कोकणात अ.भा.अंनिसबद्दल काय भूमिका? 2)माझं लग्न पारंपारिक पद्धतीने झालेले आहे. 3)मी मुस्लिम धर्मीय असल्याने इतर धर्माची धर्मचिकित्सा कशी काय करू शकतो? डॉक्टरांनी दिलेले याचं उत्तर आजदेखील मला आठवतं आणि माझं जीवनतत्वज्ञान झालं आहे. त्यांनी दिलेली उत्तरे थोडक्यात अशी.

1) इतर कोणत्याही/समविचारी संघटनेबाबत, तत्वज्ञानाबाबत भूमिका सहकार्याचीच घ्यावी. आपलं काम ठामपणे, निर्धाराने करीत रहावे. लोक योग्य निर्णय घेतात. 2)कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया सुरू असताना किंवा नंतर अपरिहार्य कारणामुळे प्रतिगामी निर्णय झाले असतील तर दबाव न होता या पुढे पुरोगामी निर्णय घेण्याचे प्रयत्न करावेत व पूर्वी झालेल्या चुका स्पष्टपणे मान्य कराव्यात. लाईन ऑफ थिंकींग, विचार करण्याची दिशा कशी असते याचा नमुना म्हणून मी वरील पत्राचा उल्लेख केला. खरेतर या लाईन ऑफ थिंकींगनेच आम्हाला घडविले.

ऑगस्ट 2013 ला डॉक्टरांचे शेवटचे पत्र आले. “सांगली जिल्ह्याच्या बैठकीच्यावेळी तुझी भेट झाली नाही. त्यामुळे चुकल्यासारखे वाटले. तुला तब्येतीचा काही त्रास पुन्हा सुरू झाला आहे. असे कानावर आले. आता तब्येत पूर्ववत झाली असेल अशी आशा आहे.” खरं तर यावेळी मी राज्यपदाधिकारी, जिल्हापदाधिकारी किंवा तालुकापदाधिकारी नव्हतो. शाखेचा सामान्य कार्यकर्ता होतो. 3-4 वर्षांपासून तर संघटनेत पण कमीच सहभागी होतो. परंतु डॉक्टरांसोबतचा हाच भावनेचा धागा संघटनेत कार्यकर्त्यांना बांधून ठेवत होता. मी न भेटण्यामुळे डॉक्टरांना थोडावेळ चुकल्यासारखे वाटलं. पण डॉक्टर मला यापुढे कधीही भेटणार नाहीत, चर्चा करणार नाहीत, पत्र लिहणार नाहीत त्यामुळे मला आयुष्यभर चुकल्यासारखं वाटेल? त्याचं काय???

फारूक गवंडी, तासगाव