“आमची तशी भाची लागते हो! घरची परिस्थिती वाईटच म्हणायची. घरच्यांनी आलं ते स्थळ चांगलं म्हणून सोळावं सरतंय तोच लग्न केलं. सासू भयंकर छळायची म्हणून माहेरी आली तो नवराही पाठ धरून आला. इथंच स्वतंत्र राहू या म्हणाला. पण नोकरी धड नाही. भाड्याच्या घरातच रहातात. आताशा काय व्हायला लागलंय की मंगळवारी देवीच्या देवळात आरती सुरू झाली की, तिच्या अंगात येतं. घुमते, पिंगा घालते, वेगळ्याच आवाजात बोलते. सगळेच म्हणतात तिच्या अंगात देवीचा संचार होतो म्हणून. पण मागे शेजारच्या गावात तुमचा कार्यक्रम बघितला होता, तेव्हापासून पटलंय की असलं काही नसतं म्हणून, पण पटवता येत नाही हो सगळ्यांना. म्हणून तुमच्याकडे आलोय.” चाळीशीचा नवरा आणि पस्तिशीची बायको असे दोघे एका रविवारी आमच्याकडे गार्हाणं घेऊन आले होते.
देवाच्या दर्शनाचा ध्यास अनेक साधू संतांनी आजवर घेतला. घरदार, तहानभूक, थंडीवारा, उनपाऊस कशाकशाचीही पर्वा न करता तपश्चर्या केली. असं म्हणतात की, यापैकी ज्या मोजक्या लोकांना ‘देव’ दिसला तो केवळ काही क्षणांपुरताच. साधू-संतांना वर्षानुवर्षे दर्शन न देणारे देव, गावोगावी आठवडा पंधरवड्याला सामान्य माणसांच्या शरीरात शिरतात आणि बोलू लागतात. चारचौघांसारखी वागणारी बाई भजनात दंग होऊन वाद्यांच्या गजरात अचानक घुमू लागते, वेगळं बोलू लागते, आवाज बदलते, पाया पडणार्या बायाबापड्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागते. या सगळ्यावर आपण सहजपणे विश्वास कसा ठेवतो? साधा विजेचा बल्बसुद्धा ‘टेस्ट’ करून आणणारी शहाणी व्यवहारी मंडळी ‘अंगात येणं’ मात्र निमूटपणं स्वीकारतात? देव व धर्म यावरच्या सर्वांच्या श्रद्धेचा योग्य आदर करायचं ठरवलं तरीही ‘अंगातल्या दैवी संचाराची’ डोळसपणे चिकित्सा करणं अशावेळी गरजेचं वाटतं. अंगात येण्याचा पहिला प्रकार म्हणजे निव्वळ ढोंग! लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, त्यांना लुबाडण्यासाठी अंगात ‘आणलं’ जातं. प्रश्नांची उत्तरं दिली जातात, उपाय सुचवले जातात. एकंदर प्रकारात अंगात आ(ण)लेल्या व्यक्तीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा असतोच. कारण प्रश्न विचारणारे कमीतकमी एखादा नारळ आणि पाच रूपये तरी ठेवतातच. याशिवाय अंगात आलेला अवसर जी ‘फी’ आकारतो ती वेगळीच!
अंगात येण्याचा दुसरा प्रकारा म्हणजे ढोंग नसतं, तर तो असतो सौम्य असा मनाचा आजार. सुरवातीला जी गोष्ट सांगितली तशा कितीतरी अभागिनी अजूनही आसपास दिसतात. या मुलीला काय झालं होतं? कोवळ वय. शरीर आणि मन अजून लग्नासाठी पुरेसं तयार नाही. तशातच लग्न झालं. अपरिचित नाती, सासरचा छळ, भांडणं, नवर्यानं मूग गिळून बसणं, काय करावं तिनं? आपलं दु:ख कुणाला सांगावं? माहेरी येऊनही काहीच उपयोग झाला नाही. नवरा येऊन संसार सुरू झाला खरा, पण नियमित उत्पन्नाअभावी सततचा असुरक्षितपणा. या सगळ्यामुळे तिच्या मनावरचा ताण अतोनात वाढला.
