Categories
संपादकीय

धर्मांचे ऑक्टोपस

जानेवारी - २०१५

विचार करणाऱ्या सर्व जगाला चिंता वाटावी अशा घटना सर्व जगभर सरत्या वर्षात घडून गेल्या. भारतही याला अपवाद नाही. पेशावर मध्ये सैनिकी शाळेवर अतिरेक्यांनी हल्ला करून १५० शाळकरी मुलांना ठार केले; आणि अवघे जग हादरून गेले. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे एका अतिरेक्याने प्रसिद्ध अशा कॅफेमध्ये ४० जणांना ओलीस ठेवले. हे सगळं घडलं धर्माच्या नावावर. एके ५६ रायफली व रॉकेट लाँचर घेऊन आलेल्या अतिरेक्यांनी ‘चार्ली हेब्डो’ या साप्ताहिकाच्या पॅरीस येथील कार्यालयावर हल्ला करून संपादकासहीत व्यंगचित्रकार व इतर अशा बारा जणांना ठार केले. धार्मिक प्रेषिताच्या व्यंगचित्रावर आक्षेप घेऊन हा हल्ला झाला. धार्मिक दहशतवादाचा हा धिंगाणा जगभर आणि भारतात सर्वत्र जोर धरीत आहे. आपल्या देशातही गुजरातमध्ये धार्मिक दंगलीत हजारो निरपराध मुस्लीमांची कत्तल झाली होती.
भारतामध्ये धर्मनिरपेक्ष घटनेला आव्हान देऊन एका धर्माचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. “जगाच्या कल्याणासाठी अजिंक्य असा हिंदू समाज आम्हांला हवा आहे. आमची मूल्ये सर्वत्र हळूहळू रूजवली जातील. जगावर राज्य करण्याची मनीषा ठेवणाऱ्या अनेक शक्तींमध्ये महायुद्ध अटळ आहे.” अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते यांचे हे उद्गार आहेत. (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स २२ डिसेंबर २०१४.) सर्व धर्मांमध्ये हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, अशा अर्थाची वक्तव्ये हिंदुत्वादी मंडळी वारंवार करीत सुटली आहेत. घर वापसीचे प्रयोग सुरू झालेत. राष्ट्रपिता म. गांधी यांचा खून करणाऱ्या कडव्या धर्मवादी नथुरामची मंदिरे आणि पुतळे उभारली जावीत असे प्रयत्न सुरु झालेत. या देशात राम मानणारे राहतील हरामजाद्यांनी चालते व्हावे, अशाही धमक्या सुरु झाल्या आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून सर्व धर्माचे खरे घर इस्लाम हेच आहे. लहानपणी प्रत्येकजण मुस्लिम म्हणूनच जन्माला येतो. मात्र त्याचे पालक त्यांचे धर्मांतर करतात असे व्यक्तव्य एम.आय.एम.चे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांनी केले आहे. (लोकसत्ता, दि.६ जाने. २०१५)
वरील पार्श्वभूमीवर ‘गुलजार’ या साहित्यिकांनी काढलेले उद्गार सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरावेत. “औषधाच्या बाटलीवर ते बाद होण्याची एक तारीख लिहिलेली असते. त्यानंतर ते औषध विष होऊन जाते. धर्मांचे सध्या तसे झाले आहे. त्याला आपल्यातून काढून टाकणे योग्य.” गुलजारचे धर्मांबद्दलचे हे प्रखर भाष्य गंभीरपणे विचारात घ्यायला हवे.
संघटीत धर्मांनी विद्वेषाचे रूप पसरवून धार्मिक युद्धेही लढली. रोगराई आणि संकटे यांनी जेवढी माणसे मेली नसतील त्याच्यापेक्षा जास्त माणसे क्रूसेडस् व इतर धार्मिक संघर्षात मारली गेलीत. हिटलरने तर लाखो ज्यूंना कंठस्नान घातले. धर्माने मानवी मने निर्भय व सहिष्णु व्हायला हवीत. पण दुसऱ्या धर्माची भीती, दुसऱ्या जातीचा विद्वेष, ही अदिम काळातील मानसिकता आजही तशीच ठेवण्याचे कारण काय? निसर्गाचे नियम माहित करून माणसांनी जगात एवढी समृद्धी आणली आहे की, विद्वेषाची भावना गाडून टाकायला हवी. आणि या समृद्धीचा सर्व मानव जातीच्या हितासाठी वापर करायला हवा. पण खोट्या अस्मिता वाढीस लावणाऱ्या सर्वच धर्मातील मक्तेदारांना हे नको आहे. धर्मांचे ऑक्टोपस आपले विषारी पाय वेगाने पसरवीत आहेत.
एका जाहीर कार्यक्रमात बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी दिलेला संदेश आपण समजून घ्यायला हवा. धर्माची शिकवण, नीतीमूल्ये चांगली असली तरी प्रचंड वैविध्याने व्यापलेल्या या विश्वामध्ये कोणताही एक धर्म वैश्विक होऊ शकत नाही. मानवतेला वाचवायचे असेल तर धर्मनिरपेक्ष निती मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. “भविष्यात आमच्याच धर्माचे जगावर राज्य असेल” असा दावा सध्या काही धर्मांध टोळ्या करीत आहेत. पण कोणताही एक धर्म जगावर राज्य करू शकणार नाही. दलाई लामा धर्मनिरपेक्ष मानवतेची मूल्ये यांना महत्व देत आहेत. म्हणजेच गुलजार यांच्या भाषेत कालबाह्य धर्माचे औषध सोडून द्या / टाकून द्या असेच ते सांगत आहेत. बड रसेल या महान तत्वज्ञाने शांततेसाठी व समृद्धीसाठी जागतिक सरकार व्हावे अशी मांडणी केली होती. अशा सरकारची स्थापना भविष्यकाळात होईल की नाही हे काळ ठरवेल. पण ती झालीच तर त्या जागतिक सरकारचा एकच धर्म असेल. तो म्हणजे ‘मानव धर्म’.