Categories
परिसंवाद

गेल्या चार वर्षांत असहिष्णुतेला राजमान्यता मिळाल्याने धार्मिक दहशतवाद आणि असहिष्णुतेचे संकट प्रत्येक दारात पोचले आहे.

वार्षिकांक - २०१८

धार्मिक दहशतवाद आणि असहिष्णुतेविरोधी ही परिषद संपल्यावर आपण आपापल्या गावी जाणार आहात. कार्यकर्ते म्हणून जेथे आपणास आत्मविश्वास मिळाला आहे, तो घेऊन आपणास आपल्या ठिकाणी मोठं काम सुरू करावं लागेल.

प्रत्येक ठिकाणी असा एक मोठा समूह आहे, मोठा गट आहे, ज्याचं पोट हातावर आहे. दोन वेळची भाकरी मिळविण्यासाठी ज्याला खूप यातायात, आटापिटा करावा लागत आहे. अशा सर्व माणसांना सांगावं लागेल की, हे धार्मिक दहशतवादाचं आणि असहिष्णुतेचं संकट तुझ्या दारापर्यंत पोचवलं आहे. घडणार्‍या विपरित घटनांपासून तो स्वत: लांब असत्याच्या भ्रमात आहे. त्याला काही देणं-घेणं नाही, असं त्याला वाटतं. या भ्रमातून त्याला बाहेर काढावं लागेल.

हडपसरचा मोहसीन शेख जमावाकडून मारला गेला. खरं तर त्या जमावापैकी त्याचं कुणाशी भांडण नव्हतं. त्यांची ओळखही नव्हती; फक्त दाढीवाला आहे म्हणून मोहसीन मारला गेला. त्या ठिकाणी मोहसीनऐवजी दुसरा कोणीही दाढीवाला असता, तरी मारला गेला असता. 17 वर्षांच्या नितीन आगेचे सवर्ण मुलीशी प्रेम असल्याच्या संशयावरून त्याचा क्रूरपणे खून होतो. नितीनच्या ऐवजी तेथे कुणीही संशयित असता, तर त्याचाही खून झाला असता. कोपर्डीची आमची बहीण अतिशय यातना करून मारली गेली. हा उन्माद, ही मस्ती कुठून आली?

सत्तेचा उन्माद असलेल्या एका सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने दहीहंडीच्या कार्यक्रमात आपली बेताल भाषा वापरली. चॅनलवर तो बरळला नाही, तर जाणीवपूर्वक तो मुलींबाबत गैर बोलला. त्यामुळेच कोपर्डीसारख्या घटनांना बळी पडलेल्या आमच्या बहिणीसारख्या घटना घडविण्याचे धाडस इतरांना मिळते. तिच्याऐवजी आणखी कुणीही असती, तरी तीही मारली गेली असती.

साडेचार वर्षांपूर्वी या देशात असहिष्णुतेचे वातावरण नव्हते, असे आम्ही मुळीच म्हणणार नाही. त्यावेळीही अत्याचार झालेच, क्रूर घटना घडल्या; पण त्या वेळीही आम्ही विरोध केलाच; मात्र या काळातील असहिष्णुतेच्या घडणार्‍या सर्व अशा घटनांना राजमान्यता मिळालेली आहे. त्यामुळे धार्मिक दहशतवाद बोकाळला आहे. असहिष्णू घटना घडविणार्‍यांचे बळ वाढले आहे. कारण त्यांना भय वाटण्याऐवजी राजमान्यता मिळत आहे.

माणसाची हत्या करणार्‍या गोरक्षकांचा सत्कार या देशाचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा हे स्वत: करतात. हा केवळ आभास नाही. हे संकट आपल्या दारावर पोचलं आहे. याची जाणीव आपल्याला करून द्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले. अनेक वर्षे मूठभरांच्या हाती असलेले अधिकार संविधानाने सर्वांना बहाल केले. वाटले, संविधानामुळे आपले अधिकार काढलेे गेल्याची भावना, पुन्हा सत्तेची संधी मिळताच त्यांच्यातील पुरुषी मनोवृत्ती जागी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असहिष्णुतेचं दर्शन ते घडवू लागले.

