Categories
आठवणीतले दाभोलकर

शनिशिंगणापूर आंदोलनातील मुत्सद्दी डॉक्टर

वार्षिकांक – २०१३

नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरासंबंधी एका चमत्काराची खूप प्रसिद्धी झाल्याने अलिकडे त्याचे महत्व खूप वाढले आहे. तिथे कोणी चोरी केली तर तो भ्रमिष्ट होतो त्यामुळे तिथे चोरी होत नाही, तिथल्या घरांना दारे, कुलपे नाहीत. याची सत्यासत्यता पडताळण्याचा म.अं.नि.स.ने उपक्रम जाहीर केला. पण त्याला अतिशय विरोध झाला व इतरही कारणाने तो उपक्रम घेता आला नाही. त्याऐवजी तेथील एका रूढीविरूद्ध आंदोलन करण्याचे ठरले. ती रूढी म्हणजे शनी चौथर्‍यावर जायला स्त्रियांना बंदी आहे. ही रूढी भारतीय घटनेतील स्त्री-पुरूष समानतेच्या तत्वाला हरताळ फासणारी आहे. शनिशिंगणापूर येथे याविरूद्ध सत्याग्रह करायचा पण त्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी पंढरपूर ते नगरपर्यंत समता यात्रा काढायला हवी असे डॉ.दाभोलकरांनी सुचविले आणि त्यात महिला कार्यकत्यार्र् पाहिजेत म्हणून सोलापूरच्या स्त्रीप्रधान शाखेतल्या आम्हा कार्यकर्त्यांना विचारले. आजपर्यंत कधीच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न झाल्याने आपल्याला हे जमेल का अशी शंका होती. पण डॉ.दाभोलकरांनी आश्वासक शब्दात समजावून दिल्यावर आत्मविश्वास आला व मी, निशा आणि प्रिती तयार झालो. आणि एक अनोखा पण उद्बोधक अनुभव या जागेतून मिळाला.

यात्रेची सुरवात पंढरपूरच्या तनपुरे महाराजांच्या मठातील सभेने झाली. डॉक्टरांचे नियोजन स्थळकाळाला योग्य आणि काटेकोर असायचे. दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून याच जागी सानेगुरूजींनी उपोषण करून समतेचा लढा दिला व आम्ही येथूनच 1 जून सानेगुरूजींच्या स्मृतीदिनी समता सत्यागृहाची सुरवात केली. जीपचा प्रवास, रोज नवीन गाव, तिथल्या सभा, कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम असा कार्यक्रम असायचा. या सर्वांमध्ये डॉक्टरांचे मोठे भाऊ देवदत्त सहभागी झाले होते. तेही उत्साहाने सभेमध्ये भाषण करीत प्रवासात आम्हाला त्यांच्या समृद्ध अनुभवाच्या गोष्टी सांगत. ऐंशीच्या घरातला त्यांचा उत्साह पाहिल्यावर डॉक्टरांच्या उत्साहाचे मूळ त्यांच्या रक्तातच आहे हे समजले.

कार्यकर्त्यांच्या घरी गेलो की, डॉक्टर त्याची व त्याच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी करत. त्या सर्वांना डॉक्टर घरी आल्याचा अतिशय आनंद होई व सर्व व्यवस्था चांगली व्हावी म्हणून त्यांची धडपड असे डॉक्टरही बरोबरच्या कार्यकर्त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून काळजी घेत. तेथून पुढील मुक्कामाच्या कार्यक्रमाची चौकशी करत कारण तेव्हा मोबाईल नव्हते ना. पंढरपूर ते पुणे असे दिवस गडबडीचे गेले.

पुण्याचा कार्यक्रम महात्मा फुल्यांच्या वाड्यात झाला. ज्या महात्म्याने आपल्या पत्नीला शिकवून स्त्री शिक्षणाचा प्रारंभ केला, स्त्री सन्मानाचा आदर्श ठेवला त्याच फुल्यांच्या वाड्यात 150 वर्षांनंतर शनीशिंगणापूरच्या देवस्थानात स्त्री पुरूष समानता असावी यासाठी सभा घ्यावी लागत होती. आणि तीही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानाने अशी समानता मान्य केली असताना हा विरोध डॉक्टरांनी तळमळीने मांडला.

या सर्वाच्या बातम्या रोजच्या वर्तमानपत्रात येत होत्या. शनिशिंगणापूर देवस्थानाकडून, सनातनी लोकांकडून याला विरोध होत होता. अंधश्रद्धा निर्मूलन करणारे डॉक्टर आता स्त्रियांना पूजा करायला सांगत आहेत अशी टीका होत होती. डॉक्टर व त्यांचे कार्यकर्ते इथे आले तर आम्ही त्यांना मज्जाव करू अशा धमक्या येत होत्या. म्हणून डॉक्टरांना नगर जिल्हाबंदी करावी अशी मागणी होत होती. नगर येेथे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून सत्याग्रह करावयाचा पण त्यापूर्वी तीन दिवस आम्ही नगरमध्ये उपोषण करावयाचे ज्यामुळे देवस्थान विश्वस्तांचे मतपरिवर्तन असे नियोजन होते.

आमचा नगर जिल्हा प्रवेश सुरळीत झाला व नगरला कुसळे यांच्या घरी आम्ही पोचलो. त्यांनी आमची व्यवस्था छान केली होती. ‘तीन दिवस उपोषण तुम्हाला झेपणार नसेल तर एकच दिवस करा, मी तीन दिवस करेन’ असे डॉक्टर आम्हाला सांगत होते. मी तीन दिवस उपोषण करू शकेन का अशी शंका माझ्याही मनात होती. कारण आत्तापर्यंतचे उपास खिचडी खाऊनच केले होते. पहिल्या रात्री घरी आल्यावर कुसळे वहिनींनी वरणभात खाण्याचा आग्रह केला व पण डॉक्टरांचा आदर्श आणि सगळा माहोल बघून आम्हीही तीन दिवस उपोषण केले आणि ते जाणवलेलही नाही.

