सामाजिक समतेचे स्वप्न पहाणारे व त्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविश्रांत धडपडणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल ही जयंती. स्वतंत्र भारतात लोकशाहीच्या मार्गाने समाजातील दलित-वंचितांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत म्हणून बाबासाहेबांनी त्यांना घटनात्मक अधिकार मिळवून दिले. या अधिकारांचा वापर करून, स्वत:चे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी दलितांनी अहिंसात्मक संघर्ष करावा व आपली उन्नती साधावी हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. त्या दिशेने दलित समाजात जागृती सुरू झाली व बाबासाहेबांच्या प्रयत्नांना फळे मिळू लागली.
शिक्षणातून न्यायासाठी आसुसलेली दलित विचारवंतांची व साहित्यिकांची नवी पिढी घडू लागली. अनेक कवी, कादंबरीकार व कथालेखक आपल्या वेदना प्रखर भाषेत मांडू लागले. आपल्यावरील अन्याय व अत्याचार यांना वाचा फोडू लागले. कॉम्रेड आण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, ना.रा.शेंडे, बाबूराव बागुल इत्यादींचे कांदबरी लेखन, विद्रोही कथाकार बाबूराव बागुल, प्रा.केशव मेश्राम, वामन होवाळ, योगीराज वाघमारे आदींच्या कथा, दया पवार, लक्ष्मण माने आदी मान्यवरांचे अस्वस्थ करणारे आत्मकथन, नामदेव ढसाळांच्या कविता अशा साहित्यिक कृतींनी दलित समाज प्रबोधित होऊ लागला. अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरा यांच्या जाचातून मुक्त होऊ लागला. घटनात्मक अधिकार व कर्तृत्व यांच्या जोरावर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात दलितांचे नवे नेतृत्व उभे राहू लागले. दलित समाज कात टाकू लागला. बाबासाहेबांनी दलितांची अस्मिता जागृत केल्याचा परिणाम म्हणून अनेक दलित विचारवंतांच्या पंखात बळ आले व ते विविध क्षेत्रात उंच भरार्या घेऊ लागले. पण या झेपावणार्या गरूडांचा समतेच्या ओढीचा प्रवास हा सुखासुखी झालेला नाही. त्यांचे विदारक अनुभव समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य मुळातूनच वाचायला हवे. अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्य्र व अस्पृश्यता अशा राक्षसांच्या कराल पंजात सापडलेला आणि शतकानुशतके पायदळी तुडवलेला समाज या साहित्यातून व्यक्त होतो. बाबूराव बागुल यांची ‘मी जेव्हा जात चोरली होती’ ही कथा वाचकांनी अवश्य वाचावी. म्हणजे दलितांच्या वेदना काय असतात ह्याची जाणीव सर्वांना अस्वस्थ करेल.
समतेच्या प्रवासाचे दलित वंचितांचे स्वप्न पुरे झालंय काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वास्तवाचे नीट आकलन करून घ्यावे लागेल. घटनेने जरी अधिकार दिले तरी समाज व्यवस्थेच्या अंतरंगात समतेच्या जाणिवा दिसत नाहीत. वरकरणी शांत वाटणार्या भूखंडाखाली तप्त लाव्हारसाचे प्रवाह असावेत त्याप्रमाणे समाजव्यवस्थेच्या अंतरंगात जातीभेदाचे व विषमतेच्या समर्थनाचे सुप्त प्रवाह दडलेले आहेत. खैरलांजीसारख्या घटनेतून ते व्यक्त होताना दिसतात. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न पूर्ण होण्यात समाजाच्या अंतर्मनातील दलित जातीच्या द्वेषाचा प्रवाह हा मोठा अडथळा आहे. पण त्याबरोबरच दलितांमधील बेकी, राजकीय फाटाफूट व दलित मनात परंपरेचे ओझे झुगारून देण्याबाबतचा दुबळेपणा ही पण महत्वाची कारणे आहेत.
बाटलीतील खेकड्याची गोष्ट तुम्हास माहीत आहे का? या खेकड्यांपैकी एखादा खेकडा बाहेर पडण्याची धडपड करीत असेल तर इतर खेकडे त्याला मागे खेचतात. याला सामुहिक वेडाचार असे नाव देता येईल. वामन होवाळांच्या अनेक कथांत अशा मनोवृत्तीवर उपहासात्मक भाष्य केले आहे. त्यांची ऑडीट या संग्रहातील ‘घालमेल’ ही कथा अवश्य वाचावी. या गोष्टीतील अबूराव स्वत:चा म्हातारा मेल्यावर त्याला निवदपाणी केलं नाही तर या कल्पनेने अस्वस्थ होतो. त्याच्या अंर्तमनातील प्रथा परंपरेचे खेकडे त्याला मागे ओढतात. परिवर्तन कसे अवघड आहे हे आपणास समजते.
उच्चसमाजाच्या अंर्तमनातील खेकडे वेगळ्या पद्धतीचे आहेत. एखादा दलित व दलित तरूणी आर्थिक दृष्ट्या व बौद्धिक दृष्ट्या सुधारली तर इतर जातींना ते आवडत नाही. खैरलांजी प्रकरण हे अशा द्वेषातूनच घडले.
नवा विचार व घटनेने दिलेले अधिकार वापरून मागासवर्गीयांनी गरूडाप्रमाणे झेप घ्यावी व आपली व समाजाची प्रगती करावी यासाठी इतर समाजाने त्यांच्या पंखात बळ भरावे तरच समता व बंधुता याकडे आपली वाटचाल होईल. यासाठी दलितांच्या बाबतीत उच्चवर्णियांनी उदारमतवादी मानसिकता वाढविणे व दलितांनी गुलामीची मानसिकता फेकून देणे हेच प्रभावी उपाय आहेत. मनातील विद्वेषाचे खेकडे काढून टाका व दलितांच्या पंखांना बळ द्या हाच संदेश डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करताना आपण मनी बाळगू या!
सौ.सरस्वती होगाडे यांचे निधन इचलकरंजी येथील अं.नि.स.चे कार्यकर्ते तसेच लक्ष्मीदत्त स्क्रिन प्रिंटींगचे विनायक नारायण होगाडे यांच्या पत्नी सौ.सरस्वती विनायक होगाडे यांचे वयाच्या 58 वर्षी आकस्मिक निधन झाले. विनायक नारायण होगाडे व त्यांच्या परिवाराच्या दु:खात अंनिस सहभागी आहे.