21 जुलै 2011 रोजी या प्रकल्पाचे शेवटचे यान नासाच्या केप केनेडी स्पेस सेंटर येथे सुरक्षितपणे उतरल्यानंतर सेंटरभोवती प्रत्यक्षपणे हजर असलेल्यांच्या चेहर्यावर काही प्रमाणात समाधान व काही प्रमाणात दु:खाची छाया दिसत होती. इतक्या वर्षांच्या परिश्रमानंतर यान सुखरूप उतरले याचे समाधान व यानंतर हा प्रकल्प बंद होणार(व त्यामुळे काहींच्या नोकरीवर गदा येणार!) म्हणून दु:ख अनेकांच्या डोळ्यात दिसत होते. 30 वर्षे अव्याहतपणे चाललेल्या या प्रकल्पाचा अशा प्रकारे शेवट होईल याची कल्पना कुणालाही नसेल. अंतराळातील ही 135 वी व शेवटची खेप होती. यानंतर या अवकाशयानाला नासाच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. या नासाच्या संग्रहालयातील Mercury, Gemini, Apollo या नावाजलेल्या यानांच्या अवशेषाबरोबरच्या व राईट बंधूंच्या त्या ‘विमाना’बरोबरच्या पंक्तीत हे यान जाणार आहे. 8 जुलै रोजी या अट्लांटिस यानाने आकाशात झेप घेतली होती. अवकाश भ्रमण करत अंतरिक्षातील स्पेस स्टेशनला भेट देऊन यातील अंतरिक्षयात्री व यान 13 दिवसांनी परत आले.
यानंतर नासा कधीच अवकाशयानांचे उत्पादन करणार नाही. खाजगी कंपन्या आता यात उतरल्या असून पुढील 10 वर्षेतरी त्या मानवसहित उड्डाण करणारे यान बनवू शकतील की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बराक ओबामा यांनी 2025 पर्यंत एखाद्या अशनीवर (asteroid) व 2035 पर्यंत मंगळ ग्रहावर यान पाठवण्याची महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. परंतु यासाठी लागणार्या यानाच्या व रॉकेटच्या रचनेचा प्राथमिक आराखडासुद्धा तयार झालेला नाही. अभ्यासही झालेला नाही.
या यान प्रकल्पांतर्गत तयार झालेल्या यानाचे प्रथम उड्डाण 1981 मध्ये झाले. अनेक यानांचे उत्पादन करण्यात आले. यानांच्या सहाय्याने हबल स्पेस टेलिस्कोपला अंतराळात स्थिर करण्यात आले. टेलिस्कोपची दुर्बिण धूसर झाल्यानंतर त्याची दुरूस्ती करण्यात या यानांचा वापर झाला. यातील काही उड्डाणामधील अंतरिक्ष प्रवासात स्त्रियांचा, सर्वसामान्यांचा, शिक्षकांचा सहभाग होता. प्रथम पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करणार्या यानात जॉन ग्लेन होता व त्याचे वय त्यावेळी 77 वर्षांचे होते. आज तो 90 वर्षांचा आहे. यान उड्डाणात अनेक अडचणी आल्या. काही दुर्घटनांचा अनुभव घेतला. 14 जण मृत्युमुखी पडले. चॅलेंजर यानाने उड्डाणाच्या वेळीच पेट घेतला. कोलंबिया यानाला खाली उतरताना अपघात झाला. 30 वर्षांच्या अवधीत या सर्व यानांनी मिळून 80 कोटी किलोमीटर्सचा अंतरिक्ष प्रवास केला. 21152 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा घातली. 355 यात्रींनी यानातून अवकाशात भ्रमण केले. त्यात 16 देशांचे नागरीक होते. सलगपणे मोजल्यास 1330 दिवस सुमारे 4 वर्षे यान अवकाशात भ्रमण करत होते. सात वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी हा प्रकल्प थांबविण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या प्रदक्षिणेतील यान अंतराळातील स्पेस स्टेशनवर अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकवून परत आला. पुढील काही वर्षांत ज्या खाजगी कंपनीचे मानवसहित यान उड्डाण करणार आहे त्या कंपनीला तो ध्वज परत आणण्याचा सन्मान मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 196000 कोटी डॉलर्स खर्च झाले. हा खर्च चंद्रावर पदार्पण करण्यास आलेल्या, अणुबॉम्ब करण्यास आलेल्या व पनामा कालवा खोदण्यास आलेल्या एकूण खर्चापेक्षा जास्त असेल. तरीसुद्धा या प्रकल्पामुळे अंतराळ विमानातील संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. अंतराळातील ग्रह-तार्यांच्या स्थितीगतीविषयीची अप्रतिम छायाचित्रे मिळाली. या सर्व गोष्टी मानवीबुद्धीला आव्हानात्मक होत्या व ते आव्हान स्वीकारण्यात जगभरातील वैज्ञानिक यशस्वी झाले. प्रकल्पाच्या प्रारंभी नासा प्रशासनाने अनेक आश्वासनांची खैरात केली होती. दर आठवड्याला एक यान पाठवू, अंतरिक्ष यात्रा कमी खर्चात करून देऊ, अपघातरहीत करून देऊ इ. इ. परंतु यातले काहीही साध्य झाले नाही. काहींच्या मते हा प्रकल्प म्हणजे मोठ्या प्रमाणातील नामुष्कीचे प्रमाण ठरू शकेल. तरीसुद्धा अमेरिका व रशिया यांच्यातील संबंध सुधारण्यात(व जागतिक अण्वस्त्रयुद्ध टाळण्यात!) आंतरराष्ट्रीय सौहार्दता वाढविण्यात या प्रकल्पाने फार महत्वाचा वाटा उचलला आहे, हे तरी आपल्याला मान्य करावे लागेल!
– प्रभाकर नानावटी