1 जुलै 2012 रोजी वर्तमानपत्रात एक बातमी आली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर निमज या भोंड्या माळावर वसलेल्या गावात शुक्रवार तारीख 29 जून 2012 रोजी रात्री 12 वाजता एक देवी प्रगट झाली. देवी म्हणजे देवीची सोन्याची मूर्ती जमिनीतून आवाज काढत उगवली. त्यामुळे तिच्या पुढं भक्तांची रांग लागली. पहिल्या पहिल्यांदा सर्वांनीच त्या बातमीकडे दुर्लक्ष केलं. परंतु नागजचे दै.पुढारीचे वार्ताहर विठ्ठल नलवडे यांनी मात्र या बातमीचा पिच्छा सोडला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना नलवडे यांनी फोन करून वस्तुस्थिती पहा आणि त्याचा भांडाफोड करा अशी सूचना केली. ते नुसते सूचना करून थांबले नाहीत तर त्यांनी त्या सुचनेचा पाठपुरावा केला. त्यांच्या सुचनेप्रमाणे दि.22 जुलै 2012 रोजी अंनिसचे ज्येष्ठ मार्गदर्शक व वार्तापत्राचे संपादक प्रा.प.रा.आर्डे, जिल्हा उपाध्यक्ष कॉ.नामदेव करगणे आणि मी असे तिघे निमजला गेलो. दै.पुढारीचे पत्रकार नलवडे यांनी फोन केला पण ते सांगलीत असल्याचं समजले.
कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्याच्या हद्दीवर असणार्या नागज पासून गुहागर विजापूर रस्त्याने चार पाच किलोमीटरवर निमज हे गाव आहे. गाव भोंड्या माळावर वसलेलं. दुष्काळाचं चटकं सोसून सोसून रया गेलेली करपलेल्या चेहर्याची माणसं. कुठं हिरवळीचा पत्तासुद्धा नाही. गर्द सावलीच्या झाडांना या परिसरात थाराच नाही. झाडं असलीच तर ती काटेरी बाभळीची. तशी झाडं कमीच पण झुडपं बर्यापैकी. ती पण कुपोषित बालकासारखी खुरटलेली. गावात निम्मी पडकी आणि निम्मी चांगली अशी घरं. रस्ते खडबडीत आणि खडकाळ. गावात शे दीडशे घरं. जिथं गाव सुरू झालं तिथंच थांबलो. एकजण साठीकडं झुकलेला इसम समोरून आला. त्याला परवा देवी प्रगट झालेलं ठिकाण कुठं आहे हे विचारलं. त्यानं एकवार आमच्याकडं निरखून बघितलं. मनातल्या मनात तो म्हणाला असंल, की ही शिकल्या सवरलेली माणसं दिसत्यात. पण हीबी फसल्यातच. आम्हाला त्यानं हात करून एक विजेचा खांब दाखविला. तिथनं डावीकडं वळा. जवळच आहे असं त्यानं सांगितलं. त्यानं सांगितल्याप्रमाणं आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो.
अडीच बाय अडीच फुटाचं आणि दीड फूट उंची असणारं लहानसं नवीन बांधलेलं आणि नुकताच गिलावा केलेलं वर भगवं निशान लावलेलं देऊळ दिसलं. तिथं थांबलो. थांबल्याबरोबर शेजारच्या घरातनं एकजण लगबगीनं आला. आम्ही देवळासमोर जमिनीवर बसलो. देवळाला जाळीचं दार होतं. ते त्या माणसानं उघडलं. आम्ही देवीचं दर्शन घेतलं. त्यानं आमच्या कपाळाला भंडारा लावला. त्यानं आम्हाला आणि आम्ही त्याला गाव नाव विचारलं. त्याचं नाव नामदेव कोळेकर आहे हे समजले. तोपर्यंत आसपासची आणखी दोघं आली. मग त्यातल्या एकानं सांगायला सुरवात केली. तो म्हणाला, गेलेल्या शुक्रवारच्याबरोबर मागच्या चौथ्या शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता या ठिकाणी एक मोठा आवाज झाला. नामदेवचा एक सतरा अठरा वर्षांचा मुलगा आहे. तो बालब्रम्हचारी आहे.(आता सतरा अठरा वर्षाचं पोरगं ब्रम्हचारी असणार नाही तर काय) त्याच्या अंगात येतंय. आवाज ऐकून तो आणि मी बाहेर आलो. बघितलं तर जमिनीतून सोन्याची एक पिवळी धम्मक मूर्ती हळूहळू वर येत होती. आम्ही दोघं तिथंच बघत थांबलो. आवाजामुळं इतरही बरीच माणसं गोळा झाली. अर्धा पाऊण तास गेला आणि बरोबर बारा वाजता देवीची संपूर्ण मूर्ती बाहेर आली. तेजानं चकाकायला लागली. लख्ख उजेड पडला. आम्ही सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं. रात्रभर आम्ही तिथंच जागत बसलो. उजाडल्यानंतर देवीच्या दर्शनाला माणसांची झुंबड उडाली. मग आम्ही हे छोटसं मंदिर बांधलं. प्रा.आर्डे सरांनी त्याला विचारलं की, देवी कोणती आहे? तो म्हणाला गावातल्या मराठी शाळेजवळच्या देवळातील मायाक्का आहे. त्या देवळात तिचा कोंडमारा झाला. तिथल्या पुजार्याने आपल्या आईच्या अस्थी रात्री देवीच्या गाभार्यात पुरल्या. गाव सारं देवीसंगं त्याच्या आईच्या अस्थिचबी दर्शन घ्यायला लागलं. हे देवीला सहन झालं नाही. त्यातनं देवीनं. आपली सुटका करून घेतली आणि इथं उगवली.
