ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर, फलटण तालुक्यात तरडगाव नावाचे मोठं गाव आहे. त्याच्या लगतच्या मौजे शिंदे माळ या गावात विठ्ठल सगोबा शिंदे नावाचा भोंदूबाबा प्रसिद्धीस आला. पिठाच्या गिरणीवर काम करणारा तो साधा कामगार होता. त्याने बुवाबाजीच्या मोठ्या मिळकतीतून पूजाविधीसाठी मोठा हॉल बांधला आहे. देवदेवतांच्या तसबिरींनी तो सजवला आहे. दारात स्वत:च्या तीन गाड्या उभ्या आहेत. दर अमावास्या आणि पौर्णिमेला मोठा दरबार भरतो. दरबारात मोठी रक्कम घेऊन करणी, भानामती आणि चेटूक काढले जाते. आजार्यांसाठी जारण-मारण विधी केला जातो. शावरी(?) विद्येत माहीर असल्याची त्याची ख्याती आहे. विठ्ठल महाराजाने आपल्या बुवाबाजीची सुरवात स्वत:च्या चुलत भावापासून केली. विष्णू दत्तात्रय शिंदे याच्या घरात खवीस आहे. घरातील पितरं काढल्याशिवाय सुख लागणार नाही अशी भीती त्याने त्याला घातली होती. चुलत भाऊ घाबरला. त्याने घर विकायला काढले. पडेल किंमतीत या बाबानेच ते विकत घेतले. बाबाची सुरवात चांगली झाली. त्याचा घोडा स्वैर सुटला. याच पद्धतीने चुलत भावाची जमीन हडपण्याचा प्रयत्न त्याने चालवला. “जमीन माझ्या नावे कर. नाहीतर सर्वांना आंधळा करीन, पाय लुळे करीन” महाराजाने दम दिला. विष्णू शिद्यांनी सातार्याच्या अंनिस शाखेकडे संपर्क साधला. प्रशांत पोतदारने सचिन पोळ व इतर कार्यकर्त्यांसह गावात जाऊन चौकशी केली. बुवाचे मोठे प्रस्थ असल्याची जाणीव झाली. विठ्ठल महाराजाची भेट घेतली. महाराजास विनंती केली.
“महाराज! हा माझा मित्र सचिन पोळ. लग्न होऊन पंधरा वर्षे झाली, मूलबाळ नाही. त्यामुळे तो मधून मधून वेड्यासारखा वागतो. त्याला चक्कर येते. तो जमिनीवर लोळण घेतो. प्रत्यक्षात सचिनला तीन मुले आहेत. लगेचच सचिन वेड्यासारखा हावभाव करू लागला. चक्कर येऊन लोळू लागला. प्रशांतने सचिनच्या गावी येऊन पूजा घालावी अशी विनंती केली. यावर महाराज उत्तरला, “जाग्यावर पूजा घालण्यासाठी, तीन पूजांचे नियोजन करा. प्रत्येक पूजेला वीस हजार, या प्रमाणे साठ हजारांची तजवीज करा.” पुढे महाराज म्हणाला, “महिन्याभरच्या पूजा बुक आहेत. पुढे बघू.” संपर्कासाठी महाराजांनी स्वत:चे व्हिजीटींग कार्ड दिले.
साप्ताहिक मिटींगमध्ये महाराजाच्या पूजेची चर्चा झाली. पूजेचा कार्यक्रम झटपट घेण्याचे ठरले. प्रशांतने महाराजाला फोन लावला. “महाराज! आपले दर्शन झाल्यापासून सचिनची तब्येत लई बिघडली आहे. त्याचे विचित्र वागणे वाढले आहे. एकदोन दिवसात पूजेचे काय ते बघा.”
