Categories
संपादकीय

कैफियत मंगळ-शनीची

मार्च - २०१२

आचार्य अत्रे एखाद्या किर्तीमान व्यक्तीचे गुणगान करताना म्हणत असत-‘अशी व्यक्ती गेल्या हजारो वर्षांत झाली नाही व पुढेही होणार नाही.’ त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ज्योतिषाइतके फसवे शास्त्र व ज्योतिष सांगणार्‍याइतकी धोकेदायक माणसे गेल्या हजार वर्षात झाली नसतील व पुढेही होणार नाहीत. शनी या ग्रहाला कोपिष्ट ठरवून व मंगळाला कडक ठरवून या मंडळींनी आतापर्यंत हजारो माणसाच्या आयुष्यात नको तितकी ढवळाढवळ करून ठेवली आहे. हे आम्हाला पुन:पुन्हा सांगायचे कारण गेल्या महिन्यात पुण्यात घडलेली भीषण घटना. शनी व मंगळ यांची अभद्र युती झाल्याने जगण्यात अर्थ नाही अशा निराशेमुळे पालकर नामक गृहस्थानी स्वत:ला, त्यांच्या पत्नीला व दोन हुशार मुलांना झोपेच्या गोळ्या देऊन संपविले. एवढी शोककारक व हृदयद्रावक घटना ज्योतिषामुळे गेल्या शंभर वर्षात घडली नसेल.

वास्तव काय आहे?

            मंगळ पृथ्वीपेक्षा दीडपट अधिक अंतरावरून सूर्याभोवती फिरतो. 1 सेकंदाला चाळीस किलोमीटर्स एवढ्या वेगाने तो सूर्याभोवती 687 दिवसात एक प्रदक्षिणा पुरी करतो. त्याचा स्वत:भोवती फिरण्याचा काळ पृथ्वीएवढाच म्हणजे 24 तास 37 मिनिटांचा आहे. पृथ्वीपेक्षा निम्मा व्यास व वस्तुमान तिच्या 1/10 पट असणारा हा ग्रह ज्योतिषांनी बदनाम केलाय. मुलीला कडक मंगळ आहे असे सांगून आतापर्यंत हजारो मुलींच्या आयुष्यातील आनंद हिरावून घ्यायला लावून मंगळावर केवढा अन्याय केला गेलाय?

            22 ऑगस्ट 1975 ला व्हायकिंग 1 हे अंतरीक्ष यान मंगळाकडे झेपावले. काही दिवसांनी व्हायकिंग 2 तेथे पोचले. ही याने मंगळाची माहिती पृथ्वीवर पाठवू लागली. त्यातून मंगळावर जीवसृष्टी आहे का, नसल्यास पूर्वी होती का, तिथल्या मातीत कोणती खनिजे आहेत याचे संशोधन सुरू झालंय मंगळाच्या मातीत लोह व गंधक यांची खनिजे आहेत. त्यामुळेच तो लाल दिसतो. खरे तर मंगळ थंड आहे. कारण त्याच्या दोन्ही धु्रवावर कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे गोठलेले बर्फ आहे.

            शनी ग्रह तर सर्वात देखणा आहे. तो सुंदर दिसतो त्याच्या कड्यामुळे. ही कडी बर्फाळ तुकड्यांनी बनली आहेत. शनी हा हेलियम व हायड्रोजन वायूचा गोळा आहे. पण हे वायू थंडीमुळे द्रवरूप अवस्थेत आहेत. याला कारण शनीचे सूर्यापासूनचे अंतर. पृथ्वीपेक्षा साडेनऊ पट अधिक अंतरावरून तो सूर्याभोवती 29॥ वर्षात एक फेरी मारतो. त्याचा आकार पृथ्वीच्या आठशे पट असून वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट आहे.

            असे हे शनी-मंगळ ग्रह. खगोल विज्ञानातून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार पृथ्वीप्रमाणेच ते जड गोळे आहेत. सूर्याच्या गुरूत्वाकर्षणामुळे ते पृथ्वीप्रमाणेच सूर्याभोवती व स्वत:भोवती गतीमान असून हजारो वर्षे विशिष्ट कक्षेत फिरत राहिलेत. त्यांना ना मन ना भावना.

            पण ज्योतिषांनी एकाला कोपिष्ट ठरवले तर दुसर्‍याला कडक ठरवले. एक साडेसाती आणणारा दुष्ट ठरवला गेला तर दुसरा मंगळ्या मुलीला वा मुलाला त्रास देणारा ठरवला गेला.

            मंगळ आणि शनी यांना खरंच मन असते तर ते पृथ्वीवासियांना व तथाकथित ज्योतिषांना उद्देशून काय म्हणाले असते?

            “पृथ्वीवासियांनो! तुम्ही आम्हाला का नाहक बदनाम केलेत? तुमच्याच चार भावंडांचे आमच्या नावाचा वापर करून का नाहक बळी घेतलेत? पृथ्वीवर थोर सर्जनशील विचारवंत व तत्त्वज्ञ आहेत असे आम्ही ऐकलंय. सत्यासाठी प्राणाची आहुती देणारे महात्मे पृथ्वीवर  होऊन गेले. आजही मानवतेचे रक्षण करणारे कृतीशील थोर लोक कार्यरत आहेत. प्रतिभावंत, कलावंत, विचारवंत यांची पृथ्वी ही कर्मभूमी. पण मानवतेचा अपराध करणारी, अज्ञानाचा प्रसार करणारी नतद्रष्ट माणसंही तुमच्यातच आहेत व आमच्या नावाने ती निरपराधांचा बळी घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत हा केवढा विरोधाभास!” 

            “भूतेखेते, चेटूक कल्पना, नरबळी… आणि असलंच अज्ञान निर्माण करणारा माणूसच! आणि आमच्या मार्गाने प्रामाणिकपणे फिरत रहाणार्‍या आम्हा ग्रह गोलांना दुष्ट व कडक ठरवून अनेकांच्या आयुष्यांची बरबादी करणारा माणूसच.”

            मंगळ व शनीची ही कैफियत किती खरी आहे! अज्ञानमूलक ज्योतिषासारख्या भ्रामक शास्त्रावरील अंधविश्वास लवकरात लवकर झुगारून द्यायला हवा आणि ह्यासाठी ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायद्याचा बडगा दाखवायला हवा.