1982 च्या सुमारास ‘ग्रंथाली वाचक चळवळीने’ महाराष्ट्रातील डाव्या व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे अनुभव व जडणघडण या संदर्भात ‘संकल्प’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले होते. डॉ.दाभोलकर त्यावेळेस ‘समाजवादी युवक दला’चे काम करीत होते. त्यांनी ‘संकल्प’मध्ये त्यावेळेस लिहिलेला लेख आम्ही पुनर्प्रकाशित करीत आहोत. त्यावरून दाभोलकरांच्या तरूणपणातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत येण्यापूर्वीच्या प्रवासाची माहिती वाचकांना होईल.
एम.बी.बी.एस.च्या शिक्षणासाठी माझे सांगलीला वास्तव्य होते. माझे भाऊ देवदत्त दाभोलकर हे चिंतामणराव कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्याबरोबर मी रहात होतो. कॉलेजात असताना सामाजिक कामाची कल्पना मनात उसळत असायची. आता वाटते, ती बरीचशी भाबडी होती.
घरी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, प्रा.मे.पुं.रेगे, प्रा.भणगे यासारखी मंडळी अधूनमधून असायची. त्यांच्या भावाबरोबरच्या(देवदत्त दाभोलकर) गप्पांमुळे विचाराला खाद्य मिळायचे. समाजवादी परिवारातल्या माणसांची ही प्रासंगिक उठबस असे. त्याचाही परिणाम होता. सांगली जिल्हा राजकीय दृष्ट्या जागृत. त्यातील अनेकजण दादांशी गप्पा मारायला येत. या सार्यांमधून काही करावे असे वाटायचे. आता वाटते. ते तसे धूसर होते.
ज्या वर्षी डॉक्टरीची परीक्षा पास झालो त्या वर्षीच्या दोन गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला. कुमार सप्तर्षी हा त्या वेळचा युक्रांदचा नेता. बिहार दुष्काळातील काम, फी-वाढ विरोधी आंदोलन यामुळे पुण्यात त्याचे नाव गाजत होते. तो विश्रामबागला आला होता. कॉलेजमध्ये त्याची काही व्याख्याने घडवण्यातही मी पुढाकार घेतला होता. त्या वेळच्या माझ्या मनाला कुमारने चळवळीच्या अंगाने केलेली विचाराची रोखठोक व आकर्षक मांडणी खूप झपाटणारी वाटली होती. दुसरी आठवण जयप्रकाशजींची. जयप्रकाश 69 सालातील अखिल भारतीय सर्वोदय संघाच्या अधिवेशनाकरिता सांगलीला येणार होते. त्यांना 67 वे वर्ष लागले म्हणून 67 हजार रूपये द्यायचे ठरले होते. माझा भाऊ त्या समितीचा कार्याध्यक्ष होता. प्रभावतीदेवींसह आलेल्या जयप्रकाशजींची सोय आमच्या बंगल्याजवळच असलेल्या कॉलेजच्या गेस्ट हाऊसवर केली होती. आणि स्थानिक स्वयंसेवक म्हणून सर्व देखभालीसाठी त्या ठिकाणी मी तिन्ही दिवस जे.पीं.च्या बरोबर होतो. लोक गटागटाने येत आणि जे.पी.च्या बरोबर आपला फोटो काढून घेत. काही वेळा आग्रह करून प्रभावतीदेवींनाही फोटोत घेत. तीन दिवसांत माझी दोघांशी बर्यापैकी जानपेहचान झाली. तेव्हा त्या दोघांबरोबर एकट्याचा फोटो काढणे सहज शक्य होते. पण का कोण जाणे, मनात विचार आला, आपली लायकी आहे का? आणि फोटो काढणे मी टाळले. जे.पीं.ना घेऊन चौथ्या दिवशी गाडी निघाली त्यावेळी मी काही कारणाने घरीच होतो. घरासमोरून जाताना काहीतरी आठवल्यासारखे करून जे.पी.नी गाडी थांबवली आणि बरोबर असलेल्या माझ्या भावाला म्हणाले, “तुमच्या भावाचा निरोप घ्यायचा राहिला.” मला दादांनी हाक मारली. गाडीची काच वर करून जे.पीं.नी माझा हात हातात घेतला. तीन दिवसाच्या स्वयंसेवकाच्या सेवेबद्दल धन्यवाद दिले आणि म्हणाले, “कुछ बनो.” पुढे बरेच दिवस मी अस्वस्थ राहिल्याचे मला आठवते.
71 साली इंटर्नशीप संपवून मी सातारला गेलो. सातारा हे माझे गाव. शिवाजी उदय मंडळाचा मी नावाजलेला कबड्डीपटू. क्रीडामंडळात बरीच तरूण मुले असायची. मुले हमखासपणे हाकेला उभी राहणारी. स्वाभाविकच त्यांचा उपयोग सामाजिक कामामध्ये सहजपणे होणार होता. पण क्रीडासंस्थेचे वळण काँग्रेसचे होते. निवडणुकीच्या वेळी ती हमखास यशवंतराव चव्हाण सांगतील ते काम करायची. म्हणून संघटना नव्या नावाने उभारायचे ठरले. ‘समाजवाद’ हे उद्दिष्ट, युवक हे माध्यम आणि दल हे साधन, म्हणून ‘समाजवादी युवक दला’ची स्थापना झाली. कल्पना वैचारिक आणि व्यावहारिकही अस्पष्टच. स्थापना-बैठक ही मंडळातच झाली. ‘समाजवाद : प्रेरणा व प्रक्रिया’ हे विविध विचारवंतांचे समाजवादावरचे लेख एकत्रित देणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते. त्याचा उपयोग संघटनेचे ध्येयधोरण ठरवताना झाला. त्यावेळी ते भलतेच भारदस्त वाटले. स्थापनेच्या वेळी दि.के.बेडेकर आले होते. त्यांचे भाषण संध्याकाळी व बौद्धिक रात्री होते. रात्री नऊला साठ-सत्तर तरूण मुले समाजवाद ऐकायला आलेली पाहून त्यांना फारच आनंद झाला. विचाराच्या बांधिलकीपेक्षा क्रीडांगणाच्या बांधिलकीतून ही तरूण मुले जमल्याचे वास्तव मी त्यांना सांगू शकलो नाही.
