बहुसंख्य कार्यकर्ते स्वत:चे कुटुंब व स्वत:चा व्यवसाय सांभाळून तीन नंबरच्या प्राधान्यक्रमाने समितीचे कार्य करतात आणि ते बहुतेक वेळा घरचे खाऊन लष्कराच्या भाकर्या भाजतात. अंनिसची शाखा चालवण्यासाठी कोणालाही कसलीही मदत मध्यवर्ती देत नाही. स्वत:चे पैसे स्वत: उभारावे व खर्च करावेत अशीच कल्पना आहे व त्याची अंमलबजावणी होते. राज्यकार्यकारिणी वर्षातून तीन वेळा होते. अत्यंत नियमाने कार्यकारिणी सदस्य येतात. अपवाद वगळता त्यापैकी कोणी प्रवास खर्च घेत नाही. संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय येथील एकूण यंत्रणेसाठी नियमित क्लार्क, शिपाई जागा अशी व्यवस्था नाही. (त्यामुळे अडचण होते; परंतु तरीही सर्वसाधारण काम ठीक चालते.) ही संघटना पद्धती हा झाला एक भाग. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे समितीला कामासाठी हवा तेवढा पैसा दरवर्षी देणग्यातून व वार्तापत्राच्या जाहिरातीतून निश्चितपणे उपलब्ध होतो. लोकांना चळवळ हवी आहे याची ही खूण आहे असेच मी मानतो. महाराष्ट्रातून कुठून कुठून येणारे हे आर्थिक मदतीचे हात मला अचंबित करतात.
‘तुम्ही भाग्यवान दिसता. महाराष्ट्रात तुमच्याच संघटनेचे बरेच बरे चालले आहे’ – महाराष्ट्रातील सामाजिक संघटना चळवळीशी दीर्घकाळ संबंधित असलेल्या एक ज्येष्ठ व्यक्तीने एका भेटीत मला हे ऐकवले.
मी कुतुहलाने विचारले, ‘म्हणजे काय?’
‘तुमच्या समितीत गटबाजी दिसत नाही.’
‘जातीचा प्रश्न सतावताना आढळत नाही.’
‘काम बरेच चालू असते; पण आर्थिक अडचणीने बेजार झाल्याचे चित्र नाही.’
‘शिस्तही ठीक आहे.’ प्रसिद्धी भरपूर मिळते.’ ‘संघटनेला नाव आहे.’ वगैरे… वगैरे….. वगैरे….
मला बरे वाटले हे तर निश्चितच; परंतु काही प्रमाणात हे खरे आहे हेही निश्चित. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव आता ‘अंनिस’ म्हणून तमाम महाराष्ट्राच्या तोंडात रूळले आहे. एका खटल्यात दस्तुरखुद्द न्यायमूर्तींच्या तोंडातून मी हा शब्द ऐकला आणि अंनिस सर्वदूर पोचल्याची खात्री पटली. संघटनेचा इतिहास अवघा 17 वर्षांचा आहे. संघटना वयात येते आहे. अशा वेळी वरील उपलब्धी ज्या प्रमाणात खर्या असतील त्या प्रमाणात आश्वासक आहेत. माझा व्यक्तीगत अनुभव असा की, अपरिचित ठिकाणी व्यक्तीचा माझे अथवा संघटनेचे नाव सांगितले की 70% लोकांच्या चेहर्यावर तरी एक ओळख उमटते. ती ओळख त्यांच्या विचार विश्वात अंनिस हा शब्द नोंदला गेला असल्याची खूण असते. अंनिसला बदनाम करण्याचे भरपूर प्रयत्न झाले. ते शत्रूकडून झाले कधी मित्रांकडूनही झाले. कोणी ही संघटना धर्मविरोधी असल्याचा कांगावा केला. कोणाला यात ब्राम्हणी कारस्थान दिसले, त्यावरून बुद्धीभेदाचे प्रयत्न झाले. तरीही याचा परिणाम वर उल्लेख केलेल्यापैकी कोणत्याही बाबीवर झाला नाही. संघटनेत गटबाजी झाली नाही. भांडणे लागणे तर दूरच राहिले. कोणी जातीचे, प्रादेशिक अस्मितेचे मुद्दे काढले नाहीत. देणगीदाराने आणि जाहिरातदाराने हात आखडला नाही. संघटनेची शिस्त बिघडली नाही. संघटनेची माध्यमातील जागा कमी झाली नाही की संघटनेबद्दलची लोकांची सदिच्छा आटली नाही.
