शाखेच्या रविवारच्या मिटिंगमध्ये वडाचीवाडीच्या सरपंचांचे पत्र ठेवण्यात आले. हे पत्र उपसरपंच अजित भोसले यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सातारा शाखेला सादर केले होते. पत्रात लिहिले होते… “देवऋषी आनंदराव लक्ष्मण पवार, ही व्यक्ती आमच्या गावात दर गुरूवारी दरबार भरवून देवऋषीपणा करते. भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडते. त्यासाठी ताईत, गंडे दोरे, मंतरलेले लिंबू, अंगार्याच्या पुड्या देऊन लोकांचे पैसे लुबाडत आहे. स्वत:कडे दैवी सामर्थ्य असल्याचा दावा करते. त्याद्वारे समस्या सोडविण्याचे ढोंग करते. आमच्या गावात लोकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण मोठ्या प्रमाणात चालू आहे.”
‘शासनाच्या तंटामुक्ती अभियानात आमचे गाव अग्रेसर आहे. या बाबतीत गावाचा नावलौकिक आहे. तंटामुक्ती अभियानात, अंधश्रद्धा निर्मूलन हा महत्वाचा विषय आहे. परंतु हा भोंदूबाबा गावात अंधश्रद्धा पसरवून तंटाबखेडा वाढवत आहे. ही बाब आमच्या गावीला हानिकारक आहे. या भोंदूबाबामुळे आमच्या गावात वादावादी, भांडणे, मारामारी होण्याची दाट शक्यता आहे. तरी या बाबाच्या विरूद्ध समितीने लक्ष घालून कारवाई करावी. ग्रामस्थांची अंधश्रद्धेच्या जोखडातून सुटका करावी ही विनंती.’
या बाबत शाखेच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली. दरबाराची संपूर्ण माहिती काढण्याची जबाबदारी संघटना सचिव भगवान रणदिवे यांनी घेतली. त्यांनी दरबाराला तीन वेळा भेट देऊन वास्तव समोर आणले. भोंदूबाबा मंत्रतंत्र वापरून दैवी उपचार करत असल्याचे निदर्शनास आले.
याच दरम्यान रहिमतपूर जवळील पिंपरी गावचे शंकर रामराव कणसे यांची बाबाबाबत वैयक्तिक तक्रार आली. शंकर कणसे यांना फिट येते. बाबांच्या भक्तांच्या सांगण्यावरून शंकर कणसे दरबारात जाऊ लागले. बाबांना त्यांनी आपली समस्या सांगितली. बाबांनी कणसे यांच्याकडे 5000 रू.ची मागणी केली. कणसे यांनी बाबांना 500 रू. अॅडव्हान्स दिला. दरबारात अनेक हेलपाटे घातले. बाबांच्या गंडेदोर्यांनी, अंगार्याधुपार्यांनी कणसेंची फिट काही कमी होईना. उरलेल्या पैशाचा तगादा मात्र वाढत गेला. आपली फसवणूक झाल्याचे कणसे यांच्या लक्षात आले. त्यांनी समितीकडे संपर्क साधला.
प्रशांत पोतदार आणि भगवान रणदिव्यांनी कणसे यांना बरोबर घेतले. वडाच्यावाडीचे ग्रामस्थ बरोबरच होतेच. कोरेगावातील अंनिस कार्यकर्ते महेंद्र डेरे आणि दिलीप वेलीयवेट्टील त्यांना येऊन मिळाले. पोलीस निरीक्षक श्रीरंग लंघे यांची भेट घेतली. त्यांना सविस्तर तक्रार दिली. लंघेसाहेबांनी पोलीस कर्मचार्यांना आदेश दिला. सहाय्यक पोलीस फौजदार नाना शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रतापराव साळुंखे, महिला पोलीस कोळी, बीट अंमलदार नागेश भरते यांच्याबरोबर पोलीस गाडीतून कार्यकर्ते वडाचीवाडी येथे पोहोचले. पोलिसांची गाडी बघताच भक्तासह बाबांची बोबडी वळली. काहीनी जागेवरून पळ काढला. अंमलदार नागेश भरतेंनी बाबाला बाहेर बोलावून घेतले. उसने अवसान आणून बाबा दंगा करू लागला. ‘सर्वांना बघतोच’ म्हणून दम देऊ लागला. सर्व भक्त अवाक् होऊन पाहू लागले.
भोंदूबाबा आनंदराव लक्ष्मण पवार म्हणजे साठ वर्षांचा, मजबूत बांध्याचा वृद्ध गृहस्थ. छातीवर रूळणारी पांढरीशुभ्र दाढी, खांद्यापर्यंत वाढलेले डोईचे केस, डोळ्याला चष्मा, कपाळावर भस्माचे आडवे पट्टे, त्याचप्रमाणे दंडावर, छातीवर काढलेले पांढरे शुभ्र आडवे पट्टे. गळ्यात रूद्राक्षाच्या अनेक माळा, बोटात अंगठ्या, कमरेला भगवे वस्त्र. भोंदूबाबा आणि त्यांची कन्या गाडीत बसली. गाडी कोरेगावच्या दिशेने सुसाट निघाली. रस्त्यात भोंदूची दमबाजी चालू होतीच. आता त्यात त्याच्या मुलीची भर पडली. मोबाईलवर स्थानिक राजकारण्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न चालू होता. वडाचीवाडीच्या गावकर्यांत एकजूट होती. बाबाने सरकारी जागेवर अतिक्रमण करून मजबूत झोपडे बांधले होते. त्या विषयी गावकर्यांनी, तहसीलदार, पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नव्हती. कारण बाबांच्या बाजूने अनेक शक्ती कार्यरत होत्या. त्या गावकर्यांचा प्रयत्न निष्प्रभ करत होत्या. परंतु यावेळी सतत मोबाईल करूनही कोणीही पोलीस स्टेशनकडे फिरकले नाही. याला कारण अंनिसचा दबदबा.
गुरूवार दि.12/5/2011 रोजी भोंदूबाबा आनंदराव लक्ष्मण पवार यांच्यावर अधिनियम आय.पी.सी. कलम 420 खाली एफ.आर.आय.क्र40/11 ने गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबाला अटक झाली. त्याची बातमी छायाचित्रासह अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. त्याला दुसर्या दिवशी शुक्रवारी कोरेगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कृ.ग.पालदेवार यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
तंटामुक्त अभियानात मुख्य विषय आहे, अंधश्रद्धा निर्मूलन या बाबतीत लोकांचे योग्यरित्या प्रबोधन झाल्यास, लोकांची बुवाबाजी विरोधी एकजूट होऊ शकते, पोलिसांच्या मदतीने हे विषारी मूळ तळातून उपटून काढून टाकता येते. हेच वडाचीवाडीच्या ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखविले.
– कुमार मंडपे