अनंत काणेकरांच्या एका लघुनिबंधात मानवी मनातील निद्रिस्त ज्वालामुखीचा उल्लेख आहे. मानवी संस्कृतीच्या सुरवातीच्या काळात संघर्ष व अत्याचार ही सहजप्रवृत्ती होती. ही प्रवृत्ती माणसांनी जीवाच्या उत्क्रांतीतून घेतली. जगण्याच्या कलहात संघर्ष व आक्रमण अटळ होते. उत्क्रांतीच्या डी.एन.ए.चा हा विशेष माणसातही आला. विशेषत: भटक्या अवस्थेत तो प्रकर्षाने कार्यरत राहीला.
हळूहळू शेतीचा शोध लागला. टोळ्या स्थिरावू लागल्या. नद्याकाठी गावे वसू लागली. शिकारीबरोबरच धान्य पिकवणारी माणसे आपल्या बुद्धीचा वापर करून जगू लागली. आता प्रत्येक वेळी शिकारीची गरज उरली नाही. विधायक प्रयत्नाची संस्कृती अवतरू लागली.
पण विधायक वृत्तीच्या तळाला शोषकता व आक्रमक वृत्ती शिल्लक राहिलीच. त्यातूनच एक समूह दुसर्या समुहाशी वैरभावाची वृत्ती ठेवून होताच. त्यातून वर्णव्यवस्था, स्त्रीपुरूष विषमता, अन्याय-अत्याचार चालूच राहिले. काणेकरांनी अंतर्मनातील याच संघर्ष वृत्तीला निद्रिस्त ज्वालामुखी म्हटलंय.
विरोध-विकासाच्या मानवी चळवळीतून अन्याय करणारे व अन्याय सहन करणारे यांच्यातील संघर्षाची तीव्रता हेलकावे खात राहिली. पण हळूहळू का होईना, विज्ञानाच्या सामर्थ्याने उत्पादनात वाढ झाल्यावर समाज अधिक स्थिरतेकडे व अन्यायविरहीत वाटचालीवर चालत राहिला. गुलामीची प्रथा लोप पावू लागली. स्त्रियांना अधिकार मिळू लागले. दलितांना न्याय मिळू लागला. निग्रोंना अमेरिकेत समतेची वागणूक मिळू लागली. पण-
समतेच्या व स्वातंत्र्याच्या व बंधुतेच्या तळाला अविचाराचे निखारे निद्रिस्त राहिलेत. ते अधूनमधून उफाळून येतात व आपले विकृत रूप उघड करतात. अधून मधून आपल्या देशात व जगात याचे अभद्र दर्शन आपल्याला घडते. दिल्लीतील बलात्काराची घटना व महाराष्ट्रात तीन दलितांची प्रेमसंबंधातून झालेली हत्या व इतर घटना अविचाराचा निखारा जिवंत असल्याची साक्ष देतात.
वरवर आपण सुसंकृत वाटतो. पण पूर्व संस्काराची जळमटे अजूनही पुरती नाहीशी झालेली नाहीत. स्त्रिया व दलित यांच्यावरील अत्याचाराच्या पाठीमागे हा प्राचीन वारसा कारणीभूत आहे.
स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे व तिचे लैंगिक शोषण हा आपला अधिकार आहे असे मानणारी प्रवृत्ती अजूनही जागी आहे. दुसर्या व्यक्तीच्या संमतीची आवश्यकता नाही, तिला छळणे वा तिच्यावर अनेक प्रकारे जुलूमजबरदस्ती करणे असे समजणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. भारतीय घटनेनुसार असे वर्तन बेकायदेशीर आहे असे असूनसुद्धा अशा कायद्यांना भीक न घालणारी मंडळी समाजात वावरतात. यांच्या मनोवृत्तीत बदल करणे हे आपणासमोरचे मोठे आव्हान आहे.
स्त्रियांवरील अत्याचाराबरोबरच दलित व गरीब समाजावरील अत्याचार पदोपदी घडत आहेत. दलित तरूणाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केले म्हणून या मुलाचे व त्याच्या दोन मित्रांचे तुकडे करण्यात आले. खैरलांजी प्रकरणातील दलित ऐटीत वावरतात म्हणून त्याची हत्या करण्यात आली.
बाई ही पायातील वहाण आहे व दलित हे ब्रम्हाच्या पायातून जन्मले या गैरसमजुती अजूनही नष्ट होत नाहीत. सुसंस्कृत समाजाला हे लांच्छनास्पद आहे. याबाबत कायद्याचा धाक वाढवायला हवाच पण अशा अविवेकी वर्तनाचे निखारे कसे बुझवता येतील यासाठी प्रबोधनाचे सामर्थ्य वाढवायला हवे. अंनिस याबाबत सक्रीय राहील.