भूमिका :
विशेषत: गेल्या तीन दशकात कुटुंब जीवनपद्धती झपाट्याने बदलत चालली आहे. नवीन जीवनमूल्ये मूळ धरु पाहात आहेत. पती-पत्नीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा, जीवनविषयक दृष्टिकोन व कौटुंबिक भूमिका बदलत चालल्या आहेत. त्यामध्ये मैत्री, जोडीदाराची निवड, विवाहातील रुढी-परंपरा, विवाहानंतर बदलणारी नाती, लैंगिकता, पालकत्व इत्यादी अनेक विषयांवर आपली काही मते असतात. ती नेहमीच इतरांना पटतात असे नाही. हे सर्व लक्षात घेता पूर्वीच्या व हल्लीच्या जीवन पद्धतीचा अभ्यास आजच्या युवक-युवतींनी डोळसपणे करुन त्याची जाणीवपूर्वक नोंद केली पाहिजे. ही सर्व तयारी विवाहपूर्व काळात म्हणजेच युवावस्थेपासूनच व्हावयास हवी. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि स्वत:च्या अपेक्षापूर्तीसाठी स्वत:च आता नव्या वाटा शोधायला हव्यात. अर्थात ही गरज फक्त शहरापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. कारण जागतिकीकरणाच्या धोरणामुळे झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण व शहरीकरण, दळणवळणाची वेगवान साधने, वाढता शिक्षण प्रसार व आधुनिक जीवनपद्धतीची ओळख करुन देणारी नवनवीन साधने ह्या सर्वांमुळे नवे विचार-आचार आता खेडोपाडी पोचले आहेत. खेड्यातील जीवन पद्धतीतही बदल होऊ घातले आहेत.
मैत्री प्रेम आकर्षणापासून सुरु झालेले स्त्री-पुरुष संबंध जीवन साथी म्हणून विवाह बंधनात परावर्तित होणे अपेक्षित असते. परंतु भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल असलेल्या अपुर्या व अनैसर्गिक समजामुळे गुंतागुंत तयार होते. त्यात विवाह संस्कार वा करार करुन वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी कराव्या लागणार्या पारंपरिक रुढी-प्रथा-परंपरांमुळे पुरुष सत्ताक समाजामध्ये बाईवर कायम अन्याय होत राहतो. विवाहामध्ये होणारा जात, पोटजात, कुळ, गोत्र, प्रतिष्ठा, हुंडा, मानपान, दागदागीने, बॅण्ड, कन्यादान, जेवणावळी, पत्रिका, अक्षता, लायटिंग, वरात प्रकारांमध्ये प्रचंड आर्थिक-शारीरिक-मानसिक गुंतवणूक करुनही हाती असमाधानच राहते.
अशा पार्श्वभूमीवर विवाह का आणि कशासाठी करायचा? इथपासून त्याच्या नकारात्मक व सकारात्मक कारणांचा विचार, विवाह यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणार्या बाबींची समज, वैवाहिक जोडीदाराच्या निवड प्रक्रियेतील पारंपरिकतेतील दिशाभूल, शोषण, फसवणूक आणि त्यातून भोगावा लागणारा मन:स्ताप व अत्याचार याचा, युवक-युवतींनी गांभीर्यपूर्वक जाणिव करुन घेणे आवश्यक आहे. त्या हेतूनेच आम्ही महाराष्ट्रातील युवा पिढीशी प्रबोधनाचा सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. त्यामधून सहभागी होऊन प्रबोधित होणार्या युवांना त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनासाठी संकल्पीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जोडीदाराची निवड करण्याविषयीची समज विकसित करणारे ‘जोडीदाराच्या विवेकी निवडीसाठी- युवा संकल्प मेळावा’पुढील काळात मोठ्या प्रमाणात घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील.त्यामधून महाविद्यालयीन युवक-युवतींना आपल्या वैवाहिक जीवनाचा जोडीदार विवेकपूर्वक निवडण्यासाठी आधुनिक वैज्ञानिक विचार आणि बदलत्या जीवनप्रणालीमध्ये कालसुसंगत मार्गदर्शन मिळू शकेल. या भूमिकेतून महाराष्ट्र अंनिस व महाविद्यालयीन विद्यार्थी-प्राध्यापकांचे संघटना असणारी ‘विवेक वाहिनी’ यांच्या संयुक्तपणे ‘जोडीदाराच्या विवेकी निवडीसाठी -महाराष्ट्र व्यापी युवा संकल्प अभियान’ आम्ही आयोजित करीत आहोत.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व विद्यापीठांच्या शहरांमधून एक दिवसीय मेळावे चालू शैक्षणिक वर्षात आयोजित करण्याचा आपला प्रयत्न आहे. दुसर्या टप्प्यात सर्व जिल्हानिहाय मेळावे आणि मागणीनुसार कार्यशाळा पुढील शैक्षणिक वर्षात आयोजित केल्या जातील. जसे निरामय मानसिक आरोग्यासाठी ‘मानस मित्र’ बनविण्याच्या कार्यक्रम महाराष्ट्र अंनिसतर्फे राबविला जाणार आहे. त्याचप्रमाणे विवेकी सहजीवनाचा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणारे अभियान भविष्यात चालविता येऊ शकेल. विवाहाच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या युवक-युवतींना आपल्या जीवनसाथीच्या निवडीबद्दल मनात असलेले संभ्रम, गैरसमज आणि रुढी-प्रथा-कर्मकांडाचा संस्कार नाकारुन विवेकपूर्वक जोडीदाराची निवड करण्याचे धैर्य अभियानातून मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
अविनाश पाटील
राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस.

