यथा राजा तथा प्रजा ही म्हण कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी खरी करून दाखविली. आपल्या विरोधकांनी आपल्यावर करणी केली आहे व त्यामुळे आपल्या सत्तेला धोका आहे अशी धास्ती येडीयुरप्पांना वाटू लागली. मांत्रिकांनी त्याना दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी विवस्त्र स्थितीत नदीत बसून सूर्यनमस्कार घातले. विरोधकांची करणी उलटवण्याचा हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेचा कळस होय. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला तरी अज्ञानाच्या अंध:कारात गटांगळ्या खाणार्या अशा सत्ताधार्यांची धन्य होय. राजे असे वागले तर प्रजा कशी वागणार? अंधश्रद्धा विरोधी लढाई यांच्यामुळेच अवघड बनली आहे हे कटु वास्तव स्वीकारायलाच हवे.
कर्नाटकात चंद्रगुत्तीच्या डोंगरावर एके काळी स्त्रिया विवस्त्र अवस्थेत जवळच्या नदीवरून घागर घेऊन देवीच्या दर्शनाला येत. या नग्नपूजेला सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने विरोध केला. त्यावेळच्या कर्नाटक सरकारचे गृहखाते सूज्ञ होते. त्यांनी या पूजेबाबत कणखर भूमिका घेत कार्यकर्त्यांना मदत केली. पण अंधश्रद्धेचा प्रभाव एवढा जबरदस्त की, विरोध करणार्या पोलिसांचे व कार्यकर्त्यांचे कपडेच भक्तगणांनी उतरवले. पण अखेरीस कर्नाटक सरकारने कणखर भूमिका घेत या नग्नपूजेला बंदी घातली व ही अंधश्रद्धेची प्रथा बंद पाडली. याच कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री अंधश्रद्धेला कवटाळत स्वत: विवस्त्र होऊन विरोधकांची करणी उलटवण्याचा वेडाचार करीत आहेत. हा उलट्या पावलाचा प्रवास अक्षम्य आहे.
आपल्या महाराष्ट्रात यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही. इथले सत्ताधारी येडीयुराप्पाशी स्पर्धा करणारेच आहेत. महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्याने गणपतीला दूध पाजले. ही बातमी दूरदर्शनवर झळकत होती. दुसर्या एका मुख्यमंत्र्याने एका बड्या बुवाला आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावून त्याची पूजा केली. असे हे राजे, जनतेला अंधश्रद्धापासून कसे रोखणार? अंधश्रद्धा विरोधी कायदा कसा करणार?
खरं तर मुख्यमंत्री वा पंतप्रधान पदाला पोचणार्या व्यक्ती बद्धिमान असतात. मग यांची बुद्धी अचानक का हरते? मोठ्या कष्टाने व हर प्रयत्नाने मिळालेल्या सत्तेला हादरा बसायला लागला की, ही मंडळी भयभीत होत असावीत. खुर्चीचा लोभ मोठा विलक्षण असतो. मग या संकटांना वैध मार्गाने व हिंमतीने सामोरे जाण्याऐवजी मिळेल तो उपाय. करूया अशी यांची मानसिकता होत असावी. हतबल अवस्था अंधश्रद्धेकडे घेऊन जाते हेच खरे. याला सत्ताधारी सुद्धा अपवाद नाहीत. पण लोकशाही राज्य व्यवस्थेत खुर्ची ही कायम आपली नसते हे यांना कसे कळत नाही?
खुर्ची आणि अंधश्रद्धा यांचे हे निकटचे नाते सर्वत्र दृष्टीस पडते. जगभरचे हे वास्तव आहे. याचे एक उदाहरण म्हणजे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष रेगन. नॅन्सी रेगन ह्या मि.रेगनच्या पत्नी. रेगन सत्तेवर असताना या बाई एका ज्योतिषाच्या सल्ल्याने मि.रेगनला महत्वाचे निर्णय घेण्यास राजी करायच्या.
प्रसिद्ध खेळाडू, प्रसिद्ध उद्योगपती व सिनेनाट्य कलावंत यांच्याबाबतीत सुद्धा अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. अभिषेक बच्चनच्या लग्नाचा किस्सा तर सर्वश्रुत आहे. ऐश्वर्याला मंगळ होता. तिचे लग्न पहिल्यांदा पिंपळाबरोबर लावण्यात आले व नंतर अभिषेकशी.
विविध क्षेत्रातील मातब्बरांना अपयशाची भीती सतावते. अपयश आले तर सत्ता जाते व अपकिर्ती होते. हे या मंडळींना सहन होत नाही. मग भल्या बुर्या मार्गाने या भीतीवर तोडगे शोधणे सुरू होते आणि मग सुरू होतो यांचा अंधश्रद्धेच्या वाटेवरचा प्रवास. ही मंडळी ज्या वाटेने जातात त्याच वाटेने इतरही जाणार. अलिकडे समाजात नव श्रीमंतांचा उच्च मध्यमवर्ग तयार झालाय. त्यांची संख्या बरीच मोठी आहे. या मंडळींची नवश्रीमंती बर्याचदा संकटग्रस्त होते. आपला व्यवसाय, आपली प्रतिष्ठा धुळीस मिळते की काय अशी परिस्थिती निर्माण होते. मग ही मंडळी अंधश्रद्धेचा आसरा शोधतात. यातूनच नव्या बुवाबाजीचा प्रसार वाढलेला दिसतो.
आयझॅक अॅसिमाव्ह या प्रसिद्ध विज्ञान लेखकाने म्हटलंय की विवेकी लोक समाजात अभावानेच आढळतात. आजूबाजूला असतो मुर्खांचा बाजार.( Island of Sanity in the Sea of Non-sense.) मूर्खाच्या महासागरातील शहाणपणाची बेटे अगदी थोडीच.
वरील कारणांनी अंधश्रद्धा निर्मूलन ही प्रवाहाविरूद्धची चळवळ बनते. याचे भान ठेवून निर्धाराने वाटचाल करू या.