राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा देशभर साजरा झाला. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा! त्याच पंधरवड्यात अलिबागेत हे घडावे, हा योगायोग तर खराच, पण तो सर्वांसाठीच एक संदेश आहे. आमचे मित्र आणि चळवळीतील स्नेही नितीनकुमार राऊत यांचे वडील नरहरी केशव राऊत यांचे गुरूवारी निधन झाले. समाजवादी चळवळीतील संस्कारातून नरहरी राऊत यांची घडण झाली. म्हणूनच त्यांनी संकल्प केला तो नेत्रदानाचा. मरणोत्तर नेत्रदान करून त्यांनी अवघ्या रायगड जिल्ह्याला संदेश दिला आहे. नेत्रदानाची चळवळ खरे तर अधिक यशस्वी व्हायला हवी. पण तसे त्या गतीने होताना दिसत नाही. याचे पहिले कारण हे आहे की, मृत्यूला आपण अनेक कर्मकांडे आणि अंधश्रद्धा यांनी बांधून टाकले आहे. मृत्यू म्हणजे मुक्ती असे मानले जाते, पण अंधश्रद्धा आणि जुनाट धारणा यापासून तोही मुक्त नाही. आपल्या काकस्पर्शी समाजाने जगण्याइतकेच मरणाचेही रूपांतर अविवेकी व्यवहारात करून टाकले आहे! मरणोत्तर नेत्रदान केले तर शरीर विद्रूप होते इथपासून ते पुढच्या जन्मी अंधत्व येते इथपर्यंत अनेक अंधश्रद्धा आहेत. मरणोत्तर विधी हा आणखी वेगळाच विषय. नरहरी राऊत हे वाढलेच समाजवादी परंपरेच्या मुशीत. एस.एम.जोशी आणि ना.ग.गोरे यांच्या सान्निध्यात त्यांचे तारूण्य गेले. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदान करायचे, हे त्यांनी अगोदर बजावून ठेवले होते. त्यांचा एक मुलगा नितीन अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा खंदा कार्यकर्ता, तर नवीन आणि सुबोध हेही नव्या विचारांचे. त्यामुळे हा संकल्प सिद्धीस गेला. मरणोत्तर नेत्रदान ही खरे तर चळवळ म्हणून विकसित होणे फार आवश्यक आहे. भारतासारख्या देशात ही गरज मोठ्या प्रमाणात आहे. आज भारतात दीड कोटी लोक अंध आहेत. त्यापैकी सुमारे 30 लाख जण असे आहेत की, ज्यांना अशा नेत्रदानामुळे दृष्टी मिळू शकते. जगातील एकूण अंधांपैकी सुमारे वीस टक्के लोक भारतात असताना आपली या संदर्भातील जबाबदारी वाढते, पण ती जबाबदारी आपल्याला समजते, असे नाही. भारतात दरवर्षी मृत्यू होतात सुमारे 80 लाख. पण त्यापैकी फक्त 45 हजार लोक डोळे देण्यासाठी पुढे येताना दिसतात. दुर्दैव असे की, नेत्रदानाचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे. 2009 मध्ये 46,589 जणांनी नेत्रदान केले. तो आकडा 2011 मध्ये 44,926 पर्यंत घसरला. त्यामुळे भारतात जे नेत्ररोपण होते, त्यासाठीचे डोळे श्रीलंका वगैरे चिमुकल्या देशातून मागवावे लागतात. हे होते, याला आणखी एक कारण आहे. आपली अनास्था आणि अंधश्रद्धा ही तर कारणे आहेतच. पण ती तेवढीच नाहीत. व्यवस्था हाही मुद्दा आहे. म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव सर्वदूर दिसतो. असे एखादे उदाहरण स्वत:हून निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय नेते करीत नाहीत. राजकीय नेत्यांच्या निधनासोबत नेत्रदानाच्या बातम्या उमटताना दिसत नाहीत! आपली सार्वजनिक रूग्णालये तशी दक्ष नाहीत. शिवाय प्रशिक्षित डॉक्टर कमी आहेत. त्यामुळे अलिबागसारख्या गावात एखाद्याने अशी इच्छा व्यक्त केली तरी ती सिद्धीस जाणे वाटते तेवढे सोपे नाही. अलिबागमध्ये श्रीपाद आगाशे आणि त्यांचे चिरंजीव अनिल आगाशे असे काही कार्यकर्ते नेत्रदानाची चळवळ वाढावी यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहेत. त्याला यशही मिळत आहे. त्याशिवाय सुजाण-विचारी नागरिकांची संख्याही वाढू लागली आहे. मागे 21 जुलै रोजी डॉ.वसंत महादेव पाटील यांचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आणि तो सिद्धीस गेला. तातडीने पुढील शस्त्रक्रिया झाल्या. खूप गुणी-गरजू व्यक्तींना हे डोळे मिळाले. डॉक्टर आजही आपल्यासोबत आहेत, असेच आता वाटते, ही विद्या पाटील यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आकडेवारी आणि सामाजिक बांधिलकी सोडा, पण आपला माणूस नेत्ररूपी अमर आहे, ही कल्पना किती काव्यात्म आहे! नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैन दहति पावक: असे वर्णन नुसते करून काय उपयोग, इथे अगदी खरोखर अमर होण्याची संधी असताना त्याकडे पाहिले जात नाही. नेत्रदान करणे ही फार कठीण बाब नाही. ते कमालीचे साधे आणि सोपे काम आहे. शिवाय त्याला ना वेळ लागतो ना पैसा, गरज आहे ती आस्थेची. अलिबागमधील एक उदाहरण असेच बोलके ठरावे. पिंपळभाट येथील जयंत जोशी हे काजूचे व्यापारी. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनीही नेत्रदान केले. त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी, नरहरी राऊत यांची कन्या डॉ.वंदना मोकल यांचे निधन झाले. त्यांनीही नेत्रदान केले. याचा अर्थ असा की, अलिबाग आणि परिसरात हे प्रमाण वाढू लागले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पनवेलमध्ये एक नेत्रपेढी आहे. खरे तर अशा पेढ्या आणखी असायला हव्यात. पण सध्या डोळेच कमी मिळतात, त्याला काय करणार! आता हे प्रमाण वाढू लागले आहे. अलिबागमध्ये डॉ.रिटा धामणकर असोत वा श्रीपाद आगाशे असोत, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांचे डोळे उघडू लागले आहेत. ही घटना त्या दृष्टीने महत्वाची मानायला हवी-ठाण्यातील अजय गोगटे एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या घरी जवळचे-दूरचे असे मिळून सुमारे 50 जण एकत्र जमतात. यावेळी रक्षाबंधनाला काहीतरी वेगळे करायचे असे ठरविल्याने गोगटे यांनी आपली बहीण राखी गोखले यांच्याशी चर्चा करून सामुदायिक नेत्रदानाचा निर्णय घेतला. रक्षाबंधन म्हणजे रक्षण करणे आणि म्हणून नेत्रदान हा अंध व्यक्तींचे रक्षण करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे असे गोगटे यांना वाटले. हे घडले ते श्रीपाद आगाशे यांच्या पुढाकारामुळे. त्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दिल्यानंतर घरातील 23 जणांनी नेत्रदानाचा फॉर्म भरून आगाशे यांना दिला. याचा अर्थ एवढाच की, आता बदल होत आहे पण त्याचा वेग कमी आहे. पुनर्जन्म वा अमरत्व ही मिथके आहे. त्यात तथ्य काहीच नाही. पण, मृत्यूनंतर तुमचे उरणे सोडा, पण त्याहूनही मोठे मोल आहे, ते आणखी वेगळेच. आपल्या एका साध्या कृतीमुळे अनेकांना डोळे मिळू शकतात, ही कल्पनाच किती बळ देणारी आहे! डॉ.मोकल, डॉ.पाटील, जोशी राऊत यांनी अमरत्वाचा नवा मंत्र दिला आहे. आता तरी आपले डोळे उघडतील? आपले एक साधे पाऊल नवे डोळस जग जन्माला घालणार आहे. तो संकल्प या पंधरवड्याच्या निमित्ताने करायला हरकत नाही!
मात्र, निधनानंतरही नरहरी राऊत अमर झाले आहेत, ते त्यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे. नेत्रदान चळवळीतील कार्यकर्ते अनिल आगाशे आणि श्रीपाद आगाशे यांनी वेळीच सहकार्य केल्यामुळे त्यांच्या नेत्रदानाचा संकल्प सिद्धीस गेला. जातानाही आपले पुरोगामी विचार कायम ठेवत, तोच वारसा त्यांनी नव्या पिढीला दिला आहे. त्यांचे चिरंजीव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नितीन राऊत, त्याचप्रमाणे नवीन आणि सुबोध राऊत यांनी पित्याची ही इच्छा पूर्ण केली. राऊत कनकेश्वर फाटा येथील रहिवासी. कनकेश्वराच्या पायथ्याशी मापगाव हे त्यांचे जन्मगाव. प्रथम ते चोंढी येथील प्राथमिक शाळेत शिकत होते त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये साने गुरूजी, आचार्य अत्रे यांच्यासोबत काम केले होते. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, मधु लिमये यांच्यासारख्या समाजवादी विचारांच्या नेत्यांशी त्यांचा संबंध आला होता. त्यांनी 1967 सालापर्यंत मुंबई विद्यापीठात पेपर सेटींग विभागात काम केले. 1968 ते 1972 सालापर्यंत पोल्ट्री फार्मचा व्यवसाय केला व 1980 सालापासून नर्सरीचा व्यवसाय केला व तो अखंडपणे चालू ठेवला. फळझाडे लागवड व अन्य वृक्ष लागवडीसाठी ते स्वत: जागेवर जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करीत. राऊत नर्सरी कनकेश्वर फाटा येथे असलेली नर्सरी त्यांनी यशस्वीपणे चालविली.
तरूणपणी त्यांनी मुंबईत नाटकांची आवड जोपासली. वेगवेगळ्या थिएटर्सच्या माध्यमातून आत्माराम भिडेंसारख्या अभिनेत्यांसोबत त्यांनी नाटकात काम केले. मापगाव येथील ग्रामस्थ मंडळात त्यांनी अनेक स्थानिक कलाकारांना घेऊन नाटके सादर केली. लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ किहीम या संस्थेत वेगवेगळ्या पदावर त्यांनी कार्य करून अध्यक्षपदही भूषविले. त्याचप्रमाणे चोंढी किहीम भातगिरणीच्या संचालकपदावरही निवडून गेले होते. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध होता. आपल्या पुरोगामी विचार प्रणालीमुळे त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता व त्यांच्या मुलांनी तो पूर्ण केला. त्यांच्या पश्चात नवीन, नितीन, सुबोध ही तीन मुले व सुना नातवंडे असा परिवार आहे.
-नितीन राऊत