मी त्यावेळी सातार्यापासून सहा मैलांवरच्या परळीला वैद्यकीय अधिकारी होतो. माझ्याकडे सहा उपकेंद्रे होती. मानेवाडी त्यापैकी एक. प्रत्येक उपकेंद्रात एक नर्स आणि तिला मदतनीस म्हणून आया असायची. मानेवाडीची आया त्याच गावची. आडनाव कांबळे. गावात विहिरीवर पाणी भरायला मिळत नाही-वाढतात-हे मला तिच्याकडून समजले. डॉ.बाबा आढावांची पाणवठा-चळवळ त्यावेळी नुकतीच गाजू लागली होती. मानेवाडीला ‘एक गाव एक पाणवठा’ करायचे ठरवले. दलित वस्तीत बैठका घेतल्या. गावात दबाव बराच होता. मंडळी तयारच होईनात. शेवटी काही बैठकांनंतर त्यांना विश्वास आला. मिरवणुकीने जाऊन पाणी भरले. दुसर्या दिवशीपासून गावात दलितांवर कडकडीत बहिष्कार. काम मिळेना, गावात धान्य मिळेना. मंडळी सैरभैर होऊन सातारला आली. त्यांना घेऊन कलेक्टरकडे गेलो. मी सरकारचा क्लास टु ऑफीसर. कलेक्टर सुपर क्लासवन. हाताखालच्या अधिकार्याने असे शिष्टमंडळ आणणे हा त्याला नियमांचा भंग वाटला. त्यामुळे तो नाराज. प्रश्न तर सुटायला पाहिजे होता. सातारचे त्या वेळचे आमदार, राज्यमंत्रीही होते. त्यांना भेटलो, काही करण्याची विनंती केली. गावचा मराठा मतदार समतेसाठी दुखवणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यांनी आम्हालाच झापले, “महात्मा फुल्यांनी या प्रश्नात गुडघे टेकले आणि महात्मा गांधींनी हात टेकले, आणि तुम्ही पोरं निघाला शहाणपणा करायला!” त्यांना मी सरकारी नोकरीत आहे हे माहीत नव्हते ते नशीब. चार दिवसांनी समाजकल्याणमंत्री दादासाहेब रूपवते सातारा दौर्यावर आले. त्यांनी लक्ष घातले आणि कणखर भूमिका डी.एस.पी.ला घ्यावयास लावली म्हणून आम्ही वाचलो. पण आपण पाय टाकीत असलेले पाणी खोल खोल जाते याची त्यावेळी जाणीव झाली.
उत्साहाच्या भरात केलेल्या काही चुका कशा गोत्यात आणतात हे याच सुरवातीच्या काळात शिकलो. आमदार बनातवाला यांनी वंदेमातरम् म्हणायला नकार दिल्याची बातमी होती. त्यामुळे चिडून जाऊन पुण्याला तरूणांनी ‘इस देशमे रहना होगा तो वंदेमातरम् कहना होगा’ अशा घोषणांची पत्रके सर्वत्र लावली होती. आमच्यातल्या काही उत्साही मंडळींना तो कार्यक्रम पटला. आणि त्यांनी ‘वंदे मातरम् देश की पुकार, जो न पुकारे वो गद्दार’ अशा घोषणांची मोठी पत्रके छापून घेतली. त्याच्यावर मागे प्रकाशकाचे नाव घालायचे हे माहीत नव्हते. त्यात हुशार मुद्रकाने स्वत:च्या प्रेसचे नावही छापले नाही. धुमधडाक्यात भिंतींवर, वाहनांवर घोषणापत्रके चिकटवण्याचा कार्यक्रम झाला. आणि सकाळी डी.एस.पी.चे निमंत्रण घेऊन जीप आली. वातावरण प्रक्षोभित करणारी पत्रके आणि तीही छपाईच्या नियमांचा भंग करून, असा गुन्हा. गुन्हा करणारा राजपत्रित अधिकारी. गुन्हा कबूल होता. शिक्षा होणार हे नक्की होते. स्वाभाविकच नोकरीही जाणार होती. डी.एस.पी.चांगला होता. तो म्हणाला, तुम्ही कोणाही एका अन्य नोकरीवर नसणार्या मुलाचं नाव द्या. माझी हरकत नाही. पण अशी जबाबदारी टाळणे मला पटत नव्हते. दुपारी वातावरण तणावाचे झाले म्हणून शांततासमितीची सभा बोलावली गेली. गावातल्या अनेक मुस्लिमांनी माझ्यावर खटला घालण्याच्या कल्पनेस विरोध केला आणि त्यापुढे डी.एस.पी.ला नमते घ्यायला लागले.
या प्रकारच्या चळवळींतून मंडळाशी खेळाडू म्हणून संबंध राहिले तरी कार्यकर्त्याचा पुरवठा बंद होत गेला. त्यांच्या काँग्रेसी पिंडाला हे मानवणारे नव्हते. जयप्रकाशजींची बिहारची चळवळ हळूहळू आकारत होती आणि दलाच्या नावाने काम करणारा छोटा गट त्याकडे खेचला जात होता. त्याच सुमारास तेलाची भाववाढ प्रचंड झाली होती, आणि तेलाच्या गिरण्यांतील साठे घेराव करून ताब्यात घेऊन कमी दरात वाटण्याचे छापा-तंत्र शिवसेना व अन्य काही संघटनांनी पुण्या-मुंबईला अवलंबिलेले होते. अतिशय प्रासंगिक आणि अपुर्या विचारावर आधारलेले, परंतु क्षणिक आकर्षण ठरणारे हे आंदोलन होते. श्रावणाचा महिना असल्याने तेलाच्या दराबरोबर आम्ही उपवासाच्या सर्व गोष्टीदेखील आमच्या आंदोलनात घेतल्या होत्या. भरपूर तरूण मुले रस्त्यावर आली. त्यात प्रामुख्याने मंडळाचीच मुले जास्त होती. आंदोलन यशस्वी झाल्याचा क्षणिक आभास झाला. पण पुढे जोर लावायचा ठरला तर मंडळाची मुले तिथल्या अध्यक्षाच्या सूचनेवरून बाहेर पडली. लढ्याचा शक्तीपातच झाला. स्वत:च्या शक्तीसंचयाचे शहाणपण मला त्यावेळी निर्णायकपणे जाणवले.
