डॉ.दाभोलकर आणि माझा अनेक वर्षांचा स्नेह आहे. अनेक वेळा आम्ही भेटायचो. खूप चर्चा व्हायची. डॉ.दाभोलकर हे खूप सिन्सीयर माणूस होते. ते जे बोलत त्याच्या पाठीशी अॅक्शन होती. ‘बोले तैसा चाले’ याचे चांगले उदाहरण म्हणजे डॉ.दाभोलकर. त्यांच्याशी बोलताना आत्मविश्वास वाढायचा. त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. मला वाटायचे या व्यक्तीचे मार्गदर्शन अनेक दशके लाभायला हवे. त्यांच्या अचानक जाण्याने समाजात मोठी पोकळी तयार झाली आहे. डॉ.दाभोलकरांचे सहकारी, कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने काम करतात ही जमेची बाजू आहे. पुढील काळात अधिक जोमाने काम करावे लागेल.
दाभोलकरांची लढाऊ वृत्ती होती. ते सॉफ्ट स्पोकन होते. प्रत्यक्ष पाहिले तर अत्यंत सौम्य स्वरात आपला मुद्दा मांडत असत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव स्मरणीय आहे. फलज्योतिषाबद्दल आम्ही एक चाचणी केली होती. ज्यामध्ये कुंडलीच्यावरून काय काय भाकित बरोबर करता येते किंवा काय येत नाही ते ठरविण्याचे निकष काय? ते व्यक्तीच्या मतावरून नसून विज्ञानाच्या नियमांनुसार असावे असे आम्ही ठरविले. डॉ.दाभोलकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिल्ड वर्क केली. खूप मेहनत घेतली. या प्रयोगाच्या संदर्भातील आम्हाला हवा असणारा डेाटा मिळविला.
आम्ही दोघांनी डेटा गोळा केल्यावर नंतर पत्रकार परिषद घेतली. ज्योतिषांनी आमचे आव्हान स्वीकारावे. ज्योतिषांनी या प्रयोगासाठी पुढे यावे असे आवाहन आम्ही केले. त्यावेळी काही फलज्योतिषी बिथरले आणि म्हणाले, अंनिस आमच्या विरूद्ध आहे. प्रयोगाचा निकाल आमच्या विरूद्ध येणार. मी त्यांना आश्वासन दिले की, तपासणी सांख्यिकीशास्त्र विभागाकडून (स्टेट डिपार्टमेंट) स्टेटच्या नियमांनुसार होणार इथे अंनिसला काय वाटते याला महत्व नाही. या विषयाच्या अनुषंगाने आम्ही काही सभा घेतल्या. त्यामध्येही खूप सौम्यपणे, शांतपणे आम्ही काम करणार आहोत. तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते सांगितले. त्यानंतर सर्व निकाल जाहीर झाले. त्यातून आम्हाला अपेक्षा होती तसाच निकाल लागला. पत्रिकेवरून आपणास काही सांगता येत नाही हा निष्कर्ष निघाला. विज्ञानाच्या एका नियतकालिकेतून या प्रयोगाबद्दल लेख प्रसिद्ध केला. डॉक्टर दाभोलकरांच्या ऑथरशीपखाली याचा सविस्तर तपशील लिहला होता. त्यानंतर तो लेख अमेरिकेतील ‘स्केप्टीकल इन्क्वायरर’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध जाला. त्यानंतर ‘स्केप्टीकल इन्क्वायरर’ने हा इंटरेस्टींग स्टडी आहे. तुम्ही अधिक माहिती द्या असे कळविले. मला असे सांगायचे आहे हा जो अभ्यास झाला. त्याच्या मुळाशी डेटा गोळा करायचे हार्ड वर्क अंनिसने केले त्या सर्वांची प्रेरणा होती. त्यानंतर अंनिसने फलज्योतिषविरोधी परिषदा घेतल्या. कल्पक प्रबोधन चालू केले.
डॉ.दाभोलकरांच्या पश्चात्य अंनिसची चळवळ गतीमान राहील. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे ही डॉ.दाभोलकरांना आदरांजली ठरेल. अंधश्रद्धेचा धुमाकूळ शांत करण्याचे काम डॉ.दाभोलकरांनी केले. डॉक्टरांच्या कामाचा वारसा पुढे चालू ठेवला पाहिजे. दाभोलकरांच्या प्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी सौम्यपणे, ठामपणे, निर्धाराने अंधश्रद्धेविरूद्ध लढले पाहिजे.
अंनिसबरोबर काम करायला निश्चित आवडले आहे. पुढील काळात अंनिसबरोबर काम करायचे विशेषत: वैज्ञानिक दृष्टकोन रूजविण्याचे काम करू.
–डॉ. जयंत नारळीकर