माणसाच्या मनाचे दोन भाग असतात. आपल्याला सतत जाणवणारं बाह्यमन आणि सुप्त असणारं अंतर्मन. एखाद्या हिमनगाप्रमाणे एक अष्टमांश प्रकट दिसणारं बाह्यमन, तर सात अष्टमांश न दिसणारं अंतर्मन. साहजिकच बाह्य मनापेक्षा अंतर्मन सातपट मोठं असल्यामुळे अधिक प्रभावी असतं. माणसाच्या आयुष्यातील सुखं-दु:खं, आशा-निराशा, असं सगळं त्यात साठवलं जातं. पण हे मोठं असणारं अंतर्मनही सततच्या ताण-तणावांनी व्यापलं गेलं तर? जरा एखाद्या धरणाचं चित्र समोर आणा. धरण जेव्हा तुडुंब भरतं तेव्हा पाण्याच्या रेट्यानं ते फुटू नये म्हणून त्यात असलेल्या झडपा उघडून जास्तीचं पाणी पुढे सोडावं लागतं, वाहून जाऊ द्यावं लागतं. तसं केलं नाही तर धरण फुटेल आणि सगळं उद्धवस्त होईल. नेमकं असंच काहीसं ज्याला आपण देवानं किंवा देवीनं अंगात येणं म्हणतो त्याबाबत घडतं. मनाच्या जाणीवेच्या पलिकडच्या पातळीवर अंतर्मनाच्या झडपा उघडल्या जातात. काही काळ मूळ व्यक्तिमत्वाचा विसर पडतो. अशी व्यक्ती मग वेगळीच दिसते. वेगळीच वागते. थोड्या वेळानंतर ती पूर्ववत होते. या काहीशा गूढ वाटणार्या प्रक्रियेमुळे अंतर्मनातील ताण बाहेर टाकले जातात. मनाची ही स्वसंरक्षणाची कृती व्यक्तीमत्व संपूर्ण उध्वस्त होण्यापासून वाचवते. ही गोष्ट मनाच्या अबोध पातळीवर नकळतपणे घडत असते. याची ढोबळपणानं तीन कारणं किंवा पातळ्या सांगता येतील. एक-पारंपारिक मान्यताप्राप्त वर्तन, दोन-ज्ञानेंद्रिय उद्दीपन आणि स्वसंमोहन आणि तीन-प्रासंगिक मनोविघटन(सोमॅटोफॉर्म डिसोसिएशन).
पारंपारिक मान्यताप्राप्त वर्तन : एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा तिथीला एखाद्या विशिष्ट वेळी व्यक्तीच्या अंगात येतं. यामागे ‘सूचना-ग्राहकत्व’ हे कारण असतं. लहानपणापासून मंगळवार-शुक्रवार हे देवीचे वार किंवा अष्टमी-नवमी या देवीच्या तिथी असं समीकरण आपल्या डोक्यात पक्कं झालेलं असतं. वेळेची किंवा तिथीची जाणीव ही बाह्यमनानं अंतर्मनाला केलेली सूचनाच असते. ‘अंगात येऊ शकतं’ असं संस्कार झालेला असतो. त्यात गैर काहीच नाही, उलट देवाचा संचार होणं हे अभिमानास्पदच अशी अप्रत्यक्ष पारंपारिक मान्यताही असते. त्यावेळी होणारं ‘बेभान’ वर्तन हे सर्वमान्य आहे, त्यात अयोग्य काहीच नाही, कोणीही हसणार नाही अशा खात्रीतून बाह्यमनाचं नियंत्रण सुटतं. नेहमीच्या वागण्यातील बंधनं सैल होतात आणि ‘अंगात येतं.’
ज्ञानेंद्रिय उद्दिपन आणि स्वसंमोहन : नवरात्रात रात्री जागरणाच्या ठिकाणी आणि एरवीही यात्रा-उत्सवांच्या ठिकाणी देवीच्या अवतीभोवती रोषणाई केलेली असते. त्या लखलखाटामुळं डोळ्यांचं उद्दीपन होतं. ठेक्यावर म्हटल्या जाणार्या आरत्या-भजनांमुळे, घंटाच्या आणि वाद्यांच्या गजरामुळे कानांचं उद्दीपन होतं. उदा.धुपाच्या वासामुळं नाकाचं उद्दीपन होतं. या सार्या वातावरणाचा परिणाम म्हणून व्यक्तींच्या संवेदनांना आधी एकतानता आणि नंतर बधीरता प्राप्त होते. हळूहळू या व्यक्ती संमोहन अवस्थेत जातात आणि घुमायला सुरवात करतात. घागरी फुंकण्यामुळं, फुंकलेल्या घागरीत उच्छवासातून बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड वायू साठतो. घेतलेल्या श्वासाबरोबर तो आपल्या रक्तात मिसळू लागतो आणि मेंदूला मिळणार्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. मेंदूच्या तल्लखपणावर याचा विपरित परिणाम होऊन बेहोशी वाढण्यास मदत होते.
