Categories
कार्याध्यक्षांची डायरी

हिशोब त्रिदशकाचा, संघटित भविष्यवेधाचा

एप्रिल - २०१९

संवैधानिक लोकशाही प्रजासत्ताका’ची निवडणूक

अंधश्रद्धा निर्मूलन संघटित कार्याचा सलग 30 वर्षांच्या वर्धिष्णु वाटचालीचा वस्तुपाठ जगापुढे उभे करणार्‍या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून माझ्यात आनंद, अभिमान आणि समाधानाची भावना आहे. त्यात आता आपल्या संघटित कार्याच्या वाटचालीचे त्रिदशकपूर्ती वर्ष साजरे करायचे आपण ठरविले असताना, तर मी विविधांगी भावना, विचार व अनुभवांना सामोरे देखील जातो आहे. त्यामध्ये एका बाजूला वाढती मान्यता, अनुकुलता व मागणीचा ताण आहे, तर दुसर्‍या बाजूला दशक, दोन दशक कामातील सातत्यपूर्ण सहभाग व योगदानानंतर झालेल्या स्थैर्यामुळे, अनुभवायला येणार्‍या प्रस्थापितपणामुळे निर्माण होणारे काही ताण आहेत; परंतु त्याचबरोबर एका मोठ्या संघटनेतील सतत कृतिशील राहून, विचार-कार्य-दर्जा यांचा पोत वाढता ठेवण्याचे, कायम कामामुळे चर्चेत राहण्याचे, भान सांभाळण्याचे, अवसान राखण्याची जबाबदारीदेखील नेतृत्व म्हणून आहे. तसेच आजच्या जगातील अशा एकमेवाद्वितीय संघटित, वर्धिष्णू कार्याला समाजाप्रती उत्तरदायी ठेवण्यासाठी कालसुसंगत आणि भविष्य वेधासाठी तयार करायचे आव्हान देखील नेतृत्वापुढे आहे. अर्थात, हे सगळे ज्या अधिष्ठानावर उभे करता आले, त्या संघटना बांधणी यंत्रणेच्या प्रेरणेला, व्यवस्थापनेला देखील उचित न्याय देण्याची गरज आज नेतृत्वासमोर आहेच. हे मी याकरिता उल्लेखितो आहे. कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आता त्रिदशक पूर्तीच्या टप्प्यावर ‘कात’ टाकण्याची गरज मला जाणवते. ही कात टाकताना सर्व पूर्वसुरींचा आदर कायम ठेवून देखील त्यांच्या प्रामाण्याच्या प्रभावातून बाहेर पडण्याची आवश्यकता वाटते. त्याशिवाय आजची पिढी वर्तमानातील आणि भविष्यातील जगाकडे अधिक साक्षेपी नजरेतून बघू शकणार नाही. आजच्या पिढीला मागच्या पिढीच्या कुठल्याही स्वरुपाचे ओझे मानगुटीवर न घेता बदलत्या परिप्रेक्षामध्ये संघटना, विचार, कृती कार्यक्रमांची आखणी करावी लागणार आहे. कारण आव्हान वैचारिकतेचे नाही आव्हान संघटीत, नियोजनबद्ध व प्रभावी परिणामकारक कृती करण्याचे आहे आणि तेच करण्यामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी म्हणवणार्‍या चळवळी, संघटना, संस्था, व्यक्तींच्या मर्यादा तयार झालेल्या आहेत. कारण आपण जरी लोकशाही-समाजवाद-धर्मनिरपेक्षता-राष्ट्रवाद यासाठी प्रजासत्ताकतेच्या संवैधानिक चौकटीत समता-स्वातंत्र्य-बंधुता आणायची, असा दावा करीत असलो तरी आपल्या जीवनशैलीमध्ये, कार्यपद्धतीमध्ये आपण व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष म्हणून ही मूल्ये अंमलात आणू शकलो आहोत का? स्वयं मूल्यमापन करण्याची तातडीची, नितांत गरज आहे. प्रश्न विचारा, तपासा, चिकित्सा करा, याचा आग्रह धरणारे विवेकवादी असताना आपणच आपल्या संस्था, संघटनांमधील व्यक्तीकेंद्री, कुटुंबकेंद्री, ठराविक विचार कार्यपद्धतीकेंद्री आणि जात-धर्म-पंथ केंद्री गटबाजीच्या राजकारणाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागीदार नाहीत ना? हे तपासायची आवश्यकता आहे. कारण याविषयक अनुभव आणि त्यामुळे व्यापक परिवर्तनामधले अडथळे आपण इतिहासात अनुभवले आहेत आणि वर्तमानातही अनुभवतो आहोत. त्यामुळे पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळींची संघटना-संस्थांची स्थिती ‘बडा घर, पोकळ वासा’ अशी झाली आहे का? हे आत्मपरिक्षण आपल्याला करावे लागेल. त्यानंतर व त्यातून आपल्याला भविष्य वेधाचा दृष्टिकोन व धोरण-नीती-कार्यक्रम ठरविता येणे शक्य होणार आहे.

