रविवार 3 फेबु्रवारीच्या दै.लोकसत्ताला हेडलाईन झळकली, “भूगर्भीय लहरींमुळे ‘एक्स्प्रेस-वे’ वर अपघात! ठराविक पट्ट्यातच दुर्घटना होत असल्याचा संशोधनाद्वारे दावा.” पुण्यातल्या एम.आय.टी.च्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख पिंपळीकर आणि सिंहगड अॅकॅडेमी ऑफ इंजिनियरिंगचे प्राचार्य खरात यांनी पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर होत असलेल्या अपघाताचं कारण म्हणजे ‘जिओपथिक स्ट्रेस’ असल्याचा जावईशोध लावला आहे. वेगाची हौस, चालकांची बेपर्वाई अशी भौतिक कारणं कमी आहेत की काय म्हणून अशी ‘दैवी’ कारणं शोधून काढणं हा निव्वळ आगाऊपणा आहे.
आहे तरी काय ही भानगड? ग्रीकमध्ये ‘जिओ’ म्हणजे पृथ्वी(भू) आणि ‘पॅथॉस’ म्हणजे बिघाड(विकार). तेव्हा जिओपथिक स्ट्रेस म्हणजे भूविकारजन्य ताण. या वरवर वैज्ञानिक वाटणार्या संकल्पनेमागचं गृहीतक काय, तर पृथ्वीचा भूगर्भ सगळीकडे सारखा नाही, त्यात जमिनीखालून जाणारे पाण्याचे प्रवाह, खाणींमधले बिघाड, खडकांचे स्तरभ्रंश, हिरव्या कुरणांची क्षेत्रं असे वेगवेगळे ऊर्जास्त्रोत(?) असतात, त्यातून ‘विशिष्ट’ लहरी किंवा तरंग बाहेर पडतात, ‘त्यांचं नेमकं स्वरूप माहीत नसलं(?)’ तरी त्यामुळे पृथ्वीच्या नैसर्गिक चुंबकीय क्षेत्रामध्ये ढवळाढवळ होते(?) आणि त्याचा माणसाच्या शरीरावर आणि इमारतींवरही परिणाम होतो. यात शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होण्यापासून ते एखाद्या जागेत गेल्यावर ‘अस्वस्थ’ वाटण्यापर्यंत अनेक परिणाम सांगितले आहेत. यातलं काय, कुठे, कधी, कुणी सिद्ध केलंय, याबद्दल मात्र अवाक्षर नाही. वर जे ‘ऊर्जास्त्रोत’ म्हणून सांगितले, त्यातून नेमकी कोणत्या प्रकारची ऊर्जा बाहेर पडते? चुंबकीय क्षेत्रावर या उर्जेचा परिणाम व्हायचा असेल तर निघणारे तरंग ही विद्युत-चुंबकीयच असावी लागतात. तशी ती असतील तर मग भूभौतिकीतज्ञांना(जिओफिजिसिस्ट) ती आजवर का सापडली नाहीत? क्षीण चुंबकीय क्षेत्राचा माणसाच्या शरीरावर बरा-वाईट परिणाम होतो याला आधार काय? बरं, हा ताण ओळखायचा कसा तर ‘डाऊझिंग’चं(‘यष्टीकौल’) तंत्र वापरून-जमिनीतलं पाणी शोधण्यासाठी झाडाची बेचकं असलेली फांदी वापरतात(अंनिवाच्या सूज्ञ वाचकांना याबाबतीत काही सांगायची आवश्यकता नसावी) त्याच पद्धतीनं किंवा लंबकाचा(पेन्ड्युलम) वापर करून. जी गोष्ट आपल्या सावध असणार्या बाह्यमनाला कळत नाही ती या साधनांमुळे अतिंद्रिय(!) शक्ती असलेल्या ठराविक लोकांनाच कळते असा जिओपथीक स्ट्रेसच्या समर्थकांचा दावा आहे. यातलं आणखी एक भल्याभल्यांना भुरळ पाडणारं नवं-ताजं ‘नॅनो’ तंत्र म्हणजे लेचर अॅन्टेना. शरीराभोवतीचं ‘ऊर्जाक्षेत्र’ मोजणार्या(?) या उपकरणाच्या वापरासाठी मात्र अतिंद्रिय शक्तीची गरज नाही, ते ज्योतिष, रेकी, प्राणिक हीलिंग, वास्तूशास्त्र, रत्नशास्त्र इत्यादी विविध क्षेत्रात काम करणार्या कोणालाही वापरता येतं, फक्त वैश्विक उर्जेवर श्रद्धा हवी!(एवढ्यावरूनच त्यामागचा भंपकपणा लक्षात यावा!)
