Categories
नाट्य-चित्र परिक्षण

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, अभंगाचे पान : तुकाराम चित्रपटावर एक भाष्य

ऑगस्ट - २०१२

            चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुकाराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटावर किंवा चित्रपटाच्या विषयाला अनुषंगून बरीच चर्चा माध्यमांमधून होईल अशी एक साधारण अपेक्षा मी बाळगली होती. कारण ‘तुकाराम’ पडद्यावर जिवंत करणे ही फारच नॉर्मल गोष्ट आहे पण तुकारामाच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाला दूर सारून संत-कवी-विद्रोही तुकाराम साकारणे ही मात्र आव्हानाची गोष्ट होती. लेखक प्रशांत दळवी यांनी ती योग्य पद्धतीने रेखाटली, चंद्रकांत कुलकर्णी यांनी ती दिग्दर्शित केली व जितेंद्र जोशी यांनी अविष्कृत केली. ‘तुकाराम’ नावाचे वादळच जणू यांनी समर्थपणे पेलले आहे. त्याबद्दल खरेतर त्यांचे अभिनंदनच करायला हवे.

            ‘तुकाराम’ यांच्याबद्दल आपण कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर तो हमखास ‘इंद्रायणीतून गाथा वर आलेल्या’ व ‘तुकारामच्या सदेह वैकुंठ गमनावर’ आपल्याला रंगवून सांगतो. याला कारण अगोदर चित्रपटातून, लेखकांच्या लेखनातून, किर्तनातून मग अगदी गणपती उत्सवात साकारल्या जाणार्‍या देखाव्यातूनही अशा घटनांना खतपाणी घातलं गेलं. स्पष्टच सांगायचं तर बहुजनांच्या या विद्रोही नायकाचं उदात्तीकरण करून त्याला चमत्कारिक पुरूष करून टाकण्यात आलं. एकूणच समाजात तुकारामांविषयी चमत्कारिक पुरूष, टाळकुट्या, निष्क्रिय, भोळाभाबडा वारकरी अशी प्रतिमा उभी करून त्याखाली तुकारामांच्या समाजक्रांतीच्या विचारांचे मढे पुरले गेले. त्यामुळे जनमाणसांचा तुकाराम हा केवळ दगडमातीचा चमत्कारीक संत म्हणून समाजात रूजवला गेला. तुकारामांच्या क्रांतीकारी विचारांचे उत्खनन व पुर्नरूज्जीवन डॉ.आ.ह.साळुंखे सर तसेच कॉ.शरद पाटील यांनी केले. आणि आता मर्यादित अर्थाने चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले.

            चित्रपटाला नाव देखील खूप समर्पक आहे फक्त ‘तुकाराम’. संत, कवी, जगद्गुरू अशा उपाधी न लावता त्यांच्या माणूस म्हणून घडण्याच्या धारणा चित्रपटातून उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘तुकाराम’ हे नाव किती आपल्यातलं वाटतं. आपलं वाटतं. ‘तुकाराम’ असा शब्द जरी उच्चारला तरी बुद्धाच्या हृदयातील अमर्याद करूणा सामावून घेते. तर दुसर्‍या बाजूला ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातला ज्वालाग्राही तळपता सूर्य अंधाराला भेदताना दिसतो. एकूणच ‘तुकाराम’ हे टायटल समाजाने घडवलेला, घडलेला ‘तुकाराम’ असे निर्देशित करते. टायटल ‘तुकाराम’ ही जगण्याची, घडण्याची, लढण्याची एक न संपणारी प्रक्रिया आहे हे दाखवून देते.

            गण्या, मण्या, तुका…. अशा गीतामधून तुकारामांचे बालपण उगलगडत जाते. लहानपणापासून असलेली त्यांची दुसर्‍यांच्या दु:खांना आपले समजण्याची संवेदनशीलता प्रकर्षाने दिसते मग ती गरीब मित्राला ‘चांदीचं सालकड’ देण्याची असो अथवा आई ‘मर मेल्या’ म्हटल्यानंतर स्वत:ला गाडून घेण्याचा प्रयत्न असो. दु:ख निवारण्याचे सर्वच मार्ग बाल तुकाराम समाजातील दु:ख पाहूनच शिकतो. तुकारामांचे मोठे बंधू सावजी यांच्या चिंतनाचा असलेला प्रभाव तुकारामांवर शेवटपर्यंत दाखवला आहे. ‘लोकांच्या वस्तू आपल्याकडे गहाण पडल्या आहेत म्हणून आपल्याला वाटतं आपण श्रीमंत झालो, पण खरंतर आपलीच पोटं त्यांच्याकडे गहाण पडली आहेत’ सावजींच्या विधानाने व्यथित होणारा बालतुकाराम. आणि चंद्रभागेतिरी भेटलेला सावजी जेव्हा तुकारामांना म्हणतो की; ‘जे शोधण्यासाठी मी घराबाहेर पडलो ते मला भरपूर शोधूनही सापडले नाही, मी आत शोधायला हवे होते का?’ या सर्वच संवादातून सावजीच्या चिंतनाचा तुकारामांवर किती गहन प्रभाव होता हे दिसून येते. दुष्काळात ‘माणुसकी’ मेल्याचा अनुभव तुकारामांना आल्यानंतर शाश्वत मूल्यांचा शोध घेताना आपल्या हिश्यांची असलेली सावकारीची कागदपत्रे इंद्रायणीत तुकाराम बुडवून टाकतात. हीअत्यंत क्रांतीकारक घटना चित्रपटात दाखवली गेली. तुकारामांचा वर्गअंताच्या दिशेने चालू झालेला प्रवास या घटनेतून साकारला आहे. ही कागदपत्रे बुडवताना पहाटेचा प्रसंग निवडला आहे हे फारच सूचकरित्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडले आहे. सावकारकी तुकारामांनी सोडून शेती करायला सुरवात केली. हा वर्गबदलाचा राजकीय संकेत ठळकपणे समोर येतो. भयाण दुष्काळ तुकारामांना खर्‍या अर्थाने नैतिकदृष्ट्या उन्नत आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ बनवतो हे चित्रपटातील धान्याची कोठारे उघडी केल्यानंतर उसळलेली गर्दी ही त्यातील ‘माणसांचे जनावर होणे’ या प्रसंगातून दाखवले आहे. एवढ्या भयाण दुष्काळातही एक नाजूक हिरवे रोपटे तुकारामांच्या नव्या वाटचालीचा संकेत  देते. चित्रपट मध्यंतरापर्यंत तुकारामांचे सामाजिक होण्याच्या दिशेने असलेल्या चिंतनाचा, प्रसंगाचा भाग दर्शवितो.

