Categories
कायदा

आमचं घुमणं चालूच रहाणार!

मे - २०१२

मा.ना.पृथ्वीराज चव्हाण

          मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सादर नमस्कार,

            महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा एका वर्षात करण्याचे लेखी आश्वासन काँग्रेसने 1999 साली दिले. या अर्थसंकल्पी अधिवेशनात ते प्रत्यक्षात आणण्याचा शब्द आपण दिला. तो पाळला जाईल अशी खात्री वाटत असताना पुन्हा एकदा अपेक्षाभंगच झाला. त्याबाबतची महाराष्ट्रातील पुरोगामी मानसिकतेची तीव्र वेदना आपणास कळवण्यासाठी हे खुले पत्र.

            आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जादूटोणा विरोधी कायदा करणारे भारतातले पहिले राज्य अशी 15 ऑगस्ट 2003 च्या स्वातंत्र्यादिनी सर्व प्रमुख वृत्तपत्रात भली मोठी जाहिरात देऊन आपल्या शासनाने स्वत:ची जाहीरपणे पाठ थोपटून घेतली होती. 13 एप्रिल 2005 ला विधानसभेत मांडलेले कायद्याचे विधेयक पुढे सौम्य करून 16 डिसेंबर 2005 ला विधानसभेत मंजूरही झाले. पुढे विधानपरिषदेत विधेयक मंजूर करण्याची औपचारिकता, तब्बल चार वर्षे रखडवण्यात आली. संयुक्त चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यात आले. त्या विधानसभेची मुदत 2009 साली संपली पण संयुक्त चिकित्सा समितीला मात्र आपले कामकाज संपवायला वेळ मिळाला नाही. आणि स्वाभाविकच विधेयकाचीही इतिश्री झाली. आम्हाला विलासरावजी देशमुख वा अशोकराव चव्हाण यांच्याकडून फारसे वेगळे काही घडण्याची अपेक्षा नव्हतीच. पण पृथ्वीराजजी, आपण मुख्यमंत्री झाल्यामुळे मात्र आमच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या. सत्यसाईबाबांच्या निधनानंतर पंतप्रधानापासून सारे दर्शनाला रांगा लावत असताना आपण शोकसंदेशही पाठवला नाहीत ही बाबच आपल्या वैचारिक जडणघडणीचा वेगळेपणा स्पष्ट करणारी होती. त्यात आश्चर्य नव्हतेच कारण आपल्या आईवडिलांचे आपल्यावरचे संस्कार थेट तसेच होते. शिवाय आपण तंत्रज्ञानातील परदेशातील उच्चविद्याविभूषित आहात हा अधिकचा मुद्दा. उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे कायद्याच्या बाजूने उभा राहील. स्वाभाविकच एप्रिल 2011 मध्ये मंत्रीमंडळात कायदा मंजूर झाला त्यावेळी आम्हाला कायदा होण्याची खात्रीच वाटली.

            मुख्यमंत्रीजी, वारकरी संप्रदायाची दिशाभूल करून या कायद्याच्या विरोधात त्यांना उठविण्याचा प्रयत्न झाला. ना.आर.आर.पाटील व ना.शिवाजीराव मोघे वारकरी बांधवांशी बोलले. ना.अजितदादा व ना.लक्ष्मणराव ढोबळे यांनी विविध खात्यांच्या प्रधानसचिवासह वारकरी नेत्यासमवेत सविस्तर बैठक घेतली. आपणास जे वारकर्‍यांचे प्रतिनिधी भेटले त्यांच्या मनातील भीती व गैरसमज आपण दूर केलेत. ‘काळी जादू, चेटूक, भानामती, डाकीण, मंत्राने विष उतरवणे, मानसिक आजारांवर अघोरी उपचार अशा प्रत्यक्षपणे शोषण करणार्‍या बाबींच्या विरोधातच हा कायदा आहे. त्याअभावी संबंधितांना शिक्षा करण्यात अडचण येते असा पोलिसांचाही अनुभव आहे. अंधश्रद्धेमुळे सर्वात जास्त नुकसान गरीब माणसाचे होते. ते फसवले जातात. दैववादी क्रियाशून्य बनतात. ‘शोषण स्वाभाविक मानून त्याचा स्वीकार करतात.’ हे आपण आक्षेप घेणार्‍यांना पटवले. हेही ठामपणे सांगितलेत की, ‘घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला उपासनेचे व धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे. त्या विरोधात कायदा करताच येणार नाही आणि संकल्पित जादूटोणाविरोधी कायद्यात तर तसे काहीही नाही.’ यानंतरही काही संघटनांचा विविध नावे वापरून कायद्याला विरोध करण्याचा उद्योग चालूच राहीला. पण मुख्यमंत्री महोदय, आपल्या सरकारनेच ज्या संघटनावर बंदी घालण्याची मागणी केंद्रशासनाकडे केली आहे. त्याच संघटनातील कार्यकर्त्यांचे चेहरे यामागे आहेत. हे आपणाला ज्ञात होतेच.

