बाळक्या देवाचा निस्सीम भक्त होता. जसा देवावर त्याचा प्रचंड विश्वास होता तसा स्वत:वर आणि स्वत:च्या कामावरही विश्वास होता. सरळ मनाचा….. भोळा…. भाबडा बाळक्या कामाची सुरवात करताना रोज देवासमोर दोन फुलं ठेवायचा. देवाला प्रदक्षिणा घालायचा. सगळ्या जगाची चिंता आपल्यालाच असल्यासारखा जगाची गार्हाणी त्याच्यासमोर मांडायचा. त्याला खात्री होती, कधी ना कधी त्याचे डोळे उघडतील…. त्याची कृपा होईल आणि जग सुखी होईल. जगाचं दु:ख-दारिद्र्य संपेल. लोक भयमुक्त होऊन आनंदानं जगायला लागतील. सगळ्यांना रोज पोटापुरतं अन्न मिळेल. भुईवर पडताक्षणी झोप लागेल. कुणाचे कुणाशी वैर राहणार नाही. कुणी कुणाचा द्वेष करणार नाही. शेवटी म्हणायचा,
‘देवा. ऐकतोयस ना… म्हणजे समजलं ना तुला आमाला काय पाहिजे ते….’
पण देवानं कधी त्याचं गार्हाणं ऐकलं नाही. कधी कुणाला निरपेक्ष मदतही केली नाही. दारिद्र्य, दु:ख, कलह, माणुसकीला काळीमा फासणार्या घटना घडत राहिल्या…. अगदी देवाच्या साक्षीने!
एकदा खूप पाऊस पडला. नदीला महापूर आला. नदीच्या पाण्यानं गावात धाव घेतली. गाव कमरेएवढ्या पाण्यात बुडाला. पाणी चढतच राहिलं. सगळे लोक गाव सोडून गेले. गाव रिकामा झाला. त्याचा पाय काय हालत नव्हता. संकटाच्या वेळी देवाला सोडून कसं जायचं? त्याला समजेना देवाचं काय करायचं? त्याला कसं वाचवायचं? नदीला कसं हटवायचं?…. ‘ए बये जा आता…. फिर मागं… तू तुझ्या जागेवरच ठीक आहेस. तीच तुझी जागा. अशी गावात आलीस तर लोकांनी काय करायचं? तू आई आहेस. आईसारखी वाग…. नाही तर लोक तुला ‘आई’ न मानता आपला शत्रू मानतील. जा, नाही तर थुंकीन तुझ्या तोंडावर….’
नदी काही हटेना. गाव सोडून जाईना…. ‘अगं देवाची तर काही लाज बाळग… त्यानं काय करावं? कुठं जावं?’

‘चला काका, सगळी माणसं गेली…. चला…’ म्हणून त्याला गावाबाहेर जाण्यासाठी बोलावलं आणि देवाला वाचवायचा शेवटचा उपाय म्हणून सहजतेनं त्याला उचलून एका उंच झाडावरच्या बेचक्यात नेऊन ठेवलं. म्हणाला, ‘तुलाही बरोबर नेलो असतो देवा पण गावावर लक्ष कोण ठेवणार? गावावर लक्ष ठेव….. पाणी उतरताच येतोच आम्ही. बसवतो तुला पुन्हा देव्हार्यात नेऊन!
तो ही गाव सोडून गेला. देव बुडण्याची त्याला बिलकूल चिंता नव्हती. पण तरी त्याला झोप लागत नव्हती. रात्रीच्या अंधारात एखादा साप बीप चावला देवाला तर? विंचवाने नांगी मारली तर? झाडावरच्या मुंग्या डसल्या तर? आणि देव खाली पाण्यात पडला तर? रात्रभर तो देवाच्या काळजीत तळमळत राहिला, तडफडत राहिला. देव मात्र झाडावर शांत होता. जसा देवळात होता… तसाच!