Categories
वाचक प्रतिसाद

प्रतिसाद

एप्रिल - २०११

            ‘ओळख कायद्याची’ हा अ‍ॅड.देविदास वडगावकर यांचा, भारतीय संविधान संदर्भातील लेख आवडला. कायदा समजून घेण्यासाठी भाषेची अडचण येते हे खरेच आहे. अं.नि.वा.चे कार्यकर्ते, वाचक यांची कायदेविषयक साक्षरता वाढावी, संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांचा अभ्यास व जाणीव जवळून व्हावी. ही मनोमन इच्छा आहे. यासाठी भारताच्या संविधानातील विविध राष्ट्रीय कर्तव्ये, व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात यश संपादन करण्यासाठीची कर्तव्ये तसेच संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार या सर्वांची व्याप्ती आणि साक्षरता प्राप्त व्हावी यासाठी सुरू करण्यात येणारे नवीन सदर हे नक्कीच जिज्ञासापूर्ती व ज्ञानसंवर्धन करणारे असेल. क्रमश: सुरू होणार्‍या या सदराच्या प्रतिक्षेत आहोत. धन्यवाद.

सौ.थोरात एम.बी. कराड, जि.सातारा


            अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, फेबु्रवारी 2011 च्या मासिक अंकामधील प्रासंगिक या सदराखाली आपण लिहिलेला, “प्राचीन भारतात विज्ञानाचा र्‍हास का झाला? हा लेख वाचला तो फारच अभ्यासपूर्ण आणि भारताच्या प्राचीन इतिहासाचे मूल्यमापन घडलेल्या घटनेसह योग्यरित्या केले असून त्यावेळच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे आपण यथायोग्य अवलोकन केले आहे. इ.स.पूर्व 2900 च्या मोहेंजोदडो आणि हडप्पा या आर्यपूर्व काळामध्ये भारताचा झालेला विकास व त्यानंतर इ.स.पूर्व 1500 पासून विज्ञानयुगाची भारतामध्ये झालेली प्रगती तसेच बौद्ध धर्माला मौर्यकाळात लाभलेला राजाश्रय व त्यामुळे व्यापार उद्योगधंद्याची झालेली भरभराट हाच तो भारताचा सुवर्णकाळ इ.स.150 पर्यंत म्हणजे जवळ जवळ साडेचारशे वर्षं टिकून होता हे म्हणणे अगदी बरोबर आहे याबद्दल कोणाचेही दुमत होणार नाही.

            हिंदू धर्माच्या नवनिर्माण युगात काही गोष्टी वर्ज्य कराव्या लागल्या तसे वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी, आणि बेटीबंदी, अशी सात बंधनं समाजावर लादली गेली. त्यामुळे देशाचा व्यापार बंद झाला, विज्ञान रोखले गेले, जातीचे नियम कडक करण्यात आले, ज्ञानाचा अधिकार फक्त ब्राह्मण क्षत्रियांकडे राहिला गेला. शूद्र आणि अतिशुद्र म्हटल्या जाणार्‍या जातीवर श्रमाची कामं लादली गेली यामध्ये तीळमात्र शंका नाही. अशा एकंदर परिस्थितीमध्ये शुद्र आणि अतिशुद्र जातींना शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंद झाले. विज्ञानाचे युग बंद होऊन फलज्योतिष शास्त्राचा उगम झाला आणि ब्राह्मण वर्गाचा चंगळवाद चालू झाला, इथूनच खरी अंधश्रद्धेला सुरवात झाली व खालच्या जातीची प्रगती रोखली गेली.

आयु.सोपान कांबळे, वडूथ, जि.सातारा.


            मी आपल्या वार्तापत्राची गेली 15 वर्षे नियमित वाचक व सभासद आहे. सदर वार्तापत्र अत्यंत उच्च दर्जाचे असून वाचनीय आहे. आम्ही सदर वार्तापत्राची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. माहे मार्च 2011 मधील डॉ.आशुतोष मुळ्ये यांचा महिला दिन विशेष ‘गृहिणीची किंमत’ हा लेख वाचण्यात आला. सदर लेख वाचून नोकरी न करता घरामधील गृहिणीचे कर्तव्य बजावणार्‍या स्त्रियांचे मनोगत कोणीतरी समाजापुढे मांडून गृहिणीचे काम हे अनुत्पादक नव्हे तर अमूल्य असून नोकरी करणार्‍या स्त्रियांपेक्षा कितीतरी मोठे आहे, हे हा लेख वाचून वाटले. तसेच लेखात नमूद केलेली गृहिणींची कामे करण्यास अमाप पैसे मोजून देखील काम करण्यासाठी बायका मिळत नाहीत हे मुद्दाम नमूद करावे वाटते. तरी सदरच्या लेखाबद्दल डॉ.आशुतोष मुळ्ये यांचे अभिनंदन.

सौ.छाया वाईकर, सातारा


            मी इयत्ता 7 वीतील विद्यार्थी आहे आणि मुख्य म्हणजे खेड्यातला. मला आपलं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मासिक खूपच आवडते. मला त्याविषयी माहिती माझ्या शाळेतून म्हणजेच सरांकडून मिळाली. महत्वाचे म्हणजे मी खेडेगावातला असल्यामुळे मला जादूटोणा म्हणजे भानामती, लिंबू मारणे, वस्तू भारणे, अपशकुन गोष्टी, नजरबंदी इ.चे वेळोवेळी दर्शन घडत असते. पण माझा त्यावर तीळमात्र विश्वास नाही आणि माणसामाणसातला बाट हाही खेड्यात अनुभवायला मिळतो.

राहुल मधुकर घुगरे, भवानी(ज.), जि.यवतमाळ