Categories
कथा

न्याय – निवाडा

वार्षिकांक – २०१३

वारूशी लग्न करायला इंदरने नकार दिला तशी वारू म्हणाली, ‘मी तुझ्या पोराची आई होणार आहे, आणि तू नाही करणार म्हणतोस? अशा अवस्थेत मी काय करणार?

‘काय करायचं तो तुझा प्रश्न आहे… तुझं तू बघ….’ म्हणून इंदरने हात झटकले.

ही गोष्ट सगळ्यांना समजली. छोट्याशा गावात गावभर पसरली. आता काय करायचे….? वारू घाबरली. आई-वडील काळजीत पडले. आता पुढे काय….? मोठाच प्रश्न पडला त्यांना.

लोक कुजबुजू लागले. कुजबुज रस्त्यावर आली. आणि, वारूचे काय करायचे…. ते ठरवण्यासाठी पंचायत बसली. पंच म्हणजे गावाचे न्यायाधीश! त्यांचा निर्णय ऐकावाच लागतो. समाजात पंचांना मान होता. आता पंच काय सांगतात… गावाने कान टवकारले आणि…

‘तारूण्यात भरकटलेली स्त्री’ म्हणून पंचांनी वारूला लिलावात काढले. इंदरला काही विचारायचा प्रश्नच नव्हता. इंदर पुरूष असल्याने कसाही वागायला मोकळा होता. शिक्षा मात्र वारूलाच?……

धायकूने लिलाव धरला. पाचशे एक रूपयाला वारूला त्याने विकत घेतले. वारू त्याची झाली.

दंड म्हणून पंचांनी वारूच्या आई-वडिलांकडून 2000 रू. तर इंदरच्या आई-वडिलांकडून 3000 रू. वसूल केले. घर गहाण टाकून वारूच्या वडिलांनी दंड भरला.

वारू चिडली. आपल्या बापाला म्हणाली, ‘हा कसला न्याय केला पंचांनी?’ ज्यानं मला फसवलं त्याला शिक्षा नाहीच…. पुन्हा दंड दोन्हीकडून वसूल करून स्वत:ची तुंबडी भरली. शिक्षा मला केली होती मग पुन्हा दंड का? मी हा लिलाव मानत नाही. मला धायकूबरोबर राहायचे नाही…..’

‘पंच शेण घालतील गं तोंडात…. नागडी धिंड काढतील तुझी! वारूची आई रडायला लागली…. ‘उद्या तुझ्या बहिणींशी लग्न कोण करील? पदर पसरते बाई, पण आसं करू नको. धायकूबरोबर राहा… नाही तर, आपल्याला समाज वाळीत टाकेल.

वारूला पंचांचा न्याय-निवाडा मान्य नव्हता. धायकूबरोबर राहायचं नव्हतं. बहिणींची काळजी होतीच…. शिवाय उद्या समाजानं वाळीत टाकलं, तर जगायचं कसं? तरी ती आपल्या निर्णयाशी ठाम होती. तिला समजत नव्हतं, काय करायचं? हा तिढा कसा सोडवायचा?

दुसर्‍याच दिवशी मोठ्या विहिरीत वारूचे प्रेत तरंगताना दिसले. पंचांनी आता वारूच्या बदली तिची बहीण सोनाला धायकूला द्यायची आज्ञा केली. तर धायकूला सोना द्यायची नाही, तर, 5000 रू. दंड भरायचा….

वारूच्या वडिलांनी धायकूला सोना देऊन टाकली.