विवाह आणि बदलती जीवनशैली
21 वे शतक हे मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचे सोनेरी पर्वच म्हणावे लागेल. नवनवीन शोध, संशोधन, चंद्रच नव्हे तर मंगळावर मानवाने केलेली चढाई, क्लोनिंग सारखे निसर्गाला आव्हान देणारे मानवाने केलेले प्रयोग हे सर्व पहाता आपण आश्चर्यचकित होतो. मानवाने त्याच्या बुद्धी सामर्थ्याने सर्व जगच नव्हे तर संपूर्ण अवकाश आज काबिज केले आहे.
माहिती व तंत्रज्ञान शास्त्राच्या विकासातील प्रगतीकडे पहाता तर आजचा मानव हा काळाच्या खूपच पुढे-पुढे धाव घेतो आहे असे दिसते. इंटरनेटमुळे सर्व जगच आपल्या जवळ आले आहे. आज या सर्व गोष्टी जेव्हा लहान मुले लिलया वापरताना दिसतात तेव्हा गंमत म्हणून इसवी सन दोन हजार वर्षांपूर्वी जग कसे असेल याचा विचार मनात येतो. ज्या संथ लयीने माणूस तेव्हा विचार करत असेल, ज्या संथ लयीने जगातील व्यवहार तेव्हा चालत असतील ते आजही तसेच चालले तर आपणास चालेल का असा विचार मनात डोकावतो.
खरेतर प्रत्येक शतकात नवनवीन शोध लागले आहेत. दरवेळेस एक-एक पाऊल आपण पुढे सरकलो, अज्ञानातून ज्ञानाकडे चाललेला हा प्रवास आजही चालू आहे. प्रत्येक वेळेस काळाच्या पुढे जावून भविष्याचा वेध माणूस घेतच असतो. ज्ञानाने, विचाराने, कृतीने स्वत:ला प्रगल्भ करणे हा मानवाचा स्थायीभाव आहे. मात्र काही बाबतीत आपण आजही अंधश्रद्धा बाळगतो. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था काळाच्या ओघात मानवाने स्विकारली. या संस्थांचे जसे काही फायदे आपणास मिळाले तसेच या संस्थामुळेच काही तोटेही आपल्या वाट्याला आले आहेत. संस्कृतीच्या नावाखाली आजही आपण वेदकालीन वर्णव्यवस्था मानतो. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र ही वर्णव्यवस्था आज वरवर पहाता मागे पडलेली दिसत असली तसेच दत्तक मूल स्विकारणे, आंतरजातीय/जपण्याची भाषा बोलली जाते तेव्हा ही मानसिकता डोके वर काढताना दिसते. अशा विचारांमुळे समाजव्यवस्था ढवळून निघते. सामाजिक संघर्ष होताना दिसतात.
शारीरिक गरजा, सुरक्षितता, पुर्ननिर्माण या महत्वाच्या बाबी पूर्ण करण्याकरिता मनुष्यप्राणी टोळ्यांतून राहू लागला. लहान लहान शेतीतील प्रयोग तो करु लागला. शेती, बीजाचे संरक्षण, पशुपालन, शिकार, शेती व शिकारीकरिता शस्त्र निर्मिती तो हळूहळू करु लागला.
वाढवणे, जोपासणे या स्त्रीच्या अंगभूत गुणांमूळें काही जबाबदार्या आपसूक तिच्याकडे आल्या. सर्व घराची, शेतीची, पशुपालनाची तसेच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेणारी स्त्री ही त्याकाळी अत्यंत महत्वाची ठरली. सर्व मालमत्तेची काळजी घेणारी म्हणून पुरुष तिला जपू लागला, तिला संरक्षण देवू लागला. मात्र हळूहळू पुरुष व स्त्रीच्या प्रमुख भूमिकेत येथेच फरक पडत गेला. संपूर्ण टोळीमधे अत्यंत महत्वाची असणारी व्यक्ती म्हणून अशा सक्षम स्त्रीला तिच्या पालकांकडून पुरुष धन-धान्य, गाई-गुरे देवून विकत घेवू लागला. तिच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करु लागला. स्त्रीला विकत घेवून, स्वत:चा मालकी हक्क तिच्यावर प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला हळूहळू सोहळ्याचे स्वरुप येवू लागले. याच प्रक्रियला पुढे विवाह म्हणून संबोधले जावू लागले.
