अंनिवाचे वाचक आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे हितचिंतक अ. दि. तापकिरे यांनी महाराष्ट्रातील एका दैनिकात अलिकडेच प्रसिद्ध झालेला पुढील लेख पाठविला आहे आणि याबाबतचं सत्य काय ते मांडण्याची विनंती केली आहे.
“रामसेतूच्या दगडातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन!”
‘पिप’ (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त झालेले रामसेतूच्या दगडाच्या प्रभावळींचे छायाचित्र
1) रामसेतूचा दगड प्रवाळासारखा असलेला हा दगड पाण्यावर तरंगतो.
2) वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश.
एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, ती वस्तू सात्विक आहे की, नाही किंवा ती वस्तू अध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे की नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असे. संत सूक्ष्मातील जाणून शकत असल्याने ते प्रत्येक वस्तुतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. भक्त, साधक, संतांनी सांगितलेले शब्दप्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धिप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते. येथे रामसेतूच्या दगडातून कशी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे पडताळण्याच्या उद्देशाने त्याची वैज्ञानिक चाचणी करण्यासाठी आर.एफ.आय.रिडींग उपकरण आणि पिप तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
3) आर.एफ.आय.(RFI) रिडींग उकरण आणि पिप (PIP) तंत्रज्ञान यांची ओळख
आर.एफ.आय.(रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) रिडींग उपकरणाच्या सहाय्याने आपण वातावरणातील वैश्विक ऊर्जा मोजू शकतो, तर पिप(पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणाया स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ(ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय उपकरणाला व्हिडीओ कॅमेर्याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जावलये पाहता येतात. हे उपकरण रंगांचे विभाजन करते. यात सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय आहे. पिप प्रणालीनुसार नारिंगी आणि जांभळा रंग तणावाची किंवा त्रासदायक स्पंदने यांचे प्रतीक आहे. गुलाबी रंग राजसिकतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग आध्यात्मिक उपायांशी संबंधित सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. निळा(आकाशी) रंग सात्विकता किंवा शांती यांचे प्रतीक आहे, तर सोनेरी छटा असलेला पिवळा रंग उच्चस्तरीय वैश्विक स्पंदने दर्शवतो.
4) निरीक्षणे आणि त्यांचे विवरण
4 अ) आर.एफ.आय.(रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) नोंद आणि तिचे विवरण : प्रयोगासाठी रामसेतूचा दगड ठेवल्यावर त्याच्या जवळच्या वातावरणातील आर.एफ.आय.कंपनसंख्या 143.7 मेगाहर्ट्झ आली. या कंपनसंख्येचा रंग हिरवा आहे. हा रंग सात्विकता दर्शवतो आणि तो वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर करून सात्विकता वाढवणारा आहे.
4 आ. पिप(पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)द्वारे प्रभावळीचे केलेले वर्णन आणि त्याचे विवरण : रामसेतूच्या दगडाच्या प्रभावळीवरून हा दगड पुष्कळ सात्विक आहे, असे दिसून येते. या दगडाभोवती सात्विक अशा आकाशी रंगाची आणि गतीमान अशा हिरव्या रंगाची वलये दिसून येतात. ही वलये वातावरणातील त्रासदायक अशा जांभळ्या आणि नारिंगी वलयांना दूर करत आहेत.
श्री.संतोष शामराव जोशी
(वैश्विक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, डोंबिवली. 19/4/2012)
खरं काय?
काही वेळा अस्सल विज्ञान आणि भ्रामक विज्ञान यांच्यातल्या फरकाची सीमा धूसर असते. भ्रामक विज्ञान नेहमीच अस्सल विज्ञानाचा आव आणतं. एखादी कपोलकल्पित संकल्पना खरी ठरावी अशा इच्छेनं चुकीच्या पद्धती वापरत स्वप्नरंजनाचा सतत पाठपुरावा करत रहाणं हे भ्रामक विज्ञानाचं गमक असतं. भ्रामक विज्ञानाचं वैशिष्ट्य असं की ते वापरतात वैज्ञानिक शब्द पण संबंधित संकल्पना अवैज्ञानिक असतात. कोणत्याही भाषेत शब्दांना विशिष्ट अर्थ आणि नेमके संदर्भ असतात. पण भ्रामक विज्ञानाला या नेमकेपणात रस नसतो. या लेखात मांडलेलं तथाकथित संशोधन हा भ्रामक विज्ञानाचा आणि त्याच्या आक्रमक पुरस्काराचा नमुना आहे. आपण त्याची क्रमश: चिकित्सा करूया.
