आंतरराष्ट्रीय किर्तीचे, आपल्या चित्रशैलीचा आधुनिक भारतीय कलेवर मुद्रा उमटवणारे, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व मानवी मूल्यांची जपणूक करणारे प्रतिभावंत चित्रकार मकबूल फिदा उर्फ एम.एफ. हुसेन यांचे लंडनमधील वॉल्टन इस्पितळात गुरुवारी, 9 जून रोजी पहाटे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
हुसेन यांना ‘भारताचा पिकासो’ म्हटलं जातं. पण त्यांच्या चित्रांचा फारसा प्रभाव हुसेन यांच्या चित्रांवर पडलेला नाही. एमिल नोल्डे हा जर्मन चित्रकार आणि ऑस्कर कोकोश्को हा ऑस्ट्रीयन चित्रकार या दोहांचा प्रभाव मात्र त्यांच्या चित्रावर पडला आहे. हे दोघंंही चित्रकार आविष्कारवादी आहेत आणि हुसेन यांची चित्रशैलीही आविष्कारवादी आहे.
जाडसर, ठाशीव व प्रवाही रेषा, मोजकेच पण तजेलदार रंग, कुंचल्यानं मारलेले फटकारे, हे हुसेन यांच्या आविष्कारवादी शैलीचे काही ठळक विशेष होत. नेमक्या तपशीलांनी चित्र अर्थपूर्ण बनवणं हा त्यांच्या शैलीचा एक खास विशेष म्हणाला लागेल.
महाभारत, रामायण (अलिकडेच त्यांनी रामायणावर चित्रमालिका रंगवण्यासचा प्रकल्प हाती घेतला होता), पुराणकथा हे चित्रकार हुसेन यांच्या आवडीचे व चिंतनाचे काही विषय होते. भारतीय संस्कृतचं एक महत्त्वाचं अंग असलेल्या या प्राचीन साहित्यातील व्यक्तीरेखांचा हुसेन यांच्या प्रतिभेनं लावलेला चित्रार्थ एकाचवेळी समकालिन व सार्वत्रिक बनल्याचा आपल्याला प्रत्यय येतो. उदा. द्रौपदी, तारा, मंदोदरी, सीता यासारख्या स्त्री व्यक्तीरेखांचं त्यांनी केलेलं चित्रण, स्त्री म्हणून असणार्या त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आपल्याला प्रत्यय आणून देतात. स्त्रीच्या विविध रुपांचा वेध घेणं, त्यांचं आकलन करणं आणि सौंदर्यपूर्ण रंगरेषातून नवनव्या प्रतिमांत त्यांना साकार करणं हा हुसेन यांच्या चित्रविश्वाचा एक चिरंतन विशेष म्हणावा लागेल.
असामान्य प्रतिभेचा चित्रकार म्हणून ख्याती पसरलेल्या हुसेन यांची काही चित्रं ‘वादग्रस्त’ बनली. 1996 च्या आसपास त्यांनी रंगवलेल्या हिंदू देवदेवतांच्या ‘नग्न’ चित्रांवरुन वाद सुरु झाला. ‘दुर्गा’ व ‘सरस्वती’ या दोन्ही देवतांची चित्रं त्यांनी 1970 साली काढली होती. पण ‘अचानक’ 1996 साली ‘विचारमीमांसा’ नावाच्या हिंदी नियतकालिकात ‘चित्रकार की खाटीक?’ अशा शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. हुसेन यांच्या अशा चित्रांतील प्रतिकात्मकता लक्षात घेण्याऐवजी त्यांनी या चित्रांना जातीयवादी राजकारणाचा विषय बनलं. हुसेन यांच्या इतर चित्रांप्रमाणे त्यांनी काढलेलं सरस्वतीचं चित्रही प्रतिकात्मक होतं. त्या चित्रात सरस्वतीला ‘विवस्त्र’ दाखवली होती, या चित्राला शैक्षणिक क्षेत्रातील वास्तवाचा संदर्भ होता. त्या सुमारास शैक्षणिक क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर त्यांनी या चित्रातून उपरोधिक व जळजळीत भाष्य केलं होतं. ‘भारतमाता’ हे त्यांचे चित्रही वादाचा विषय बनलं. त्यांच्या मुंबईतील घरावर बजरंग दलानं हल्ला करुन त्यांच्या घराची व चित्रांची नासधूस केली. शिवसेनेनं त्याचं समर्थनही केलं.
कट्टर हिंदुत्ववाद्यांकडून हुसेनना जसा विरोध झाला तसा विरोध मूलतत्ववादी मुस्लिम शक्तींकडूनही झाला. त्यांच्या ‘मिनाक्षी ः अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या चित्रपटातील एका गीतात कुराणातील शब्दपक्तींच्या केलेल्या वापराविरुद्ध त्यांनी विरोध केला होता.
एका बाजूला पद्मश्री, पद्मविभूषण, राज्यसभेचे सदस्य देवून त्यांचा सन्मान करणार्या सरकारनं जातीयवादी शक्तीपासून त्यांचं संरक्षण करण्याचा, त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही हा सरकारच्या दुबळेपणाच्या आणि दांभिकपणाचा धडधडीत पुरावा म्हटला पाहिजे. जातीयवादी शक्तीपासून त्यांना संरक्षण देऊ न शकणार्या आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी व सार्वभौम म्हणवून घेणार्या देशाची ही शोकांतिका आहे.
– रमेशचंद्र पाटकर