“मंझील उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है,
पंखोसे कुछ नही होता, होसलो से उडान होती है.।”
डॉ.दाभोलकरांचे व्यक्तिमत्व चांगले होते यात संशयच नाही. पण दाभोलकर कशासाठी होऊन गेले हे पाहायला हवे, जगात असे खूप सारे लोक आहेत की, ज्यांना आपल्यातील कार्यक्षमता न कळता किड्या मुंगीसारखे जन्माला येतात व मरून जातात. माझ्या जगण्याचा हेतू काय आहे? असा प्रश्न आपल्यापैकी किती लोकांना पडतो? केवळ मरण येत नाही म्हणून जगायचे, अशा प्रकारचे जगणे आज आपल्यापैकी अनेकांचे सुरू आहे. परंतु डॉ.दाभोलकरांचे जीवन जगणे म्हणजे दुसर्याला प्रेरणा देणारे, विचारात परिवर्तन घडवणारे आणि समाजासाठी जगणे होते. त्यांच्या जीवन जगण्यात वेगळेपणा होता. ते प्रवाहाविरूद्ध जीवन जगत होते. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत गाडगे महाराज यांचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला होता.
डॉक्टरांचे यवतमाळमध्ये प्रथम व्याख्यान आम्ही पती-पत्नीने (ज्योती व प्रकाश डब्बावार) आयोजित केले होते. त्या व्याख्यानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. ते व्याख्यान ऐकून मी स्वत: केव्हा बदलून गेले लक्षातच आहे नाही. तेव्हा विदर्भात एकटे प्रकाश डब्बावार महाराष्ट्र अं.नि.स.चे काम करत असत. आम्ही दोघे मिळून शिक्षकांचे एक शिबीरही त्यावेळेस घेतले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि तेव्हापासून डॉ.दाभोलकरांचे विचार मला पटू लागले. त्यांची पुस्तके वाचून तर माझे पूर्ण जीवनच बदलून गेले. दररोज पूजा-पाठ करणारी मी एक वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागली. मी डोकं चालवायला लागले, विचार करायला लागले आणि पूर्ण घरच पुरोगामी विचारांचे बनले. यांचे सर्व श्रेय डॉ.दाभोलकरांना जातं. त्यानंतर दाभोलकर म्हणजे मला माझ्या घरचीच व्यक्ती वाटू लागली. ते जेव्हा जेव्हा यवतमाळला येत तेव्हा माझ्याकडेच त्यांचा मुक्काम असे आणि त्याचा मला खूप आनंद होत असे. कुठेही असले तरी सकाळचे फिरणे व व्यायाम ठरलेला.
असेच एकदा ते यवतमाळला आले असताना सकाळी ते व प्रकाश डब्बावार फिरायला गेले असता प्रकाश डॉक्टरांना म्हणाला, “सर आपल्यास धोका होऊ शकतो. तुम्हाला सुरक्षा हवीच.” यावर दाभोलकर म्हणाले, “अरे मला सुरक्षा मिळेलही. पण तुमचे काय?” कार्यकर्त्यांबद्दल आपल्या जीवापलिकडची ही त्यांची भावना मला खूपच भावली.
घरी कोणताही प्रॉब्लेम आला तरी मी पटकन त्यांना फोन करून त्यांचा सल्ला घेत असे आणि ते सुद्धा न कंटाळता मला आपुलकीने समजावून सांगत असत, मदत करीत असत. प्रत्येक गोष्ट करतांना का व कशासाठी हा प्रश्न स्वत:ला सतत विचारायला पाहिजे हीच खरी वैज्ञानिक दृष्टी जी मला डॉक्टरांकडून मिळाली.
आज ‘जादूटोणा विरोधी विधेयक’ मंजूर झाले आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यास बरीच मदत होईल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास हरकत नाही. एवढे सर्व असूनही डॉ.दाभोलकरांची कमतरता नेहमीच भासत राहील. तरीही त्यांचे कार्य जोमाने सुरूच ठेवून देशाला अंधश्रद्धा मुक्त करणे हीच दाभोलकरांना खरी आदरांजली ठरेल.
प्रकाश डब्बावार