            मध्यंतरानंतर ‘तुकाराम’ हा जनमाणसांचा ‘तुकाराम’ म्हणून समोर आणला आहे. ‘मृत्यू’ हे अंतिम सत्य आहे हे कळलेल्या तुकारामांचा प्रवास हा समाजातील दु:ख निवारणाच्या दिशेने सुरू होतो. किर्तनाच्या माध्यमातून तुकारामांचा जनोपदेश चालू असताना चिंचवडच्या मंबाजीबुवाचे देहूतले आगमन आणि त्याचा डामडौल आजच्या आधुनिक बुवाबाजीचे स्मरण करून देतो. परमार्थसाधन, साधी राहणी, भूतदया अशा चिरंतन टिकणार्‍या मूल्यांवर तुकाराम भाष्य करीत असताना मुंबाजी बुवा आणि तुकाराम यांच्यातील संघर्षही महत्वाचा ठरतो. धंदेवाईक ब्राह्मणी व्यवस्था आणि शोषितांच्या मुक्तीचा अभंग गाणारा तुकाराम असाच हा संघर्ष रंगवला आहे. ‘वेदांचाच अर्थ आम्हासीच ठावा गबाळांनी वहावा व्यर्थ भार माया’ अशा अभंगातून संघर्ष रंगून जातो. धर्मपीठासमोरदेखील ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देणारे तुकाराम हे खर्‍या अर्थाने विद्रोही परंपरेतले बहुजन नायक शोभून दिसतात. जाती व्यवस्थेवरील तुकारामांचे भाष्यही चित्रपटातून विविध अभंगातून समोर येते. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगांचा वापर खूपच समर्पक व योग्य ठिकाणी केलेला दिसतो. तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढणार्‍या ब्राह्मणी व्यवस्थेला देखील तुकाराम ठणकावून सांगतो.

            ‘मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास। कठीण वज्रासी भेदू ऐसे। भले तरी देवू गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।‘

            समाजातील विषमतेविरोधात संतापून तुकाराम देवाच्या परखड चिकित्सेपर्यंत येऊन पोहोचतात तेव्हा ‘माझ्या लेखी देव मेला। असेल त्याला असेल।’ असे तुकारामांचा अभंग जेव्हा आपण ऐकतो. तेव्हा मात्र खरंच दिग्दर्शकाला धन्यवादच द्यावे लागतात.

            तुकारामांचा ‘आपलाच वाद आपणांसी’ दाखवायलाही दिग्दर्शक विसरले नाहीत. बहिणाबाईंना स्वत:च्या प्रकाशात मार्ग शोधण्याचा सल्ला देणे असो, अवलेच्या दु:खाला स्वत:च्या काळजाच्या कोनाड्यात जागा देऊन तिची व्यथा मांडून ‘मी दु:खाच्या बाजूचा’ म्हणणे असो, की तेली मित्राला अनुभवांची सत्यता समजावून सांगणे असो. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून संवादातून, तुकारामांचे जिवंत माणूसपण साकारलेले दिसते.

            ‘तुकाराम’ चित्रपटाची समाप्ती ही तुकारामांच्या गाथा इंद्रायणीत बुडवण्याच्या प्रसंगात होते. हा तर चित्रपटाचा क्लायमॅक्सच म्हणावा लागेल कारण तुकारामांचा विचार हा एक भौतिक शक्ती बनतो आणि गाथेतील अभंग स्वत:च्या मुक्तीसाठी पुन्हा जनसागर गाऊ लागतो. एकूणच हा चित्रपट म्हणजे तुकारामांना ब्राह्मणी विचारांतून मुक्त करून त्यांच्या खर्‍या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न आहे. आजच्या व्यावसायिक भांडवली व्यवस्थेत असा चित्रपट काढणे म्हणजे त्याच व्यवस्थेला आव्हान आहे. व्यावसायिक शहाणपण जपत चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘तुकाराम’ योग्य ठिकाणी संपवला आहे, पण जर तो त्यांच्या घडवून आणलेल्या मृत्यूपर्यंत नेला असता तर त्याची परिणामकारकता अधिक झाली असती. जितेंद्र जोशींनी तुकाराम असा साकारला आहे की, जणू तो कधी बुद्ध बनतो तर कधी विद्रोही क्रांतीकारक, सर्वांच्याच अप्रतिम अभिनयातून हा चित्रपट उभा राहतो. चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांच्या सर्वच टिमच्या कठोर मेहनतीला आपण पुरोगामी मित्रांनीच हात द्यायला हवा.

– कुणाल शिरसाठे