Categories
कथा

देवपण हरवलेलं मंदिर

वार्षिकांक – २०१३

आजीनं आपल्या बहिणीच्या नातीला- साक्षीला सगळा गाव फिरवून दाखवला. गावातली सगळी मंदिरं दाखवली. बाग दाखवले, साखर कारखाना दाखवला. जवळचा रामलिंगचा डोंगर दाखवला. दाखवलं नाही ते मुख्य गावाबाहेरचं मोठं मंदिर. तशी साक्षी म्हणाली, “आजी सगळं दाखवलंस पण ते गावाबाहेरचं मंदिर नाही दाखवलंस…. चल. आपण तेही मंदिर बघूया!”

‘छे छे! तिकडं जायचं नाही आपल्याला!’ आजी गडबडीने म्हणताच साक्षीने आश्चर्यानं विचारलं,

‘पण का? मंदिरच आहे ना ते!’

‘हो! पण आता मंदिरात मंदिरपण राहिलं नाही.’

‘म्हणजे?’

‘ती एक मोठी गोष्ट आहे… आजीनं मोठा सुस्कारा सोडला.

‘सांग ना आजी…. काय झालं? मंदिराची कसली गोष्ट आहे?’

‘गोष्ट मंदिराची नाही बाळ. गोष्ट माणसांची आहे. अगं आज जशी गावात वेगवेगळ्या जाती-धर्माची मंदिरं आहेत ना. तशी ती पूर्वी नव्हती.

‘म्हणजे गावाला मंदिर नव्हतंच?’

‘होतं ना! गावाबाहेर मंदिर आहे ना. ते एकच मंदिर होतं. वस्ती वाढल्यानं ते पूर्वी गावाबाहेर होतं आता ते तसं गावाच्या परिसरातच आलंय. तर या एकाच मंदिरात गावातले लोक यायचे. कारण ते मंदिर सगळ्यांचं होतं. तिथं राम होता, कृष्ण होता, हनुमान होता, येशु, बुद्ध, महावीर, पीरसाहेब अनेक देवी-देवता होत्या. माझ्या लग्नानंतर आम्ही जोडीनं त्याच मंदिरात नमस्काराला गेलो होतो. त्याला आता साठ वर्षेहोऊन गेली. सगळा गाव तेव्हा गुण्यागोविंदाने रहात होता. एकदा कधी तरी इलेक्श्नच्या वेळी एका उमेदवाराने हिंदूंसाठी राममंदिर बांधले. दुसर्‍या उमदेवाराने चर्च बांधून दिले. कुणी दर्गा उभारला. पुढं पुढं जैन मंदिर, बुद्ध मंदिर, हनुमान मंदिर, गुरूद्वार, दर्गा वगैरे सारखी प्रत्येक जाती धर्माची मंदिरं उभारली गेली. तसे लोकही विभागले गेले. आपापल्या मंदिर मशिदीत जाऊ लागले. मुख्य मंदिरात कुणी फिरकेनासे झाले. मंदिर ओस पडले. पण हळूहळू पुन्हा वर्दळ वाढत गेली. आताही लोक जातात येतात पण ते….. जातीय दंगलींच्या सुपारी देण्या-घेण्यासाठी. गावात राडा करून आपले वजन वाढविणार्‍या राजकीय नेत्यांच्या चमच्यांची जशी वर्दळ असते तशीच ती जुगार खेळणार्‍या जुगार्‍यांची, दारू पिणार्‍या दारूड्यांची, संप-मोर्चा-बंदच्या वाटाघाटी करणार्‍यांची! याठिकाणी अनेकदा खुनी हल्ले होतात. एखाद-दुसरा खून होतो. एखाद्या बाईला पळवून बलात्कारही केला जातो. पूर्वीही मंदिराची वास्तू सगळ्यांची होती. आत्ताही सगळ्यांची आहे. देव पूर्वीही होते. आत्ताही आहेत. पण देव काही करत नाहीत. त्यांच्या साक्षीनेच सगळे घडते तरी देव शांतच आहेत. अशा मंदिराला मंदिर कसे म्हणायचे सांग बघू? आणि देवांचं देवपण तरी कसं मानायचं? सगळ्या देवांनी जणू स्वत:ला मोडीत काढलंय. सगळ्यांवरचा विश्वास उडालाय….’

आजीने परत मोठा सुस्कारा सोडला. खूप मोठा प्रवास करून आल्यासारखी आजी थकली होती.

‘आजी, मी त्या मंदिरावर एक लेख लिहिते….’ साक्षी म्हणाली. ‘समजू दे लोकांना तिथं काय काय चालतंय ते!’

‘नाही, नाही….’ आजी घाबरून म्हणाली. ‘असलं काही एक करणार नाहीस तू!’

आजी रडायला लागली. शरीर थरथरायला लागलं.

‘काय झालं आजी…. काय झालं?’

आजीच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली… काय सांगणार होती ती… की तिच्या लंगड्या नवर्‍याचा पाय याच मंदिरात तोडला होता ते….? की तिला आयुष्यातून उठविण्याची धमकी दिली ते! त्या मंदिरावर लेख लिहिल्याचं बक्षीस म्हणून आजोबांना आपला पाय गमवावा लागला होता. आयुष्यभर पांगळेपणा पत्करावा लागला होता….

आजी रडत राहिली.

-आणि साक्षीच्या मनात शब्दांची जुळवाजुळव होऊ लागली.

निलम माणगावे