आम्हा दहा भावंडांतला नरेंद्र सर्वात धाकटा. आईच्या भाषेत बोलायचं तर शेंडेफळ. मी त्याच्या पुढची. आम्हा दोघात तीन वर्षांचे अंतर. त्यामुळे घरी-दारी, येणार्या-जाणार्याला नरेंद्रच्या बालरूपाचे कौतुक करायची लहर यायची. आणि मग ‘पापी’ घेऊन घेऊन सगळे त्याला हैराण करायचो. एके दिवशी नरेंद्रला यावर नामी युक्ती सापडली. चार-पाच वर्षांचा असताना त्याने कर्मवीर भाऊराव पाटलांना पाहिले आणि त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडले. ‘आता मी या आजोबांसारखीच मोऽठी दाढी वाढवीन. मग कोण कशी घेईल माझी पापी?’ आम्ही त्याच्या कल्पनेवर खूप हसलो. लहान मुलाला दाढी येत नाही हे त्याला कुठे माहीत होते? पण स्वत:च्या प्रश्नावर स्वत:च उत्तरे शोधायची त्याची वृत्ती त्या लहान वयातही सर्व वडिलधार्यांना जाणवली.
आम्हा इतर भावंडांप्रमाणे नरेंद्रचे नाव आबांच्या दत्तगुरूशी निगडीत नव्हते. पण नावाचे अपभ्रंश करण्याच्या आमच्या सवयीप्रमाणे. नरेंद्रचे उपेंद्र, उपेंद्रचे उपेन, उपेनचं ‘उप्या’ इथपर्यंत गाडी आल्यावर पुढे ते ‘हुप्प्या’वर जाणार हा धोका ओळखून नरेंद्रने ‘नरेंद्र’ नाव पकडून ठेवले. तरी ‘उपेंद्र-वज्रा’चे लक्षण सांगणार्या ‘उपेंद्र-वज्रा म्हणतात ज्याला’ या श्लोकावरून आम्ही त्याला वज्रा म्हणायचो. आईने दिलेले हे नाव त्याने सार्थ केले. अंधश्रद्धांवर त्यांने इंद्रवज्राप्रमाणे कठोर प्रहार केले.
सगळ्या नवीन गोष्टी शिकण्यात त्याची माझ्याशी स्पर्धा असायची. त्यामुळे पाच वर्षे पुरी व्हायच्या आधीच तो वाचायला शिकला. घरात लहान मुलांची भरपूर पुस्तके असली तरी त्यातले ‘बाल-रामायण’ आमचे दोघांचे आवडीचे. नरेंद्रला विशेष करून त्यातील युद्ध-कांड आवडायचे. ते निदान स्वप्नात तरी दिसावे म्हणून तो कित्येकदा बाल रामायणातले युद्धकांड वाचून झोपत असे.
रामचरित्राप्रमाणे रामदास-चरित्र हे आमचे आवडते. विशेषत: ‘श्रीराम जयराम जय जयराम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र 13 कोटी वेळा जपून रामदासांना रामाचे प्रत्यक्ष दर्शन झाले या कल्पनेने आम्ही इतके भारून गेलो होतो की, घरातल्या मोठ्या वेताच्या खुर्च्यांच्या पाठीवरच्या व बैठकीवरच्या भोकातून बोटे टेकवून आम्ही जप करायचा प्रयत्न करायचो. आमचे हे सगळे उद्योग बालपणीचे निरूपद्रवी उद्योग म्हणता येतील. पण याच्या जोडीला काही उपद्रवी उद्योगही चालायचे. अर्धवट ज्ञानावर आधारलेले व आमचेच नुकसान करणारे आम्ही कुठेतरी वाचले की, सूर्याकडे पाहिल्याने डोळे तेजस्वी होतात. या विधानामागील सत्यता वा तपशील काहीच न तपासता आम्ही येता जाता सूर्याकडे टक लावून पाहू लागलो. डोळे तेजस्वी होणे दूरच. पण दहा भावंडांत नरेंद्रला व मलाच सर्वात लहान वयात चष्मा लागला. कदाचित अंधश्रद्धेचे दुष्परिणाम त्याला तेव्हाच प्रथम जाणवले असतील.
