Categories
व्यक्तिविशेष

साधीशी कौतुकाची थापही कामाची प्रेरणा देणारी….

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

आयुष्याचे दोन टप्पे बालपण व तरूणपण घरच्या पारंपारिक ब्राह्मणी संस्कारात गेले, त्यामुळे सण, उत्सव, व्रतवैकल्य हे नित्यनेमाने घरात चालत होते, अर्थात चालत आलेले संस्कार म्हणून पुढे चालविले जात होते, त्यात कट्टरपणा नव्हता. अशा घरात श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांचा विचारच मनात आला नाही. पुढे शाळेची नोकरी सांभाळताना नोकरीच्या उत्तरार्धात शाळेतील इतर शिक्षकाकडून अंनिसचे विचार कानावर आले. हळूहळू त्या विचाराशी जवळीक झाली व त्या विचाराकडे खेचली गेले. अंनिसच्या कामाला हळूहळू सुरवात केली. जमेल तितके करण्याचा प्रयत्न करू लागले. अंनिसच्या विचारांनी आयुष्याला विशेषत: निवृत्तीच्या आयुष्याला एक योग्य वळण मिळाले.

या कामाच्या संदर्भात डॉ. दाभोलकरांची भेट वारंवार होत गेली. त्या सरळ साध्या पण कर्तव्यतत्पर व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा आदर्श समोर आल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढू लागला. त्या करारी पण शांत, स्वच्छ, आनंदी व्यक्तीमत्वाचा प्रभाव अंनिसच्या कार्याला बांधून घेऊ लागला. महाराष्ट्रभर पसरलेल्या अंनिस संघटनेचे ते कार्याध्यक्ष म्हणजे खूप मोठी अधिकारी व्यक्ती. त्यांच्याशी बोलण्याची हिंमत नव्हती पण हळूहळू सहवास वाढला. स्वभावाची ओळख पटली व अंतर कमी झाले. अंनिस विचारांची जडणघडण त्यांची भाषणे ऐकून त्यांचे लेखन वाचून झाली पण त्यापेक्षा त्यांच्या सहवासातून त्यांच्या वर्तनातून अधिक झाली. सच्चेपणा व साधेपणा या दोन गुणांनी सामान्यातील सामान्य कार्यकर्ता त्यांच्याकडे आकृष्ट होत असे व काम करण्याची त्याची उमेद वाढत असे. सामान्य कार्यकर्त्याच्या कामाकडे ते बारकाईने पहात असत व त्याच्या कामाचे आवर्जून कौतुक करत असत असा अनुभव अनेक वेळा आला.

कोणत्याही लहान सहान कामात भाग घेतल्यावर ‘वा! अलकाताई छान’ असे हसतमुखाने म्हणून जणू पाठीवर शाबासकीची थाप देत होते. एखाद्या कामासाठी त्यांना फोन केला त्यावेळी ते बोलू शकले नाहीत तर थोड्या वेळाने आपण स्वत: फोन करून विचारत की, का फोन केला, काय काम आहे? ‘असेल काम तर करतील त्या पुन्हा फोन’ असा विचार त्यांनी कधीच केला नाही.

वार्तापत्राचे वर्गणीदार करणे व वार्तापत्राला जाहिराती मिळवून देणे याबद्दल गोरेगाव शाखेचे त्यांना खूप कौतुक होते. हे कौतुक मनाशीच न ठेवता ते दरवर्षी एक कौतुकाचे पत्र आमच्या नावावर आठवणीने पाठवत असत. कौतुकाचे भुकेले नसलो तरी त्या पत्राने कार्याची नोंद झाली याचा आनंद नक्कीच होत असे. जादूटोणा विरोधी कायदा संमत करून घेण्यासाठी आझाद मैदानावर वेगवेगळी आंदोलने शांततेने झाली, त्याची तयारी मुंबईचे कार्यकर्ते करत मुख्य काम विजय, नंदकिशोर सारखे तरूण कार्यकर्ते करत. पण थोडीफार मदत आम्ही वयाने ज्येष्ठ कार्यकर्त्या करत होतो. शेवटच्या धरणे आंदोलनाचा सर्व खर्च मध्यवर्ती देणार होती पण हा सर्व खर्च मुंबईच्या दोन ते अडीच लाखाच्या जाहिरातीच्या कमिशनमधून झाला त्यामुळे मध्यवर्तीला वेगळे पैसे द्यावे लागले नाहीत. कार्यक्रम संपल्यावर सर्व कामे आटपून आम्ही घरी गेलो. रात्री आठ वाजता डॉक्टरांचा फोन आला. फोन पाहून विचार आला आत्ता का फोन असेल? जाहिराती मिळवून देणार्‍या शाखेचे कौतुक करण्यासाठी त्यांनी फोन केला. इतकी कार्यव्यस्त व्यक्ती दोन दिवसांनी सावकाश फोन करू शकली असती पण कौतुकाची थाप लगेच देण्याची त्यांची सवय.

गेल्या वर्षी ‘सुधाकर आठल्ये प्रथम पुरस्कार’ मला देण्याचे कमिटीमध्ये ठरले. इतके सगळे मोठेमोठे कार्यकर्ते सोडून आपल्याला पुरस्कार मिळणार याचा आनंद मला झाला नाही. उलट ऑकवर्ड झाले. इस्लामपूरला पुरस्कार घेण्यापूर्वी मी माझी व्यथा बोलून दाखविली. तुम्ही मला हा पुरस्कार देऊन कार्याला बांधून घेतले हे ऐकून डॉक्टर माझ्यावर रागावले नाहीतच पण मिश्किलपणे हसून माझ्याकडे पाहून माझ्या म्हणण्याला जणू अनुमोदनच दिले. तो हसरा चेहरा हेच माझे खरे बक्षीस होते तो चेहरा मी माझ्या हृदयात जपून ठेवला आहे. 20 ऑगस्टला घडलेल्या घटनेनंतर खरा चेहरा परत कधीच दिसणार नाही. हृदयात जपून ठेवलेल्या त्या फोटोलाच आठवायचे.

20 ऑगस्टला सकाळीच त्यांच्या निर्घृण खुनाची वार्ता कळली. जिवंत असण्याची कोणतीच शक्यता नाही हे स्पष्ट झाले. बातमी ऐकली हातापायातले त्राण जाऊन मी खाली बसले. ओक्साबोक्सी रडू लागले. थोड्या वेळाने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनाला मी प्रश्न केला माझे आई, वडील गेले तेव्हा मी इतकी रडले होते का? मनाने हळूच उत्तर दिले. नाही!

अलका चाफेकर, मुंबई