मला काही वेळा या सगळ्याचे कोडे वाटते. या सर्व बाबतीत संघटनेचे प्रयत्न केले हे सत्य आहे; परंतु आखीव रेखीव प्रशिक्षण, शिस्तबद्ध कॅडर बांधणी, काही विशेष प्रलोभने, असे काहीही संघटनेने केले नाही. तरीही हे घडून आले हे खरे आहे.
याची काही कारणे वर वर पाहता दिसतात आणि रास्तही आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा यांच्या निधनानंतर तसेच किर्लोस्कर मासिकाची याबाबतची धडधडती तोफ थंडावल्यानंतर महाराष्ट्रात जवळजवळ 30 वर्षेधर्म चिकित्सा सोडाच अंधश्रद्धा विरोधी संघर्षाबाबतही सन्नाटा होता. आधुनिकता, विज्ञानप्रसार, शिक्षणप्रसार यातूनच हे घडून येईल अशी एक भाबडी आशाही असावी. व्यवहारात यासंदर्भात काहीच चालू नव्हते. एवढे मात्र खरे. अंनिसतर्फे हे काम चालू झाले आणि त्याचे स्वागतही झाले; परंतु तरीही बर्याचदा अशी कामे 5-7 वर्षात विझतात. आपल्या चिकाटीमुळे अंनिस त्याला अपवाद ठरली. विविध उपक्रमांतून अंनिसने आपल्या कामाचे क्षितीज वाढवले. संघटनात्मक विस्तारही केला. लोकसंवादाची प्रबोधनाची भूमिका कायम ठेवली. अंनिसला चांगली प्रसिद्धी सतत मिळाली असे मला वाटते. सतत दीड तप अशी अनुकूलता लाभणे हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एखाद्या संघटनेच्या क्वचितच वाट्यास आले असेल. संघटना प्रसिद्धीला लालसावेलेली नाही. कार्यकर्तेप्रामाणिक आहे. या गोष्टी संघटनेला उपकारक ठरल्या हे खरेच. अंनिस प्रसिद्धी मिळवण्यात वाक्बगार आहे असा आक्षेप संघटनेवर घेतला जाऊ नये असे मला वाटते. समितीला मिळालेल्या प्रसिद्धीसाठी समितीने कधीही कोणालाही कसलीही गैर प्रलोभने दिल्याचे मला आठवत नाही. ही बाब अत्यंत कटाक्षाने सर्वांनी सांभाळलेली आहे; परंतु अंनिसचे कार्यक्रम प्रसिद्धी झोतात राहिले याचे महत्वाचे कारण श्रद्धा, अंधश्रद्धा ही बाब सर्व स्तरातल्या, सर्व वयोगटातल्या, सर्व जाती धर्माच्या, स्त्री पुरूषांच्या मनात सतत की जास्त प्रमाणात चर्चेत राहिली आहे. स्वाभाविकच अशा विषयावरील बातम्या वृत्तपत्रांना हव्या हव्याशा वाटल्या तर नवल नाही. या बरोबरच अंनिसने घेतलेले उपक्रम हे कल्पक व बातमीमूल्य असणारे होते. शोध भूताचा, बोध मनाचा, सर्पयात्रा, भानामती निर्मूलनाची धडक मोहीम, चमत्कार सत्यशोधन मोहीम, बुवांचा पर्दाफाश या बाबी निश्चितच उत्कंठा वाढवणार्या ठरतात व ठरल्या. या सर्वांबरोबर एक जोखीमही होती. ती अशी की अंनिसचे काम संवेदनशील क्षेत्रात आहे. शनी शिंगणापूरबाबत एकदा याचा फटका मला आणि संघटनेला बसला आहे; परंतु संघटनेची प्रामाणिक भूमिका ही संयमाची आहे याची प्रसारमाध्यमांना खात्री आहे. म्हणूनच कायदा निर्मितीच्या वेळी समितीच्या विरोधात कमालीचा गदारोळ उठवण्याचा प्रयत्न झाला तरीही संघटनेला त्याचा धक्का बसून प्रसारमाध्यमे विरोधी जाण्यात त्याचा परिणाम झाला नाही. आता इतर मुद्द्यांकडे वळू संघटनेत गटबाजी नाही. जातीच्या आधारावर कसलाच विचार केला जात नाही. शिस्त आहे. आर्थिक ताण नाही, हे सर्व चांगले शेरे ऐकले की मला सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या मला आठवलेल्या एका पुस्तकाची आठवण होते. या पुस्तकाचे नाव आहे ‘हे सारे कुठून येते?’ अगदी खरे विचाराल तर मला तरी यावरील प्रश्नांची विश्लेषणात्मक उत्तरे माहीत नाहीत.
