Categories
बालविभाग

जरा डोकं चालवा!

वार्षिकांक – २०१२

1) ससा आणि कासव यांच्या (न झालेल्या) शर्यतीची गोष्ट

            ससा आणि कासव एकाच वर्गात शिकायला होते. वर्गात सरांनी ससा-कासवाची गोष्ट सांगून झाली होती. सरांसमोर कसे बोलायचे म्हणून ससा गप्प बसला पण जेव्हा शाळा सुटली तेव्हा ससा जाम वैतागून कासवाला म्हणाला, “शाळेत शिकवतात म्हणून काही सर्व खरे नसते.”

“पण मी कुठे तसे म्हटले.” कासवाचे उत्तर.

            “हे बघ आपण मित्र आहोत म्हणून ठीक, पण मला  हा अपमान सहन होत नाही, आपण एकदाची खरोखरची दहा किलोमीटर अंतराची शर्यत लावून हा फैसला करून टाकू.” ससा अजूनही चिडलेला होता.

            “माझी काहीच हरकत नाही, कारण मी हरलो म्हणून काही कुणी मला चिडवणार नाही. कारण मी मुळातच हळू चालतो पण तू हरलास तर तुझी मात्र नाचक्की होईल” कासव अजूनही शांत होता.

            “मी तुझ्यापेक्षा दहापटीने जास्त वेगात धावतो त्यामुळे तू जरी एक किलोमीटर पुढून शर्यत सुरू केलीस तरी मी ती सहज जिंकू शकेन”, ससा अजूनही शर्यतीचे विसरला नव्हता.

            “तू जरा नीट विचार करून बोल, मी एक किलोमीटर पुढून शर्यत सुरू करू ना?”

            “अगदी खात्रीने!!”

            “मग आपण शर्यत धावायची गरजच नाही, कारण ही शर्यत मीच जिंकणार”

            “काहीतरीच बोलू नको, शर्यतीला घाबरून तू हे बोलतो आहेस.”

            “नक्कीच नाही! कारण तू मला कधीच गाठू शकणार नाही.”

            “ते कसे? कारण मी तुझ्यापेक्षा दहापटीने वेगात धावतो.”

            “तूच विचार कर, तू जेव्हा एक किलोमीटर अंतर कापशील, तेव्हा मी शंभर मीटर पुढे गेलेला असेन.”

            “हो त्यात काय? तेवढेसे अंतर पार करायला कितीसा वेळ लागणार?” ससा म्हणाला.

            “पण तो पर्यंत मी अजून दहा मीटर पुढे गेलेला असेन, आणि ते अंतर पार करेपर्यंत मी एक मीटर पुढे असेन, आणि असे कितीही वेळ चालले तरी मी थोडासा का होईना सतत तुझ्या पुढेच असणार, त्यामुळे तू उगाच शर्यत लावून स्वत:चे हसे कशाला करून घेतो आहेस?”

आता मात्र ससा गोंधळला.

            बिचारा ससा अजूनही कागद, पेन घेऊन बसला आहे. तुम्ही त्याला मदत करू शकाल का?

2) अंतराळातील वाहतूक व्यवस्था

            ही खूप खूप वर्षानंतरची गोष्ट आहे. तुम्ही चुकीचे वाचले नाही. ही खरेच खूप वर्षांपूर्वीची गोष्ट नसून खूप वर्षांनंतरची गोष्ट आहे. अंतराळात वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय झाला होता. रॉकेटस देखील जवळजवळ प्रकाशाच्या वेगाशी तुलना करणारे होते. वाहतूक व्यवस्था म्हटली तर सिग्नल आलेच. त्यामुळे अवकाशस्थित उपग्रहाची सोय करून, सवय असल्याने, पृथ्वीवर असतात तसेच लाल, पिवळा आणि हिरवा असे दिवे ठरवण्यात आले. वाहतूक मार्ग आखण्यात आला. सर्व झाले. पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण आला कारण कुणीच सिग्नल मानायला तयार नव्हते. त्यातल्या चालकावर खटला भरण्यात आला. वाहतूक पोलिसांचे म्हणणे होते की, लाल सिग्नल असतानाही चालकांनी रॉकेट तसेच पुढे नेले आणि चालकाचे म्हणणे होते की, खरे तर हिरवाच सिग्नल होता.