गंमत म्हणजे याबाबत चिकित्सा करून या भ्रामक विज्ञानाची थेट भांडाफोड करणार्या वेबसाईट्स नाहीतच. उलट त्याची तळी उचलून धरणार्या वेबसाईट्सची कमतरताच नाही. चुंबकीय क्षेत्रातल्या असातत्यानं होणारे दुष्परिणाम, वास्तूदोष, एखाद्या घरातील रहिवाशांच्या भावनिक उद्रेकामुळे निर्माण होणारे अदृश्य ठसे, भुताटकी, या सगळ्याचे माणसाच्या आरोग्यावर होणारे परिणाम, अशा बिनबुडाच्या गोष्टींची चर्चा आणि त्यावर उपाय सुचवणार्या आणि उपचार करणार्या(?) केंद्रांची माहिती हेच जास्त आढळतं. याच भ्रामक विज्ञानाला भाळून पुण्यातल्या या संशोधकद्वयीनं हे खर्या प्रश्नांना बगल देत दिशाभूल करणारं ‘संशोधन’ केलं असावं.
या अभियंत्यांनी 93 कि.मी.लांबीच्या महामार्गावर कमी-अधिक तीव्रतेची 49 भूविकार तणावक्षेत्रं आहेत(दर दोन किमी मागे एक?) असं सांगितलं खरं, पण हे संशोधन करताना त्यांनी कोणत्या उपकरणाचा आधार घेतला हे स्पष्ट केलेलं नाही. हे ताण मोजण्याचं एकक कोणतं याबद्दलही काही उल्लेख नाही. थोडक्यात त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. वास्तुशास्त्रासारखाच हा भंपकपणा आहे. तरी बरं की वास्तुशास्त्रज्ञ जशी घराची तोडफोड, पाडापाड करायला सांगतात, तसा हा महामार्गच उखडून टाकायचा सल्ला त्यांनी दिलेला नाही.
क्षणभर असं गृहीत धरू की असा काही ताण असतोच, तरीही जगभरातले जिओपथिक स्ट्रेसचे समर्थक म्हणतात की, या ताणामुळे शरीरावर होणारे परिणाम लगेच होत नाहीत, तर सावकाश होतात, विशेषत: जुनाट आजार बळावतात(म्हणजे अर्थातच फारसं काही होत नाही). पण पिंपळीकर आणि खरात यांच्या मते शंभर-एकशेवीसच्या वेगानं जाणार्या वाहनाच्या चालकांवरही(फक्त?) त्याचा परिणाम होतो. हा परिणाम कसा होतो तर म्हणे भूविकारजन्य ताणलहरींचा चालकाच्या शरीरातील उर्जेशी मेळ बसत नाही! शरीरात्ली ऊर्जा म्हणजे काय, ती कशी मोजली, किती चालकांच्या बाबतीत हा प्रयोग झाला, त्यातील किती गाड्यांना अपघात झाला किंवा नाही झाला, याबद्दल काहीच विश्लेषण नाही. हृदयाचे ठोके कमी होतात, रक्तदाब आणि नाडीच्या ठोक्यांमध्ये फरक पडतो आणि त्याचा परिणाम मेंदूवर होतो, असं ते म्हणतात. हे मोजमाप कुणी, कधी आणि कसं केलं? त्यासाठी कोणतं उपकरण वापरलं? सर्वात जास्त(तथाकथित) तणावक्षेत्र असलेल्या भागात स्थिरपणे उभ्या असणार्या माणसांच्या शारीरिक क्रियांवर काही परिणाम होतो का, याचा तरी अभ्यास ‘बेसलाईन’ म्हणून केला का? यासाठी कोणत्या वैद्यकीय तज्ञाची मदत कशी घेतली, याबाबत या ‘संशोधना’त काहीही नाही. शिवाय वस्तुस्थिती अशी आहे की, वेगानं वाहन चालवताना काही प्रमाणात तरी चालकाच्या(आणि त्यामुळेच प्रवाशांच्याही)हृदयाचे ठोके आणि रक्तदाब दोन्ही वाढतात, कारण वाहन चालवताना कोणताही चालक थोड्या-फार प्रमाणात तरी ताणाखाली असतो. तेव्हा महामार्गांवरील वाढत्या अपघातांमागचं कारण वेगाच्या नशेपासून दारूच्या नशेपर्यंत वेगवेगळ्या किंवा एकत्रित कारणांनी चालकाच्या मनोव्यापारावर आलेले ताण-तणाव आहेत. त्यासाठी ‘भूविकारजन्य ताण’ यासारखे भ्रामक वैज्ञानिक सिद्धांत मांडण्याची काहीच गरज नाही.
– डॉ. आशुतोष मुळ्ये