शिस्तीची बाब घेऊ. समितीची संघटनात्मक शिबीरे होतात त्यात कार्यकर्त्यांने कसे वागावे हे सांगितले जाते. कार्यकर्ता आपल्याहून संघटनेत जुन्या असलेल्या कार्यकर्त्यांचे वर्तनही बघत असतो. तो आपापसात चर्चाही करत असेल; परंतु समितीची एकूण संघटनात्मक बांधणी बरीचशी मोकळी ढाकळी आणि काहीशी विस्कळीत आहे. अशा संघटनेला नेहमीच शिस्तीचे प्रश्न भेडसावण्याचा धोका असतो. समितीला तसा धोका कधीही झालेला नाही. समितीचे राज्य पातळीवरचे सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तीत व वेळेत पार पडतात. अशा कार्यक्रमात अनेकदा अनपेक्षित अडचणी येतात. कधी अल्पोपहार मिळत नाही. कधी जेवण पुरत नाही, कधी भाषणे कंटाळवाणी होतात तर कधी कार्यक्रमाच्या अतिरिक्त मार्यामुळे शारीरिक, मानसिक थकावट येते. अशा वेळी शिस्तीचा कस लागतो आणि याबाबत संघटना कसाला उतरली आहे. एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे. शनी शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश द्यावा यासाठीचा सत्याग्रह 11 जूनला होता. त्याआधी आम्ही तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. जिल्हा पोलीस प्रमुख सतत तंबी देत होते की, 11 जूनचा सत्याग्रह मागे घेतला जावा. त्यांचे म्हणणे होते की, नगर हा संवेदनशील जिल्हा आहे. महाराष्ट्रातून येणारे समितीचे सत्याग्रही कसे वर्तन करतील याची खात्री कोण देणार? यामुळे सत्याग्रह राहिला बाजूला, काही भलतेच विपरीत होऊ शकेल. हे लक्षात घेऊन सत्याग्रह मागे घेण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. समितीने तो मानला नाही. सत्याग्रह मोठ्या प्रमाणात झाला. अत्यंत शिस्तबद्ध झाला. सत्याग्रहींनी पोलिसांना, सत्याग्रही तंत्राप्रमाणे पूर्ण सहकार्य केले. अटकेतून सुटल्यावर सर्वजण शांतपणे घरी गेले. कोणीही परस्पर शनी शिंगणापूरला जाण्याचा आगाऊपणा केला नाही या सर्वांमुळे त्यावेळचे नगरचे जिल्हा पोलीस प्रमुख प्रभावित झाले; तुरूंगातून सुटून मी पुण्याला आलो त्यावेळी त्याचा फोन आला की, हल्ली संघटनामध्ये अशी शिस्त पाळण्याचे आश्वासन कोणी देत नाही. आणि ते दिले तर तुमच्या संघटनेच्या लोकांनी ज्या काटेकोरपणे ते पाळले तसे कोणी पाळत नाही. अर्थात संघटनेची ही शिस्त संघटनेच्या दैनंदिन कामात, संघटनात्मक कामात दिसत नाही. शाखांच्या बैठका नियमितपणे होत नाहीत. संघटनात्मक बाबी नीटपणे पाळल्या जात नाहीत. या अर्थाने संघटनेचे शिस्तीचे बाह्यरूप अधिक जोमदारपणे प्रत्यक्षात घेण्याची गरज जाणवते.
