Categories
बालविभाग

…आणि विद्यार्थ्यांनी बैल-पोळ्याचा मुहुर्त धुतकारला.!

वार्षिकांक – २०१४

इ. 5 वी ते 10 वी पर्यंतची आमची शाळा आदिवासी भागात कार्यरत आहे. साधारणत: 8 ते 10 खेड्यांची मुले मुली विद्यालयात शिक्षण गेतात. 15 वर्षांपूर्वीची घडलेली(आणि घडवलेलीही) घटना!

एका शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांसाठी सूचना आली. शिक्षकाने सूचना वहीतून सूचना पुढीलप्रमाणे वाचली. “सोमवारी बैल पोळ्याचा सण असल्याने विद्यालयाला सुट्टी राहील. मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळा भरेल” मुलांना आनंद झाला. पोळ्याची सुट्टी आणि तीही रविवारला जोडून आनंदच आनंद. मात्र तेवढ्यात वर्गातील 8-10 विद्यार्थी शिक्षकाला (मला) म्हणाले, “सर आमच्या गावचा पोळा सोमवारी नसून मंगळवारी होणार आहे. मग आमची सुट्टी? कोणकोणत्या खेड्यांमध्ये सोमवारी पोळा साजरा केला जाणार आहे. याची वर्गात विचारपूस केली. एक दोन खेडे सोडले तर 5 ते 7 खेड्यात सोमवारीच पोळा साजरा होणार होता. मग त्या दोन खेड्यांमध्येच मंगळवारी पोळा का साजरा होणार आहे. याचा शोध घेण्याचे ठरले. त्या गावच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, मघा नक्षत्र असल्याने त्या दिवशी पोळा साजरा केला तर सर्व गावावर अरिष्ट कोसळणार आहे. मोठे संकट गावावर येऊ शकते. म्हणून सर्व गावाने सोमवारी पोळा साजरा न करता मंगळवारी करावा, असे मुहूर्त पंचांग सांगणार्‍या गावातील एका व्यक्तीने सांगितले आहे. म्हणून गावाने निर्णय घेतला की, मंगळवारीच पोळा साजरा करू या!

विद्यार्थ्यांच्या मनात मुहुर्ताचा प्रश्न नव्हता. त्यांची सुट्टी हुकणार होती. म्हणून त्यांना पर्याय हवा होता. ज्या गावांतून सोमवारी पोळा साजरा होणार नव्हता त्यांना समजावून सांगितले की, तुमची दोन गावं सोडली तर इतर गावांमधून सोमवारीच पोळा साजरा होणार आहे. त्यांना का अरिष्टाची-संकटाची भीती वाटत नाही? मग तुम्हीच कशाला घाबरता? तुम्हीही तुमच्या पालकांशी चर्चा करा, सोमवारीच बैल सजवा. आणखी पुढे जाऊन असे करा की, गावाला ज्या दिशेने तुम्ही सजविलेल्या बैलांना मिरवत न्या. मुलांना कल्पना आवडली. पण पालक ऐकतील का, ही शंकाही काहींच्या चेहर्‍यावर दिसली.

मात्र काही विद्यार्थ्यांनी धाडसाने कल्पना प्रत्यक्षात राबविल्याची बातमी त्यांच्याच तोंडून शाळा भरल्यावर (मंगळवारी) ऐकायला मिळाली. प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्यात यश मिळविल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. कष्टकरी बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. त्यासाठी कशाला हवा मुहूर्त? ह्या विचारावर सर्व ठाम झाले. दु:ख याचेच उरले की, कोणीतरी एक व्यक्ती सर्व गावाच्या सामाजिक मनात ज्योतिष, मुहुर्त, वास्तूशास्त्र अशा थोतांडांची भीती घालते आणि गाव विचार न करता, ते सर्व पाळते. मात्र मुलांनी मुहुर्त धुतकारला हे काही कमी महत्वाचे नाही. धन्यवाद!

डॉ. टी. आर. गोराणे

लेखक संपर्क: 9402551345