प्रशांतच्या आग्रहाला महाराज बळी पडला. पूजेची फी अधिक जाण्यायेण्याचा, गाडीचा खर्च मागितला. शनिवार दि. 8/9/2012 रोजी संगम मुहली येथे पूजा घालण्याचे ठरले. आदल्या दिवसापासून प्रशांत महाराजाच्या संपर्कात होता. भगवान रणदिव्यांच्या घरी उदय चव्हाण, किशोर धरपडे, युवराज झळके, वसीम बागवान, समीर कांबळे आणि महेश हे महाराजाच्या स्वागताला उपस्थित होते. महाराज रणदिव्यांच्या घरी पोहोचताच भगवान रणदिव्यांनी नारळ व 500 रू.ची नोट देऊन त्याचे स्वागत केले. नोटेची झेरॉक्स प्रशांतच्या खिशात होती. महाराजाने खिशात नोट ठेवताच कार्यकर्त्यांचे चेहरे उजळले. प्रशांतने सर्व वृत्तपत्रांच्या वार्ताहरांना एस.एम.एस.केला होता. ठीक बारा वाजता उपस्थित राहण्याबाबत बजावले होते. शिरवळच्या मुराद पटेलने बातमीदार व वृत्तवाहिनींची आघाडी सांभाळली. संकेताचा एस.एम.एस.मिळताच त्यांनी पूजास्थानावर धडक मारायची असे ठरले. महाराजाबरोबर त्याचे दोन साथीदार, भानुदास विठोबा शिंदे आणि वसंत भिकू शिंदे होते. त्यातील एक महाराजांचा ड्रायव्हर होता.
पूजेला नवरा बायको दोघांना बसावे लागेल याचा अंदाज कार्यकर्त्यांना नव्हता. सचिनकडे बघत, दोघांनी पूजेला बसा असे महाराजाने सुचविले. सचिनची बायको उपस्थित नव्हती. लगेच उपस्थित होण्याची शक्यता नव्हती. प्रसंगाचे गांभीर्य सचिनच्या लक्षात आले. सचिनकडे एकमेव हत्यार म्हणजे चक्कर येऊन लोळण घेणे. त्याने लोळण घेतलीच. आणि सचिनची पूजेतून सुटका झाली. प्रशांतने रणदिव्यांना खूण केली. रणदिवे तयार झाले. परंतु त्यांची बायको तयार होईल याची खात्री नव्हती. रणदिव्यांनी बायकोची समजूत काढली. दोघे पूजेला बसले. पूजेचा कार्यभाग महाराजाच्या साथीदाराने पार पाडला. यानंतर होमहवनाचा विधी होता. होमहवनाचे साहित्य महाराजांनी मांडून घेतले. मध्ये हवनासाठी शेगडी ठेवली. महाराज उठून बाथरूममध्ये गेले. होमाचा ड्रेसकोड घालून आले. भगवी कफनी, भगवी लुंगी, कपाळावर भस्माचे आडवे पट्टे आणि त्यावर उभे कुंकू. गळ्यात रूद्राक्षाच्या माळा. भगव्या कफनीतील महाराज बघून, कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. कफनीमुळे महाराज पकडल्याचे खरे समाधान मिळणार होते. याच वेळी सिव्हील ड्रेसमधील मजबूत बांध्याचे दोन पोलीस शिपाई उपस्थित झाले. त्यांचे कडक इस्त्रीचे कपडे बघून महाराजाला संशय आल्यास मोठी अडचण होणार होती. फौजदारसाहेबांना बजावून विनंती केली होती. ‘सामान्य बांधणीचे गावकरी दिसणारे पोलीस पाठवा म्हणून.’ महाराजाला संशय यायच्या आत प्रशांतने खुलासा केला, “सचिनचे मेव्हणे मुंबईवरून पूजेला आले आहेत.” महाराजाचे समाधान झाले. ते पूजा सांगू लागले. पूजेची मांडणी करता करता महाराजाने रणदिव्यांकडे चौकशी केली. “तुम्हाला काय त्रास आहे” यावर रणदिवे उत्तरले, “उजव्या खांद्यावर गाठ आहे. सतत दुखते. डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करून काढून टाकू. पण मला भीती वाटते. मंडळीपण तयार नाही.” महाराजाने गाठीला हात लावून खात्री केली. रणदिव्यांच्या खांद्यावर लहानपणापासून गाठ आहे. तिचा त्यांना काहीही त्रास नाही. महाराजाने चौकशी केली. “घरात पैसे किती आहेत?” रणदिवे म्हणाले, “फक्त पाचशे रूपये आहेत. बाकीचे गोळा करून देतो” महाराजाने होमविधी पुढे चालू ठेवला.