कोणत्याही चळवळीला आर्थिक आधार लागतोच; पण अंनिससारख्या प्रवाहाविरूद्ध पोहणार्या चळवळींच्याबाबत तो मिळणे अधिक अवघड असते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान एका विशिष्ट उपक्रमासाठी काही मदत देते. तर स्वयंअध्ययन परीक्षेद्वारे काही पैसे उभे राहतात. अर्थात अंनिसला प्रामुख्याने दिवाळी अंकातील जाहिरातीतूनच व देणग्यांच्याद्वारे निधी मिळतो.
अशा अस्थिर स्त्रोतावर अवलंबून वर्षानुवर्षे चळवळ चालवणे हे अवघड आहे. कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना त्याची आर्थिक बाजू आ करून उभी असतेच. याबाबत दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात. एक तर अंनिसकडे जवळपास पूर्णवेळ कार्यकर्ते नाहीतच. बहुसंख्य कार्यकर्ते स्वत:चे कुटुंब व स्वत:चा व्यवसाय सांभाळून तीन नंबरच्या प्राधान्यक्रमाने समितीचे कार्य करतात आणि ते बहुतेक वेळा घरचे खाऊन लष्कराच्या भाकर्या भाजतात. अंनिसची शाखा चालवण्यासाठी कोणालाही कसलीही मदत मध्यवर्ती देत नाही. स्वत:चे पैसे स्वत: उभारावे व खर्च करावेत अशीच कल्पना आहे व त्याची अंमलबजावणी होते. राज्यकार्यकारिणी वर्षातून तीन वेळा होते. अत्यंत नियमाने कार्यकारिणी सदस्य येतात. अपवाद वगळता त्यापैकी कोणी प्रवास खर्च घेत नाही. संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय येथील एकूण यंत्रणेसाठी नियमित क्लार्क, शिपाई जागा अशी व्यवस्था नाही. (त्यामुळे अडचण होते; परंतु तरीही सर्वसाधारण काम ठीक चालते.) ही संघटना पद्धती हा झाला एक भाग. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे समितीला कामासाठी हवा तेवढा पैसा दरवर्षी देणग्यातून व जाहिरातीतून निश्चितपणे उपलब्ध होतो. लोकांना चळवळ हवी आहे याची ही खूण आहे असेच मी मानतो. महाराष्ट्रातून कुठून कुठून येणारे हे आर्थिक मदतीचे हात मला अचंबित करतात.
महाराष्ट्रात हल्ली बहुतेक सामाजिक चळवळी भाषा कोणतीही बोलेत जातीच्या आधारावर उभ्या असतात. ज्या तशा असतात त्या अनेकदा त्यांची इच्छा असो वा नसो एकजातीय बनलेल्या असतात. अथवा आपापल्या संघटनेत जाणीवपूर्वक जातीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वास्तव याबाबत हेवा वाटावा असे आहे. समितीच्या सर्व शाखांच्यात मिळून फार मोठ्या प्रमाणात सर्व जातींचे प्रतिबिंब सभसदांच्या रूपाने आपोआप उमटलेले आहे. परंतु संघटनेने संघटना चालवताना कधीही जातीच्या आधारावर विचार केलेला नाही. समितीच्या शाखा जिल्हा व राज्य कार्यकारिणीच्या निवडीमध्ये कधी चुकूनही कोणता कार्यकर्ता कोणत्या जातीचा आहे याचा विचार झालेला नाही. आणि तो आपण करत नाही कारण आपण खर्या अर्थाने जाती धर्माच्या पलीकडे गेलो आहोत असे समितीला वाटते आणि अशा स्वरूपाची संघटना बांधण्यात मर्यादित प्रमाणात यश आले याला समितीला अभिमान वाटतो.