पुढे आणिबाणी आली. मंडळाबरोबरची नाळ तुटली. वैचारिक स्पष्टता वाढीला लागली. कुरूंदकरांची लागोपाठ दोन वर्षे झालेली वैचारिक शिबीरे डोळे उघडणारी ठरली. आणीबाणी-विरोधाच्या भूमिकेमुळे आम्ही कोणत्या बाजूचे याची संदिग्धता संपली. आणीबाणीला आम्ही सक्रिय विरोध केला. पण बहुसंख्य कार्यकर्ते नोकरी करणारे होते. त्यामुळे प्रत्यक्ष सत्याग्रह मात्र केला नाही. पत्रके वाटणे, भिंती रंगवणे, भूमिगत कार्यकर्त्यांना घरी ठेवणे, पैसे जमवणे, ही सगळी जोखीम आम्ही पार पाडली. आज वाटते, नोकरीचा मोह जो पुढे सोडला तो आणिबाणीतच सोडून सत्याग्रह करायला पाहिजे होता. नाही म्हटले तरी रूखरूख कायमची राहिली. अर्थात केले तेही तसे पोलिसांनी उचलून नेण्यास पुरेसे होते. पन्नालाल सुराणा भूमिगत म्हणून घरी राहून गेले. त्यांनी येताना ढीगभर प्रचार-साहित्य आणले होते. त्याने घरातले कपाट भरले होते. दोन दिवसांनी पन्नालाल सातार्यात येऊन गेल्याची बातमी पोलिसांना लागली. स्थानिक सी.आय.डी.इन्स्पेक्टर मला भेटायला घरी न येता आय.टी.आय.मध्ये मी वैद्यकीय अधिकारी होतो तिथे आला. दोन तास चौकशी चालली होती. वेगवेगळ्या पद्धतीने गुगली प्रश्न टाकण्यात येत होते. “पन्नालाल सातार्यात येऊन गेल्याची बातमी खरी आहे. पण ते उतरले कुठे? तुमच्याच घरी उतरण्याची शक्यता सर्वात जास्त.” असे म्हणून चौकशी चालू होती. शेवटी त्यांचे तात्पुरते समाधान मी केले. घरी येऊन सहज म्हणून कोणतेही कपाट त्यांनी उघडले असते तरी त्यांचे पुरेपूर समाधान झाले असते.
घटना-दुरूस्तीवर जाहीर चर्चा व्हावी असे त्यावेळी बाई बोलल्या होत्या. आम्ही चर्चा आयोजित करण्यास परवानगी मागितली. फारच प्रयास पडले. शेवटी एकदाचा परिसंवाद जाहीर झाला. घटना-दुरूस्तीविरोधी बोलणारा असा मी एकटाच. बाकीचे सोयीस्करपणे गैरहजर राहिले. घटना-दुरूस्तीची तरफदारी करण्यासाठी जिल्ह्यातील दोन नामांकित वकील होते. त्यांनी भाषण केल्यावर मी बोललो. भाषण फारच जहाल झाले. इंदिरा गांधींच्यावर नाव घेऊन टीका केली. त्या रात्री मला पकडणार याच्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नव्हती. पण कसा वाचलो कोण जाणे.
आधी रचना नंतर संघर्ष, की आधी संघर्ष नंतर रचना, की संघर्षाला तळ बांधण्यासाठी रचना, असे वाद जयप्रकाशजींच्या आंदोलनाच्या काळात नेहमी चालत. त्याचा एक व्यावहारिक जीवघेणा अनुभव आणिबाणीत आला आणि तत्वमंथनाला व्यवहारातून परस्पर उत्तर मिळाले. आणिबाणीत प्रत्यक्ष संघर्ष अशक्य म्हणून आम्ही वीस कलमांच्या आधारे दलितांच्या जमिनी सोडवण्याचा आणि प्रत्यक्ष कसण्याचा कार्यक्रम करीत होतो. सातार्यापासून सहा मैल अंतरावरच्या गवडी गावात दलितांची अशीच बारा एकर गहाणवट जमीन सोडविली. कसण्यासाठी बँकेकडून मदत मिळवली. आणखी काही मिळविण्याचे प्रयत्न चालू होते. दलित मंडळी आमच्यावर खूष होती. आणि आणिबाणी-विरोध चालू ठेवूनही हा रचनात्मक कार्यक्रम चालू ठेवल्याने आम्हीही स्वत:वरच खूष होतो. अशा वेळी एस.एम.जोशी सातारला आले. आणिबाणीत हिंडत असता खेड्यामध्ये आणि तेही दलित वस्तीत जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा अण्णांचा कटाक्ष होता. सातारच्या आसपास या दृष्टीने काम आमचेच होते. त्यामुळे गवडीला जायचे ठरले. मदत करणार्या काँग्रेसच्या ताब्यातल्या सहकारी बँकेला हे समजले. त्यांनी दलितांना दम टाकला-मदत ताबडतोब थांबवू. एस.एम.जोशी येऊन चालणार नाहीत. दलित मंडळी घाबरून आमच्याकडे आली. आम्ही त्यांच्यासाठी धडपडतो हे ठाऊक असल्याने आम्ही ठरवलेला कार्यक्रम त्यांना मोडवत नव्हता. पण बँकेने नाडी आवळली तर सोडविलेल्या जमिनीची मशागत होणार नव्हती. हे त्यांना परवडत नव्हते. अण्णांना हे सगळे समजावून सांगणेही अवघड. त्यांना गवडीचा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले, तर त्यांना वाटले ते आणिबाणीच्या भीतीपोटीच. ते म्हणाले, कोणी येऊ नका, मी एकटा जातो. आमची भलतीच अवघड अवस्था झाली. शेवटी आम्ही दलितांची मन:स्थिती त्यांना सागितली. कार्यक्रम रद्द झाला. पण तेव्हापासून कानाला खडा लावला की, राजकीय जाणिवांना बळी देऊन नुसता विधायक कार्यक्रम कधी करायचा नाही. नाहीतर आपणही केव्हा काँग्रेसवाले होऊ याचा पत्ता लागायचा नाही.
