Categories
कव्हर स्टोरी

गारपीटग्रस्तांसाठी ‘मानसमित्र’ नक्की काय करू शकतील?

मे - २०१४

विवेकसाथींनो,

अंनिसच्या द्विदशकपूर्ती मोहिमेच्या वर्षात पुढील दशकाचा कार्यक्रम म्हणून ‘मानसमित्र’ ही मोहीम आपण हाती घेतली. भावनिक अस्वस्थतेमुळे अंधश्रद्धा, बुवाबाजी व व्यसनाकडे झुकणार्‍या समाजमनाला विवेकी आणि शास्त्रीय भावनिक आधार व उपचाराकडे वळवणे हे ‘मानसमित्र’ मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट्य असल्याचे आपण तेव्हा ठरवले होते.

परंतु डॉक्टरांना आपल्यातून क्रूरपणे हिरावून नेणे व त्यानंतर जादूटोणाविरोधी कायद्याची लढाई या सर्वांमध्ये चाळीसगावचे डॉ. प्रदीप जोशींच्या नेतृत्वाखाली चालणारे केंद्र सोडले तर मानसमित्र मोहिमेला आपण म्हणावा तितका न्याय देऊ शकलो नव्हतो.

9 मार्चला आपण महाड येथून ‘जादूटोणा विरोधी कायदा जनसंवादाची प्रबोधनाची यात्रा’ सुरू केली आणि त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागामध्ये गारपीट आल्याच्या बातम्या धडकल्या. पुढच्या काही दिवसांमध्ये मराठवाडा व विदर्भामध्ये गारपीटीने झालेल्या प्रचंड हानीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. अत्यंत अवघड परिस्थितीमधून जाणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक व शेतीविषयक मदतीबरोबर नव्याने उभारी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भावनिक आधाराची गरज आहे हे स्पष्टच होते.

डॉक्टरांच्या अचानक जाण्यामुळे झालेले न भरून येणारे नुकसान व त्यामधून निर्माण होणार्‍या भावनिक अस्वस्थतेशी आपण सगळेच जण गेले आठ महिने झगडतो आहोत. त्यामुळे अनेक वर्षांनी पहिल्यांदा हातातोंडाशी आलेले पीक गारपीटीत नष्ट झाल्याने व त्या धक्क्याने जवळच्या व्यक्तीने जीवन संपवल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाच्या मनामध्ये होणारी भावनिक अस्वस्थता आपण अंनिसचे कार्यकर्ते चांगलेच जाणू शकतो. ह्या पार्श्वभूमीवर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या कुटुंबातील कर्ता मारला गेला असताना गारपीटग्रस्तांना आधार देण्यासाठी पुढे येणे हे अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या उन्नत सहवेदनेचे रूप दर्शवते.

गारपीटग्रस्त भागामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये आपण काय काम केले ह्याचा आढावा डॉ. प्रदीप पाटकरांच्या लेखामध्ये घेण्यात आलेलाच आहे. त्यामुळे ह्या लेखामध्ये अंनिसने संघटना म्हणून गारपीटग्रस्त भागामध्ये चालणार्‍या ‘मानसमित्र’ मोहिमेकडे काय नजरेने बघावे? गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या नक्की कशामुळे होत असतील? त्या टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? ह्याची आपण चर्चा करू या.

1. अंनिसने संघटना म्हणून गारपीटग्रस्त भागामध्ये चालणार्‍या ‘मानसमित्र’ मोहिमेकडे काय दृष्टिकोनाने बघावे?

कुठल्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीच्या कालखंडामध्ये समाजामधील भावनिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढत असते. ह्या आपत्तीला विवेकी भावनिक प्रतिसाद देण्याची समाजाची पद्धत नसेल तर त्यामधून अंधश्रद्धा, बुवाबाजीचे व व्यसनाचे मोठ्या प्रमाणात पीक येते. हे आपण लातूरच्या भूकंपानंतर केलेल्या कामामध्ये अनुभवले आहे. ह्याच अस्वस्थेमुळे बाधीत व्यक्तीकडून आत्महत्येसारखी टोकाची अविवेकी कृती होऊ शकते.