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढू लागल्या. त्या रोखण्यात सरकारला अपयश आलं म्हणून मागील वर्षीच्या 15 ऑगस्टला डॉ. बाबा आढावांसह आम्ही पालकमंत्र्यांना राज्यभरात ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा चुकीचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी लावला. ध्वजारोहणालाच आम्ही विरोध करतो, असे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनी चॅनलवरून बोलताना सांगितले. वास्तविक, आमचे म्हणणे असे होते की, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना जबाबदार असणार्‍या सरकारच्या मंत्र्यांनी ध्वजारोहण करू नये; ते इतर नागरिकांनी केल्यास हरकत नव्हती. ध्वजारोहणाला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. तसे आम्ही घडू देणार नाही. ध्वजारोहण झालेच पाहिजे; फक्त ते या सरकारातील पालकमंत्र्यांच्या हस्ते नको, ही आमची भूमिका होती; परंतु तरीही मुख्यमंत्री महोदयांनी चुकीचा अर्थ सांगून, आमच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल करण्याची भाषा केली. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत बोललो म्हणून आम्हास राष्ट्रद्रोही ठरविणारे हे सरकार असहिष्णुतेचे दर्शन घडवून गेले.

दहा दिवसांपूर्वी किनवट भागातील जवर्ला या आदिवासी खेड्यात आम्ही गेलो. राज्यपाल महोदयांनी हे गाव दत्तक घेतलं होतं. कोट्यवधी रुपये या गावासाठी खर्च झाल्याचे कळाले; मात्र तेथे काहीच सुविधा दिसून आल्या नाहीत. म्हणून 24 ऑगस्टला आम्ही किनवटला मोर्चा काढला. त्यामध्ये ‘पेसा’ कायद्याची मांडणी केली. आदिवासी जीवनाचे आणि त्यांच्या गावासाठी सुविधांचे प्रश्न आम्ही उपस्थित केले. आमच्यातील एका कार्यकर्त्याने, राज्यपाल महोदयांनी दत्तक घेतलेल्या गावातील साधन-सुविधांबाबत राज्यपालांना काही थेट प्रश्न केले; मात्र त्याने चुकूनही असंसदीय भाषा वापरली नाही, तरीही आम्ही राज्यपालांबाबत अपमानास्पद बोललो, त्यांचा अवमान केला म्हणून ‘सुभाष वारे व इतर काही कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा खटला भरावा,’ अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्याचा तेथील दोन स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याचे नंतर समजले. म्हणजे वस्तुस्थिती मांडली, तरी साधासुधा नाही, तर राजद्रोहाचाच खटला भरण्याची मागणी करण्यापर्यंत धाडस केले जाते. हे बळ कुठून येते? सत्तेच्या नावाखाली असहिष्णुता बळकट करण्याचा हा प्रयत्न असतो. असहिष्णुता केवळ गोळीने मारल्यावरच होते असे नाही, तर माणसे जगतात; परंतु ते सतत भीती, दडपण, चिंता, अगतिकता अशा परिस्थितीत आणि वातावरणात जगत असतात.

सध्या बळजबरीने अर्थकारण लावले गेले आहे. त्याचा परिणाम विपरित होत आहे. एका बाजूला दररोजची जगण्याची लढाई आणि दुसर्‍या बाजूला टी.व्ही.वरील बदलते जग, तो कुटुंबासह बघतो. आपल्या बकाल जीवनाची, जगण्याची त्याला लाज वाटते. मोठ्या प्रमाणातील ही आर्थिक विषमता त्याला असह्य होते. स्वप्नं आभाळाएवढी पाहतो; पण बकाल वास्तव, तर टाळता येत नाही. यामधील अंतर प्रचंड असल्याचे त्याला घडोघडी जाणवते. निराशेपोटी आणि मानहानीची वेदना असह्य झाल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे; मात्र टी.व्ही.वरील या कार्यक्रमांतून असहिष्णुतेचे काम थांबत नाही, वास्तव प्रश्नांची चर्चा होत नाही.

पुण्यात लाखो तरुण एम.पी.एस.सी.च्या अभ्यासासाठी आहेत. त्यांना गावी कुणी चांगलं म्हणत नाही, आणखी लाखो तरुण रोजगारासाठी फिरतात, त्यांचा प्रश्न सोडविला जात नाही; मात्र हक्काचा पैसा मर्जीतल्या लोकांना वाटला जातो. साधनांचा वापरही तेच करतात. ही खरी मोठी असहिष्णुता आहे.

