अंधश्रध्दा निर्मूलन समितीतील प्रमुख कार्यकर्त्यांना मानसिक आरोग्याचे भान मिळावे त्यांना प्राथमिक पातळीवर जनसामान्यांशी मानसिक आरोग्याविषयक संवाद व प्रबोधनकरता यावे यासाठी विभागीय पातळीवर मानसिक आरोग्य आणि अंधश्रध्दा निर्मूलन कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा चाळीसगाव येथे नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयाचे सभागृहात घेण्यात आली. हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. पहिल्या सत्रात डॉ. प्रदिप पाटकर (मानसोपचार तज्ज्ञ, पनवेल) यांनी मानसिक आजार व अंधश्रध्दा, समाजात कार्यकर्त्यांची भूमिका, मानसिक आजाराबाबत समुह मानस, संबंधित विषयांवर शंका निरसन या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसर्या सत्रात डॉ. प्रदिप जोशी (मानसोपचार तज्ज्ञ, जळगाव) यांनी मेंदुची रचना , कार्य मानसिक आजाराची कारण मिमांसा, देवराई स्किन करून त्यानंतर सायकोसिसचे प्रकार सांगणे, न्यूरोसिसचे प्रकार, समपुदेशन व आर.टी.ई., मेंटल हॉस्पिटलला अॅडमिट करणे व बाह्य उपचार प्रतिबंध या आदि विषयांवर मार्गदर्शन केले. दोनही सत्राच्या अगोदर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शिबीराची भूमिका स्पष्ट केली. हम होंगे कामयाब या गिताने शिबीराचा समारोप करण्यात आला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
ठाणे लॉ कॉलेजमध्ये डॉ.दाभोलकरांचे व्याख्यान
ठाणे विद्याप्रसारक मंडळाच्या ठाणे विधी महाविद्यालयात ‘संविधान बांधिलकी महोत्सवा’ अंतर्गत दि.31 जानेवारी 2012 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे ‘जादूटोणा विरोधी कायदा : वाटचाल, सद्यस्थिती आणि आक्षेप’ या विषयावर कायद्याचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात डॉ.दाभोलकर यांची जादूटोणा विरोधी कायद्याचे नामांतर कसे झाले, वाटचाल कशी झाली, कायदा वयात आल्यानंतरही तो मंजूर का होऊ शकला नाही, त्याबद्दलचे आक्षेप आदी विषयांवर सविस्तर विवेचन केले. तसेच भारतीय संविधानास सुसंगत आणि आवश्यक अशा या कायद्याचे महत्व विषद केले. व्याख्यानानंतर लेखी प्रश्नोत्तरे झाले. त्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या विषयावर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून त्यांचे शंका निरसन केले. व्याख्यानास महाविद्यालयातील जवळपास 300 पेक्षा जास्त विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. व्याख्यान आयोजित केलेल्या सभागृहात अनेक विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नव्हती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्र.विनोद वाघ यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा परिचय महाविद्यालयाचे विद्यार्थी व अंनिसचे सुधीर निंबाळकर यांनी केला. तर आभार प्रदर्शन प्रा.मिथुन बनसोडे यांनी केले.
–सुधीर निंबाळकर, ठाणे.