प्रासंगिक मनोविघटन : अंगात येणार्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्वाचा प्रकार. स्त्री-पुरूष असमानतेवर आधारित समाजव्यवस्थेमुळे विशेषत: स्त्रियांना अनेक प्रकारच्या मानसिक ताणांना तोंड द्यावं लागतं. यात सासुरवास असतो, लैंगिक अतृप्ती असते, मूल न होणं किंवा मुलगा न होणं अशा गोष्टी असतात. आणि मुख्य म्हणजे स्त्रियांच्या मनात या सर्वांमागे उगाचच अपराधी भावना असते. प्रतिष्ठित, सुशिक्षित, सुखवस्तू घरातील स्त्रियांनाही हे त्रास असतात. अंतर्मनातील हे ताण जेव्हा नियंत्रणाबाहेर जातात त्यावेळी त्यांचा समाजमान्य रितीनं निचरा होणं आवश्यक असतं. यासाठीच त्या व्यक्तीच्या बाह्यमनाचं विघटन(डिसोसिएशन) होतं. त्या व्यक्तीचा आवाज बदलू शकतो, चेहर्यावरचे हावभाव बदलतात, लोकांना नेहमीपेक्षा कोणी वेगळीच व्यक्ती समोर आहे की, काय असं वाटतं. तिथी-वारांचे संस्कार बघणार्यांवरही असतातच. त्यामुळे त्यांनाही वाटतं की देवीच अंगात आली. एखाद्याला चुकून शंका आली तर बाकीचे मूर्खात काढतील आणि अश्रद्धपणाचा शिक्का बसेल ही भीती असतेच. शिवाय खरंच देवी असेल तर कशाला कोप ओढवून घ्या, असंही वाटत असतं.
हे सगळं सांगितल्यावरही कुणाला अशी शंका वाटू शकते की अंगात आल्यावर प्रश्नांची उत्तरं कशी मिळतात? त्यावेळी सर्वसाधारणपणे विचारले जाणारे प्रश्न बहुधा प्रापंचिक असतात. उदाहरणार्थ मुलीचं लग्न कधी जमेल? यावेळी मुलाला मुलगा होईल का? नवर्याला बढती मिळेल का किंवा बदली होईल का? यावर उपाय म्हणून पाच मंगळवार करायला सांग, नऊ मंगळवार अखंड दिवा तेवत ठेव, अशी काहीतरी उपासना सांगितली जाते. समजा मुलाऐवजी मुलगी झाली तरी पुढच्या वेळेला कोणी जाब विचारायला येणार नसतं. दोष प्रारब्धाला दिला जातो. देवी कशी खोटी असेल? देवी सर्वज्ञ, सर्वसंचारी, सर्वशक्तीमान आणि कल्याणकारी असते, तर मग या देवीला असले प्रापंचिक प्रश्न विचारण्यापेक्षा काश्मीरपासून मुंबईपर्यंत हैदोस घालणार्या दहशतवाद्यांचं निर्दालन ती कधी करणार हे का विचारू नये? भारतमातेच्या रक्षणासाठी तरी पाकच्या सैन्याच्या हालचाली कुण्या देवीनं आपणहून का सांगू नयेत? पण असं मात्र घडत नाही. ही सगळी माहिती समजून घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की, खेड्यातल्या एखाद्या अडाणी बाईच्या अंगात येणं काय आणि एखादी शहरातली सुशिक्षित बाई घागर फुंकत असताना तिच्या अंगात येणं काय, दोन्हीही मानसिक आजारच! तेव्हा अंगात येणार्या बाईच्या कुटुंबियांनी तिच्या पाया न पडता हे लक्षात घ्यायला हवं की, तिचा कोणत्या तरी कारणामुळं मानसिक कोंडमारा होतोय. महत्वाचं म्हणजे याबाबतीत तिला दोषी न ठरवता तिच्याशी संवाद साधून तिची घुसमट जाणून घ्यायला हवी. हे ध्यानात ठेवायला हवं की, हा परिस्थितीतील ताण-तणावांशी जुळवून घेता न आल्यामुळे झालेला, बरा होऊ शकणारा सौम्य मानसिक आजार आहे. प्रेमाची, सहानुभूतीची वागणूक हाही त्यावरचा एक उपाय आहे. अशी व्यक्ती नक्की बरी होऊ शकते, पण त्यासाठी तिची परिस्थिती बदलायला हवी, छळ रोखायला हवा, सहानुभूतीनं संवाद साधायला हवा. मानसोपचारातज्ञांची मदतही घ्यायला हवी.
-डॉ.आशुतोष मुळ्ये