गडी लई माहिती द्यायला लागला. आपल्या सगळं लक्षात राहणार नाही म्हणून मी लिहून घ्यायला लागलो. तसा नामदेव कोळेकर माझ्यावर खेकसला. लिहून घेताय म्हणजे तुम्ही काय पत्रकार हाय काय? तुम्ही काय हे सगळं पेपर आऊट करणार हाय काय? त्यावर दुसरा म्हणाला, आजवर एका दोघांनी पेपरात दिलंय. त्यांची काय गत झाल्या ते बघा आणि मग पेपरात द्या. मी त्याला पेपरात द्यायला नाही तर माहितीसाठी लिहून घेतोय असं सांगितलं. त्यानंतर नामदेव कोळेकर म्हणाला, हे बघा आम्ही काय कोणाला बोलवायला जात नाही, कोणाला काय मागत नाही. माणसं आपणहून येत्यात, नारळ फोडत्यात. काही जण दक्षिणा देत्यात. मी त्यांच्या कपाळाला भंडारा लावतो. भक्तांची गर्दी होते त्याला आम्ही तरी काय करणार? असं त्यानं ठासून सांगितलं. प्रा.आर्डे सरांनी त्याला अंगात येणारा राहुल कुठं आहे? भक्तांच्या प्रश्नांना तो उत्तर देतोय काय? त्यांच्या समस्या सोडवतोय काय? त्यांच्या समस्यांवर उपाय सांगतोय काय? त्यांच्याकडून पैसे घेतोय काय? असे प्रश्न विचारायला सुरवात केली. त्यावर त्यांची पंचायत व्हायला लागली. त्याचबरोबर गर्दीतील दोन तरूण पोरं पुढं आली. त्यांनी नामदेव कोळेकर आणि त्याच्या त्या जोडीदाराला गप्प बसवलं. त्यापैकी एक पोरगा म्हणाला, हे बघा साहेब आम्ही कॉ.नामदेव करगणेंना ओळखतोय, त्यावरनं तुम्ही कोण हायसा हे आम्हाला कळलंय. देवी प्रगट झालेली नाही. जमिनीतून उगवलेली नाही. ती सोन्याची नाही. ती पितळंची आहे. आम्ही आमच्या खर्चानं ती बनवून आणून इथं बसविल्या. देऊळ आम्ही बांधलंय. आम्ही कुणाकडनं पैसे घेत नाही. राहुल अंगात येऊन भविष्य सांगत नाही. जुन्या देवळातला पुजारी हाक्के याचं आम्हाला पटत नाही. म्हणून इथल्या कोळेकरांनी स्वत:ची देवी स्वतंत्र केली. आतापर्यंत नामदेव कोळेकर आणि त्याच्या जोडीदारानं जे सांगितलं ते सारं खोटं आहे. ते तुम्ही मनावर घेऊ नका.
कॉ.नामदेव करगणेंना ओळखल्यामुळं आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माणसं आहोत हे त्या पोरांनी ताडलं. ही माणसं नामदेव कोळेकराचा भांडाफोड करणार. इथं थापा मारून चालणार नाही. सगळं खरं सांगून पुढचं संकट टाळण्यातच शहाणपण आहे असा विचार करून त्यांनी रिव्हर्स टाकला. आमचं भांडाफोड मिशन अयशस्वी झालं. पण अंनिसच्या कामाचा दबदबा किती आहे याची प्रचिती आली. चळवळीतल्या कार्यकर्त्यांपुढं थापा मारून चालत नाही. इथं खरंच सांगावं लागतं हेच आपल्या चळवळीचं यश आहे. दुसर्या दिवशी निमजच्या मंडळींनी रिव्हर्स टाकल्याची बातमी पेपरला आली. भक्तांची गर्दी कमी व्हायला लागली. कोळेकरांची बनवेगिरी उघड झाली. त्यांच्या दुकानदारीला पायबंद बसला.