जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रबोधन व प्रभावी अंमलबजावणीमुळे शोषित कुटुंबांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. अनेक भोंदू लोकांनी काळेधंदे बंद केल्याची माहिती मिळत असतांना अनेक तक्रारीही महाराष्ट्र अंनिसकडे येत आहेत. अंनिस, समविचारी संघटना व प्रशासनाच्या मदतीने गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. आजपर्यंत(14 जून पर्यंत) नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या सत्तरच्यावर गेली आहे. त्यातील बाकी घटनांचा आढावा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज याच्यावर येरमाळा पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. कार्यकर्तेप्रदीप पाटील खंडापूरकर व शिवाजी गिट्टरे यांनी 23 मे रोजी कळंब तहसीलदार कार्यालयासमोर सदर भोंदूबाबाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण केले होते. जिल्हाधिकार्यांनी त्याची दखल घेऊन तहसीलदार वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. लोमटे महाराज हा चमत्काराचा दावा करून भक्तांची फसवणूक करत असल्याचे समितीस आढळून आले. त्यावरून मंडल अधिकारी भारत एकनाथ ओव्हाळ यांनी गुन्हा दाखल केला.
काळ्या हळदीच्या मदतीने पैशाचा पाऊस पाडतो व कोट्याधीश बनवितो असा दावा माटुंगा येथील वास्तुशास्त्र तज्ञ मोहीत परब याने केला. इंजिनिअर असलेल्या निशांत कपाडिया यांच्याकडून त्याने त्यासाठी वेळोवेळी 54 लाख रूपये उकळले. कपाडिया यास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपीने मूठ, करणी व भानामती करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या जिभेच्या उलट्या बाजूस असलेल्या तिळामुळे त्याने सांगितलेले सर्व खरे होते अशी धमकीही देण्यात आली होती. अंनिसचे कार्यकर्तेनितीन वरळीकर यांच्या पाठपुराव्याने माटुंगा पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. शीव येथे राहणार्या सुलक्षणा केणी ह्या महिलेची अशीच नऊ लाख रूपयांची फसवणूक आरोपीने केली होती.
अपत्यप्राप्तीसाठी पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेस सलग 48 दिवस डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करणार्या भोंदूबाबास साकोली(जि.भंडारा) पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा आधार घेत अटक केली. दि.14 फेबु्रवारी रोजी सदर महिलेच्या पतीने तिला भोंदू सुरेश सखाराम मेश्राम उर्फ वसंता सुखदास हुमणे ह्याच्याकडे सोडले. पूजाविधीच्या नावाखाली तिला स्वत:कडे ठेवून घेतले. महिलेने स्वत:ची सुटका नातेवाईकांमार्फत करून पोलीस ठाणे गाठले. तिच्या पतीलाही पोलिसांनी अटक केली होती.
एखादी महिला करणी करते असं जाहीर करून तिला डाकीण ठरवत तिला बहिष्कृत करण्याच्या चार घटना एका महिन्यात नाशिक जिल्ह्यात घडल्या. पैकी दोन घटनांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचा आधार घेऊन गुन्हा नोंदविला. सटाणा येथील आक्काबाई मधुकर वाघ ही महिला करणी करते असे मांत्रिकाने सांगितल्यामुळे राजेंद्र सुकडू जाधव व अन्य सात आरोपींनी मारहाण केली. सटाणा पोलिसांनी नाशिक अंनिसच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा नोंदवत मांत्रिकासह अन्य आरोपीस अटक केली. गावात होणार्या मृत्यूस वयोवृद्ध महिला जबाबदार आहे असं अंगात आल्यावर मांत्रिकाने सांगितल्याची घटना वावी(सिन्नर) येथे घडली. मोबाईलवरचे हे संभाषण गावभर पसरल्याने वयोवृद्ध महिलेस मारहाण करत तिच्या सामाजिक जीवनावर बहिष्कार टाकण्यात आला. अंनिसच्या कार्यकर्त्या अॅड.रंजना गवांदे व दिलीप गोसावी यांच्या पाठपुराव्यामुळे मांत्रिक नवनाथ खैरनारसह इतर सहा व्यक्तींवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आजारी असलेल्या सुनेला सासूसासर्यांनी एका भगताकडे नेले. तिला भूत लागल्याचे सांगत भगताने लाकडी दंडुक्याने महिलेस अमानुष मारहाण केली. जखमी अवस्थेतील महिलेने मोठ्या हिंमतीने पळ काढत लासलगाव(जि.नाशिक) पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मांत्रिक गुलाब भिकाजी शिंदेसह सासू सासर्यांवर गुन्हा नोंदवत अटक केली. या व्यतिरिक्त मानवी विष्ठा कोंबण्याच्या घटनेचा व देवळा येथील एका महिलेस डाकीण ठरवून तिला बहिष्कृत करण्याच्या घटनांचा अभ्यास अंनिस नाशिक करत आहे.
टी.व्ही.सिरीयलमधील एका नायिकेला म्हाडाच्या लॉटरीत घर मिळविण्यासाठी तंत्रविद्येच्या बहाण्याने बलात्कार करणार्या मांत्रिकास चारकोप(कांदिवली) पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केला. इस्माईल खान(बंगालीबाबा) याने अघोरी पुजेसाठी महिलेकडून विश्वास संपादन करून 25 लाख रूपये उकळविले होते. पुजाविधी करत असतांना तिच्यावर बलात्कार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरून सदर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
दूरचित्रवाणीवर अमिताभ बच्चन हे कॉम्प्लेन पावडरची जाहिरात करतात. पावडर पिणार्या व्यक्तीच्या शरीरात भुतासारखी व्यक्ती संचारते असे जाहिरातीत दाखविण्यात आले आहे. पुण्यातील राजेंद्र सोनार यांनी तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयामुळे तक्रारकर्त्यास दिलासा मिळाला. अभिताभ बच्चनसह इमेज इंडस्ट्रीज प्रा.लि.हेन्स इंडिया प्रा.लि.चे महाव्यवस्थापक अभिषेक प्रसाद, कार्यकारी संचालक सीमा मोदी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.
अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधाला भूत लागले असे म्हणून भूत उतरविण्याच्या बहाण्याने अघोरी मारहाण करत बलात्कार करणार्या मांत्रिकाला गुट्टीखदान(नागपूर) पोलिसांनी अटक करत गुन्हा नोंदविला. सोमनाथ नथुजी गवई या मांत्रिकाने मुलीच्या अंगावर गरम चटके दिले. त्यानंतर दिलेले तीर्थ पिल्यावर गुंगी आल्याचे पाहून मांत्रिकाने तिच्यावर बलात्कार केला. असाच प्रकार विक्रोळी(मुंबई) येथे घडला. करणी उतरविण्याच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार करत पूजाविधीसाठी 80 हजार रूपये लुबाडणार्या गणेश भांगरे या मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे नागनाथ मंदिराचा पुजारी दादा शिवपुजे याने एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरोरा (जि.चंद्रपूर) येथे सर्पदंशामुळे झालेली विषबाधा ही जादूटोणा केल्यामुळेच असून गावातील एका व्यक्तीचे नाव जाहीर करत तिचे जीवन त्रासदायक केल्यामुळे मांत्रिक शंकर दडमल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच प्रकारची घटना खामपुरा (जि.गोंदिया) येथे घडली. जादूटोणा करतो या संशयावरून प्रकाश पारधी याची हत्या करण्यात आली. तसेच संपूर्ण गावास जाळून टाकण्याची धमकी मांत्रिकाने दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवली(ठाणे) येथील पेट्रोल पंपावर काम करणार्या कृपाशंकर मिश्रा याने आजारपणावरील उपचारापोटी शेख बंगालीबाबास दहा हजार रूपये दिले. परंतु त्यांची फसवणूक झाल्याचे समजताच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन बंगालीबाबाचा पर्दाफाश करत गुन्हा नोंदविला.
चिखली (जि.बुलढाणा) येथील नागनाथ महाराज संस्थानचा भोंदूबाबा हरिदास बळकर उर्फ नागराज बाबा हा चमत्काराचा दावा करून भक्तांची आर्थिक फसवणूक करत होता. अभा.अंनिसचे कार्यकर्तेप्रतिभा भुतेकर व दत्ता देशमुख यांनी त्याचा भांडाफोड करत गुन्हा नोंदविला.
या नोंद झालेल्या गुन्ह्याव्यतिरिक्त काही तक्रारींमध्ये पोलीस तपास करत आहेत. वाडा (जि.ठाणे) येथील शामला भुजड ह्या महिलेच्या आजारपणास व मुलाच्या मृत्यूस लडकु वरठा हा व्यक्ती जबाबदार आहे असे मांत्रिकाने सांगितल्यामुळे लडकू वरठाची हत्या करण्यात आली. पोलीस निरीक्षक हजार अधिक तपास करत आहेत. हरसूल (जि.नाशिक) येथील बेपत्ता रेखा राऊत हीचा मृतदेह घाटात कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्या शेजारी पुजेचे साहित्य आढळून आल्यामुळे हा नरबळी आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. बोरिवली (मुंबई) येथील मांत्रिक गुरट्या दासरी याने पहाटे आरती करून तक्कु शिंदे याची तलवारीने हत्या केली. मांत्रिकास गुरट्याचे रक्त प्यायचे होते असं स्थानिकांच्या बोलण्यातून समजते. मालेगाव (जि.नाशिक) येथे तहेसिना शेख जामिल ह्या पाच वर्षीय मुलीचा शनी अमावास्येच्या रात्री संशयास्पद खून करण्यात आला. जादूटोणा व काळी विद्येची पुस्तके सापडल्यामुळे नरबळीचा तपास पोलीस करत आहेत. यापूर्वीच दिवाळीच्या आमावास्येला सोरेगाव (जि.सोलापूर) येथील निखील जानकर ह्या मुलाचा शेजारच्या निपुत्रीक माणसाने घेतलेला बळी व यवतमाळच्या गौरी गिरी ह्या बालिकेच्या संशयास्पद नरबळीचा शोध अजूनही लागला नाही.
कायद्याच्या प्रबोधनामुळे अनेक ठिकाणच्या अघोरी प्रथा बंद झाल्या आहेत. जांभुळणी (जि.सांगली) येथील यात्रेतील नवसापोटी होणारी पशुहत्या, कोटमगाव (जि.नाशिक) येथील देवीसमोर नवसापोटी महिलांनी उलटे टांगून घेण्याची प्रथा, सवंत्सर-कोकमठाण(अहमदनगर) येथील गोफणधोंडा युद्ध खेळण्याची मध्ययुगीन अघोरी प्रथा, सर्पदंशांनंतर रूग्णास मंदिरात ठेवण्याची सिन्नर तालुक्यातील प्रथा अशा अनेक ठिकाणी अघोरी प्रथा बंद झाल्या आहेत.
–कृष्णा चांदगुडे
मोबा.नं.9822630378