नऊ वर्षांचा एक मुलगा.. आपल्या मामाबरोबर हौशीनं शिकारीला जातो.. मामानंच दिलेल्या एअरगननं एक चिमणी टिपतो.. खाली पडलेली चिमणी हातात घेतल्यावर लक्षात येतं की तिच्या मानेवर पिवळा पट्टा आहे.. ही तर नेहमीसारखी चिमणी नाही.. कुतूहल निर्माण होतं.. मामा सरळ त्या मुलाला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत घेऊन जातो.. तिथल्या ब्रिटिश अभ्यासकाबरोबर गाठ घालून देतो.. तिथल्या पेंढा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह पाहता पाहता तो मुलगा पक्ष्यांच्या जगात हरवून जातो..आयुष्यभरासाठी..
हाच मुलगा पुढे ‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ म्हणून जगप्रसिद्ध झाला – डॉ. सलीम अलींच्या पक्ष्यांबरोबरच्या जीवनप्रवासाचं बीज याच प्रसंगात रूजलं म्हणून त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं शीर्षकही ‘ द फॉल ऑफ अ स्पॅरो’ असं दिलंय. एका सुखवस्तू बोहरा मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई-वडिल लहानपणी वारले, त्यामुळे त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला. कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय खाणकामाचा आणि लाकूड व्यापाराचा. त्यांचं मन त्यात रमणं शक्यच नव्हतं कारण ते गुंतलं होतं पक्ष्यांमध्ये. पण प्राणीशास्त्रातलं उच्च शिक्षण नसल्यामुळे सुरवातीला पक्षी अभ्यासक म्हणून खूपच धडपड करावी लागली. हा तिढा सोडवण्यासाठी ते जर्मनीला गेले. तिथं प्रोफेसर स्ट्रेसमान यांच्या हाताखाली त्यांनी पक्षीशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी बाया विणकर पक्षाच्या प्रजोत्पादनाचा सखोल अभ्यास केला. दरम्यानच्या काळात त्यांना काही संस्थानिकांकडून पक्षी अभ्यासासाठी अनुदान मिळालं. त्यानंतर सुरू झाला भारतभर प्रवास..
कर्मठ मुस्लीम कुटुंबामध्ये जन्मलेल्या सलीमला लहानपणी कुराणाचे धडे दिले जात, त्याचं पाठांतर करून घेतलं जाई. मोठेपणी जेव्हा त्याची अर्थशून्यता किंवा त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘दांभिकता’ लक्षात आली तेव्हा त्यांनी सगळं कर्मकांड सोडून दिलं.
माणसानं पाऊलही ठेवलं नसेल अशा अनेक दुर्गम भागांमध्ये ते जाऊन तळ ठोकत. त्यांचं स्फूर्तीस्थान पत्नी तहमीना या सतत त्यांच्याबरोबर असत. त्या पक्षी निरीक्षणाबरोबरच त्यांच्या हस्तलिखितांचं संपादनही करत असत. पक्ष्यांचा अभ्यास हा प्रयोगशाळेत पेंढा भरलेले नमुने वापरून न करता ते नैसर्गिक स्थितीत जिथं जसे वावरतात तिथं जाऊन त्यांचं निरीक्षणं घेऊन करायला हवा असं त्यांचं ठाम मत होतं. तसंच पक्ष्यांचं एकंदर पर्यावरणातलं स्थान हा त्यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू असे.
सलीम अलींना मोटरसायकल चालवण्याचं जबरदस्त वेड होतं. 1950 मध्ये स्वीडनमधल्या उप्साला इथं भरलेल्या पक्षी अभ्यासकांच्या परिषदेला जाताना बोटीमधून ते आपली ‘सनबीम’ मोटरसायकल घेऊन गेले, युरोपभर त्यांनी त्यावरून भटकंती केली, तेव्हा भारतातून ते मोटरसायकलवरून स्वीडनला आले अशी अफवाही पसरली होती.
स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आधी जवाहरलाल नेहरू आणि नंतर इंदिरा गांधी यांचा त्यांना जोरदार पाठिंबा मिळाला. सायलेन्ट व्हॅली नॅशनल पार्क या केरळमधील जागी सुरवातीला एक मोठा जलविद्युत प्रकल्प व्हावा असं नियोजन स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होतं. पण दुर्मिळ अशा जीव विविधतेनं नटलेला हा वनप्रदेश त्यामुळे धोक्यात येणार होता. अनेक पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. सलीम अलींनी या भागाचा अभ्यास करून हा प्रकल्प पर्यावरणाला कसा घातक आहे हे शासनाला पटवून दिलं. त्यामुळे 1979 साली हा प्रकल्प रद्दबातल झाला आणि त्याऐवजी तिथं सायलेन्ट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान अस्तित्वात आलं.
भरतपूर इथल्या पक्षी अभयारण्याच्या निर्मितीमध्येसुद्धा सलीम अलींचा वाटा फार मोठा आहे. नुसतंच पक्षीनिरीक्षण करून ते थांबले नाहीत. त्यांनी जो अभ्यास केला तो सर्व त्यांनी पुस्तकरूपानं जगापुढे आणला. त्यांचं कोणतंही पुस्तक हातात घेतल्याशिवाय भारतात पक्षीशास्त्राच्या अभ्यासाला सुरवात करता येत नाही. (आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल की सलीम अलींचं ‘भारतीय पक्षी’ हे पुस्तक नेहरूंनी तुरूंगात असताना इंदिरा गांधींना आवर्जून वाचण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यातून त्यांना पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण झाली) आयुष्यभराच्या त्यांच्या या योगदानाबद्दल भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. याहीपेक्षा मोठा सन्मान म्हणजे वटवाघळाच्या, लोवा पक्ष्याच्या आणि विणकर पक्ष्याच्या एकेका जातींना त्यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नीच्या सन्मानार्थ सुतार पक्ष्याच्या एका जातीला तहमीना असं नाव देण्यात आलं आहे.