संघटना म्हटली की, मतभिन्नता आली, व्यक्तीगत राग, लोभ आले. हेवेदावे, स्पर्धा, असूया हे सगळे मानवी दुर्गुणही आले. जेथे माणसे आहेत तेथे हे सारे असणारच; परंतु यामुळे आपल्या कामाला आणि म्हणूनच आपल्या शाखेला, जिल्ह्याला आपापसातील वादाचे ग्रहण लागू नये हा शहाणपणा, समंजसपणा दाखवण्याची गरज असते. ही बाब समितीमध्ये राज्य पातळीवर जवळपास साध्य झाली आहे. राज्याच्या कार्यध्यक्षाला जी कामे करावी लागतात त्यामध्ये शाखाशाखात निर्माण झालेल्या मतभेदाची आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे कामही करावे लागते. मला अशी वेळ जवळपास आली नाही. याचे महत्व या स्वरूपाची जबाबदारी सांभाळणारे अन्य संघटनांचे पदाधिकारी समजू शकतील आणि ते बहुधा माझा हेवाही करतील.
संघटनेत सर्व काही आलबेल आहे. छान छान चालू आहे. शिस्त चोख आहे, आर्थिक ताण नाही, जातीय विचाराला दूर ठेवले आहे, गटबाजी नाहीच, प्रसिद्ध योग्य अथवा भरपूर मिळत आहे असे गोड गुलाबी चित्र या लेखातून रंगवण्याचा हेतू अजिबात नाही. कुणाच्या मनात हा लेख वाचून तशी भावना निर्माण झाल्यास कृपया ती दूर करावी. खरे तर हा लेख हा अनुभवाच्या वास्तवाच्या आधारे केलेले एक प्रगट चिंतन आहे आणि चिंतनात मला पडलेला मुख्य प्रश्न हा आहे की, विशेष असा कोणताच प्रयत्न न करता समितीला या गोष्टी मर्यादित अर्थाने का होईना कशा साध्य झाल्या? याचे उत्तर मला सापडत नाही. विचार करताना एवढेच वाटते की प्रत्येक व्यक्तीत स्वाभाविक विवेकवृत्ती असते, संवेदनशीलता असते. समाजाशी स्वत:ला पटणार्या कामासाठी जोडून घेण्याची ओढ असते. अंनिसबाबत आणखी एक गोष्ट घडली असावी. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हा लोकप्रिय विचार नाही. उलट वादग्रस्त विषय आहे. कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र यांच्यासोबत असलेले संबंध हा विचार स्वीकारल्यानंतर अनेकदा ताणाचे बनतात. व्यक्ती स्वत:च्या प्रेरणेला स्मरण विचारावरची निष्ठा अभंग ठेवते; पण आतून तिला एकटेपण जाणवत असते. अंनिस हा अशा एकट्यांचा तयार झालेला जथा आहे. यामुळे हा जथा जिवंत सक्षम ठेवणे ही त्या जथ्यातील प्रत्येकांची आंतरिक गरज आहे. त्यातून मग शिस्त आपोआप येते. खर्च, जात, गटतट हे विचार आपोआप जोडून घेतो आणि व्यक्ती म्हणून स्वत: असलेल्या उणिवा संघटनेच्या वाट्याला येऊ नयेत त्यासाठी धडपडतो. अर्थात हे झाले माझे मत. वाचकांना काय वाटते? हे सारे कठून येते? मी समजून घ्यायला उत्सुक आहे.
–डॉ. नरेंद्र दाभोलकर
(अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक 2006 या अंकातील लेख)