Categories
अभियान

अंनिसचे जात पंचायतीला ‘मूठमाती’ अभियान

ऑगस्ट - २०१३

मूळात जात मानणे ही अंधश्रद्धा आहे, कारण जातीला कुठलाही भौतिक आधार नाही. जातीचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगण्यात येते ‘जी जात नाही, म्हणजे जी नष्ट होत नाही, ती जात’. अशा जातींची व पोटजातींची भारतातील संख्या 8000 पेक्षा जास्त आहे. शेकडो वर्षेआपल्या हाडीमाशी खिळलेल्या या जाती एकदोन पिढ्यात नष्ट होणार नाहीत, हे जरी खरे असले तरी त्यांच्यातील जातिविद्वेषाची, एकमेकांतील उच्चनीचत्वाची भावना आणि जातीय संघटना व त्यातील जात पंचायती कडून होणारी दडपशाही, शोषण, छळवणूक हळूहळू कमी व्हावयास पाहिजे; संपायला पाहिजे. जातिसंस्थेचा हा अडसर विशेषत: खेड्यापाड्यांतून दैनंदिन जीवनामध्ये येऊन आता शहरी वस्त्यांमधून येत असल्यामुळे माणसांच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करणारा ठरत आहे. परंतु, आता जातिव्यवस्थेच्या विरुद्ध आणि आंतरजातीय-आंतरधर्मिय विवाहाचे समर्थक असूनही अशा विवाहित जोडप्यांतील मतभेद, संघर्ष, त्यांना अनेकांकडून झालेला विरोध, आपल्या अपत्यांच्या भवितव्याबद्दल वाटणार्‍या चिंता याबाबत कोणत्याही प्रकारची लपवाछपवी अथवा सारवासारव न करता या जात पंचायतीच्या शोषणाच्या विकलतेची जाणीव खेड्यापांड्यातूनही होऊ लागली आहे ही चांगली खूण आहे. नाशिकमधील ताज्या घटनेमुळे त्याला उजाळा मिळालेला आहे. त्यामध्ये अशा उपेक्षित, वाळीत टाकलेल्या व बहिष्कृत करून छळवणूक केल्या गेलेल्या व्यक्ती आणि कुटुंबांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठरविले आहे. त्यासाठी आम्ही राज्यव्यापी ‘जात पंचायतीला मूठमाती अभियान’ ऑगस्ट महिन्यात राबविणार आहोत.

महाराष्ट्र अंनिसतर्फे ‘जोडीदाराची विवेक निवड-मिश्र विवाहाला प्रोत्साहन अभियान’ पुढील दशकांचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून राबविला जात आहे. त्याच्या वैचारिक भूमिकेच्या विस्तारीत कार्यक्रमामध्ये जातीतील शोषणासाठी कारणीभूत ठरणार्‍या जात पंचायतीच्या बुवाबाजी व अमानुष-अघोरी रुढी-प्रथांविरोधात भूमिका घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे समिती जात पंचायतीला ‘मूठमाती’ अभियान अंतर्गत व्यापक आवाहन करून जात पंचायतीच्या अन्यायाला सामोरे जावे लागलेल्या व्यक्ती, कुटुंबांची नोंद घेणार आहे. समाज प्रबोधनासाठी त्यांच्यावरील अत्याचाराच्या निवारणासाठी त्यांच्या अनुभव कथनांचे आयोजन परिसंवाद, चर्चासत्रे, मेळावे व परिषदांमधून आम्ही करणार आहोत. तसेच बाधितांना न्याय मिळण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी शक्यतेनुसार मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न आहे.

जात म्हणजे ‘विस्तारलेल्या नातेवाईकांचा गट’ (Extended kin). जात ही मनुष्यनिर्मित आहे. तिच्यातील कर्मठ आचार धर्मामुळे असंख्य मागासवर्गीयांवर शेकडो वर्षेअन्याय होत आला आहे. आधुनिक काळात त्याची शोषण यंत्रणा जात पंचायतींच्या माध्यमातून कार्यरत आहे. तो दूर व्हावयास हवा असेल तर जाति संस्था नष्टच होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार याबाबतीत लक्षणीय आहेत. ते म्हणतात, “जातिभेद नष्ट करायचा असेल तर त्याला एक जालीम उपाय आहे व तो म्हणजे आंतरजातीय विवाह.” मिश्र विवाह हे जातिनिर्मूलनाचे प्रभावी साधन केंव्हा होईल? ज्यावेळी विवाहांना समाजाचा असलेला विरोध बर्‍याच मोठ्या प्रमाणात कमी होईल. तेंव्हाच या विवाहामुळे जाति निर्मूलनाचे काम साध्य करता येईल. समाज आपल्याशी फटकून वागला तर आपणही त्याच्याशी फटकून वागले पाहिजे ही वृत्ती ठेवून जाति निर्मूलनाचे ध्येय साध्य होणार नाही. त्याबाबतीत क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीने वागण्याची आवश्यकता आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण म्हणतात, “सामाजिक समता संस्थापनेचे अभियान गतिमान करायचे असेल तर आंतरजातीय विवाहाचा आदर्श समाजापुढे गौरवशाली पद्धतीने मांडला गेला पाहिजे. आंतरजातीय विवाहांच्या मागे आपली नैतिक शक्ती उभी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.” स्वामी विवेकानंदांनी ‘भारतीय नारी’ या ग्रंथातील विवेचनात प्रतिपादन केले आहे, “आपल्या समाजातील एकेका पोटजातीत शेकडो वर्षांपासून विवाह चालू आहेत. त्यामुळे शरीर दूर्बल होत आहे. अगदी थोड्या लोकांमध्ये रक्ताचे संचारण होऊन ते दूषित होत आहे आणि शारीरिक व्याधी घेऊनच नवीन बालकांचा जन्म होत आहे.”

परिस्थितीच्या रेट्यामुळे सगळेच समाज चित्र बदलत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून स्त्री-पुरुषांना एकत्र येण्यासाठी नाना प्रकारच्या संधी मिळत आहेत. जातिबंधने शिथिल होऊ लागणयची कारणे बुद्धिपुरस्सर स्वीकारलेल्या उदार मतवादापेक्षा आर्थिक निकडीत अधिक सापडतील असे म्हटले जाते. त्यामुळे जात पंचायतीच्या संघटीत व परंपरेने मान्यताप्राप्त शोषण व्यवस्थांना दुर्बल करण्यासाठी जात वास्तव, जातीय संघटना, जात पंचायती, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, पूरक कायदे व नियम-नियमावली, कल्याणकारी राज्यातील महसूल व पोलीस प्रशासनाची जबाबदारी, सामाजिक न्याय व महिला बाल कल्याणाच्या विविध योजना आणि मानव अधिकार व व्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व याबाबत ‘व्यापक साक्षरता मोहीम’ राबविण्याची अत्यंत गरज आहे. त्याशिवाय आज संसदीय निवडणूकीच्या राजकारणाचा प्रमुख आधार झालेल्या जात वास्तवातून मुक्त होऊन जाती-धर्म निरपेक्ष,शोषण रहित, समताधिष्ठित समाज उभारणीच्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकणार नाही. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार ही जीवनदृष्टी मानणार्‍या कार्यकर्ते, वाचकांनी आमच्यासोबत ‘त्या’ दिशेने एक पाऊल तरी टाकलेच पाहिजे!

अविनाश पाटील

मो. 9422790610