रचना आणि संघर्षासारखा दुसरा केलेला प्रयोग वर्ग आणि वर्ण लढ्याचा. आर्थिक शोषणाविरूद्धचा. नुसता वर्गलढा उपयोगाचा नाही आणि जातीय विषमतेविरूद्धचा वर्णलढाही एकटा अपुरा आहे, तेव्हा दोन्हीचा सांधा जोडून लढाईची फळी उभारावी, असा विचार. याची व्यावहारिक प्रचिती घेण्यासाठी सातार्यापासून वीस मैल दूर अंतरावरच्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोर्यात शेतमजुरांची संघटना बांधायची ठरवले. शनिवारी दुपारी नोकरीमध्ये दांडी मारून निघायचे. किन्हईला नदीतून स्कूटर पुढे घुसवून कच्च्या रस्त्याने भाडळे गाठायचे. तेथून कोणीही शहाणा माणूस स्वत:ची गाडी घालायला धजावणार नाही. अशा दगड धोंड्यांतून गाडी हाकत रोजगार-हमीचे काम गाठायचे. मजुरीवरच्या बायाबापड्यांशी बोलायचे. त्यांच्या बरोबरच कोणत्या तरी वाडीत मुक्कामाला यायचे. रात्री बैठक जमवायची. सकाळी तरूण पोरांना समजवायचे. असा प्रपंच दीड वर्ष केला. शनिवार-रविवारी सुट्टी असणारे सारे साथी पण सोबतीला असत. गावात वस्तीला बहुधा बुद्ध वस्तीत असायचो. लोकांना पर्यायी रोजगार म्हणून सातारहून चरखे घेऊन गेलो. रोजगार-हमीवरच्या सुखसोयी मिळवणे. कामाची नवी ठिकाणे हुडकणे हेही चालूच होते. तरीही दीड वर्षांअखेर हातात काहीच लागले नाही. जाती व्यवस्थेविरोधी प्रश्नही फारसे घेणे जमले नाही. आज विचार करताना वाटते, कितीतरी अधिक तपशीलात शिरून मगच कामाला हात घालायला पाहिजे होता. आपणास नेमके काय करायचे आहे? आठवड्यातून दीड दिवस जाऊन शेतमजुरांचा असा मूलभूत लढा उभे करणे शक्य आहे का? भागात एकूण शेतमजूर आहेत तरी किती? त्यातले दलित किती? जातीय शोषणाचे कोणते प्रश्न तीव्र आहेत? गावातल्या सधन आणि राजकारणी मंडळींना आपला नेमका विरोध कसा असणार? याचा विचार झालाच नाही वा फारच प्रासंगिक झाला. परिणामी काम थंडावले.
सातारा शहरात हमाल-संघटन बांधण्याचा प्रयत्नही असाच फसला. हमालांना जमवले. मुद्दे पटवले. संघटनेचे बिल्ले दिले. पण तेवढ्याने काहीच होत नाही हे आमच्या लक्षात आले. सातारा शहरात मोठं मार्केट यार्ड नाही. त्यामुळे हमालांचे मालक वेगवेगळे. हमालांना ताब्यात ठेवायच्या त्यांच्या युक्त्या आणि धमक्या स्वतंत्र. त्याला पुरून उरणे तसे अवघडच. अजूनही सातारा शहरात ते कोणाला जमलेले नाही. परंतु आम्ही हा प्रयत्नही फार अपुर्या तयारीने केला असे वाटते.
सामाजिक चळवळी त्या मानाने आम्ही नेटाने पुढे रेटल्या. दरवर्षी आसपासच्या गावातून समता-मोर्चेकाढायचो. गावातील सामाजिक वास्तव वेशीवर टांगायचो. त्याचा वृत्तपत्रीय गाजावाजा बराच व्हायचा. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे झाली म्हणून सातारा ते महाड आम्ही पदयात्रा काढली होती. समतेच्या संगराला पन्नास वर्षेउलटल्यानंतरही जाणवणार्या सामाजिक वास्तवाचा पीळ मनाला पीळ पाडणारा होता. यातूनच पुढे त्रिपुटी परिषद झाली. त्रिपुटी हे सातार्यापासून सात मैलावरचे गाव. चवदार तळ्यासारखेच विस्तीर्ण बांधीव तळे. गुरांना पाणी प्यायला सदैव मोकळीक. पण दलितांचा मात्र पाण्याला नाट. सत्याग्रह करण्याची तयारी आजूबाजूच्या खेड्यांतून सहा महिने चालली होती. वातावरण विलक्षण तापले. आपल्या मतदारसंघातील ही आमची उठाठेव पाहून स्थानिक आमदार आधी संतापले. नंतर सावरले. त्यांनी आमच्या जाहीर सत्याग्रहाआधीच घाईघाईने एक कार्यक्रम करून पाणवठा खुला झाल्याचे जाहीर केले. याच्या परिणामी आमचा फुगा फुटेल अशी त्यांची कल्पना. झाले उलटे. यातला दंभ ओळखून झुंडीझुंडीने आजूबाजूच्या गावातून स्त्री पुरूष आले. जंगी परिषद झाली. तळे खुले झाले तो आनंद गहिवरून जाण्यासारखा होता. मात्र गावाला बरोबर घ्यायचे आमचे प्रयत्न कसोशी करूनही फसले. गावाच्या जिव्हारी हा सत्याग्रह लागला. पुढे जत्रेच्या वेळेत मुंबईचे गावकरी परतले. त्यांनी रोज आग्रहाने पाणी भरणार्या रामोशांच्या शिवाजी चव्हाणला धडा शिकवायचे ठरवले. देवळात त्यांच्या आणाभाका झाल्या. रातोरात शिवाजी पळत सातारला आला. सकाळी सातला आम्ही गाव गाठले. आणि गावातील तिढा सरळ केला. या अनुभवातूनच पुढे नामांतरासाठी सातारा-औरंगाबाद चालत लाँगमार्च काढण्याची कल्पना आली. सातारला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री रमाबाईंची समाधी तिथे ज्योत पेटवली आणि ती घेऊन चालत सातारा-बारामती-पुणे-नगर मार्गेगेलो. नगरला अटक झाली. तोपर्यंत सर्वत्र गावोगावी फार चांगल्या सभा झाल्या.
