जातपंचायतीला मूठमातीअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या वार्तापत्र विशेषांकाचा लोकार्पण सोहळा नुकताच अलिबाग येथील जेएसएम कॉलेज येथे संपन्न झाला. त्यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, पत्रकार किशोर केणी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना महाराष्ट्र अंनिसच्या सहकार्यवाह आरती नाईक यांनी सांगितले की, वाळीत प्रकरणांतुल पीडीत कुटूंबांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी अंनिस कार्यरत आहे. त्यानंतर नितीनकुमार राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, जातपंचायत रद्द झाली पाहिजे. त्यासाठी अंनिसचे प्रयत्न सुरू असून अनेक पिडीत कुटूंबांना भेटून त्यांच्या व्यथा समितीने जाणून घेतल्या आहेत. या अनेक प्रकारांमध्ये गावकीच्या पंचांची दादागिरी व अत्याचायांचा समावेश असल्याचे दिसून आलेले आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता ही समिती कार्यरत असून या समितीने जादूटोणा विरोधी कायदा तयार करण्यास शासनाला भाग पाडले. पण त्यासाठी डॉ. दाभोलकरांचा बळी गेला. पण त्यानंतर प्रबोधन होण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर या कायद्याचा अंनिस तर्फे प्रसार करण्यात आला. रायगड जिल्ह्यात अनेक वाळीत प्रकरणे आजदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु अनेक पीडीतांच्या मनात भीती असल्याने ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याची खंत नितीनकुमार राऊत यांनी व्यक्त केली. मात्र या जातपंचायतींविरूद्धच्या तक्रारींना पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावर यांचे चांगल्या प्रकारे सहकार्य असून यापुढे जेव्हा जातपंचायतीचा इतिहास लिहीला जाईल त्यामध्ये पोलीस अधिक्षक डॉ. महावरकरांचा आदराने उल्लेख केला जाईल असेही राऊत यांनी सांगितले. त्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी जातपंचायतीचे प्रकार कसे घडतात याबाबत अनेक प्रकारांची माहिती सांगितली. तसेच समाजप्रबोधनाचे कार्य करताना अनेक अडथळे येतात. ही संक्रमण अवस्था असून त्यामध्ये बदल होण्यास वेळ लागतो. लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. पोलीस हा समाजाचाच एक घटक असून तो जनतेच्या पाठीशी आहे.
त्यानंतर अंनिसचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले की, जात पाळणे हीच अंधश्रद्धा असून त्याबाबत परिपूर्ण कायदा होणे गरजेचे आहे. त्यानंतर जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी कायदेविषयक माहिती देऊन कायद्यातील अनेक त्रुटी स्पष्टपणे सांगून समाजातील दंडेशाहीचे प्रकार थांबविण्यासाठी याबाबतचा कायदा होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी अंनिसचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
– महेंद्र नाईक, पनवेल
संपर्क : 9594094785