Categories
बालविभाग

 जगाच्या पाठीवर

वार्षिकांक – २०११

मिरीं-प्रसादाची

            तुमच्या दैवताला तुम्ही गुलाब, मोगरा, झेंडू किंवा जास्वंदीची फुले वाहात असाल ना? तुम्ही मिरींदाणे देखील वाहू शकता. होय तिखट मिरी! उत्तर केरळमधल्या कोंडुगल्लूरमध्ये भद्रकाली किंवा दुर्गेचे मंदिर आहे. तिथल्या इतर वस्तूंबरोबर मिरींही वाहिली जातात. काली म्हणजे काळा, मिर्‍याचा रंग! देवीला आजार येऊन नये म्हणून या देवतेची उपासना करतात.


केशदान

            तुम्ही कधी तिरूपतीला गेला आहात? या तीर्थक्षेत्रांत तुम्हाला एक आगळे दृश्य दिसते. डोेक्यावरचे केस कापून अगदी तुळतळीत गोटा केलेली असंख्य डोकी इथे दिसतात. हे पाहून नवखा माणूस बुचकळ्यात पडतो. पण जरा चौकशी केली तर हे सर्व स्त्रीपुरूष व लहान मुले ही भक्त मंडळी आहेत हे समजते. आंध्रप्रदेश व तामिळनाडूमधून मोठ्या संख्येने येणारी मंडळी आपले केस वेंकटेश्वराला आनंदाने अर्पण करतात. अनेक बालकांचे पहिले जावळ तिरूपतीला किंवा दुसर्‍या एखाद्या तीर्थक्षेत्रांत जाऊन करण्याची तामिळनाडूमध्ये प्रथा आहे. आता देवाला हे केस कशासाठी द्यायचे? हा कसला आचरट त्याग?


स्त्री-हमाल

            गुजरातेंतल्या भावनगर संस्थानातल्या राजवाड्यात अनेक पुरूष सेवक नोकरीला होते. जेव्हा या संस्थानात रेल्वे सुरू झाली, आणि भावनगर स्टेशन तयार झाले, त्यावेळेला तिथे स्त्रिया हमाल म्हणून नेमल्या जाव्यात असा फतवा काढण्यात आला होता. अजूनही स्त्री-हमाल असणारे भारतांतले हे एकमेव स्टेशन आहे.


कासवांचे घर

            ईशान्य भारतांतल्या मिझोराम राज्यांत ख्रिश्चन धर्माचे नागरिक जास्त आहेत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म या राज्यांत नुकताच येत होता. ही शताब्दी ख्रिश्चन धर्मियांनी मोठ्या धामधुमीत आणि भव्य प्रमाणात साजरी केली. एका मोठ्या ढोलाच्या तालावर त्यांनी गाणी गायली आणि नृत्य केले. हा ढोल मिझोराममधल्या एका प्रचंड मोठ्या झाडाच्या बुंध्यातून तासून तयार केलेला होता. हा बुंधा जेव्हा कापला, तेव्हा तो आतून पोकळ होता. त्यात दहा कासवे राहात होती. त्या झाडाच्या खोडांत ती कासवे किती वर्षे राहात असावीत?


नाकाला लावायचा नाही हं!

            हा रूमाल आगळा आहे. तो हातात घेतलात की त्यांने नाक पुसायची कल्पनादेखील तुमच्या मनात येणार नाही, किंवा हाताची बोटे साफ करायला तुम्ही हा रूमाल वापरणार नाही. कारण हा आहे चंबा रूमाल, सुंदर भरतकामाचा एक अप्रतिम नमुना-हिमाचल प्रदेशांतलल्या चंबा या गावावरून हे नाव पडले आहे.

            राजघराण्यांतल्या व इतर श्रीमंत स्त्रिया या विशिष्ट भरतकलेत अतिशय निपुण होत्या. भरगच्च भरतकाम केलेला हा चौकोनी चंबा रूमाल 18 व्या व 19 व्या शतकात फार लोकप्रिय ठरला. या काळात, अनेक चित्रकार मुघल साम्राज्यातून निघून चंबा, कांग्र व बशोली या हिमाचल प्रदेशांतल्या भागात स्थायिक झाले. सधन घरांतल्या स्त्रिया या चित्रकारांकडून रूमालावर चित्रें काढून घेत व रेशमाच्या लड्यांनी त्यावर किचकट, सुरेख भरतकाम करीत असत.

            या चित्रात महाभारतातील युद्धाचे देवाखे, कृष्ण व गोपी, श्रीगणेश व त्याच्या ऋद्धीसिद्धी या दोन पत्नी, असे विषय असत. सोळाव्या शतकात गुरूनानक यांची भगिनी बिबी नानकी हिने भरलेला एक रूमाल हा सर्वात जुना रूमाल पंजाबमधल्या होशियारपूर जिल्ह्यांतल्या वस्तुसंग्रहालयांत जपून ठेवलेला आहे.