फेब्रुवारी 2000 मध्ये ‘नासा’च्या उपग्रहानं पाल्कच्या सामुद्रधुनीच्या घेतलेल्या छायाचित्रात भारत आणि श्रीलंका या भूप्रदेशांना जोडणारी मोठ्या प्रवाळ खडकांची रांग पाण्याखाली असलेली दिसली. ही लाखो वर्षांपूर्वींची आहे असा निष्कर्षही ‘नासा’नं काढला. तेव्हा अमेरिकेतील वैष्णव न्यूज नेटवर्क आणि इतर काही वृत्तसंस्थांनी हे रामसेतूचे अवशेष असल्याचा दावा केला. ‘नासा’नं आणि नंतर भारतीय पुरातत्व विभागानं याचा अधिकृतपणे इन्कार केला. कार्बन डेटिंग पद्धतीनुसार या खडकांचं वय सुमारे सव्वा पाच लाख वर्षं इतकं आहे. कालमापनाची नीटशी जाणीव नसलेल्या परंपराभिमान्यांना रामायण ‘इतकं जुनं’(!) असल्याबद्दल आनंद झाला. पण रामायणातील प्रत्येक शब्दावर पूर्णपणे श्रद्धा ठेवणारे अभ्यासक रामायणाचा काळ आजपासून साडेसात ते दहा हजार वर्षांपूर्वीचा असल्याचं मानतात. या काळाशी खडकांचा काळ जुळत नसल्यामुळे साहजिकच ही भौगोलिक रचना म्हणजे वानरनिर्मित रामसेतू नाही हे सिद्ध होतं. इथं एक वेगळा मुद्दा आवर्जून नमूद करायला हवा. मूळ वाल्मिकी रामायणात राम नर्मदा ओलांडून दक्षिणेकडे गेल्याचा उल्लेखही आढळत नाही. प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ ह. धि. सांकलिया, मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे, रामायणावर आयुष्यभर संशोधन करणारे मा. वि. किबे यांनी आणि इतरही अनेक अभ्यासकांनी रावणाची लंका मध्यप्रदेश, ओरिसा या भागात(आजचा झारखंड) असावी असं म्हटलंय. श्रीलंका ही रावणाची लंका नसेल तर कुठला रामसेतू आणि कुठली पवित्र स्पंदनं!
दुसरा मुद्दा पाण्यावर दगड तरंगण्याचा. रामेश्वरला मोठ्या संख्येने भेट देणार्या हिंदू श्रद्धाळूंना रामतीर्थ, हनुमान तीर्थ इथं ‘रामाच्या पदस्पर्शानं पावन झाल्यामुळे तरंगणारे’ दगड दाखवले जातात. तिथले टुरिस्ट गाईड आणि एजंट याच प्रकारचे दगड अवाच्या सव्वा किंमतीत विकतात. वस्तुत: हे दगड प्रवाळजन्य खडक असतात. हे सच्छिद्र असल्यामुळे त्यांचं आकारमान वस्तुमानापेक्षा जास्त असतं. साहजिकच ते पाण्यावर तरंगतात. अशा तरंगणार्या आणि म्हणूनच अस्थिर असणार्या, शिवाय वजन पेलण्याची क्षमता कमी असणार्या दगडांचा 30 कि.मी.(18 मैल) लांबीचा पूल…. त्यावरून हजारोंचं सैन्य जाईल अशी कल्पना करणार्यांची मानसिक स्थिती तपासायला हवी! प्रत्यक्षात वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडाच्या 22 व्या सर्गात सेतू बांधण्याचं वर्णन आहे, त्यात कुठेही ‘रामनामे पाषाण तरल्याचा’ उल्लेख नाही, तर अजस्र वृक्ष आणि पाणी उंच उडेल इतके मोठे दगड वापरून पूल उभारण्याचं वर्णन आहे. तेव्हा जो तपासला जातोय तो रामसेतूचा दगडच नाही, तरीही तो सात्विक असल्याचा निष्कर्ष निघत असेल तर… भाष्य अनावश्यक!