पाणवठा चळवळ, समता मोर्चे, लाँग मार्च-सगळीकडे सवर्णाच्या बरोबर खुल्या संवादाची भूमिका होती. अनुभव आश्वासक येत गेले. ठराविक रटाळ भाषणे वा विकासाचे साचेबंद बोलणे यापलिकडे जाऊन मूल्य परिवर्तनासाठी संवाद घडू शकतो; लोक बोलतात, संतापतात, धमकावतात, पण समजूनही घेतात, कबूल करतात, बदलतात, याची प्रचिती आली.
नामांतर वा पाण्याचा न्याय तसा प्रतिकात्मकच. परंतु दलितांना प्रत्यक्ष काही देण्याचा प्रसंग आला की, लोक कसेे जीवावर उठतात याचा भाटपरळीला अनुभव आला. सत्वशीला सोनावणेची महार इनामी वतनी जमीन, कागदोपत्री मामलेदारांनी तिला कायद्यानुसार दिलेली. पण जमिनीचा मालक जमिनीत पाय ठेवू देईना. मी त्या गावी गेलो. मालकाला भेटलो. त्याने हग्या दम भरला : “जमिनीत पाय ठेवून बघा- मुतणंच कापून ठेवतो! आणि वर मुडदा पाडतो. पाच मुलगं हायती मला. त्यातला एक जाईल फासाला. त्याची पर्वा नाही. आणि त्यो तरी कशाला जातोय? कोर्टातून कसं सोडवून आणायचं आम्हाला चांगलं ठाऊक हाये.” मामला इतका पुढे गेल्यावर आम्ही ठरवले की, आसपासच्या गावातून मंडळी जमवून मोठ्या संख्येने जमिनीत घुसायचे. सत्याग्रह जाहीर झाला तसा कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाने मामलेदार टरकला. स्वत: जातीने पी.एस.आय.सह आम्हाला घेऊन गेला आणि क्वचित दाखवला जाणारा सरकारी हिसका दाखवून जमीन खुली करून दिली.
दलितांची चळवळ हा माझा मुख्य भाग बनला. माझी ब्राह्मण जात माझ्यापेक्षा माझ्या सहकार्यांनाच जास्त आडवी आली. “हा बामण तुमच्यात कसा? त्याला कसा एवढा पुळका?” या प्रश्नांना त्यांना उत्तरे द्यावी लागायची. जात पुसून काढणे तसे अवघडच; परंतु मला वाटते वरच्या प्रश्नातून वाटणारा अविश्वास सोडाच परंतु दुरावाही आता बराचसा दूर झाला आहे. आता जिल्ह्यातल्या कोणत्याही दलित वस्तीत आपला माणूस म्हणून स्वागत होताना जाणवते. जिल्ह्यात दलितांवर काही अन्याय घडले तर प्रकरणे प्राधान्याने माझ्या संघटनेकडे, माझ्याकडे लोक घेऊन येतात. ही कमाई मी तशी मोलाची मानतो.
“असलेले कायदे जरी नीट अंमलात आले तरी अर्धी क्रांती पुरी होईल.” असे जे.पी.म्हणत. मुळात कायदा माहीत नसतो. माहीत असला तर अंमलबजावणीची इच्छा नसते. सामाजिक-सांस्कृतिक बाबतीत तर कायद्याचे पालन करून लोकक्षोभाचे नसते लचांड मागे लावून घ्यायला सर्वच जण शासन, वृत्तपत्रे, समंजस नागरिक- घाबरतात. मग आमच्या कामाची “नसत्या उचापती” म्हणून संभावना होते.
देवदासी-प्रतिबंधक कायदा 1934 सालचा. कोणत्याही वयातील तरूणीचे तिच्या इच्छेनेदेखील होणार्या देवाबरोबरच्या लग्नाला विरोध करणारा. पण त्या कायद्याच्या आधारे पहिला खटला दाखल केला मी. त्याला 1971 साल उजाडायला लागले. फलटण हे महानुभाव पंथाचे मोठे केंद्र. महानुभावांत अल्पवयीन मुलींना संन्यास देण्यात येतो. त्या आधी त्यांच्या देवाबरोबर तिचा लग्न लावण्याचा विधी असतो. अगदी विवाह सोहळ्यासारखा साग्रसंगीत आणि मग त्याच मांडवात मुलीचा चुडा फोडून कुंकू पुसून हळदीची वस्त्रे उतरवून जन्मासाठी काळी वस्त्रे तिच्या अंगावर चढवली जातात. केसाचा चमनगोटा केला जातो. हे लादलेले वैराग्य जन्मभर जपावे लागते. सार्या स्त्रीसुलभ भावनांचा होम करीत. देवाशी लग्न लावल्याशिवाय पुढचा संन्यास नाही. आणि मुळात ते लग्नच बेकायदा. पण आम्ही गुन्हा दाखल करायला फलटण पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तर नोकरीत काळ्याचे पांढरे झालेल्या पोलीस अधिकार्याने हा कायदाच आपण कधी न ऐकल्याचे सांगितले. मग त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड दाखविले. त्यांनी सातारला डी.एस.पीं.ना फोन केला. तेही बुचकळ्यात पडले. रात्री बारा वाजता त्यांनी सरकारी वकिलांना बोलवून खातरजमा केली. गुन्हा दखलपात्र होता. रात्री दोन वाजता गुन्हा दाखल झाला. सकाळचा विवाह थांबला. दिक्षा देणार्या मठाधिपतीस कोर्टासमोर उभे केले. कोर्टाने निकाल लागेपर्यंत विवाहास स्थगिती दिली. महानुभवांचे प्रमुख केंद्र असलेल्या केवळ फलटणमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांच्या पंथात प्रचंड खळबळ माजली. माझ्या निषेधाचे मोर्चे निघाले. नावाने शिमगा केला गेला. खटला मागे घेण्यासाठी एका बाजूस विनवणी आणि दुसर्या बाजूस दहशत चालू झाली. खटला अजून उभा रहायचाय. पूर्वीच्या निकालाचे रूलिंग त्याला नाही. याच निकालावर पुढची लढाई अवलंबून आहे.