विवाहानंतर त्या पुरुषाकडून टोळीची संख्या, सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न जाणिवपूर्वक होवू लागले. त्या त्या भागातील टोळी, विशिष्ट वैशिष्टये असणारी टोळी, ओळखता यावी याकरिता विशिष्ट नावाने या टोळ्या संबोधल्या जावू लागल्या व कुटुंबे उदयास आली. अशा प्रकारे ढोबळमानाने या दोन्ही संस्थांचा इतिहास सांगता येईल. अनेक देश, प्रदेश यांच्या स्थळ, काल वैशिष्ट्यांनुसार या टोळ्यांमधे विविधता दिसून येते.
जात, धर्म, विवाह, कुटुंब संस्था या सर्व मानवनिर्मित आहेत. विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात त्या आल्या आहेत. मुख्यत: श्रमविभागणीकरिता जाती, पोटजाती, आपणाकडे रुढ झाल्या आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्मांमध्ये वेगवेगळ्या चालीरिती, रुढी-परंपरा, खाण्या-पिण्याच्या पद्धती, भाषा आढळतात. व्यक्ती आपल्या जातीची/धर्माची वैशिष्ट्ये अत्यंत श्रद्धेने, आग्रहाने संस्कृती टिकविण्याच्या नावाखाली जपताना दिसतात.
संस्कृती म्हणजे जुने ते सोने हा विचार खरेतर आज मागे टाकायला हवा आहे. जुने ते सर्वच सोने नाही आणि जुने ते सर्व टाकाऊ पण नाही पण काळानुरुप बदलणार्या जीवनशैलीच्या आवश्यकतेनुसार काही बदल स्वागतार्हच असतात. जुना विचार, जुने यंत्र, जुनी आचार पद्धती अशा अनेक गोष्टी आपण लीलया मागे टाकतो. मात्र रुढी, परंपरा चालीरिती याबाबतीत मात्र आपण फार आग्रही असतो. परंपरा, चालीरिती जपणे, जोपासणे यांची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक विकासच्या टप्प्यामधे स्त्रीवरच सोपविलेली दिसते. जर स्त्रीने ते जोपासले नाही तर कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होते. खरेतर या सर्व गोष्टी फायद्याच्या असतील तर त्या पुरुषांनीही जपल्या पाहिजेत.
21 व्या शतकाच्या पुर्वार्धापासून स्त्रीचे समाजातील स्थान बदलत आहे. शिक्षणामुळे स्त्रीने स्वत:ला समृद्ध केले आहे. ज्ञान, तंत्रज्ञान, शोध, संशोधन, शास्त्र, अवकाश, संरक्षण, कला, साहित्य अशी अनेक क्षितीजे तिने काबीज केली आहेत. स्त्रीचे स्थान उंचावत आहे.भारतात 1975 मधे पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधात अनेक आंदोलने, चळवळी झाल्या. स्त्रीने दुय्यम स्थान नाकारले, तिच्यावर होणरी हिंसा तसेच तिच्यावर लादली जाणरी बंधने तिने झुगारली. एक मानव म्हणून तिचा समाजाने स्विकार करुन, एक व्यक्ती म्हणून तिला तिचे सर्व अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी अनेक स्त्रिया संघटीत झाल्या. आपले हक्क मिळविण्यासाठी त्यांनी रस्त्यावर येणे पसंत केले, योग्य कामाचे योग्य वेतन मिळावे तसेच कामाच्या ठिकाणी तिला काही खास सोई-सुविधा मिळाव्यात याकरिता स्त्रिया एकत्र आल्या. मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे याकरिता अनेक प्रयत्न संघटितरित्या केले गेले.
स्त्रीकडे केवळ देवता, गृहिणी, पायाची दासी किंवा पायातली बेडी म्हणून न पहाता एक संपूर्ण विकसीत व्यक्तीमत्त्व म्हणून तिचा स्विकार सर्वांनी (स्त्री व पुरुष दोघांनी) केला पाहिजे अशी मागणी तिची होती.
