Categories
अभिवादन

पिस्तुलाने प्रश्न सुटतात का?

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

सातार्‍याच्या ‘शिवाजी उदय मंडळा’चा कबडीपट्टू म्हणून नरेंद्रला मी प्रथम ओळखू लागलो. पुढे मी युक्रांदच्या कामात गुंतलो. नरेंद्रने स्थापन केलेल्या समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून काम सुरू केले. आम्ही दोघेही सामाजिक क्षेत्रात होतो. वयानेही जवळपास सारखेच. माझ्यापेक्षा तो दोन-तीन वर्षांनी लहान. एकाच चळवळीतले, एकाच विचारांचे असल्याने आम्ही जवळ आलो. मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनात एकत्र तुरूंगवासातही होतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात लिहता झालो तेव्हा मी बुवाबाजीच्या विरोधात ‘संभ्रम’ नावाची लेखमालिका लिहिली होती. हे सर्व लेख नरेंद्रने वाचले होते. त्यामधून प्रेरणा घेऊनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्याचा विचार सुचला, असे नरेंद्रने मला जेव्हा सांगितले. तेव्हा मला धन्य झाल्यासारखेच वाटले होते. ‘साधना’चे संपादकपद स्वीकारण्यापूर्वी नरेंद्र पुण्यात आला की माझ्याचकडे राहायचा. माझा सख्खा मित्र होता तो. सकाळी त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी ऐकून विश्वासच बसेना. मी आतून हादरून गेलो होतो. ‘काय हे जग? सबंध अवकळा आणलीय आपण त्याला’, अशी भावना मनात उमटली. नरेंद्रसारखा कार्यकर्ता अचानक जातो तेव्हा धसकाच बसतो.

नरेंद्र ज्या क्षेत्रात काम करत होता, त्या सामाजिक विश्वातले लोक गैरसमज फार करून घेतात. त्याचा लढा कोणत्याही धर्माविरूद्ध नव्हता. धर्माच्या नावावर चालवल्या जाणार्‍या घातक रूढी आणि शोषणाविरूद्ध त्याचा संघर्ष होता. ज्यांनी कोणी त्याची हत्या केली त्यांची कीव करावीशी वाटते. ज्याचा-त्याचा धर्म त्याने पाळावा, असा उदारमतवादी तो होता. कधी कोणाबद्दल त्याच्या तोंडून अपशब्द निघाला नाही. कधी कोणाच्या धार्मिक भावना दुखावणारे, धार्मिक टीका करणारे विधान त्याने केले नाही. धर्माच्या नावाखाली मांडल्या जाणार्‍या बाजाराला त्याचा विरोध होता. त्याच्या विचारांची लढाई विचाराने लढण्याची ताकद नसलेल्या भ्याड लोकांनी त्याला गोळ्या घातल्या. रानडे, फुले, आगरगर, गोखले या विचारवंतांच्या पुण्यात ही घटना घडावी, ही पुण्याच्या दृष्टीने शरमेची बाब आहे. साठी ओलांडलेल्या नि:शस्त्र, सौम्य माणसावर गोळ्या झाडणार्‍यांनी कोणते शौर्य गाजवले?

पिस्तुलाने प्रश्न सुटतात का? जिथे-जिथे हिंसाचार होतो, तिथे-तिथे अराजक माजते. हत्या करणार्‍यांच्या धर्माने त्यांना हीच शिकवण दिली का? नरेंद्र पिसाट नव्हता. पण आपण शिवराय, ज्ञानोबा, तुकोबांना विसरलो आहोत. आपली सांस्कृतिक पातळीच घसरलीय. पण गोळ्या झाडणार्‍यांनी पत्करलेला मार्ग फार धोक्याचा आहे. ज्या पिस्तुलाने त्यांनी नरेंद्रला संपवले तेच पिस्तुल त्यांच्यावरही कधीतरी उगारले जाईल. तसे घडू नये हीच माझी इच्छा आहे. विचारांचा सामना विचाराने करण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रात रूजावी, बुद्धिप्रामाण्यवादाची जोपासना व्हावी, हीच नरेंद्रला खरी आदरांजली ठरेल. ज्या अंधश्रद्धा विरोधी कायद्यासाठी तो झगडत होता, तो कायदा लवकर मंजूर झाला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्याने दिलेला वसा नेटाने पुढे न्यायला हवा.

अनिल अवचट