कबुतरांची डाक

            आपण संदेश कसे धाडतो? सहजच प्रत्येकजण टपाल, फोन, फॅक्स, 3-मेल, तारा, व्हॉईस-मेल व इतर अत्याधुनिक नवी यंत्रे यांचा विचार करतो. पूर्वी कबुतरांना संदेश पाठवण्यासाठी खास प्रशिक्षण देऊन तयार केले जात होते, हे आपल्याला माहिती आहेच. हीच पद्धत आता मोडीत निघाली आहे, असं तुम्हाला वाटतं का? छे, तसं मुळीच नाही.

            ओरिसामधल्या कटक या शहरात पोलिस खात्याकडे एक हजार पाळीव कबुतरे आहेत. इतर पोलीस स्टेशनांकडे संदेश धाडण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात येतो. डोंगराळ प्रदेशात ही पद्धत उपयोगी ठरते. कबुतरांच्या पायाला एक छोटीशी कुपी बांधलेली असते. त्यात संदेशाचा मजकूर असतो. ही कबुतरे संदेश घेऊन जातात व त्याचे उत्तर त्याच दिवशी परत घेऊन येतात!


रूपैया

            रूपया हे भारताचे नाणे. हे नाव कसे पडले हे तुम्हाला ठाऊक आहे का? बाबरपासून बहादुरशाह जफरपर्यंत मोंगल सम्राटांनी जरी हिंदुस्थानवर राज्य केले होते, तरी मधली पंधरा वर्षे मोंगल राज्यकर्ते नव्हते. दिल्लीचा सुलतान शेर शाहा सुरी याने हुमायून पदच्युत करून हद्दपार केले होते. सुलतानाला हा विजय जाहीर करण्यासाठी आपल्या नावाची नाणी पाडायची होती. 1542 मध्ये 178 ग्रॅम वजनाच्या चांदीचे नाणे टांकसाळींत पाडण्यात आले. शेरशाहा सूरीने जेव्हा हे नाणे पाहिले तेव्हा तो आनंदाने उद्गारला, ‘रूपाईया!’ त्या शब्दाचा अर्थ होता ‘सुंदर’, पण ते नाव तेव्हांपासून त्या नाण्याशी जोडले गेले.


झुलते मनोरे

            इटलीमधला झुलणारा टॉवर ऑफ पिसा हे जगातले एक आश्चर्य मानले जाते. अहमदाबादमध्ये अहमदशाहने 1454 मध्ये बिबीकी मसजिद बांधली. तिच्या दोन मनोर्‍यांमध्ये या शहराला आगळीच प्रसिद्धी मिळाली. कारण ते हलतात. त्या मनोर्‍याला टेकून जरासा धक्का दिला तर तो हलतो. हे मनोरे भव्य आहेत, सुंदर आहेत आणि ते कां व कसे हलतात ते कुणालाच सांगता येत नाही. 2001 सालच्या भयानक भूकंपात हे मनोरे नादुरूस्त झाले. सुदैवाने ते पडून उद्ध्वस्त झाले नाहीत. भारताच्या सरकारी सर्वेक्षण खात्यातर्फे त्यांची दुरूस्ती होण्याची शक्यता आहे.


परवान्याची सूट

            बंदुकीची हत्यारे बाळगण्यासाठी देशात सर्वत्र परवाना लागतो. फक्त कूर्ग सोडून! कोणे एके काळी, कूर्गला कोडगु म्हणत आणि हे एक स्वतंत्र राज्य होते. ह्या लढवय्या जमातीला ब्रिटीश राज्यकर्तेदेखील घाबरून असत, म्हणून त्यांनी या लोकांना परवान्याखेरीज हत्यारे बाळगण्याची मुभा दिली. आता कूर्ग जरी कर्नाटकात सामील असले तरी कुर्गी लोक या सवलतीचा फायदा अवश्य घेतात. भारताचे पहिले सरसेनापती जनरल करिअप्पा व जनरल थिमय्या हे कूर्गचे रहिवासी होते.


जागतिक विक्रम

            भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांच्या नेतृतत्वाखाली निघालेली दांडीयात्रा हा एक महत्वाचा टप्पा आहे. हा एक जागतिक विक्रमदेखील आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जगातली ही सर्वात मोठी 25 दिवस चाललेली नागरी कायदेभंगाची चळवळ आहे. गांधीजी व त्यांचे 78 सहकारी यांनी साबरमतीपासून दांडीपर्यंतचे 388 किलोमीटरचे अंतर 1930 मध्ये 12 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत पायी चालत पार केले.