स्त्री व पुरुष हे कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे, मानवजातीचे भक्कम असे दोन आधार आहेत. स्त्री-पुरुषांनी एकत्र येवून निसर्गनियमानुसार जीवन पुढे पुढे नेणे तसेच त्या जीवनात समानतेच्या तत्त्वाचा आधार घेवून आनंद घेणे गरजेचे आहे. एकाला जीवन जगण्याचा, आनंदाने/सुखाने जीवनाचा आस्वाद घेण्याचा अधिकार जास्त व दुसर्या कमी ही रचना चुकीची आहे. स्त्री जर पुरुषाच्या मागे राहिली/दुय्यम राहिली तर सहजीवनाचा आनंद, बरोबरीच्या नात्यातून मिळणारा आनंद पुरुषाला देखील मिळणार नाही व त्याचे व्यक्तीमत्व देखील अपुरे राहिल. अपुर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास दोघांनी एकत्र येवून सहप्रवासी होवून करायचा असेल तर विवाहाच्या उंबरठ्यावर दोघांनी एकत्रितरित्या या सर्व प्रक्रियेचा, समाजबदलाच्या प्रक्रियेचा विचार जरुर करावा.

क्रांतीस्मारकावर तरुणाईचा विवेकी जागर जोडीदाराची विवेकी निवड करण्याचा निर्धार
शिंदखेडा (ता.12)- ‘नैराश्याच्या गर्तेत गेलेला तरुण मला बघायचा नाही, मला अत्यंत आशादायी, सकारात्मक विचारांचा आणि समस्यांना निर्धारपूर्वक भिडणारा तरुण महाराष्ट्र राज्याचा युवक कल्याण मंत्री म्हणून बघायचा आहे असे प्रतिपादन ना. अॅड. पद्माकर वळवी यांनी क्रांतीस्मारक, साळवेफाटा येथे केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र विवेक वाहिनीतर्फे आयोजित ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या राज्यव्यापी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी होते. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे निमित्ताने आयोजित संकल्प मेळाव्याचे अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम हे होते. विचार मंचावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, आमदार जयकुमारभाऊ रावल, अंनिस जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्रनाथ टोणगांवकर, जेष्ठ विधिज्ञ अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, रा.से.यो. विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ. पंकज नन्नवरे, दोंडाईच्याचे प्राचार्य एम.ओ. गिरासे, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मनिषा पवार व प्रा. रघुनाथ महाजन आदि उपस्थित होते.
नामदार पद्माकर वळवी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, हा अतिशय संवेदनशील विषय या निमित्ताने महाराष्ट्र अंनिस संवादासाठी खुला करते आहे. कारण आयुष्यात जोडीदाराची निवड हा इतका महत्त्वाचा निर्णय आहे की, निर्णय योग्य झाला तर एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर जाऊ शकते आणि निर्णय चुकला तर यशस्वी माणूस देखील रसातळाला जाऊ शकतो.
या मोहिमेची भूमिका महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी विशद केली. एकूणच तरुणाई मधील प्रेम, आकर्षण या भावविश्वाला विवेकी दिशेने नेले तर जोडीदाराची निवड करताना त्यातील पारंपारिक रुढी, परंपरा, कर्मकांड आणि वाढत चाललेला मानअपमान, बडेजाव, पैशांची उधळपट्टी थांबेल. परस्परांच्या विचारांचा आदर यातून जोडीदाराची निवड, विवेकपूर्ण होऊन सक्षम तरुणाई निर्माण होईल. जगात महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करु इच्छिणार्या आपल्या देशवासियांनी जातीधर्म निरपेक्ष समाज उभारणीसाठी आधी कुटुंब संस्था व नंतर समाजव्यवस्था मजबूतपणे उभारण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे युवा पिढीशी सुसंवाद सुरु केला गेला आहे. असे प्रतिपादन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांनी अशा मोहिमेतून तरुणांमधील घटस्फोटाचे परिणाम कमी होईल तसेच योग्य जोडीदाराच्या निवडीअभावी येणारे नैराश्य आणि त्यातून वाढणारी व्यसनाधिनता, रुढी परंपरा जोपासण्यापासून येणारे कर्जबाजारीपण आणि त्यातून वाढणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवता येऊ शकेल. असे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा. विलास चव्हाण यांना राज्यशासनातर्फे उत्कृष्ट रासेयो समन्वयक म्हणून मिळालेल्या राज्य पुरस्काराबद्दल ना. पद्माकर वळवी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दुसर्या सत्रात विद्यार्थ्यांच्या सात गटात विभागून गटचर्चा घेण्यात आल्या. जोडीदाराच्या निवडीमध्ये येणार्या अडचणी व त्यावर मात करुन व्यक्त केलेल्या अपेक्षा अतिशय प्रभावीपणे युवक-युवतींनी आपल्या अहवालात मांडल्या. गट चर्चेचे संकलन, विवेक वाहिनीचे समन्वयक प्रा. गोपाळ नेवे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. विलास चव्हाण होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन अशोकभाई शहा व सचिव राजेश शहा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी केले. कार्यक्रम संयोजनात साळवे हतनूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्यांचे कर्मचारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी, शिंदखेडा अंनिसचे कार्याध्यक्ष पत्रकार भिका पाटील,प्रा. दिपक माळी, प्रा. सतिष पाटील, प्रा. अजय बोरदे, प्रा. जी.पी. शास्त्री, प्रा. परमार, प्रा. बोरसे, हंसराज महाले, व्यवस्थापक- संदीप साळुंके यांनी परिश्रम घेतले. मेळाव्याचे संयोजक राज्य कार्यवाह प्रा.परेश शहा आणि जिल्हा कार्याध्यक्ष ए.ओ. पाटील यांनी कार्यक्रमाच्या संपर्क व संयोजनाचे सूत्र सांभाळले.
