8 ऑगस्ट 2001 ला डोंबिवली येथे विज्ञानबोध वाहिनीच्या उभारणीसाठी पार पडलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात आम्हा पालघर शाखेच्या कार्यकर्त्याची डॉ.नरेंद्र दाभोलकरांशी प्रथम भेट झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? श्रद्धा अंधश्रद्धा, मन मनाचे आजार, बुवाबाजी इ. विषयांची मांडणी सतत 4 ते 5 तास ती ही रंजकपणे करणारे दाभोलकर माझ्या लक्षात राहिले ते त्यांनी सांगितलेल्या प्रबोधनकारांच्या एका कवितेमुळे.
धर्मावाचुनी प्राण न जाई
देवाविण नच अडते
आत्मशक्ती खंबीर तयांच्या
त्रिभुवन पाया पडते.
पालघर अंनिस शाखा आम्ही 2000 साली सुरू केली होती. पण शाखा कशी चालवावी याचे मार्गदर्शन या पहिल्या शिबिरात मिळाले. त्यानंतर सफाळे, पालघर, तलासरी, तारापूर, केळवे या ठाणे पश्चिम विभागात दाभोलकर 6 वेळा आले. सतत संवाद व्हायचा. खरे तर आम्ही सोलार सेल प्रमाणे दाभोलकरांचे विचार ग्रहण करून आमच्या बॅटर्या चार्ज करून घेत होतो.
“चमत्कार सादरीकरण” हा प्रत्येक कार्यक्रमाचा ढोल आहे. तो चांगला वाजला की, लोकांमध्ये चळवळीचा विचार ऐकण्यासाठीची उत्सुकता निर्माण होते. अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना कमीत कमी 5 चमत्कार सादर करता आलेच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे मी चमत्कार सादरीकरण चांगल्या प्रकारे शिकून घेतले. “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तो का विकसित होत नाही” हे मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांना लोकांसमोर मांडता आलेच पाहिजे अन्यथा इतर विषय समजावणे व्यर्थ आहे हे डॉ. दाभोलकर ठासून सांगायचे- संत आणि समाजसुधारकांची वचने, अभंग वा रचना दाभोलकरांना अगदी मुखोद्गत असायच्या. कार्यकर्ता कृतीशील असावा हा त्यांचा आग्रह. मला आठवतात ते नाशिकच्या राज्य कार्यकारिणीत व पुण्याच्या विवेकवाहिनीच्या बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या झोपलेल्या जागच्या सतरंज्या पहाटे उठून स्वत: गोळा करणारे दाभोलकर, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण बदलणे शक्य नसेल पण समाजाच्या विवेकाला साद घालून विवेकवादी बनवणे सहज शक्य आहे हे सांगणारे दाभोलकर, अंधश्रद्धा बाळगणे, ‘जातीभेद’ मानणे आणि ‘व्यसन’ करणे सारखेच कारण इथे प्रत्येक ठिकाणी माणसाचा विवेक गहाण पडतो’ हे निग्रहाने सांगणारे दाभोलकर, जाती धर्माच्या भिंती ओलांडून मानवता हा एकच धर्म असणारा समाज निर्मितीचे स्वप्न वास्तवात यावे यासाठी धडपडणारे दाभोलकर, सनातन्यांचा खरपूस समाचार घेताना अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांविषयी ‘क्रोधापेक्षा करूणा बाळगा’ असे आम्हाला वारंवार सांगणारे दाभोलकर, आमच्या प्रत्येक भेटीत आत्मियतेने चौकशी करून व निरोपाला स्मित हास्य करत अच्छा… ठीक आहे. चळवळीचे काम चालू ठेवा, हे सांगणारे दाभोलकर…. किती आठवणी लिहायच्या….
समाजातील सामान्य माणसाशी चळवळीचे नाते जोडले म्हणून कार्यकर्त्यांनी सतत प्रयत्नशील असावे हे त्यांचे सांगणे कृतीत येण्यासाठी भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणार्या, त्याच समाजातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची व अंनिसची भावकी वाढवण्यासाठी “भटक्या विमुक्त समाजउत्थानासाठी काम करणारा कार्यकर्ता गौरव पुरस्कार” तोही अशा कार्यकर्त्यांच्या कार्य क्षेत्रात जाऊन देणे ही संकल्पना 2010 साली दाभोलकरांना अत्यंत भावली. “गाईला भाकर, मुंगीला साखर मात्र माणसांना जातीवरून ठोकर” देणार्या राज्यवस्थेविरूद्ध दंड ठोकून हे कार्यकर्ते भटक्याचं फाटकं जगणं आपल्या प्रयत्नाने शिवू पाहतात. हे कार्य ‘फोटो इज अवर मोटो’ असं प्रसिद्धीसाठी छापील स्वयंसेवी संघटनापेक्षा निश्चितच वेगळे आहे.
फटाकेमुक्त दिवाळी ही संकल्पना पालघर अंनिसने 2001 साली यशस्वीपणे राबविली. पर्यावरण संरक्षणासाठी उपयोगी असून लोक पैशाची बचत अन् चांगले आरोग्य म्हणून कृतीशील होतात. मग आम्ही डॉक्टरांकडे हा उपक्रम राज्यभर जावा म्हणून आग्रह धरला. दाभोलकरांनी शासनाचा पर्यावरण विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, हरित सेना यांच्या प्रमुखांना भेटून याला राज्यव्यापी स्वरूप दिले.