नरेंद्रचे मन जसे वेगवेगळ्या कल्पना विश्वात रममाण होत असे तसे त्याचे शरीर वेगवेगळ्या चपळ हालचालीत रमत असे. त्या काळच्या सातार्याच्या मोकळ्या रस्त्यावरून हातांनी स्टिअरिंग फिरवण्याचा अभिनय करत पाच वर्षांचा नरेंद्र पायांनी काल्पनिक मोटारगाडी धूम पळवायचा. गावात सर्कस आली की, तिच्यावरून बेतलेले प्रयोग आम्ही दोघे खालच्या माडीवरील मोठ्या झोपाळ्यावर करू पाहायचो. (हात सोडून हे प्रयोग करताना झोपाळ्यावरून जमिनीवर आपटून मी एकदा बेशुद्धही झाले होते.) मराठी पाचवीत गेल्यावर आम्ही मैत्रिणी आमच्या गावातल्या घरांपासून चार भितींपर्यंत एकट्या जायला लागलो. नरेंद्रला तेव्हा जेमतेम सहा वर्षेझाली होती. पण तो चढण्यात सगळ्यात पुढे असायचा. आणि त्यावेळी चार भिंतीच्या सभोवताली असलेल्या अडीच-तीन फूट उंचीच्या व जेमतेम एक ते दीड फूट रूंदीच्या सलग तटबंदीवरून वेगात, न चुकता न घसरता पळत असे.
एखाद्या गोष्टीचा दिवस रात्र ध्यास घ्यायची नरेंद्रला लहानपणापासून सवय होती. जेव्हा ‘हुतूतू’मध्ये गुंतून असायचा तेव्हा खालच्या मोठ्या माडीत मनाने मध्य-रेषा आखून ‘हुऽतूऽतूऽ’ असा जप करत किती वेळ दम टिकतो ते पाहणार आणि दुसर्या संघातील काल्पनिक भिडूंना हात लावून ते गडी बाद करण्याचा प्रयत्न करणार. आणि हा सराव जरा वेळ मिळाला की, दिवसभर केव्हाही चालू राहणार. नंतर ‘हुऽतूऽतूऽ’ ऐवजी ‘कबड्डी कबड्डी’ असे म्हणायचा नियम आला. हा नवा नियम गैरसोयीचा आहे अशी तक्रार नरेंद्रने कधीच केली नाही (तक्रार करणे, कुरकुरत राहणे हे त्याच्या स्वभावातच नव्हते.) फक्त नवा नियम आल्यावर नरेंद्रची प्रॅक्टीस ‘कबड्डी कबड्डी’ ने सुरू झाली इतकेच. आणि म्हणूनच बदलत्या नियमातही त्याचे कबड्डीतले कौशल्य आणि यश सदैव अबाधित राहिले.

नरेंद्रच्या या सगळ्या क्रीडाप्रेमाला श्री.बबनराव उथळे यांनी स्थापन केलेल्या शिवाजी उदय मंडळामुळे शिस्त लागली. एकदाही न चुकवता रोज संध्याकाळी 2-3 तास शिवाजी उदय मंडळात जायचा. तिथे तो खेळातील अनेक कौशल्ये शिकला. त्याला योग्य मार्गदर्शक, स्पर्धक, मित्र भेटले. याहून मुख्य म्हणजे तिथे त्याची खिलाडू वृत्ती व नेतृत्व गुण जोपासले गेले. गुरूजनांविषयी आदर व कृतज्ञता, समवयस्कांविषयी मैत्रभाव व बंधुभाव, लहानांविषयी जिव्हाळा हे सर्व गुण त्याने तिथेच आत्मसात केले. ही ‘शिवाजी उदय मंडळाची वर्षे’ हा त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा मानावा लागेल. एकमेकाला भेटताना गावाकडचे लोक जसे ‘राम राम’ म्हणतात तसे शिवाजी उदय मंडळाचे सभासद ‘जय शिवराय’ म्हणत एकमेकास भेटत.
नरेंद्रचे वैशिष्ट्य म्हणजे बालपणी त्याच्यावर रामाचा प्रभाव होता. किशोरावस्थेत शिवाजीचा होता. दोघांचंही शौर्य त्याला अनुकरणीय वाटायचे. स्वत:मागे, कार्यप्रेरित मित्र समूह उभा करून इच्छित कार्य साध्य करण्याची त्यांची हातोटी त्याच्यावर खूप प्रभाव टाकायची. पण किशोरावस्था ओलांडताना त्याच्यातील ही व्यक्तीपूजा पूर्ण मागे पडली व्यक्तीऐवजी विवेकनिष्ठ विचार, चळवळ, परिवर्तन याच्याशी त्याच्या निष्ठा बांधल्या गेल्या.