उमविच्या 17 महाविद्यालयांतील रासेयो स्वयंसेवकांमधून चारशेपेक्षा जास्त युवांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्र अंनिसचे धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले.
–प्रा. दिपक बाविस्कर
धुळे जिल्हा कार्यवाह
नात्यातील सुरेल सुसंवादासाठी जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेक वाहिनी
साथींनो,
पुढील दक्षता जरूर घ्यावी….
- विवाह ठरविताना घाई करू नका, जोडीदाराबद्दल संपूर्ण माहिती मिळवा.
- निवड पक्की करण्यापूर्वी मिळविलेल्या सर्व माहितीची खात्री करून घ्या.
- जोडीदार नोकरी करीत असल्यास नोकरीचे ठिकाण, स्वरूप, कामाच्या वेळा, मासिक उत्पन्न इत्यादी माहिती कामाच्या ठिकाणी जावून मिळवा.
- जोडीदार व्यवसाय करीत असल्यास व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायातील जबाबदार्या, कर्ज कोठून घेतले किंवा भांडवल कसे उभे केले याबद्दल सविस्तर माहिती मिळवा.
- *शिक्षण, आर्थिक स्थिती आणि राहते घर, जमीन, शेती याबद्दलची कागदपत्रे तपासून पहा.
- जोडीदाराचा दुसरा विवाह असल्यास पहिला विवाह संपुष्टात येण्याची कारणे समजावून घ्या व कागदपत्रे तपासून पहा. नातेवाईक व शेजारी यांच्याकडून खात्री करून घ्या.
- एकमेकांच्या पूर्वायुष्यातील घटना, आजार वगैरे बद्दल मोकळ्या मनाने बोला.
- विवाहापूर्वी आणि विवाहबाह्य लैंगिक संबंध टाळा. सुरक्षित लैंगिक संबंधासाठी योग्य मार्गाने शास्त्रीय माहिती मिळवा.
- निरोगी नातेसंबंध निर्माण होण्यासाठी आपलीही सर्व खरी माहिती द्या.
हे जरुर लक्षात ठेवा-
- एक व्यक्ती म्हणून जोडीदाराचा स्वीकार करा.
- मुलगी ही वस्तू नव्हे, व्यक्ती आहे हे सतत लक्षात ठेवा.
- मुलाकडे पालनकर्ता, संरक्षणकर्ता म्हणून पाहू नका.
- जोडीदाराच्या विचारांचा, मतांचा आदर करा.
- जोडीदार निवडताना स्वत:च्या तुलनेत जोडीदाराचा विचार करा.
- विवाहापूर्वी एकमेकांचे स्वभाव, आवडी-निवडी, छंद जाणून घ्या.
- जोडीदाराच्या आपल्याबद्दल असणार्या अपेक्षा व आपल्या जोडीदाराबद्दल असणार्या अपेक्षा मनात ठेवू नका, बोलून दाखवा.
- जोडीदाराविषयीच्या आपल्या अपेक्षांविषयी घरातील सर्वांबरोबर स्पष्टपणे चर्चा करा.
- जोडीदाराचे शिक्षण, इतर गुणवैशिष्ट्ये यांची माहिती मिळवा.
- आपल्या पत्नीचे अथवा पतीचे आपल्या घरात काय स्थान असेल, कोणती भूमिका असेल हे एकमेकांना सांगा.
- विवाह कसा? कोठे? केव्हा? करायचा याबद्दलची एकमेकांची मते जाणून घ्या.
- जोडीदाराचे वय विवाह योग्य असेल तरच विवाहास तयार व्हा.
- हुंडा देणे अथवा घेणे अनैतिक आहे आणि तो कायद्याने गुन्हा आहे.
- विवाहात होणारा खर्च दोन्ही पक्षाने करावा असा आग्रह धरा.
- विवाह कोणत्याही धर्मशास्त्राप्रमाणे अथवा कायद्याने केल्यास त्या विधिंचा/संस्कारांचा तसेच कायद्याचा अर्थ समजावून घ्या.
- विवाहानंतर एकमेकांच्या नातेवाईकांचा नेहमीच आदर करा. आदर शब्दातूनच नव्हे तर कृतीतून व्यक्त करायला हवा.