कायद्याचा आधारही नसणार्या सामाजिक झुंजी तर अधिकच अवघड असतात. त्यात समोरची व्यक्ती जनमानसात पूजनीय असली तर भलतीच जोखीम. कांची कामकोटीचे शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामी महाराज यांचा लौकिक ‘वॉकींग गॉड’ असा. हा देव पण सदैव हिंडणारा. एका ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त न रहाणारा. सातारच्या शंकराचार्यांच्या मठात आला आणि तब्बल नऊ महिने राहिला. मग सातारा जणू भाविकांची आधुनिक पंढरीच बनली. दर्शनासाठी राष्ट्रपती संजीव रेड्डी आणि इंदिरा गांधी येऊन गेल्या. या गुरूंना भेटायला दुसरे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज आले आणि सातारा हे परिवर्तनाच्या केंद्राऐवजी शंकराचार्यांचे पीठ बनणार का अशी साधार भीती वाटू लागली. सभा निदर्शने या नेहमीच्या मार्गांचा फायदा नव्हता. पहिल्यांदा शंकराचार्यांचे भांडे हुशारीने फोडून मग बोंब मारायला पाहिजे होती. आम्ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीजींच्या समवेत शंकराचार्यांची मुलाखत मागितली. प्रश्न आधी दिले. मुलाखत चालू झाली आणि चातुवर्ण्य, दलित वगैरे प्रश्न समोर आल्यावर शंकराचार्यांची ट्यूब पेटली. त्यांनी पहिल्यांदा दिलेली परवानगी नाकारून टेप बंद करायला सांगितले. आम्ही होकार देत पिशवीत टेप चालूच ठेवला. शंकराचार्यांचे सारे सनातन समर्थन टेप झाले. बाहेर येऊन मग पुराव्यानिशी बोर्ड लावले. प्रचंड खळबळ माजली. आता पुरता निकाल लावायचा असे ठरवून जाहीर सभा पुकारली. पोलिसांनी परवानगी नाकारली. गावात प्रचंड तणाव. सभेला भरपूर गर्दी. अगदी शेवटच्या क्षणी यासाठी अटकही होण्याची आमची तयारी बघून पोलिसांनी परवानगी दिली. सभेत दंगल होईल, नंतर आमची घरे जाळतील, ही भीती निराधार ठरली. शंकराचार्यांशी आमचे भांडण कशाकरता आहे हे मी सांगितले. अन्य वक्ते बोलले. घोषणा देऊन, अंडी फेकून एका गटाने दंगल माजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. लोकांनी त्यांना अजिबातच साथ दिली नाही. सामान्य माणूस समजून घेतो, विचार करतो याचा तो सुखद प्रत्यय होता. बघता बघता वातावरण बदलले. आठ महिने तळ ठोकलेल्या गुरू-शिष्यांना आठ दिवसांत पोबारा करावा लागला.
या सगळ्याबरोबर कौटुंबिक जबाबदार्या अपरिहार्यपणे चालूच होत्या. व्यवसायापेक्षा वेगळे सामाजिक काम करण्याची उर्मी कॉलेजमध्ये असल्यापासून होती. त्यामध्ये रोमँटिकपणा जास्त होता. विचारांची अस्पष्टताही होती. तरीही कॉलेजच्या शेवटच्या वर्षात जुळवलेले लग्न साखरपुडा झाल्यानंतर मोडण्यास ही बाब पुरेशी झाली. माझ्या गप्पांतून डोकावणारा हा विचार प्रत्यक्षात येण्याची अस्पष्ट अशी चाहूल लागताच त्या मुलीने आयुष्यातून पोबारा केला. नंतर ठरवून लग्न जमवणे आले. पाहण्याच्या कार्यक्रमापेक्षा माझे मत तिला खुल्लमखुल्ला सांगण्यात मला जास्त रस होता. व्यवसायाच्या सुरवातीला व्यवसाय सोडण्याचा विचार करणारा डॉक्टर हा त्या नाकासमोर वाढलेल्या मुलीला नकारयोग्य वाटल्यास नवल नाही. पण कसे कोण जाणे, वरील म्हणून हा अनुभव घेण्याचे तिने नंतर पुन्हा ठरविले. पाच वर्षे व्यवसाय करण्याचे मी कबूल केले. ती कबुली दामदुप्पट झाली. लग्न होऊन आता दहा वर्षे होऊन गेली. या वेळी मी पूर्ण बाहेर पडण्याच्या तयारीने उभा आहे.(अर्थात तिला हे मान्य नाही. माझी मदत ही ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा अर्धवट स्वरूपाची आहे असे शैलाला वाटले.)
लग्नापासून ताण आले, पण ते सोडवत गेलो. शैला अतिशय धार्मिक तर मी पूर्ण नास्तिक. त्यामुळे वैदिक लग्न करण्यापासून ते कुलदैवताला जोडीने जाणे, सत्यनारायण घालणे हे सर्व पूर्णत: नाकारले गेले. तिच्या अंधश्रद्धेवर मी टीका करत राहिलो. पण खूपच सौम्यपणे. गणपतीची स्थापना करून दहा दिवस ब्राह्मणाकडून त्याची पूजा करण्याचा त्यांच्या घरचा प्रघात आहे. देवाकडे मध्यस्थी करणरा हा दलाल मी तिला नाकारायला लावला. ते तिने मानले. बाकी उपवास-पूजा अर्चा ही मात्र प्रयत्न करूनही मला बंद करता आली नाही. मात्र माझ्या कामाआड ही गोष्ट कधीच आली नाही.
दवाखाना, हॉस्पिटल व घर हे सगळे एकाच जागेत. जागा गावाच्या मध्यभागी. त्यामुळे येणार्या जाणार्यांची वर्दळ. हॉस्पिटल प्रसूतीची, त्यामुळे रात्री कधीच झोप नाही. पेशंटची फार काळजी करण्याचा शैलाचा स्वभाव, त्याचा मानसिक ताण, वर नोकरी, दोन मुलांची बाळंतपणे आणि वाढ. या सार्याचा शारीरिक, मानसिक ताण तिच्यावर पडला. आता आता आम्ही याच्यातून बाहेर पडत आहोत.
