Categories
संपादकीय

छद्मविज्ञान : नवी बुवाबाजी

फेब्रुवारी – २०१५

अलिकडे विज्ञानाच्या नावाखाली एका नव्या फसवणुकीच्या प्रकाराने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. या बुवाबाजीचे नाव आहे ‘मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन’. विज्ञानाची झूल पांघरून फसवणूक करणे याला छद्म-विज्ञान किंवा फसवे विज्ञान किंवा भ्रामक विज्ञान असं नाव आहे. फसव्या विज्ञानाची अनेक रूपे आहेत. बहुरूपी जसा नकली रूप घेऊन आपली करमणूक करतो तसे छद्मवैज्ञानिक विज्ञानाला नकली रूप देतात. जादूगार सुद्धा त्याच्या कलेत विज्ञानाचा बेमालूम वापर करतो. पण जादूगार किंवा बहुरूपी यांचे हेतु लोकांची करमणूक करणे हा असतो. ते लबाड नसतात. छद्मवैज्ञानिक लबाड असतात. आध्यात्मिक क्षेत्रातील गाडगेबाबा किंवा संत तुकाराम हे लोककल्याणाची चिंता करणारे खरे आध्यात्मिक पुरूष होत. पण रामपालसारखे मंबाजी, लोकशोषणासाठी आध्यात्मिक पुरूषाची झूल पांघरतात.

आध्यात्मिक बुवाबाजी आणि फसव्या विज्ञानाची बुवाबाजी याचा हेतु समान आहे; तो म्हणजे फसवणूक. धर्म भावनेचा समाजमनावर जबरदस्त पगडा असतो. त्याचा चतुरपणे उपयोग करून तथाकथित आध्यात्मिक बुवा आपले हातपाय समाजात पसरवितात. आध्यात्मिक शब्द पेरलेली रसाळ भाषा, आम्ही देवाचे लाडके, तुमच्या कल्याणासाठी देवाने आमची नेमणूक केली आहे असे मायाजाल ही मंडळी समाजात पसरवितात. कोणी कृष्णाचे अवतार बनतात तर कोणी स्वत:ला राम समजतात तर बायकोला सीता. त्यांचा मित्र लक्ष्मण बनतो. रामपाल स्वत:ला कबीर अवतार समजतो.

ज्ञानाचा समाजात प्रसार झाला आणि विज्ञानाचे महत्व वाढले. विज्ञानाच्या सामर्थ्याची लोकांना प्रचिती येऊ लागली. देवाला भजून जे मिळत नाही ते विज्ञानामुळे मिळायला लागले. कॉलरा बरा होण्यासाठी देव नाही तर विज्ञान मदतीला येते. मूल हवं असेल तर आता नवस करण्याऐवजी वैद्यकीय इलाज म्हणजे विज्ञान मदतीला येऊ लागले. टेस्ट ट्यूब बेबीला लोक स्वीकारू लागले. विज्ञानाची थोरवी समाजात मान्यता मिळवू लागली. एक नवं सामर्थ्य आणि ऐश्वर्य विज्ञानामुळं प्राप्त होऊ लागलं.

विज्ञानाचं सामर्थ्य आणि ऐश्वर्य हे सत्य संशोधनातून प्राप्त झालं. अविरत कष्ट, निरीक्षण प्रयोग आणि पडताळा या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून निसर्गाचे ज्ञान माणसानी मिळविलं. थोर वैज्ञानिक हे संतच होत. सत्यशोधासाठी त्यांनी केलेल्या अविरत कष्टामुळे माणसाला विज्ञान मिळालं. विज्ञानाचा एक प्रकारचा दबदबा आणि स्वीकार समाज मनात रूजू होऊ लागला.

