Categories
आठवणीतले दाभोलकर

संविधान सुवर्ण वर्षातील समता संघर्ष चलो शिंगणापूर

वार्षिकांक – २०१३

शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर फक्त पुरूष जातात महिलांना जाऊ दिले जात नाही. यासाठी समता सत्याग्रह करण्याचे इस्लामपूरच्या राज्यकार्यकारिणीत ठरले आणि या सत्याग्रहात सहभागी व्हायचं हा निर्णय मी घेतला.

हा सत्याग्रह पंढरपुरातून चालू झाला. त्यामध्ये अनेक विचारवंत सामील झाले होते. पन्नालाल आणि विणाताई आमच्या बरोबर सुरवातीपासून शेवटपर्यंत होते. डॉक्टर कोणत्याही कार्यक्रमासाठी समाजातील समविचारी लोकांना हक्काने बोलवत असत. आणि ते सर्वजण ही अगत्याने येत असत. शनिशिंगणापूरच्या सत्याग्रहात जेलमध्ये जावे लागणार हे माहीत असूनही डॉ.लागूंसारखे वलयांकित सिनेनटसुद्धा अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते हा डॉ.दाभोलकरांच्या व्यक्तिमत्वाचाच प्रभाव होता. समाजाच्या अनेक क्षेत्रातील लोकांशी डॉक्टरांचे जवळचे संबंध आहेत. याचा प्रत्यय या यात्रेदरम्यान येत राहिला. यात्रा माळीनगरला पोहचली. डॉक्टर मला म्हणाले, “उद्या ऊस तोडणार्‍या महिलांच्यासमोर तुम्ही स्त्रीचं दुय्यमत्व या विषयावर बोला.” हे ऐकून मला प्रथम तर भीतीच वाटली की आपण डॉक्टरांच्या समोर कसे बोलू शकू. पण सगळा धीर एकवटून मी अर्धा तास त्या महिलांच्यासमोर बोलले. डॉक्टर काय म्हणतील असे वाटत होते. दुपारी जेवायला बसल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘निशाताई, तुम्ही चांगले बोलता की’ त्यांच्या या ‘शाबासकी’ने माझा आत्मविश्वास खूपच वाढला. एखाद्या कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कामाचं कौतुक करणं हे सर्व डॉक्टर अगदी सहजपणे करीत असत. महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते डॉक्टरांनी असेच प्रयत्नपूर्वक विचारांची व आचारांची दिशा देऊन घडविले या त्यांच्या गुणाचा प्रत्ययही या सत्याग्रहाच्या वेळी आला.

नगरला तीन दिवस उपोषणाला बसायचे ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उंच स्टेज बांधून मांडव घातला होता. एक दिवस अचानक आमच्या अंगावर काळ्या शाईने भरलेले फुगे फेकण्यात आले. क्षणभर गोंधळ उडाला. फुगे फेकणार्‍याला पोलिसांनी पकडले. तो बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. सर्व शांत झाल्यावर डॉ.दाभोलकरांनी अगदी काळजीच्या सुरात तुम्ही सर्वजण ठीक आहात ना? असे विचारले. आपल्या शब्दाखातर आलेल्यांना काही त्रास होऊ नये असे त्यांना वाटत होते. पण त्या प्रसंगाचा कोणावरही कसलाही परिणाम झाला नाही.

शेवटच्या दिवशी एका मोठ्या हॉलमध्ये सभा झाली. त्यामध्ये डॉक्टरांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की, “मी इथल्या अधिकार्‍यांना कोणताही गोंधळ होणार नाही असा शब्द दिला आहे. तेव्हा आम्ही 5 पुरूष आणि 5 स्त्रिया असे प्रतिकात्मक स्वरूपात अटक करून घेऊ. बाकीच्यांनी आम्हाला अटक झाल्यावर शांतपणे हॉलबाहेर येऊन आपापल्या ठिकाणी परत जायचे आहे. हे ऐकल्यावर कार्यकर्ते मनातून हिरमुसले होते. पण त्यांनी डॉक्टरांचा शब्द पाळला. आपल्या कार्यकर्त्यांचं कौतुक करताना डॉक्टर या प्रसंगाचे अनेकदा उदाहरण देत असत.

प्रतिकात्मक स्वरूपात अटक करून घेतलेले आम्ही – डॉक्टर दाभोलकर, एन.डी.पाटील, व्यंकटआण्णा रणधीर, डॉ.श्रीराम लागू, पन्नालाल सुराणा, पुष्पा भावे, निशा शिवूरकर, निशा भोसले, शालिनी ओक, प्रीती श्रीराम असे एक रात्र जेलमध्ये काढली. दुसर्‍या दिवशी सुटका झाली.

या सत्याग्रहात आमच्या बरोबर पंढरपूर ते पुणे असे डॉ.दाभोलकरांचे ज्येष्ठ बंधू प्रा.देवदत्त दाभोलकर(पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू) होते. आम्ही पुण्यातून नगरकडे निघताना ते पन्नालाल सुराणा यांना म्हणाले की, “शनिशिंगणापूरच्या प्रश्नावर नरेंद्रने खुपच रान तापविले आहे. मला भीती वाटते की, ते लोक त्याच्यावर हल्ला करतील, “तुम्ही त्याच्यासोबत राहा व काळजी घ्या.”

त्यांची ही भीती 20 ऑगस्ट 2013 रोजी खरी ठरली! अखेर सनातन्यांनी त्यांचा घात केलाच!!

निशा भोसले