            नामदार पृथ्वीराजजी चव्हाणसाहेब, पावसाळी अधिवेशनात कायदा होणे अपेक्षित होते. अधिवेशनात शेवटच्या चार दिवसांंत गोंधळ झाला आणि बील कसेबसे मांडले गेले. नागपूर अधिवेशनात बील चर्चेला होते. ती चर्चा घडविण्याचे आश्वासन मिळाले पण ते फोलच ठरले. अर्थसंकल्पी अधिवेशनात विधेयक मांडून मंजूर करण्याचा शब्द आपण मला व्यक्तीश: तीनदा दिलात. उपमुख्यमंत्री ना.अजितदादांनी संपूर्ण सहमती दर्शविली. संसदीय कामकाजमंत्री ना.हर्षवर्धन पाटील यांनी ‘काळजीच करू नका’ अशा स्पष्ट शब्दात आश्वासित केले. संबंधित खात्याचे मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांना तयार रहाण्यास सांगण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, महाराष्ट्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अध्यक्ष या सर्वांनी अनुकूलता दर्शविली. दोन्ही पक्षाच्या अनेक प्रमुख मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटीत स्पष्ट पाठींबा दर्शविला. सर्व निवडणुका संपल्या होत्या. आता किमान दोन वर्षे निवडणूकही नाही. इतक्या आश्वासक वातावरणात बील दोन्ही सभागृहात मंजूर होणे सोडाच एका सभागृहात साधे चर्चेलाही येऊ नये असे जर घडत असेल तर जादूटोणा विरोधी विधेयकावरच करणी केल्याची हास्यास्पद बाबही मानावी लागावी अशी विचित्र परिस्थिती निर्माण होत नाही काय?

            मुख्यमंत्रीजी, तुमचे राजकीय विरोधक या कायद्याला विधीमंडळात विरोध करणारच आहेत. धर्मांच्या आधारे राजकारण करणार्‍या शुद्र मन:प्रवृत्तीबाबत मी आपणास काय सांगावे? शिवसैनिकांना आपण हे जरूर सुनवावे जे ‘प्रबोधन’कार ठाकरे यांनी 1 डिसेंबर 1921 च्या प्रबोधन पाक्षिकाच्या अंकात ‘आम्ही नेमके कोण?’ या सवालाला जबाब देताना सांगितले होते. ते उत्तर असे : ‘जुन्या पुराण्या चिंध्या माथा, मनुस्मृतीच्या मुखात गाथा, कर्मठतेच्या चिपळ्या हाती, अंधश्रद्धा अंगी विभूती या समयाला धक्का त्यांना देऊनी पुढती सरणारे’ हा वारसा शिवसेना आमदारांनी का विसरावा? सावरकर काय म्हणाले, ‘आमच्या हिंदू राष्ट्राने आजच्या विज्ञान युगात टाकाऊ असणार्‍या खुळचट रूढी, व्रते, मते सोडावी हे त्यांना वारंवार सांगणे हे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच मुसलमान समाजासही आमचे सांगणे हेच आहे की, उपद्रवी आचार शक्य तितक्या लवकर सोडणे हे तुमच्याच हिताचे आहे.’ आणि संकल्पित कायदा हा याच विचाराने पूर्णत: धर्मनिरपेक्ष बनवलेला आहे. दखलपात्र गुन्हा करणार्‍या व्यक्तीचा धर्म व जात याचा त्यात सुतराम संबंध नाही.

            माणूस कितीही प्रगत झाला तरी त्याच्या जीवनात जोपर्यंत दारिद्य्र, अज्ञान, अभाव, दु:ख आहे तोपर्यंत त्याला कोणत्यातरी अर्थाने धर्माची गरज लागण्याची सदैव शक्यता आहे. मात्र जादूटोणा, भानामती, करणी, मूठ मारणे, गंडे ताईत, बळी हे कुठल्याही खर्‍या धर्माचे घटक कधीही नव्हते.  पटकी वा प्लेगसारख्या साथी एकेकाळी देवीचा कोप मानावयाचे. मरीआईचा गाडा ओढून बळी द्यावयाचे. आता या रोगावर लस निघाली. रोग हद्दपार झाले. धर्म बुडाला नाही उलट माणसे जगू लागली, धर्म पाळणार्‍यांची संख्या वाढली. भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे, धर्मचिकित्सा करणे व मानवतावादी वृत्ती बाळगणे या बाबी नागरिकांची कर्तव्ये म्हणून सांगितली आहेत. शिक्षणाचा गाभा घटक, मूल्यशिक्षण यात त्याचा आवर्जून उल्लेख आहे. समाजसुधारकांचा वारसाही बुद्धीप्रामाण्यवादाचा आहे. या सर्व भूमिकेशी जादूटोणा विरोधी कायदा पूर्ण सुसंगत आहे हे फार महत्वाचे आहे.

            माननीय पृथ्वीराजजी, बोलून चालून आम्ही तर ‘झपाटलेलेच.’ आपल्या शासनाची राजकीय सामाजिक इच्छाशक्ती जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करण्यासाठी कचरते आहे तो पर्यंत आमचे हे ‘घुमणे’ चालूच रहाणार. त्यावर इलाज होणार जादूटोणाविरोधी कायदा झाल्यावरच. पण या घुमण्याला वेदनेची किनार आहे आणि त्यामागे पुरोगामी महाराष्ट्राच्या एल्गाराची गाज आहे; याची कृपया नोंद घ्यावी. समाजसुधारकांच्या आकाराची पूजा करायची. विचाराला विसरायचे आणि आचाराला फाटाच द्यायचा हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला लागलेले ग्रहण येत्या पावसाळी अधिवेशनात तरी सुटेल अशी उमेद बाळगून आहे. लिहिताना काही अधिक उणे झाले असल्यास माफ करावे. (जादूटोणा विरोधी विधेयकाचे) अगत्य (पावसाळी अधिवेशनात) असो द्यावे, ही प्रार्थना.

आपला

डॉ.नरेंद्र दाभोलकर