शेतीच्या पातळीवरचे जटील प्रश्न व त्यामागची आर्थिकता सोडवणे हे अंनिसच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची गोष्ट असली तरी अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मनातील विवेक जागा ठेवून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लोकांना बळ देण्याचा प्रयत्न करणे हे अंनिसच्या कार्यकर्त्यांचे महत्वाचे काम आहे असे वाटते. आणि अगदी हेच काम मानसमित्र मोहिमेच्या माध्यमातून गारपीटग्रस्त भागामध्ये आपण करतो आहोत. तसेच विवेकी पद्धतीने आयुष्याला सामोरे जाताना आपत्ती आली तरी अंधश्रद्धा, बुवाबाजी व व्यसनाला बळी न पडता सातत्यपूर्ण कष्ट करून व विचाराच्या सहाय्याने बाहेर पडता येते हा संदेश देखील आपण ह्या व्यक्तींना देणे आपले महत्वाचे काम ठरते. आत्महत्या हे कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नाही. आत्महत्या केल्याने आपण स्वत:ची सुटका करून घेतो पण आपल्या कुटुंबाचे प्रश्न अनेक पटीने वाढवतो. हा संदेश समाजमनापर्यंत पोहचवणे हे देखील महत्वाचे काम ठरू शकते. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील आपल्या कामामुळे महाराष्ट्रातील अनेक मनोविकारतज्ञ आपल्याशी जोडलेले आहेत व तळागाळामध्ये जाऊन ह्या व्यक्तींपर्यंत मदत पोहचवण्याची क्षमता असलेले महाराष्ट्रात दुसरे संघटन क्वचितच आहे हे देखील आपण समजून घेतले पाहिजे.

ह्या सगळ्याच्या पलिकडे जाऊन आपत्तीच्यावेळी आपल्या समाज बांधवांच्या पाठीशी आपण उभे राहतो आहोत. ह्यामुळे त्यांना तर धीर वाटतोच पण आपल्या आयुष्याला अर्थपूर्णता यायला पण मोठी मदत होते. श्री.विलासभाई शहा आणि अलुरे गुरूजींनी अंनिसच्या माध्यमातून ह्या कुटुंबांना केलेली आर्थिक मदत ही आपल्या कामाची समाजाने घेतलेली दखल ठरते व समाजामध्ये बदलाचा वाहक (change agent) म्हणून काम करण्याची आपली क्षमता देखील अधोरेखीत करते.

2) गारपीटग्रस्त भागातील आत्महत्या नक्की कशामुळे होत असतील?

हे समजून घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाच जास्त गारपीट होऊन देखील आत्महत्या न झालेल्या गावाची गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. ह्या गावातील द्राक्षाच्या बागांचा गारपीटीच्या आदल्या दिवशी सौदा झाला होता. छत्तीसगडच्या व्यापार्‍याने अडीच कोटींची रक्कम नक्की करून काही लाखांचा अ‍ॅडव्हान्स देखील शेतकर्‍यांना दिला होता. गारपीटीने एका रात्रीत व्यापारी व शेतकरी दोघेही आडवे झाले. दुसर्‍या दिवशी हा व्यापारी गावात आला व सर्व शेतकरी त्याच्या गळ्यात पडून रडले. त्या सगळ्यांनी मिळून ठरवले की हा हंगाम गेला तरी जिद्द हरायची नाही. पुढचा हंगाम दुप्पट जोमाने घ्यायचा आणि त्या गावात एकही आत्महत्या झाली नाही.

ह्यामधून आपण दोन महत्वाची सूत्रे समजू शकतो की योग्यवेळी भावनिक आधार व भविष्याविषयीची आशा न हरणे ह्या दोन गोष्टी आत्महत्या टाळण्यासाठी फार महत्वाच्या आहेत. ह्या दोन गोष्टी नसल्यानेच बहुतांश शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. आर्थिक विवंचना तर जवळ-जवळ सगळ्यांच्याच पाचवीला पुजली आहे. आपले मानसमित्र बरोबर ह्या दोन गोष्टी हवालदिल शेतकर्‍यांपर्यंत पोहचवू शकले तर उस्मानाबादमधील ह्या गावासारख्या अनेक गावांमधील आत्महत्या आपण रोखू शकू. भावनिक आधार न मिळणे व जीवनातील आशावाद गमावणे ह्या पलीकडे देखील आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असतात. त्यामधील काही कारणे जैविक (व्यक्तीमत्वातील रागीटपणा व उतावळेपणा) तर इतर कारणे सामाजिक (गरीबी, व्यसनाधीनता) अशी असतात. ही कारणे ओळखणे व गरज असलेल्या व्यक्तीला मनोविकारतज्ञांपर्यंत पोहचवणे ह्यासाठीच आपण मानसमित्रांचे प्रशिक्षण करतो व मनोविकारतज्ञांच्या देखरेखीखालील मानसमित्रांनी काम करावे असा आग्रह धरतो.