माझ्याबरोबर काम करावे अशी तिची इच्छा होती. परंतु कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदार्या यामुळे ते तिला जमले नाही. खरे तर यासाठी मी किती तरी अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे होते. परंतु एका बाजूला तिच्यामार्फत मिळणार्या व्यावसायिक व आर्थिक स्थैर्याची माझ्या मनात अभिलाषा होती असे आज वाटते. आर्थिक सुस्थिती लाभली हे खरे, पण त्यासाठी तिच्या व्यक्तीमत्वावर आघात झाला हेही खरे.
सामाजिक कामाचा परिणाम कौटुंबिक स्थैर्याविरूद्ध होणे काही वेळा अटळ असते. एकदा आमची चांगलीच परीक्षा झाली. 77 सालचा सरकारी नोकरांचा संप चालू होता. राजपत्रीत अधिकारी असूनही मी दणादण भाषणे ठोकत होतो. त्याचा परिणाम झाला. नोकरी गेली. त्यावेळी मला दीड हजार रूपये पगार होता. त्यानंतर चारच महिन्यांत सातारा नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरूद्ध आम्ही आंदोलन चालू केले. चौकाचौकात मी सभा घेतल्या. आंदोलन गाजू लागले. नगरपालिकेची सत्तारूढ मंडळी खवळली. शैला नगरपालिकेच्या प्रसुतीगृहात वैद्यकीय अधिकारी होती. तिला अडचणीत आणू अशा धमक्या चालू झाल्या.
“आपल्यालाही या भ्रष्ट नगरपालिकेत नोकरी करायची नाही” असे शैलाला ठणकावून माझ्या जोषात मीच तिला राजीनामा देऊन टाकायला लावला. तिला त्यावेळी सात-आठशे रूपये पगार होता. एकदम दोन-अडीच हजारांचा फटका बसला. शिवाय घराबाहेरच्या नोकरीत आणि त्यातील हुकमत जागवण्याच्या भूमिकेत शैलाला थोडा विरंगुळा मिळे तोही संपला.
माझ्यासारख्या बेभरवशाच्या माणसाला एकच मूल पुरे अशी माझी भावना होती. त्यामुळे पहिल्या मुलीवर ऑपरेशन करून घ्यायचा विचार होता. परंतु एका मुलाचे काही झाले तर? ही भावना प्रबळ ठरली. मात्र दुसर्या मुलानंतर अजिबात वेळ न दवडता स्वत:ची नसबंदी करून घेतली. या मुलाचे नाव हमीद ठेवले. तोही काहीसा चर्चेचा विषय झाला.
पैशांचा विचार आम्ही दोघांनीही संसारात कधी केला नाही. चळवळ चालवताना अगर अन्य कुणाला मदत देताना स्वत:च्या खिशाला प्रथम तोशीस लावावी हाच मार्ग पत्करला. मात्र घरी रहायला येणार्या चळवळीतील पाहुण्यांबद्दल आमचे मतभेद आहेत. घराच्या एकंदर रचनेत त्या कार्यकर्त्यालाही अवघडल्यासारखे आणि आपणासही अडचणीचे. व्यवसायाच्या धावपळीत त्याच्या चहापानाकडे, जेवणाकडेही लक्ष देता येत नाही. त्यामुळे चांगल्या हॉटेलात त्याची सोय आपल्या पैशाने करा हा शैलाचा आग्रह. मला यात परकेपणा दिसतो. आणि कार्यकर्त्याला घरीच ठेवण्याचा माझा आग्रह असतो. हा एक नेहमीचा वादविषय आहे.
स्वत:चे ‘लिव्हिंग स्टँडर्ड’ आणि कार्यकर्ता यांच्यातली दरी मला खटकते, परंतु त्याबाबत फारसे काही मी निग्रहाने करू शकत नाही. सुरवातीच्या काळात दलात यावर फार विचार व्हायचा. माझ्या घरात सोफासेट आणि फॅन यायचा होता. तो घेणे कितपत योग्य यावर बरीच चर्चा होऊन शेवटी फॅन यावा पण सोफासेट नको असे ठरले. त्याला आता आठ वर्षे झाली. अजूनही माझ्या घरी सोफासेट नाही. घेणे शक्य असूनही फ्रिज, टी.व्ही., गाडी घेतलेली नाही. लग्न झाल्यापासून बायकोला अक्षरश: गुंजभर सोनेही घेतलेले नाही.(अर्थात स्वत:चा बंगला आहे.) चार पैसे जवळ आहेत म्हटल्यावर हे न घेण्याचे कौतुक करण्यासारखे काहीही नाही. त्याच्या फायद्या-तोट्याची चर्चा सतत मनात चालू असते. फ्रिज काही औषधे ठेवायला आणि जेवण एकदम करून ठेवायला फायद्याचा, टी.व्ही.चे काही कार्यक्रम चांगले असतात वगैरे प्रत्येक गोष्टींच्या दोन्ही बाजू सतत मनात असतात. मी थोडा सुखासीन बनू लागलो आहे याची अपराधी जाणीव अधूनमधून होते. परंतु ते झुगारण्यासाठी लागते तेवढे धैर्य स्वत:जवळ नाही असे वाटते. परवा नामांतरासाठी तुरूंगात होतो. त्यावेळी अॅल्युमिनियमची एक थाळी, एक वाडगा मिळाला आणि एवढ्यात खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित होते हे लक्षात आले. घरी गेल्यावर स्टीलचे ताट, दोन वाट्या, प्रसंगानुरूप काचेच्या डिशेस, स्टीलचे तांब्याभांडे हे सगळे नाकारून स्वत:ची गरज एवढ्यावरच मर्यादित करावी असे मनात वाटले; पण पार पाडू शकलो नाही. खरे तर डोळे फिरवणारे दारिद्य्र असणार्या आपल्या देशात ऐषारामी उपभोग कशाला म्हणायचे हाही प्रश्न पडतो. त्या दृष्टीने विचार केला तर सध्या भलतीच चैन आहे. आणि तुलनेने घ्यायचे ठरल्यास तुलनेला आपल्या देशात कोणत्याही स्तरावर दोन्ही बाजूंची मापके आहेतच. शेवटी स्वत:चा प्रामाणिक कौल एवढेच खरे वाटू लागते. पण संभ्रम आहे.