- लैंगिक संबंधाची शास्त्रीय माहिती मिळवा. एकमेकांची नीट ओळख झाल्याशिवाय पालकत्वाची जबाबदारी घेऊ नका.
- आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल जोडीदाराशी चर्चा करा.
- विवाहानंतर एकमेकांना सर्वार्थाने समजून घेण्याकरिता आपले विचार जोडीदारापुढे व्यक्त करा. हनिमूनला जा. त्या कालावधीत एकमेकांचा सतत सहवास लाभल्याने एकमेकांची अधिक ओळख होते.
नात्यातील सुरेल सुसंवादासाठी
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या लोकशाही तत्त्वांवर आधारीत कौटुंबिक, सामाजिक नाती विकसित व्हावी, जोपासली जावी या प्रेरणेने 1996 साली पुण्यातील ‘सुसंवाद’ संस्थेने काम सुरु केले होते. आजचा समाज 21व्या शतकाकडे वेगाने धाव घेत आहे. तुमच्या आमच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या नात्यातील आपुलकी, प्रेम, विश्वास या गोष्टी बोथट होत चाललेल्या आहेत. म्हणून असे नाते दृढ करणे आणि दुरावलेल्या नात्यांना एकत्र आणणे याकरिता संस्था कार्य करित होती. त्यांच्या विचार कार्याचा धागा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्यापक समाज बदलाशी नाते जोडून घेण्याचे काम आम्ही करीत आहोत.
स्वत:शी नव्याने संवाद करुन आपल्या जोडीदाराची विवेकी निवड करण्यासाठी कटीबद्ध होऊ इच्छिणार्यांनी संपर्क करावा.
वैवाहिक योग्यता ठरविणारे काही निकष 1.विवाहाची इच्छा असणे, विवाहाची इच्छा ओळखणे व व्यक्त करण्याचे धाडस आणि क्षमता असावी. आपल्या उद्दिष्टासाठी प्रयत्नशिल असणे आवश्यक. 2.स्वत:हून पुढाकार घेण्याची वृत्ती असावी. 3.जबाबदारपणाचे वर्तन राहावे. 4.निर्णय क्षमता अंगी असावी. 5.आत्मनिरिक्षण क्षमता असावी. 6.स्वत:ची शारीरिक जबाबदारी ओळखत यावी. 7.आत्मविश्वास असावा. 8.जागरुक रहाणे- संशोधन वृत्ती, हक्कांची जाणीव असणे आवश्यक आहे. 9.वृत्ती आनंदी खेळकरणाची असावी. 10.संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. 11.दुसर्याचे कौतुक करण्याची वृत्ती असावी. 12.आपले मत मांडण्याचे धाडस,क्षमता, प्रयत्नशिलता असणे आवश्यक आहे. 13.दुसर्याचे मत ऐकून घेण्याची व स्वत:चे मत दुसर्यावर न लादण्याची वृत्ती असावी. 14.स्वत:बद्दलचा गर्व पण स्वाभिमान असावा. 15.विचारांमध्ये एकसंधपणाची जाणीव आणि सतत तुलना न करण्याची वृत्ती असावी. 16.आपल्या विवाहाबाबत महत्त्वाकांक्षाच्या मर्यादा ओळखणे आवश्यक आहे. 17.दुसर्याचा आदर करण्याची वृत्ती हवी. 18.तडजोड क्षमता (मर्यादा ठरविणे) आवश्यक आहे. 19.आर्थिक क्षमता गरजांच्या व अपेक्षांच्या पूर्तीसाठी आवश्यक आहे. 20.समाधानी वृत्ती असणे आवश्यक आहे. 21.वेळ देण्याची तयारी ठेवून त्याचे नियोजन करता यावे. 22.होकारात्मक विचार करण्याची वृत्ती असावी. 23.जिव्हाळा निर्माण करण्याची क्षमता असावी. 24.स्वत:वर ताबा ठेवता यावा. 25.स्वत: सारासार विचार करुन निर्णय घेता यावेत.
साथींनो,
आपली मुले तारुण्यात पदार्पण करतात तेंव्हा त्यांच्या इतकेच आपण देखील मनाने शरीराने उल्हासित होतो. त्यांच्या पुढच्या आयुष्याची स्वप्न पहाण्याचे हेच दिवस! शिक्षण संपले की नोकरी व नोकरीत जरा स्थिरावल की त्यांच्या लग्नाचे वेध आपणास लागतात.
आलेल्या एक-दोन स्थळांमधले योग्य स्थळ निवडून लग्नही होते. लग्नाच्या धावपळीत आपण खूप थकून जातो. तरीही सामाधानाचे सुख आपल्या चेहर्यावर दिसते. या सुख-समाधानाबरोबर नव्या नात्यांची नवी जबाबदारी आपल्यावर येते.