पण सत्यशोधनाचे अपार कष्ट न करता विज्ञानाची नक्कल करून फायदे मिळवता येतील. हे ज्यानं पहिल्यांदा ओळखलं तो छद्मवैज्ञानिक. शॉर्ट कट मार्गाचा अवलंब करणारी चतुर जमात जगात सर्वत्र पसरली आहे. विज्ञानाच्या नावाखाली अज्ञान सांगून पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा एक नवा धंदाच समाजात वाढू लागलाय. बुवाबाजीचं हे नवं रूप चक्रावून टाकणारं आहे. लबाडीसाठी विज्ञानाचा वापर म्हणजे काळाबरोबर चतुर मंडळींनी आपले फसवणुकीचे तंत्र बदललं आहे याचा पुरावा होय. देवाधर्माचं खोटं नाणं आता चालणार नाही हे ओळखून फसव्या विज्ञानाचं तांब्याला मुलामा दिलेलं रूपयाचं खोटं नाणं आता वापरायला हवं असं हे चातुर्य आहे.

फसवे विज्ञान ही बुवाबाजी कशी? हा मुद्दा नीट समजावून घ्यायला हवा. बुवाबाबा करत असलेले चमत्कार आपण तपासायला गेलो तर बुवा त्याला नकार देतात. सत्यसाईबाबाचा हवेतून हात फिरवून वस्तू काढण्याचा चमत्कार तपासण्यासाठी जादूगार सरकार त्याच्या आश्रमात गेले. सत्यसाईबाबांनी हवेत हात फिरवून विभूती काढली आणि सरकारांच्या हातावर ठेवली. सरकारांनी तसाच आपला हात हवेत फिरवून रसगुल्ला काढला आणि सत्यसाईबाबाच्या हातावर ठेवला. सत्यसाईबाबा जाम भडकले आणि जादूगार सरकारांना त्यांनी आश्रमाच्या बाहेर ढकलले. श्रद्धेला आव्हान चालत नाही. मिडब्रेनवाल्या मंडळींचा असा दावा असतो की, मध्य मेंदू जागृत करून ते मुलांना डोळे बंद करून पाहण्याचे सामर्थ्य देतात. याचे प्रयोग ते टी.व्ही.वर करतात. टी.व्ही.वरील प्रयोगातील मंडळी यांचीच. प्रयोग हेच करणार? ही बदमाषी नाही का? महाराष्ट्र अंनिसने नाशिक, सातारा आणि सांगली येथे फसवणूक टाळण्यासाठी आमच्या उपस्थितीत व सर्व काळजी घेऊन प्रयोग करण्याचे मिडब्रेनवाल्यांना आव्हान दिलं. ते त्यांनी स्वीकारलं नाही. पाच हजारापासून वीस हजार रूपयापर्यंत फी घेऊन मध्य मेंदू जागृत करण्याचे हे विज्ञान म्हणजे केवढी फसवणूक आहे?

फसव्या विज्ञानातील संशोधन कुणी केलं? कोठे केलं? याचा मागोवा घेतला तर ते कोरियात झालं, जपानमध्ये झालं. अशी उत्तरं मिळतात. ते वेबसाईटवर पण दाखविलं जातं. पण खर्‍या वैज्ञानिक संशोधनाची कसोटी काय? हे संशोधन ज्या ज्ञानशाखेत झालं त्या ज्ञानशाखेतील मान्यताप्राप्त साहित्यात त्याची नोंद आहे काय? ते विश्वकोशात समाविष्ट आहे का? ते मान्यताप्राप्त वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रकाशित झालंय का? अशा कसोट्या लावल्या तर फसव्या विज्ञानाचा फोलपणा आपणास कळू शकतो. खरं विज्ञान कोणी मांडलं तर अनेक गटाकडून त्यावर पुन्हा प्रयोग केले जातात. तावून सुलाखून निघालेलं सत्य मग मान्यताप्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित केलं जातं. आरोग्य क्षेत्रात तर डबल ब्लाईंड नावाची परखड अशी चाचणी नवीन औषधाबाबत वस्तुनिष्ठपणे घेतली जाते. मगच ते औषध बाजारात आणले जाते.