3. गारपीटग्रस्त भागामध्ये मानसमित्र नक्की काय करू शकतील?

ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्या गावांमध्ये भावनिक अस्वस्थतेची लक्षणे कशी ओळखावी व अशी लक्षणे दिसून आल्यास कोणाला संपर्क करावा ह्या पद्धतीची माहिती असलेली पत्रके व भावनिक प्रथमोपचारासंबंधीच्या पुस्तिका मोठ्या प्रमाणात वितरीत करणे हे मानसमित्रांचे एक महत्वाचे काम आहे. लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये ते आपण सुरू केले आहे. त्याचा फायदा देखील ह्या गावांमध्ये दिसून येत आहे. दुसरे महत्वाचे काम म्हणजे ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे, त्या कुटुंबाला भेट देणे व भावनिक आधार देणे. अशा पंचवीस पेक्षा अधिक कुटुंबाला आपल्या मानसमित्रांनी भेटी दिल्या असून त्यांना भावनिक आधार देण्याचे काम सुरू आहे. ह्या कुटुंबामध्ये कुणाला सौम्य मानसिक अस्वस्थ्य असेल तर त्या व्यक्तीला मनोविकार तज्ञांशी जोडून देणे, शिक्षणासंबंधी मदत करणार्‍या संस्थांशी जोडून देणे, भविष्याविषयी आशा वाटेल असा धीर देणे. अशा अनेक गोष्टी मानसमित्र करू शकतात व प्रत्यक्षात करत देखील आहेत. गारपीटग्रस्त गावामध्ये प्रबोधन कार्यक्रम घेऊन गारपीटीने जास्त नुकसान झालेल्या अथवा आत्महत्या झालेल्या कुटुंबाला गावातील इतर तुलनेने बर्‍या स्थितीतील लोकांनी आधार द्यावा. ह्यासाठी देखील मानसमित्र प्रयत्न करू शकतात व करत आहेत.

माध्यमांमधून केवळ आत्महत्येच्या घटनांचे वार्तांकन चालू असताना अवघड परिस्थितीशी सामना करत जगणार्‍या असंख्य लोकांच्या लढाईकडे माध्यमांचे लक्ष वेधून घेणे हे देखील मानसमित्रांचे महत्वाचे काम ठरू शकते.

गारपीटीने नुकसान झालेला भूभाग खूप मोठा आहे व शेतीचे प्रश्न सोडवायला खूपच जटील आहेत असे असले तरी गारपीटग्रस्त शेतकर्‍याला आत्महत्या हा पर्याय नव्हे हे समजावून सांगणे व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्या कुटुंबाला आधाराचा हात पुढे करणे, ह्या गोष्टी तरी मानसमित्र म्हणून आपण नक्कीच करू शकतो.

डॉ. हमीद दाभोलकर

लेखक संपर्क : 9823557531

गारपीटग्रस्त भागातील वैफल्यग्रस्तासाठी मानसमित्र म्हणून आपण काय करू शकतो?

आधार देणारे सोबतीचे आश्वासन पेपरमाध्यमाद्वारे वैफल्यग्रस्तापर्यंत पोचविणे. मेडिकल व मानसोपचाराबाबत फॉलोअप ठेवणे. पीडितांची शेती व घरी पंधरा दिवसातून एकदा मानसमित्र स्वयंसेवकांनी मदत करणे, निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था करणे, आठवड्यातून एकदा पीडित गावात मिटींग घेऊन नेहमी भेडसावणार्‍या समस्या निवारणाबाबत चर्चा व उपाय सुचविणे. भविष्यकाळात सामूहिक शेतीसाठी गावकर्‍यांना प्रोत्साहित करणे. आजारग्रस्त शेतकर्‍यांना 3 ते 6 महिन्यापर्यंत औषध पुरवठा करण्याची व्यवस्था पाहणे.