Categories
अभिवादन

महाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

चार दिवसांपूर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. “हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा?” अशी सुरवात करून बराच वेळ बोलत होते. बार्टीच्या वतीने (डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे) “महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन विचाराची वाटचाल” या विषयावरील पुस्तक ते संपादित करीत होते. त्यासाठी मी “सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीचे अंधश्रद्धा निर्मूलनातील योगदान” हा लेख द्यायचे कबूल केलेले होते. गेल्या दोन महिन्यात पाठपुराव्यासाठी त्यांची पत्रे आणि फोन आले होते.

नरूभाऊंचा स्वभाव आर्जवी आणि संयमी होता. ते काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणे केवळ अशक्य. त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती. आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपले म्हणणे अत्यंत विनयपूर्वक, युक्तीवादाच्या आधारे मांडीत असत. त्यांच्यासारख्या ऋजू स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारे, सुन्न करणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असे वाटत नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते एक महत्वाचे नेते होते. शाम मानव यांच्यासोबत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. गेली 18 वर्षे राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी विधेयक संमत व्हावे म्हणून दाभोलकर झटत होते.

राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रूंनी ही हत्या केली असावी असे वाटते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.

मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो. 1982 साली नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरूंगात एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षे काम केले. मी साधनेत अधूनमधून लिहित असे. ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा.रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याला प्रचंड विरोध झाला. स्वत: नरूभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षणमंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असे नरूभाऊंनी सुचवले. अवघ्या दोन दिवसात हे करायचे होते. त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. मी घेतलेली मोरे सरांची मुलाखत पुढे अत्यंत गाजली. पहिल्यांदा मोरे सर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नी नाही दिली काय, काय फरक पडतो? असे त्यांचे मत होते. आज दाभोलकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरे सर असते तर ते नक्कीच चकीत झाले असते. साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. नरूभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरूभाऊंनी आपल्या तालमीत तयार केले. तो साधना उत्तम चालवित आहे.

नरूभाऊ तत्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मीडियाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती. अनेक ख्यातनाम व्यक्तींशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्‍हा सांभाळण्यात नरूभाऊ वाक्बगार होते. एक ना धड भाराभार चिंध्या असे मात्र त्यांनी कधीही केले नाही. गेली 25 वर्षे चिकाटीने त्यांनी ‘अंनिस’चे काम लावून धरले. अनेक बाबा, बुवांचे भांडाफोड केले. आम्ही मात्र त्यांना गमतीने नरेंद्र महाराज दाभोलकर म्हणत असू. औरंगाबादला त्यांच्यावर आणि डॉ.श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डॉ.लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.

नरूभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशोबी. 14 वर्षांपूर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात भल्याभल्यांना कामाला लावले होते. “लोकशाही प्रबोधन व्यासपीठ”ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तींना मतदान करा असे सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरूभाऊ आमचे सारथी होते. डॉ.लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्लॅमरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील ह्या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षे आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहीतच नव्हता. बर्‍याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावले याची निळूभाऊंना कुणकूण लागली. डॉक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी प्रेमाचे संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचे त्यांचे गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत. आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.

सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावे या हेतूने “सामाजिक कृतज्ञता निधी” जमा करायचे ठरले. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी “लग्नाच्या बेडीचा” दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भूमिका करीत होते. दौर्‍यात या सर्वांची सोय करणे हे सोपे काम नव्हते. नरूभाऊच ते काम करू जाणोत.

अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरूभाऊंची मैत्री होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचे ते गेली काही वर्षे समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऐवजी दोनतीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रीत केलेली होती. आणि ती कामे चिकाटीने लावून धरलेली होती. त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर(मुद्रा) अखंड राहील.

नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची, प्रमिला कांबळेची निर्घृण हत्या केली. जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केले. अनेकांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. नरूभाऊंचे टायमिंग फार अचूक असे. नरूभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटीत केला. परिषद लावली. परवा लातूरलाही “जातीला मूठमाती द्या” ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करीत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचे गठ्ठा मतदान मिळावे म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असे माझे मत होते. नरूभाऊ म्हणाले, “हे करण्याएवढे आपण शक्तीशाली नाही. ते करायचे तर ‘पर्यायी राजकारण’ करावे लागणार. आजतरी तसे करणे मला परवडणारे नाही.”

व्यक्तीची हत्या करून विचारांची हत्या होत नसते. उलट विचार अधिक मजबूत होतात. शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

हरी नरके