“बुद्धीप्रामाण्यवाद्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते” याचा अर्थ यंत्र म्हणून कोणीही काहीही आणेल आणि आम्ही ते डोळे मिटून स्वीकारू असा होत नाही. ‘रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग’ आणि ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफिअरन्स फोटोग्राफी’ यामागचं तंत्रज्ञान पाहिलं की त्यामागची भ्रामकता लक्षात येईल.
आर.एफ.आय.चा उपयोग वैश्विक ऊर्जा मोजण्यासाठी करतात, असं विधान आहे. वैश्विक ऊर्जा(Cosmic energy) म्हणजे काय? वैज्ञानिक हा शब्द विविध संदर्भात वापरतात. ‘विश्वशास्त्रानुसार स्थिरांक’; पुंजभौतिकीनुसार ‘पुंजपोकळी शून्यबिंदू ऊर्जा’; भौतिक विश्वशास्त्रानुसार ‘कृष्णऊर्जा’ अशा अभिप्रेत अर्थांनी वैश्विक ऊर्जा हा शब्द वापरला जातो. यातल्या काही गोष्टी विज्ञानाच्या पदवीधरांनाही माहीत नसतात तर अध्यात्मवाद्यांची काय कथा?
मग ही वैश्विक ऊर्जा आली कोठून? ‘सर्व सजीवांना चालना देणारी प्राणशक्ती’ ही संकल्पना हिंदू तत्वज्ञानाकडून भाषांतरित करताना सर जॉन वुड्रॉफ यांनी उेीाळल शपशीसू हा शब्द प्रचलित केला. अध्यात्मवाद्यांना अभिप्रेत आहे ती ही वैश्विक ऊर्जा. आत्म्यांसाठी माध्यम म्हणून काम करणार्या आणि टेरो कार्डद्वारे भविष्य सांगणार्या मॅथ्यू ग्रीन वस्तू, प्राणी, वनस्पती आणि अर्थातच माणसं यांच्याभोवतीची प्रभामंडळं(ऑरा) आणि जैविक ऊर्जा क्षेत्र(बायोएनर्जी फिल्ड)- वैश्विक नव्हे- ‘मोजण्यासाठी हे उपकरण बनवलं. खरं तर विज्ञानाच्या दृष्टीनं लाकूड, कोळसा, शेण, कचरा, बायोगॅस असे जैविक स्त्रोत वापरून केलेली ऊर्जानिर्मिती म्हणजे जैविक ऊर्जा. पण इथं अभिप्रेत आहे ती ‘सर्व सजीवांना चालना देणारी प्राणशक्ती’ वैश्विक ऊर्जा किंवा तसलंच काही तरी! ती ‘रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग’ वापरून मोजायची. अजूनही हे तंत्रज्ञान प्रयोगावस्थेतच आहे, असं त्याचेच पुरस्कर्तेसांगतात. पण अर्थात वैश्विक(की जैविक) उर्जेची बिनबुडाची कल्पना सिद्ध करायला पूर्णत्वाला न गेलेलं तंत्रज्ञान असलं म्हणून काय बिघडलं? आर.एफ.आय.चा एक भाग म्हणजे साधा डिजिटल फ्रिक्वेन्सी काऊन्टर(विद्युत चुंबकीय कंपनसंख्या मोजणारं उपकरण) आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मिळालेल्या माहितीचा ‘अर्थ लावणारं(!) एक खास सॉफ्टवेअर. ही ऊर्जा मोजायची रेसोनन्स म्हणजे कंपनं किंवा स्पंदनांवरून. पण एखाद्या वस्तूजवळ किती कंपनसंख्या असली तर त्याचा अर्थ काय समजायचा याबद्दल एकवाक्यता नाही. त्यासाठी तर ते खास सॉफ्टवेअर आहे. त्याची मदत घेतली की, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला एक रंगीबेरंगी प्रतिमा दिसते. तिचा अर्थ कसा लावायचा याबद्दलही एकवाक्यता नाही. तरीही ते फक्त तज्ञांनाच कळतं अशी मखलाशी केली जाते. यावरून ‘ऑरा’चं आकलन कसं होतं त्याला मात्र उत्तर नाही.