            यात नेमके कोण खोटे बोलत होते?

3. बुद्धिमान कोण?

            नेहमीची गोष्ट आहे. राज्याचे प्रधान निवृत्त होणार असतात. त्यामुळे त्याच्या इतकाच हुशार प्रधान निवडण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. अनेक तरूणांमधून विविध परिक्षामधून तीन तरूण निवडले जातात. त्यातून एकाची निवड करायची असते. परीक्षा घेताना प्रधान लाल आणि पांढर्‍या रंगाचे गंध घेऊन हजर होतात. प्रधान तिन्ही तरूणांच्या कपाळावर कोणत्याही एका रंगाचे गंध लावणार असतात, अर्थातच त्यावेळेस तिघांनी डोळे मिटण्याची अट असते. कपाळावर गंध लावल्यानंतरच त्यांनी डोळे उघडायचे असतात. जो तरूण दुसर्‍या कोणत्याही तरूणाच्या कपाळावर लाल रंगाचा टिळा पाहिल त्याने हात वर करायचा आणि ज्याला कळेल की स्वत:च्या कपाळावर कोणत्या रंगाचा टीळा आहे त्याने हात खाली करून उत्तर सांगायचे आणि अर्थात कारणदेखील सांगावे.

            सर्व तरूणांनी डोळे मिटल्यावर प्रधानाने तिघांच्या कपाळावर लाल रंगाचा टिळा लावला. डोळे उघडल्यावर सर्वांनी हात वर केले. पण तिघांच्याही कपाळावर लाल टिळा असल्याने कुणी कुणाकडे पाहून हात वर केला हे कळणे कठीण झाले. काही वेळात त्यातील एकाने हात खाली करून अचूक उत्तर सांगितले.

            त्याने हे कसे ओळखले असेल? बघा उत्तर वाटते तितके सोपे नाही.

4. विज्ञान प्रदर्शन आणि ऊर्जा बचत

            आज विज्ञान प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपापाली प्रतिकृती शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली होती. मयंकने बनविलेल्या प्रतिकृतीची सगळीकडे तारीफ होत होती. त्याने एस.टी.च्या छतावर पंखे बसवून त्यातून मिळणार्‍या उर्जेतून वीज निर्मिती कशी करता येईल आणि त्याच उर्जेने एस.टी.च्या डिझेल वापरामध्ये बचत करता येईल. याची प्रतिकृती सादर केली होती. त्यामुळे त्याच्या प्रतिकृतीला बक्षीस मिळणार याची सर्वांना शंभर टक्के खात्री होती. परीक्षक म्हणून संशोधक यश शर्मा आले होते. त्यांनी मयंकच्या प्रतिकृतीची प्रशंसा केली. परंतु बक्षीस मात्र ‘पाणी कसे जिरवावे आणि वाचवावे’ या प्रतिकृतीला मिळाले.

            यश शर्मा यांनी पक्षपातीपणा केला का? आणि नसेल केला तर मयंकच्या प्रतिकृतीला बक्षीस का मिळाले नाही?

5. मला अदृश्य व्हायचे आहे.

            आकाश नुसताच मिस्टर इंडिया सिनेमा पाहून आला होता. आपणदेखील अदृश्य झालो तर…. हा विचार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता आपल्याला अदृश्य होण्यासाठी काय करता येईल? याचा सतत विचार त्याच्या मनात घोळत होता. बाबाला विचारावे तर ते ओरडतील आणि आपल्याला मुर्खात काढतील अशी भीती वाटत होती. पण शेवटी त्याने हिम्मत करून बाबाला विचारलेच. बाबा म्हणाले, “अरे मी तर पडलो एक वकील मला त्यातले काय कळणार त्यापेक्षा तू आईला का विचारत नाहीस?” त्यामुळे तो आईकडे गेला. आई त्याच्या प्रश्नावर विचार करून म्हणाली, “कदाचित हे शक्य आहे. आपण आपले शरीर पारदर्शक करू शकलो तर आपण अदृश्य होऊ शकू. पण आपण जर पूर्णपणे अदृश्य झालो तर आपण इतरांना देखील पाहू शकणार नाही.”  आकाशची आई गंमत करत होती की, खरोखरच ती म्हणते त्यात तथ्य आहे?