भविष्यवेध 2025

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढील टप्प्यावरील वाटचालीस आज कार्यरत असणार्‍या जुन्या-नव्या सहकार्‍यांमध्ये संघटना, विचार, धोरण व कृतीच्या बाबतीत किमान समसमान समज आणि दृष्टिकोनाची स्पष्टता असावी, असा आमचा प्रयत्न राहिला आहे. त्याशिवाय संघटना म्हणून सामुहिकपणे आपण वर्तमानातील आणि भविष्यातील संधी व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकणार नाही. त्यासाठी मागील तीन वर्षांत महाराष्ट्र अंनिस मधील राज्यस्तरावरील व जिल्हास्तरावरील कार्यरत कार्यकर्त्यांचा पदाधिकारी म्हणून क्षमता विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि त्याचे काही सकारात्मक परिणाम देखील साधले जाताना दिसत आहेत; परंतु तेवढेच पुरेसे नाही. त्यासोबतच आम्ही संघटना म्हणून सन 2025 पर्यंत कसे व कुठे असणार याचेदेखील काही आडाखे बांधणे आवश्यक आहे. त्यासाठीचा दृष्टिकोन व धोरणाची सविस्तर मांडणी आम्ही यापूर्वी वाचकांसमोर केलेली आहेच. त्या अनुषंगाने 2020, 2022 व 2025 या तीन टप्प्यांचे काही नियोजन महा. अंनिसच्या सर्व राज्यस्तरीय विभागांतर्गत केले जावे, असे उद्दिष्ट आम्ही ठरविले आहे. त्या दिशेने प्रयत्नपूर्वक कार्यरत राहिलो, तर मला आशा आहे की, आपण अधिक सक्षमतेने आपले संघटीत काम जगासमोर उभारू शकू. त्याची सुरुवात आपण महाराष्ट्र अंनिसच्या त्रिदशपूर्ती वर्षाच्या प्रारंभी विवेकवाद्यांची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि दोन दिवस संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई संघटनेच्या आयोजनाने करीत आहोत. त्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला 60 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने 1 ऑगस्ट 2019 ते 1 मे 2020 दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या पुरोगामीत्वामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याने दिलेला ‘खारीचा वाटा’ काय राहिला याचा जनसंवाद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट 2022 रोजी. त्यानिमित्ताने ‘स्वातंत्र संकल्पना आणि अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ याविषयक प्रबोधन राज्यात व देशातील काही राज्यांमधून घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या प्रजासत्ताक संवैधानिक व्यवस्थेला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस ‘भारतीय संविधान’ विषयक साक्षरता मोहीम अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहे.

संवैधानिक लोकशाही प्रजासत्ताकाची निवडणूक

भारताच्या सतरावी लोकसभा निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक माध्यमकर्त्यांनी हा ‘लोकशाहीचा उत्सव’ आहे, असा ठळक उल्लेख केला आहे, तर काहींनी हा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही व्यवस्थेच्या देशातील ‘लोकशाहीचा कुंभमेळा’ असेही उल्लेखिले आहे. त्यानिमित्ताने सुरू असलेल्या पक्षीय राजकारणाच्या संदोपसुंदीचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. त्यातून काहीसे मनोरंजन, राग, संताप, उद्वेग होत आहे; पण त्यामुळे भारतातील पक्षीय राजकारणातल्या, नेतृत्वाच्या दर्जाची आणि व्यवहाराची अनुभूती आपल्या सर्वांना येत आहे. त्यातून आपल्या संवैधानिक आणि लोकशाही, प्रजासत्ताक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या अतिशय प्राथमिक आकलनाची कीव करावीशी वाटते. त्यामध्ये सुरू असलेल्या बुद्धीभेदाचे, अस्मितेचे, प्रतिकांचे, धर्म-जात-पैशाचे आणि हिंसेचे व्यवहार कुठल्याही संवेदनशील जागरूक, जबाबदार नागरिकाला विषण्ण करणारे आहेत; परंतु आपल्याला यातून निराश न होता परिस्थितीला सामोरे जाण्याचे आणि त्यामध्ये यथाशक्ती बदलाचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. त्यासाठी आपला दृष्टिकोन विधायक व कृतिशील हस्तक्षेपाचा असणे आवश्यक आहे. संवैधानिक लोकशाही व्यवस्था ज्या चतु:स्तंभावर उभारलेली आहे, असे मानले जाते, त्यांच्या क्षमता, मर्यादा व परस्परावलंबता आपण देशाच्या सात दशकांच्या वाटचालीत अनुभवली आहे. देशापुढील अनेक आव्हानाच्या काळात त्यांची कसोटी लागलेली आहे. त्यातून तावून-सुलाखून आपण लोकशाही-प्रजासत्ताक व्यवस्थेचे बाल्यावस्थेतील आकलन करू शकलो आहोत. आता त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला लोकशाहीच्या चार स्तभांसह जनशक्तीचा, लोकशक्तीचा पाचवा आयाम सुसंघटीत व गतिमान करणे आवश्यक राहणार आहे. जसजशी आपली प्रजासत्ताक व्यवस्था प्रातिनिधीक लोकशाहीकडून जनसहभागी-लोकसहभागी लोकशाही व्यवस्थेकडे कार्यरत होत जाईल, तसतसे आपण संवैधानिकतेच्या बाल्यावस्थेकडून कुमार व युवावस्थेकडे वाटचाल सुरू केली, असे म्हणता येईल. 2020 दशकात आपण जगातील सर्वांत जास्त युवा शक्ती असणारा देश राहणार आहोत. त्या शक्यतेचे आपण संधीत कसे रूपांतर करू शकू, यावर आपले उज्ज्वल, सर्वांगीण, चिरंतन विकासाचे स्वप्न अवलंबून राहणार आहे. त्यासाठी आपण सर्व भारतीय नागरिक कटिबद्ध होऊ या! होऊ घातलेल्या सतराव्या लोकसभा. निवडणूकीत विवेकपूर्ण मतदानासाठी सक्रीय सहभागी होऊ या! भारताच्या संवैधानिक लोकशाही प्रजासत्ताकाला सक्षम करूया!

विवेकाचा आवाज बुलंद करूया!

– अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष, मअंनिस

संपर्क ः 9422790610, 8975130609

ई-मेल ः avinashpatilmans@gmail.com

avinashpatilmans2025@gmail.com