मी प्रथम डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे अशा निमित्ताने बोलावं लागण्याचा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे आणि तो अतिशय दु:खद आणि क्लेशकारक असा आहे. आज काही विस्तारानं बोलण्याचा प्रसंग नाहीये. प्रास्ताविकावरून आपल्याला ध्यानात आलं असेल. व्यक्तीगतही फारसं बोलण्याचा हा प्रसंग नाही. तरीही 35-40 वर्षांचा ज्या व्यक्तीबरोबर स्नेह होता ती व्यक्ती आज आपल्याबरोबर नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. खरं म्हणजे थोड्याच दिवसांपूर्वी या ठिकाणी अंनिसनं आपल्या कार्यकर्त्यांना जे जीवनगौरव पुरस्कार दिले त्यावेळी त्यांच्या शेजारी मी बसलेलो होतो. तो देह आज आपल्यामधून लुप्त झालेला आहे. पण एक निर्धार या प्रसंगी आपण या ठिकाणी करूया. त्यांचे बलिदान वाया जावू नये, त्यांचे विचार पुढं घेऊन जाण्याचा आपला निश्चय कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही, एकजुटीनं आपण सर्वजण पुढची आव्हानं पेलण्यासाठी उभे राहुया. खरं म्हणजे डॉ.दाभोलकर कशासाठी धडपडत होते, कशासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं? भारतीय समाज विज्ञान निष्ठेवर आधारलेलं स्वरूप घेवून एका अतिशय निकोप, निरोगी अशा दिशेनं पुढं जावा यासाठी ते वर्षानुवर्षे संघर्ष करत होते. त्यांनी आपल्या हाती जे काम घेतलं होतं हे सगळ्या भारतीय समाजानं ध्यानात घेतलं पाहिजे. ते या भारतीय समाजाला उन्नत करणारं होते. भारतीय समाजाच्या हिताचं होते. कोणत्याही प्रकारे काही हानी होईल अशा प्रकारचं ते काम नव्हतं. अनेकदा सृष्टीतल्या घटनांचा कार्यकारण संबंध न समजल्यामुळं लोक हजारो वर्षांपूर्वी ज्या प्रकारचे उपाय करत होते त्या प्रकारचे उपाय करतात त्या सर्व मार्गातून त्यांनी बाहेर पडावं आणि आपल्या खर्याखुर्या हिताचं चिंतन करावं. हिताचे मार्ग खुले आहेत, नवा प्रकाश निर्माण झालेला आहे. अनेक महामानवांनी त्यासाठी दिशा दाखवून दिलेली आहे. जगभर विज्ञानाच्या आधारे केवढे मोठे बदल होतायत. हे सगळं भारतीय समाजानं ध्यानात घेणं हे गरजेचं आहे. आपल्याला बदलावं लागेल, चांगल्या दिशेनं बदलावं लागेल. आपल्यामध्ये जे अनिष्ट आहे, कुरूप आहे, आपलीच हानी करणारं आहे ते दूर सारलं पाहिजे. यासाठी दाभोलकर जीवाच रान करत होते. आपण सर्वजण त्यांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे साथीदार होतो. त्यांचे विचार आपण जाणलेले आहेत. त्यांनी सर्वात मोठा त्याग म्हणजे प्राणांचा त्याग तो या कामासाठी केलेला आहे. आपण आपल्या शक्तीनुसार, कुवतीनुसार जेवढं आपल्याला झेपतंय तेवढं, ज्या कार्यक्षेत्रात आपण आहोत त्या कार्यक्षेत्रात आपल्याला जे काही करणं शक्य आहे त्या प्रकारे हा विवेकाचा समंजसपणाचा, ज्ञानाचा, स्वातंत्र्याचा, मानवी बुद्धीच्या एका प्रकारे मुक्तीचा असा हा जो मार्ग आहे तो स्विकारावा. भारतीय समाजानं म्हणून आपल्याला जे करता येईल ते करण्याचा निर्धार हीच मला वाटतं डॉ.दाभोलकरांच्यासाठी सर्वात मोठी आदरांजली ठरू शकेल आणि आपण सर्वजण या भूमिकेशी सहमत आहात असा माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा मी डॉ.दाभोलकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.
डॉ. आ. ह. साळुंखे