पुरोगामी विचारवंत, सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता, विशिष्ट ध्येय समोर ठेवून संपूर्ण आयुष्य वेचलेला कर्मयोगी अशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट कबड्डीपटू आणि क्रीडासंघटक म्हणूनही डॉ. दाभोलकर महाराष्ट्राला परिचित आहेत.
डॉ. दाभोलकरांची क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द सातारच्या शिवाजी उदय मंडळात गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. वयाच्या 18 व्या वर्षी डॉ. दाभोलकरांनी कबड्डीच्या मैदानावर पाऊल ठेवलं आणि लाल मातीशी इमान राखत कसून सराव करत या खेळावर विलक्षण प्रभुत्वदेखील मिळवलं. अण्णांच्या मार्गर्शनाखाली दाभोलकरांची कबड्डीपटू म्हणून कारकीर्द बहरत आली. सुरुवातीच्या काळात मंडळाचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यांनी आंतरविद्यापीठ स्पर्धाही गाजवली. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चतुरत्र खेळ करून त्यांनी केवळ मंडळाचा नव्हे तर सातारा जिल्ह्याचा लौकिक भारतभर पोहोचवला.
आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतही दाभोलकरांनी आपली चमक दाखवली. भारतीय संघाबरोबर बांगलादेशाच्या दौर्यावर ते गेले होते. अनेक राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार खेळ करताना त्यांनी अनेक मैदाने गाजवली. कबड्डी महर्षी बुवा साळवी, गुरुवर्य बबनराव उथळे, अर्जुन पुरस्कार विजेता शंताराम जाधव यांच्यासह नामवंत खेळाडू आणि क्रीडा समीक्षकांनी दाभोलकरांच्या या हनुमान उडीची आवर्जून दखल घेत नवोदित खेळाडूंना त्यांच्यापासून स्फूर्ती घेण्याचे आवाहन केले.
दाभोलकरांच्या कबड्डी कौशल्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले. युवा छत्रपती पुरस्कार आणि क्रीडा संघटक म्हणून छत्रपती पुरस्कार मिळवणारे ते एकमेव होते. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीचा शासनाने गौरव करून त्यांना मानवंदनाच दिली. असेच म्हणावे लागेल.
सातार्यात झालेल्या अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी संयोजनामध्ये दाभोलकरांनी बजावलेली भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली. विदेशी खेळांपेक्षा कबड्डी, खो-खो यासारखे देशी खेळ प्राधान्याने खेळले जावेत. या खेळांना समाजाच्या सर्वच स्तरातून तसेच शासन पातळीवरही प्रोत्साहन आणि पाठींबा मिळावा यासाठी ते आग्रही होते. या देशी खेळांविषयी त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती. देशी खेळ जिवंत राहिले पाहिजेत. खेळाडूंना सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्या अनुषंगने त्यांनी वेळोवेळी केलेले लेखन आणि व्यक्त केलेले विचार आजदेखील तेवढेच तोलामोलाचे आणि महत्वाचे आहेत.
शिवाजी उदय मंडळाच्या स्थापनेत आणि जडघणघडणीत गुरुवर्य अण्णांच्या खांद्याला खांदा लावून दाभोलकरांनी स्वत:ला झोकून दिले. मग स्पर्धांसाठी अर्थाजन असो किंवा अन्य कोणतीही गोष्ट असो ते सर्वार्थाने मदतीचा हात पुढे करत असत. एक उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा संघटक म्हणून दाभोलकरांची कारकीर्द क्रीडा क्षेत्रात सदैव संस्मरणीय म्हणून ओळखली जाईल यात शंका नाही.
मंडळाच्या गडकोट मोहिमेतही दाभोलकरांचा सहभाग असायचा. खेळाडू केवळ उत्तम खेळणारा म्हणून जसा ओळखला जावा तसाच तो आदर्श, सुसंस्कारित असावा अशी धारणा गुरुवर्य अण्णांनी मंडळाच्या सर्व खेळाडूंना दिली. डॉ. दाभोलकरांच्या अकाली एक्झिटने केवळ शिवाजी उदय मंडळाचेच नव्हे तर सातारच्या क्रीडा क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांच्यासारखे आदर्श खेळाडू संघटक भावी काळात निर्माण झाले तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
–शरद महाजनी