महाराष्ट्र अंनिस समाजातील सर्व प्रश्नांना भिडू शकत नाही. त्यासाठी इतर सर्व प्रश्न सोडविण्यासाठी हातात हात घेऊन, परस्परांचा अजेंडा समजावून घेऊन धार्मिक दहशतवाद आणि त्या अंगाने जाणीवपूर्वक रुजविली जाणारी असहिष्णुता मोडीत काढता येईल. संविधानाची चर्चा घडवून आणणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सोन्नर महाराजांचे काम महत्त्वपूर्ण आहे. ‘लोकसत्ते’तील अतुल पेठेंचा ‘मी हिंदू आहे’ हा लेख अतिशय आशयघन आहे. हिंदू असण्याचा कोंडमारा त्यांनी या लेखामध्ये कथन केला आहे. खरा धर्म काय आहे, हे लोकांपर्यंत पोचविणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. दाभोलकर नेहमीच म्हणायचे की, ‘आम्हीच खरे धार्मिक आहोत.’ त्याचा अर्थ आपण जबाबदारीनं खरा धर्म लोकांपर्यंत पोचविला पाहिजे. धर्माच्या नावाने अधर्म पेरला जात आहे. खरा धर्म संत तुकाराम, साने गुरुजींनी अगोदरच सांगून ठेवलेला आहे. संत सावता माळी यांनी कर्मात-कष्टात धर्म सांगितला आहे. कामातच देव, धर्म सांगताना सावता म्हणतात, “कांदा- मुळा-भाजी। अवघी विठाई माझी॥” ही माझी उपासना आणि हाच माझा धर्म!

संविधानासोबतच संत-समाजसुधारकांचा हा विचार आपणास सांगावा लागेल. बसवण्णा, रोहिदास या मानवतावादी संतांचेही संदर्भ त्यांनी दिले.

घटनेच्या 25 व्या कलमात उपासना स्वातंत्र्याचा अधिकार नागरिकाला दिला आहे. त्याच्या कुटुंबाला किंवा समूहाला दिलेला नाही. संविधानाच्या या कलमाचा अर्थ संत विचाराशी जुळणारा आहे. याउलट आपणास असेच म्हणता येईल. म्हणून संत काय म्हणाले, हे आपणास लोकांना पुन्हा-पुन्हा सांगावे लागेल. शांतपणे, निसर्गासोबत बसून आपल्या अंतरंगात डोकावून आपले वागणे तपासणे, दुरुस्त करणे हीच खरी उपासना संतांना अभिप्रेत आहे. संविधानही तेच सांगत आहे. तुकारामाचा धर्म, कबीराचा धर्म आणि धर्मांधांचा धर्म यातील विसंगती ठळकपणे लक्षात आणून द्यावी लागेल.

‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म-भेदाभेद भ्रम, अमंगळ!’ असं तुकाराम म्हणतात. हेच 16 व्या कलमात संविधानात आलेलं आहे. कबीराचा दोहा, बुद्धाचा विवेक घेऊन संविधान उभे आहे, त्याचा गाभा आम्ही बदलू देणार नाही.

घटनेच्या 51 व्या कलमात स्त्रियांबाबत संविधानाने स्पष्ट भूमिका घेतली आहे, जी संत-परंपरेतील संत-स्त्रियांनी घेतली आहे. संत जनाबाई म्हणतात, ‘डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी॥’

स्त्री-पुरुष समानतेवर प्रकाश टाकणारी, भेद मोडीत काढणारी जनाबाई होती. त्याच पंक्तीत फातिमा शेख, सावित्रीबाई फुले आल्या आणि त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला.

जन्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही. संतांनीही हेच सांगितले आहे. संविधानातही तेच समाविष्ट आहे. ‘संविधान बचाव’ म्हणून चालणार नाही. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी विवेकी पातळीवर संविधानात बदल भविष्यात होऊ शकतील; परंतु संविधानाचा मूळ गाभा कोणालाच बदलता येणार नाही.

जे आज सत्तेत आहेत, त्यांना सत्तेवर आणण्याचे काम संविधानानेच केले आहे, याचा मात्र त्यांना विसर पडला आहे. म्हणून त्यांना सत्तेवरून खेचून, उतरविण्याचे कामही संविधानच करेल, याचे भान येथे उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना करावे लागेल.