मग सर्वसामान्य लोक फसव्या विज्ञानाचा स्वीकार कसा करतात? याचं एक उत्तर मानसशास्त्रीय तर दुसरं उत्तर विज्ञानाचं अज्ञान हे आहे. गाजावाजा करून, मोठमोठ्या जाहिराती वाटून, प्रसार केलेली गोष्ट खरी वाटायला लागते. तिचा वापर मग मानसशास्त्रीय दृष्ट्या तात्पुरता दिलासा देतो. याला प्लॅसिबो परिणाम म्हणतात. पण तात्पुरतं बरं वाटणं म्हणजे बरं होणं नव्हे. ब्लड प्रेशर बरे होण्यासाठी चुंबकाच्या माळा वापरल्या तर तात्पुरतं बरं वाटेलही. बर्‍याच वेळा ब्लड प्रेशरमध्ये चढउतार होत असतात. त्याचा फायदा चुंबकमाळेला मिळत असेल. पण ब्लड प्रेशर कधी शूट होईल हे आपणाला कळतही नाही. ते शूट होण्याला विविध कारणं असतात. त्या कारणांवर चुंबकीय माळ कशी नियंत्रण ठेवील? याबाबतचा फसवा युक्तीवाद असा की, रक्तात आयर्न असते. चुंबक त्यावर परिणाम करतो. म्हणून ब्लड प्रेशर बरे होते. पण रक्तातील आयर्न हे हिमोग्लोबिनच्या रेणुत बंधीत स्वरूपात असते हे आपणास कुठे माहीत असते? बंधीत आयर्नला चुंबक आकर्षित करू शकत नाही. त्यामुळे चुंबक ब्लडप्रेशर बरे करू शकत नाही. अशा प्रकारे विज्ञानाचे अज्ञान आपली फसगत करीत असते. म्हणून विज्ञानाची मूलतत्वे सोप्या भाषेत सर्व समाजाला नीट माहीत करून द्यायला हवीत.

संमोहनाचे अतिरिक्त दावे रेकी, चुंबक वस्तू, काही निसर्ग उपचार, टी.व्ही.वरील विविध पदकांच्या जाहिराती, वरूण यज्ञ, फसवे वास्तुशास्त्र, ज्योतिष असा सर्व भ्रामक विज्ञानाचा पसारा समाजावर आक्रमण करत आहे. फसव्या विज्ञानाबाबत विज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ञ वैज्ञानिक तटस्थेची भूमिका घेताना दिसतात. ते फसव्या विज्ञानाला हसण्यावर सोडून देतात. पण ही वृत्ती बरोबर नाही. शालेय शिक्षणातही फसव्या विज्ञानाकडे दुर्लक्ष केले जाते. या तटस्थ वृत्तीमुळे फसवे विज्ञान अधिक आक्रमक होत आहे. त्याचे गंभीर परिणाम समाजाला सोसावे लागतील.

छद्मविज्ञान राजकारणात घुसून जाती व वर्ण यांच्या पावित्र्याच्या नावाखाली अन्याय, अत्याचार वाढवू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाझीनी केलेला ज्यूचा छळवाद. शिक्षणक्षेत्रात विज्ञानावर ते आक्रमण करील. उत्क्रांतीऐवजी निर्मितीवाद शाळेत शिकविला जावा यासाठी अमेरिकेत जोरदार आघाडी उघडली गेली आहे. आरोग्याच्या क्षेत्रात हजारो लोकांना अकारण मृत्यूला सामोरे जाण्याचा धोका छद्मविज्ञानामुळे वाढू शकतो. धार्मिक क्षेत्रात, असहिष्णुता, धर्मवेडेपणा आणि दोन समाजात तेढ वाढविण्यास ते कारणीभूत होईल. प्रसारमाध्यमात शिरून सर्व सामान्य लोकांमध्ये महत्वाच्या सामाजिक प्रश्नावर चुकीच्या माहितीचे प्रसारण करून मतदारांना संभ्रमात पाडण्याचे काम छद्मविज्ञान करील.

ग्रे या कवीने म्हटलंय, Where ignorance is bliss. It is folly to be wise.

जेथे अज्ञान हे वरदान वाटते तेथे शहाणपणा म्हणजे मूर्खपणाच ठरतो. हा धोका लक्षात घेऊन व औपचारिक शिक्षणाची याबाबतची अनास्था ओळखून अनौपचारिक पद्धतीने विज्ञान जागृती व छद्मविज्ञानाचे धोके समजावून देण्यासाठी मोठी आघाडी सुरू करावी लागेल.