उपोषणाला बसण्यासाठी चौकात छोटा मांडव घातला होता. मधून मधून घोषणा, गाणी असे चालू होते. इतरवेळी गप्पा होत. डॉक्टर त्यांच्या चळवळीतले अनुभव इतक्या प्रभावीपणे सांगत की आपण प्रत्यक्ष तिथे होतो असे जाणवे. मधून काही समविचारी संघटनांचे नेते भेटायला येत. विरोधक दुरूनच घोषणा देत(कारण पोलीस बंदोबस्त होता) काळ्या शाईने भरलेले फुगे मारत. त्याचा राग येई. पण डॉक्टर आम्हाला संयमाने शांत राहायला सांगत. नगरचे कलेक्टर या आंदोलनामुळे हादरून गेले होते. वरचेवर डॉक्टरांना बोलवून ते वाटाघाटी करीत होते. कार्यक्रम रहीत करा नाहीतर तुम्हाला अटक करेन अशा धमक्या देत होते. पण त्यांच्याशी मुत्सद्दीपणे बोलून डॉक्टरांनी उपोषण चालूच ठेवले होते. शेवटी असे ठरले की सर्व कार्यकर्ते शनिशिंगणापूरला जाण्यासाठी नगरमधून शांततेने बाहेर पडतील त्यावेळी सरकारने प्रातिनिधिक 5 स्त्री व 5 पुरूष कार्यकर्त्यांना अटक करावी पण सत्याग्रह होऊ द्यावा. या अटीवर आदले दिवशी दुपारी आम्ही उपोषण थांबविले.

सत्याग्रहाचे दिवशी सर्व महाराष्ट्रातून जवळपास सहाशे कार्यकर्ते जमले होते. सगळे सत्याग्रह करण्याच्या उत्साहात होते. अशा वेळी पोलिसांनी अडविले असते तर काही विपरीत घडण्याची शक्यता होती. म्हणून हॉलमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांना डॉक्टरांनी समजावून सांगितले की आपण शांततेने बाहेर पडायचे आहे. सरकारकडून आपल्याला अटक केली जाणार आहे पण कोणीही संयम सोडायचा नाही.’ काहींना प्रातिनिधीक अटक करतील इतर सर्वांना सभागृहातच अटक करून सोडून देतील. कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता पण डॉक्टरांच्या शब्दातच अशी जादू होती सर्वांनी त्याचे काटेकोर पालन केले. पोलीस व कलेक्टर आश्चर्यचकित झाले.

मी, निशा, प्रीती, पुष्पाताई भावे, निशा शिवूरकर अशा पाच स्त्रिया व डॉक्टर, डॉ.लागू, प्रा.एन.डी.पाटील, बाबा आढाव व रणधीर आण्णा अशा पाच पुरूषांना पोलिसांनी अटक केली व आमची नगरच्या तुरूंगात रवानगी केली. जेलमध्ये जायचे म्हटल्यावर आमचे धाबे दणाणले, तिथे कसे होईल?’ या कल्पनेनेच हात पाय गळाले. डॉक्टरांनी अनुभवावरून सांगितले की, ‘काही काळजी करू नका आजची रात्रच आपल्याला तुरूंगात काढावी लागेल. उद्या कोर्टापुढे हजर करतील आणि लगेचच सुटका होईल.’

सगळे सोपस्कार पूर्ण करून तुरूंगात जायला सायंकाळ झाली. भल्यामोठ्या बंद दाराच्या दींडी दरवाज्यातून आत जाताना छातीत धडधडत होते. सगळे आत गेल्यावर दार बंद झाले आणि जगापासून तुटल्याची जाणीव झाली. तिथेही काही गोष्टींची पूर्तता झाल्यावर आम्हा पाच जणींना स्त्री विभागातील कोठडीत बंद करून गजाच्या दाराला कुलूप लावले तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे काय याची किंमत कळली. त्या जुन्या किल्ल्याच्या भयाण वातावरणात पण पुष्पाताईंच्या बरोबरच्या गप्पांमध्ये रात्र गेली. दुसर्‍या दिवशी कोर्टासमोर हजर केले. कोर्ट उठेपर्यंत शिक्षा झाली झाली व सायंकाळी सोडून दिले. डॉक्टरांनी आमचे कौतुक करून आमच्या परतीची व्यवस्था केली. या सर्व अनुभवाला सामोरे जाण्याची हिम्मत डॉक्टरांच्या आश्वासक शब्दातून त्यांच्या वागणुकीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला मिळाली.

त्या दहा दिवसात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा, त्यांना सांभाळून घेणारा, त्यांची काळजी वहाणारा नेता दिसला. भाषणातून श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारा, त्यांना जागृत करणारा वक्ता दिसला. मोहिमेतील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची तपशीलवार नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करणारा कुशल व्यवस्थापक दिसला. अडचणी, विरोध यावर मात करून आपला हेतू साध्य करणारा मुत्सद्दी पण दिसला. डॉक्टरांच्या अशा अनेक गुणांपैकी थोडातरी अंश घेऊन आम्ही प्रत्येकजण हे कार्य जोमाने पुढे नेऊ हीच त्यांना आदरांजली!

शालिनी ओक