‘ऑरा’ म्हणजे माणसाच्या शरीराभोवती असणारं तथाकथित प्रभामंडळ. कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूतून काही प्रमाणात एक जैविक किंवा वैश्विक शक्ती ओसंडत असते आणि ती शरीराभोवती ऊर्जा क्षेत्र तयार करते, अशी एक भंपक कल्पना मांडली जाते. या प्रभामंडळाचा अर्थ लावला तर माणसाचं व्यक्तीमत्व, आरोग्य आणि त्यावेळच्या भावना ताडता येतात, असा दावा केला जातो. वस्तुत: माणसाच्या मेंदूत चालणारे विचार किंवा भावना या निव्वळ विद्युत-रासायनिक क्रिया असतात. त्या बाहेर ‘उत्सर्जित’ होत नाहीत. त्यामुळे त्यापासून कोणतंही ‘ऊर्जा क्षेत्र’ तयार व्हायची शक्यता नसते आणि व्यक्ती सात्विक आहे की तामसी आहे हेही कळायची शक्यता नसते. माणसाच्या शरीराभोवती त्याच्या जिवंतपणामुळे औष्णिक, विद्युत चुंबकीय आणि स्थिर विद्युत क्षेत्रं असतात आणि बाहेरचं हवामान आणि शरीरांतर्गत क्रिया यानुसार त्यात काही बदल होत असतात, एवढं आणि एवढंच फक्त खरं आहे. तर असं हे ऑरा किंवा प्रभामंडळ ‘दैवी देणगी’ मिळालेल्या काही मोजक्या लोकांशिवाय इतर कुणाच्या लक्षातच येत नाही! मोजक्या लोकांच्या ताब्यात असलेला धर्म सर्वांच्यापर्यंत नेण्याचीही एक चळवळ असते. (ती धर्म नाकारण्यामागचं मर्म ध्यानात घेत नाही) तसंच ‘दैवी देणगी’ नसली म्हणून काय झालं, आम्ही विज्ञानाच्या आधारे हे प्रभामंडळ पाहू, असा हट्ट धरून ‘नवनवीन’ तंत्रज्ञानं वापरली जातात.
यातलंच आणखी एक म्हणजे ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफिअरन्स फोटोग्राफी’. विद्युत स्फटीक ही भ्रामक पद्धत वापरून उपचार करणार्या हॅरी ओल्डफिल्डनं 1989 मध्ये ते शोधून काढलं. त्यामागची गृहितकं अशी: 1) कोणत्याही सजीव-निर्जीव पदार्थाभोवती एक ‘ऊर्जा क्षेत्र’(ऑरा) असतं. 2) त्यात अपाती व परावर्तित प्रकाशकिरणांमुळे व्यतिकरण होतं.(साध्या भाषेत अडथळा किंवा व्यत्यय येतो) 3) माणसाच्या शरीरातला प्रत्येक अणू दर सात ते नऊ वर्षांनी बदलला जातो; शरीर हे सतत बदलणार्या रेणूंचं कारंजं आहे, तरीही त्याचा आकार स्थिर रहातो याचं कारण म्हणजे उर्जेचा संघटित साचा, 4) उर्जेची प्रकाशाबरोबरची अंतर्क्रिया समजली तर ज्यावर रेणू टोचलेले असतात त्या ईथरच्या(उर्जेचं प्रतिरूप!) साच्याबद्दल यथार्थ ज्ञान होईल.