नरेंद्र दहा वर्षांचा झाला आणि दोनच दिवसांनी आमच्या वडिलांचा आमच्या डोळ्यादेखत अंत झाला. त्यावेळी सातारला आमची आई माई, मी, नरेंद्र व कॉलेजात जाणारी आमची चुलत बहीण लिलू एवढेच चार जण होतो. बाकी सारी भावंडे आपापल्या कामाच्या ठिकाणी होती. नरेंद्र खरे तर दिवाळीच्या किल्ल्याची पूर्वतयारी म्हणून माती घेऊन आला होता. पण आप्पांना हार्टफेलने उभ्याचे आडवे होताना पाहून सगळे तसेच टाकून तो जवळच्याच फॅमिली डॉक्टरना घेऊन आला. तेही लगेच आले पण ते येण्यापूर्वीच सगळा कारभार संपला होता. आम्ही सगळेच मृत्यूच्या या अनपेक्षित आघाताने सुन्न झालो होतो. तुम्हाला खोटं वाटेल कदाचित, पण नरेंद्रने आम्हाला धीर दिला. अप्रिय सत्य स्वीकारायला बळ दिले. आणि त्याच्या वयामुळे असेल कदाचित तो स्वत: ते तसे स्वीकारू शकला. त्या दिवशी संध्याकाळीच तो शिवाजी उदय मंडळावर खेळायला गेला. इतरांना दिलेला धीर त्याने स्वत: आचरून दाखविला.

आमच्या शाळकरी वयात काही अंधश्रद्धा पाळल्या जात असत. उदा. ‘मांजर आडवे गेले की, अपशकुन होतो.’, ‘दाराची कडी वाजवू नये’, ‘मिठाचे भांडे कुणाच्या हातात देऊ नये’ इत्यादी. एकदा नरेंद्रला ‘मिठाचे भांडे हातात देऊ नको’ असे सांगितले. नरेंद्रने त्यावर लगेच आक्षेप घेतला. मी म्हणाले, “अरे माझा काही तसा विश्वास नाही पण आपली सवय म्हणून सांगितले.’ तो उसळून म्हणाला, ‘असेच जुने पुराणे संकेत पाळून तुम्ही स्वत: अंधश्रद्धाळू बनता व लोकांची अंधश्रद्धा पक्की करता.” त्याचे विचार पक्के व स्पष्टीकरण चोख असल्याने त्याच्यासमोर नेहमी मीच हरायचे. आणि म्हणूनच लहान असूनही त्याचं मोठेपण मी लहानपणापासून मान्य केले होते.
आम्हा सर्व भावंडांप्रमाणे नरेंद्रलाही काव्याची खूप आवड होती. आवडलेली कविता त्याला पहिल्या वाचनातच पाठ व्हायची. मग लहान मोठ्या आवाजात ती म्हणत तो सार्या घरभर फेर्या घालीत राही. “भ्रांत तुम्हा का पडे?” ही माधव ज्युलियनांची कविता त्याला अशी आवडलेली पहिली कविता.
“वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे”
“कायदा पळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला.”
“धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे.”
असा घोष करीत तो सार्या घरभर फेर्या घालत असे. हळूहळू त्याच्या कवितासंग्रहात किरण मंडळातील इतर कवींचा पण समावेश होऊ लागला.
“ग्रहांचे साह्य शुराला यशश्री पायीची दासी
वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती
मन्मना नाही क्षिती
भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? मुक्त तो रात्रंदिनी”
या ओळींचे पठण त्याला आवडे. पुढे कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जय जयकार’, ‘अहिनकुल’, ‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कवितांनी त्याला झपाटले.
मराठी काव्य सृष्टीच्या जनकाच्या केशवसुतांच्या कवितांकडे तो जरा नंतर वळला. पण त्यातल्या विचारांनी त्याला पुरते भारून टाकले.
“प्राप्त काल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
बसुनी का वाढविता मेदा
वीरांनो या त्वरा करा रे”
ही साद जणू त्यालाच होती.
केशवसुतांच्या कवितातील काही पुरोगामी विचारांनी नरेंद्रच्या विवेकनिष्ठ विचारांची पायाभरणी करण्यास मदत झाली असण्याची खूप शक्यता आहे.
“नव्या जगातील नव्या मनूचा शूर शिपाई आहे.
-अमरजा नेरूरकर