महाराजाने लोखंडी शेगडीत आगाड्याच्या वाळलेल्या काटक्या टाकल्या. त्यात कापराच्या मोठ्या पाच वड्या पेटवून टाकल्या. त्यातील पेटतात किती आणि विझतात किती यावरून महाराज रणदिव्यांचा प्रॉब्लेम सोडविणार होता. आगाडा पेटला प्रचंड धूर झाला. सारे घर धुराने भरून गेले. लोक ठसकू लागले. त्यांचे डोळे लाल झाले. भगवान रणदिवे उभे राहिले आणि ओरडले. “शिंदे महाराज तुला काहीही कळत नाही. तू लबाड आहेस, भोंदू आहेस. पूजा घालून लोकांना लुटतोस. सचिनला तीन मुले आहेत. तो अजिबात वेडा नाही. पकडा या हरामखोराला!” एवढ्यात बातमीदार, चॅनेलवाले पुढे झाले. कॅमेर्याचे फ्लॅश उडू लागले. पोलिसांनी झेप टाकून महाराज व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. महाराजाचे सर्व साहित्य व इंडिका गाडी(एम.एच.9, एबी-1407) ताब्यात घेतली. महाराज हातापाया पडू लागला, ‘मला सोडा’ म्हणू लागला. ही सारी वरात सातारा सिटी पोलीस स्टेशनात येऊन धडकली. महाराज व त्याच्या साथीदारावर फसवणुकीचा 420 व मॅजिक ड्रग्ज आणि रेमिडिज ऑब्जेक्शनेबल अॅक्ट 1954 या कलमाने एम.आय.आर.92/2012 दाखल केला. त्यांना अटक झाली. त्याची बातमी विविध वृत्तपत्रात एकाच वेळी प्रसिद्ध झाली.
दुसर्या दिवशी दि.9/9/2012 रोजी या सर्वांची जामिनावर मुक्तता झाली. ते तिघेही एस.टी.बसने लोणंद स्टँडवर येताच, तेथील पोलिसांनी अत्यंत खुबीने त्यांना पुन्हा अटक केली, लोणंद पोलिसांनी सांगितले, “पोटाच्या विकारावर औषध देतो, दैवी कोप झाला आहे, करणी केली आहे. यासाठी विठ्ठल शिंदे महाराजांनी कालसर्प योग पूजेसाठी पाच हजार रूपये घेतले आहेत.” अशी फसवणुकीची फिर्याद विष्णू शिंदे यांनी दिली आहे….
लोणंदच्या पोलिसांनी महाराजाच्या शिंदे मळ्याच्या घरावर, पूजा हॉलवर छापा टाकला. पंचनामा करून साहित्य जप्त केले. लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत केंद्रे यांचा प्रशांतला फोन आला. शिंदे मळ्यात प्रचंड संख्येने गाव जमा झाला आहे. तुम्ही इकडे या. प्रशांतच्या शरीरात शंकेची लहर चमकली. बहुतेक गावकरी आपल्या महाराजांची पाठराखण करतात. प्रशांतने प्रश्न केला, “मॉब कसा आहे?”
इन्स्पेक्टर उत्तरले, “सर्व महाराजांच्या विरोधात आहेत. त्यांच्या घरात झालेल्या पूजेच्या फोटोंचे पुरावे घेऊन ते सर्वजण उभे आहेत.” म्हणजे या महाराजाने आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाचे शोषण केले होते. महाराजांच्या दादागिरीला लोक कंटाळले होते. महाराजाच्या अटकेने त्या सर्वांना खूप आनंद झाला होता. हे त्यांच्या चेहर्यावरून लक्षात येत होते. या मोहिमेमध्ये अं.नि.स.चे डॉ.दाभोलकर, सचिन पोळ, समीर कांबळे, भगवान रणदिवे, वसीम बागवान, किशोर धरपडे, युवराज झळके, उदय चव्हाण, शंकर कणसे, मुराद पटेल, महेश सुरवडे, पोपट धायगुडे व प्रशांत पोतदार या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पत्रकार व पोलीस यांनी सहकार्य केले.