आता ही गृहितकं क्रमश: तपासून पाहू. 1.माणसाच्या शरीराभोवती कोणती क्षेत्रं असतात आणि ऑरा ही संकल्पना कशी भ्रामक आहे ते आपण वर पाहिलंच आहे. 2.प्रखर प्रकाश पडला तर शरीराभोवतीचं तापमान वाढेल. त्यामुळे उष्णता वाढली तर घाम येईल आणि फार घाम आला तर दमल्यासारखं वाटेल, एवढंच. ऑराचं नाही तर व्यतिकरण कशाचं होणार? 3.माणसाच्या शरीरातला प्रत्येक अणू दर सात ते नऊ वर्षांनी बदलला जातो, याला पुरावा काय? माणसाच्या शरीराभोवती ऑरा असतो आणि ऑरामुळे मारसाच्या शरीराचा आकार नियंत्रित रहातो या परस्परविरोधी विधानांमुळे तर पहिल्या गृहितकावरच घाला येतो, 4.अवकाशामध्ये भरून राहिलेलं द्रव्य म्हणजे ईथर अशी एक जुनाट कल्पना होती. विज्ञानानं ती कधीच खोटी ठरवली आहे. अशा नसलेल्या गोष्टीला उर्जेचं प्रतिरूप म्हणायचं आणि त्याचा साच्यावर रेणू टोचलेले असतात अशी पूर्णत: अवैज्ञानिक विधानं करायची हा भ्रामक विज्ञानाचा शाब्दिक भुलभुलय्या आहे.
आता पीआयपीच्या तंत्रज्ञानाबद्दल. क्रिलिअन फोटोग्राफी आणि विद्युत-स्फटीक उपचार यांची वैशिष्ट्ये एकत्रित करून ही फोटोग्राफीची ‘कला’ विकसित केली आहे. मायक्रोचिप वापरलेला स्कॅनर एवढंच तंत्रज्ञान, बाकी काम कंप्युटर प्रोग्रॅम करतो! पांढर्या पार्श्वभूमीवर व्यक्तीचं व्हिडीओ कॅमेर्यानं शुटींग करायचं मग एक ‘खास’ सॉफ्टवेअर शरीराभोवती विविध रंग आणि आकृतीबंध दाखवतं. या प्रतिमा सायकेडेलिक म्हणजेच आभास निर्माण करणार्या (भ्रमोत्पादक) असतात. त्यातून मग लाल म्हणजे तामसीपणा, हिरवा म्हणजे सात्विक किंवा संतुलित असे अर्थ काढले जातात. अंगावर कमीत कमी कपडे असतील तरच ऑरा दिसतो, कपडे असतील तर नीट दिसत नाही, याचं कारण व्यक्ती शरीराभोवतीची उष्णता आणि आर्द्रता हे या तथाकथित ऑराला कारणीभूत असतात.
सुरवातीला हा खुळचटपणा माणसापुरताच मर्यादित होता. नंतर तो प्राणी, वनस्पती आणि निर्जीव वस्तूंसाठीही वापरला जाऊ लागला. कारण ‘शुटींग’ केल्यानंतर जिवंत माणसाप्रमाणेच खोलीच्या भिंती आणि खोलीतलं फर्निचर यांच्याभोवतीही ‘ऊर्जाक्षेत्रं’ दिसायला लागली! मग त्यांच्यातल्या सत्व, रज, तम गुणांचा शोध सुरू झाला. पृष्ठभागाचा ओलावा आणि तापमान योग्य ते असेल किंवा सॉफ्टवेअरमधला फोटो-मोन्टाज(दृश्यमिश्रण) पर्याय वापरला की प्रतिमा हवी असेल तशीच मिळते. काल्पनिक रामसेतूचा दगड सात्विक बनला तो असा!
डॉ.आशुतोष मुळ्ये
मोबा. 9420599744