आपल्या समाजात विवाहामुळे फक्त दोन मने, दोन शरीरेच जोडली जात नाहीत तर दोन कुटूंबे एकमेकांच्या जवळ येतात. नवीन माणसे, नवीन नाती स्वीकारायला आपल्या सर्वांनाच वेळ लागतो. तसा वेळ देणे एकमेकांबरोबर संवाद वाढवणे, असे प्रयत्न सतत करावे लागतात.
म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं हे नवं नातं फुलविण्याकरिता आणि जोपासण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ या.
आपले स्नेहांकित
साथींनो,
पुढील दक्षता जरूर घ्यावी……
स्थळाविषयी संपूर्ण व खात्रीशीर माहिती मिळवा. शिक्षण, आर्थिक स्थिती, रहाते घर, जमीन कागदपत्रे इत्यादी तपासून पहा. मुलगा किंवा मुलगी नोकरी करीत असल्यास नोकरीचे स्वरूप, ठिकाण, मिळणारे मासिक/वार्षिक उत्पन्न, इतर सोई-सुविधा, कामाच्या वेळा इत्यादी बद्दल त्यांच्याशी चर्चा करा व कामाच्या ठिकाणी जावून खात्री करून घ्या. मुलगा किंवा मुलगी व्यवसाय करीत असल्यास व्यवसायाचे स्वरूप, ठिकाण लागणारे भांडवल मिळणारे मासिक/वार्षिक उत्पन्न, इतर सोई-सुविधा, कामाच्या वेळा इत्यादी बद्दल त्यांच्याशी चर्चा करा व व्यवसायाच्या ठिकाणी जावून खात्री करून घ्या. सून किंवा जावई निवडताना त्यांच्या मित्रपरिवार, शेजार यांच्याशी परिचय वाढवून मिळालेल्या माहितीची खात्री करून घ्या. सवयी, आवडीनिवडी, छंद, त्यांच्या स्वत:च्या संसाराबाबतच्या अपेक्षा इत्यादी प्रत्यक्ष भेटीत जाणून घ्या. पूर्वायुष्यातील घटणा, आजार, व्यसने इ. विषयी माहिती मिळवा, आरोग्याच्या तपासणीचा आग्रह धरा. विवाह ठरविताना घाई करू नका, विवाहापूर्वी कुटूंबियांना समजून घ्या.
…….. हे जरूर लक्षात ठेवा……..
एक व्यक्ती म्हणून त्यांचा स्वीकार करा. विवाह ठरविण्यापूर्वी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. त्यांच्या गुण-दोषांची चर्चा इतरांसमोर करू नका. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याविषयी इतरांकडे वाईट बोलू नका. विवाह खर्च, देणी-घेणी, मानपान या संदर्भात आपल्य विवाहेच्छू मुलामुलींशी जरूर चर्चा करा. आपल्या सून किंवा जावई यांच्याबद्दल असणार्या अपेक्षांची चर्चा प्रथम आपल्या मुलांशी व नंतर त्यांच्या उपस्थितीत येणार्या सून किंवा जावयाशी करा. त्यांच्या आपणाबद्दल असणार्या अपेक्षांविषयी जाणून घ्या. आपल्या मुलाला अथवा मुलीला पहायला जाताना वस्तू म्हणून त्यांचेकडे पाहू नका. एक व्यक्ती म्हणून त्यांचा आदर करा. हुंडा किंवा हुंडा सदृश्य वस्तू देणे किंवा घेणे अमानवी असून कायद्याने गुन्हा आहे.
विवाहाचे वेळी मुलाचे वय 21 व मुलीचे 18 वर्षे पूर्ण असावे.
विवाहात अवास्तव खर्च टाळा. होणारा खर्च दोन्ही पक्षाने संमतीने निम्मा निम्मा केल्यास नात्यात कटूता येणार नाही.
भेटवस्तू मुलीला दिल्यास त्यांच्या याद्या करा. पावत्या जपून ठेवा. लग्नपत्रिका व फोटो जपून ठेवा. विवाहाची कायदेशीर नोंद जरूर करा. मुलांच्या विवाहानंतर त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी, स्वभाव/आवडी निवडी जाणून घेण्यासाठी वेळ द्या. याकरिता परवडेल तसे बाहेरगावी फिरण्यास पाठवा. घरी आलेल्या सूनेवर विवाहानंतर लगेचच सर्व जबाबदार्यांचे ओझे टाकू नका. (तिच्यातील क्षमता, आवडीनिवडीनुसार तिला कौटुंबिक जबाबदार्या द्याव्यात) मुलीच्या विवाहानंतर तिच्याशी सतत संपर्क ठेवा. जबाबदार पालकत्व म्हणजे काय याबद्दल सून-मुलगा, मुलगी-जावई यांच्याशी चर्चा करा. तुमचा अनुभव त्यांना मोलाचे मार्गदर्शन देऊ शकेल. आर्थिक अडचण, दारू अथवा इतर व्यसने, दैवी भोग, शारीरिक/मानसिक आजार, अपंगत्व अशांसारखे गंभीर प्रश्न सुटण्यासाठी मुलांचे विवाह करू नका.