या दहाबारा वर्षांच्या चळवळीत मी काय मिळवले? एक चांगला गु्रप एकमेकाला विकसित करत वाढत गेला. एकसंघ भावनिक जिव्हाळा निर्माण झाला आणि टिकून राहिला हे मला सगळ्यात महत्वाचे वाटते. एखाद्या छोट्या गटातील प्रत्येक जण असा नावारूपास येणे आणि चळवळीशी इमान राखताना हे घडणे मला मोलाचे वाटते. आमचा गट तसा आठदहा जणांचाच. त्यात लक्ष्मण मानेचा ‘उपरा’ तर जगविख्यात झाला. राजा कोपर्डेला ‘अनुष्टुभ’च्या दिवाळी अंकातले लघुकादंबरीचे पहिले बक्षीस मागच्या वर्षी मिळाले. किशोर बेडकिहाळचे संघावरचे पुस्तक गाजू लागले आहे. पार्थ पोळकेचे आत्मनिवेदन बहुधा ग्रंथालीमार्फत प्रसिद्धीच्या वाटेवर आहे. नामांतरासाठी जाणीवपूर्वक आत्माहुती देणारा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा विलास राणे हा आमचा कार्यकर्ता. त्याने मराठा समाजातील स्त्रियांवरच्या व्यापक पहाणीबद्दल लिहिले असते तर ते फार ताकदीचे होते. ही सर्व मंडळी तिशीपस्तीशीमधली. काहीही मोठी ताकद मुळात असल्याची कोणतीच चिन्हे न दाखवणारी. मला वाटते, चळवळीच्या कुशीत एकमेकाच्या माणसाशी संवाद करीत आम्ही सर्वजण स्वत: घडत गेलो. सामान्यांत किती ताकद असते याचे हे बोलके उदाहरण. हे अपवादात्मक नसेल असे मला वाटते. व्यापक पातळीवर ही शोध घेण्याची, घडण्या-घडविण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. असा प्रयत्न करायला हवा.
आमची चळवळ ही महत्वाच्या सामाजिक प्रश्नांवर परंतु प्रतिकात्मक राहिली. हुंडा, पाणवठा, देवदासी हे काही काही ठिकाणांच्या वा व्यक्तींच्या बाबतीतले लढे ठरले. पुढे पुढे याची एक स्ट्रॅटेजीच आम्ही बनवली. यशही लाभले. शासकीय अधिकार्यांशी सामान्यपणे संबंध सलोख्याचे, पत्रकारांशी मैत्रीचे राहिले. याचाही फायदा चळवळीला मिळाला. महाराष्ट्रातील एकूणच परिवर्तनवादी गट व व्यक्ती या सर्वांशी चांगले संबंध असणारा आमचा गट हा अपवादात्मक असावा. एका छोट्या गटामुळे आणि विचाराबरोबरच भावनेने जोडलेल्या संघटनांतर्गत वातावरणामुळे आम्ही हे करू शकलो.
पहिल्यांदा ताकद नाही म्हणून मूलभूत लढे घेतले नाहीत. जेव्हा शेतमजूर संघटन, दलितांची जमीनमुक्ती यासारखे लढे घेतले तेव्हा पुरेशा तयारीच्या व त्यागाच्या अभावी ते उभे राहू शकले नाहीत. गेली काही वर्षे सातारा जिल्ह्याचे वास्तव लक्षात घेऊन अशा स्वरूपाचा एकारलेला तीव्र लढा या पॉकेटवर्कच्या महाराष्ट्रात एका मर्यादेनंतर होणार्या राजकीय कोंडीचा अनुभवही आम्ही(अतिसावधपणे) विचार करून दूर रहाण्यास कारणीभूत झाला. सामाजिक-सांस्कृतिक पातळीवरच्या लढ्यातले संघटनेला मिळालेले यश, व्यक्तिगत प्रसिद्धी यामुळेही आमचा मार्ग ठरल्यासारखा झाला.
माझा स्वभाव मनस्वी नाही. नेमस्त आहे. कडवट टीका वा टोकाची भूमिका मी करत नाही, घेत नाही. मला ते चुकीचेही वाटते. विरोधी वा वेगळे विचार असणार्या लोकांचे अन्य क्षेत्रात मिळणारे मर्यादित सहकार्य घ्यावे असे मला वाटते. माझ्या जवळच्या सहकार्यांना हा बोटचेपेपणा, गुळगुळीतपणा वाटतो. सामाजिक प्रश्नाबाबत आणि व्यक्तीच्या तत्वभ्रष्ट वागण्याबाबत सर्व पातळ्यांवर कठोर घणाघाती आणि एक घाव दोन तुकडे करणारी भूमिका असावी असे त्यांना वाटते.
कामाची आखणी तपशीलात जाऊन करण्याचा माझा स्वभावही काही साथींना अतिसावधपणाचा वाटतो. चळवळीच्या अपेक्षित उसळत्या उत्साहाला त्यामुळे बाधा येते असे त्यांचे मत आहे. झोकून घेऊन उडी घेतली पाहिजे त्यांना वाटते.
विचारात व कामात फार वाहून जायला हवे होते. तासन्तास डोक्यात तेच तेच विचार घर करून बसतात. मग काही वेळा ताजेपणा हरवल्यासारखे होते. सतत ताण असणार्या कार्यकर्त्यांनी वर्षातून काही काळ तरी सहेतुक अलिप्तता ठेवायला हवी असे वाटते.
मार्क्सवादी, गांधीवादी, जे.पी.वादी, लोकशाही, समाजवादी आणि इतर अनेक प्रेरणा घेऊन आयुष्य झोकून काम करणार्या संघटना, त्यांचा विचार, तरूण-उमदे कार्यकर्ते जवळून परिचित असल्याने एका आवर्तात सापडल्यासारखे वाटतात. कोंडी फोडून पुढे जाण्यासाठी नवचिंतनाची आणि नव्या कृतीशील वाटांची गरज जाणवत राहते.
–डॉ. नरेंद्र दाभोलकर
साभार : ग्रंथाली वाचक चळवळ प्रकाशित ‘संकल्प’(1980)