आयोजनासाठी विनंती पत्र
दिनांक
प्रति,
मा.
विषय :- ‘जोडीदाराची विवेकी निवड-राज्यव्यापी अभियान’ अंतर्गत कार्यक्रम घेण्याबाबत…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी समाज निर्मितीचा ध्यास घेऊन काम करीत आहे. त्यामध्ये एका बाजूला अघोरी-अमानुष अंधश्रद्धांशी संघर्ष सुरु असतानाच वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवात करण्याचा रचनात्मक प्रयत्न देखील सुरु आहे. त्यामुळे मानवी जीवनात शोषण करणार्या,दिशाभुल करणार्या रुढी, प्रथा, कर्मकांडाची चिकित्सा करीत असताना त्याला विधायक पर्याय देण्याचा प्रयोग केला जात आहे. विवाहासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी युवा पिढीशी सुसंवाद करून त्यांना त्यांच्या जोडीदाराची निवड विचारपूर्वक करायला लावणे आवश्यक आहे. त्याबद्दलचा प्रबोधनाचा आणि युवक-युवतींना संकल्पीत करण्याच्या हेतूने महाराष्ट्र अंनिस आणि विवेक वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने ‘जोडीदाराची विवेकी निेवड-युवा संकल्प अभियान’ पुढील काळात राज्यभर राबविले जाणार आहे. त्यामधून युवक-युवतींना वैवाहिक सहजीवन, कुटुंब संस्था आणि समाज व्यवहार याबाबत आधुनिक वैज्ञानिक विचार आणि बदलत्या जीवनप्रणालीमध्ये आपल्या जोडीदाराची विवेकपूर्वक निवडीबाबतचे मार्गदर्शन मिळू शकेल.
मैत्री प्रेम आकर्षणापासून सुरु झालेले स्त्री-पुरुष संबंध जीवन साथी म्हणून विवाह बंधनात परावर्तित होणे अपेक्षित असते. परंतु भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल असलेल्या अपुर्या व अनैसर्गिक समजामुळे गुंतागुंत तयार होते. त्यात विवाह संस्कार वा करार करुन वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी कराव्या लागणार्या पारंपरिक रुढी-प्रथा-परंपरांमुळे पुरुष सत्ताक समाजामध्ये बाईवर कायम अन्याय होत राहतो. विवाहामध्ये होणारा जात, पोटजात, कुळ, गोत्र, प्रतिष्ठा, हुंडा, मानपान, दागदागीने, बॅण्ड, कन्यादान, जेवणावळी, पत्रिका, अक्षता, लायटिंग, वरात प्रकारांमध्ये प्रचंड आर्थिक-शारीरिक-मानसिक गुंतवणूक करुनही हाती असमाधानच राहते. अशा पार्श्वभूमीवर विवाह का आणि कशासाठी करायचा? इथपासून त्याची नकारात्मक व सकारात्मक कारणांचा विचार, विवाह यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणार्या बाबींची समज, वैवाहिक जोडीदाराच्या निवड प्रक्रियेतील पारंपरिकतेतील दिशाभूल, शोषण, फसवणूक आणि त्यातून भोगावा लागणारा मन:स्ताप व अत्याचार याचा युवक-युवतींनी गांभीर्यपूर्वक जाणिव करुन घेणे आवश्यक आहे. त्या हेतूनेच आम्ही महाराष्ट्रातील युवा पिढीशी प्रबोधनाचा सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. त्यामधून सहभागी होऊन प्रबोधित होणार्या युवांना त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनासाठी संकल्पीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अभियानाची भूमिका, जोडीदाराच्या निवडीचे निकष आणि विविध अंगाने चर्चा उपस्थित करणारे प्रचार साहित्य आम्ही तयार केले आहे. डिजीटल पोस्टर्स प्रदर्शनाद्वारा जोडीदाराच्या निवडीविषयी विचारात घ्यावयाच्या काही महत्त्वपूर्ण बाबी मांडण्यात आलेल्या आहेत. तसेच व्याख्यान, मेळावा, गटचर्चा आणि संकल्प या माध्यमातून युवक-युवतींची सहजीवनाचा जोडीदार निवडीबद्दल सखोल चर्चा करणे शक्य आहे. त्यासाठी आपल्या पुढाकाराने व सहकार्याने आयोजन शक्यतेनुसार केले जावे अशी विनंती करीत आहोत.
आपले स्नेहांकित,