Categories
व्यक्तिविशेष

कार्यकर्त्यांवर दृढ विश्वास दाखविणारे दाभोलकर

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

गुरूवार 20 ऑगस्ट 2013. वेळ सकाळी 7 वा. एका पत्रकार मित्राचा फोन आला. डॉ. दाभोलकरांच्यावर पुण्यामध्ये अज्ञाताचा गोळीबार. मन सैरभैर झाले, बातम्या लावल्या व धक्का बसणारी बातमी दिसली…. डॉक्टर आमच्यातून निघून गेले होते. मन सुन्न झाले.. तरी सुद्धा मनातील खोटी आशा. राहुल थोरातला फोन लावला व राहुलने पुण्यास निघा हा निरोप देऊन फोन ठेवला, हे अचानक घडलंच कसं? व नकळत माझं लक्ष मोबाईलवर गेलं व 16 ऑगस्टचं कॉल रजिस्टर स्थिरावलं. संध्याकाळी 7.15 वा डॉक्टरचा कॉल. कमीत कमी पाऊण तास त्यांचे बोलणं सुरू होतं. ‘बोल संजय’ या वाक्यानं सुरू होणारा त्यांचा शेवटचा कॉल ठरला व नकळत डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

खरं तर मी अंनिसचा पूर्णवेळ कार्यकर्ता नव्हतो तरी डॉक्टरनी माझ्यावर खूप माया, प्रेम व विश्वास दाखवला मला आठवतंय पंधरा सोळा वर्षापूर्वी डॉ. कोठारींनी कुठल्या तरी कार्यक्रमात माझी ओळख करून दिली व ही ओळख माझ्या कौटुंबिक परिवारापर्यंत दृढ झाली, अलिकडे माझे व डॉक्टरांचे मोबाईलवर संपर्क पंधरा दिवसांतून एक वेळ तरी व्हायचा व दिपावलीच्या आसपास तर जाहिराती बाबत रोज संपर्क असायचा. बहुतेक वेळा आर्थिक व्यवहार, वार्तापत्र, ट्रस्ट आर्थिक नियोजन याबाबत असायचा. माझी कामकाजाची पद्धत, मन लावून केलेले काम डॉक्टरांच्या टोकदार नजरेने पास केलं व वार्तापत्राच्या ऑडिटची जबाबदारी माझ्यावर टाकली व राज्यकार्यकारणीमध्ये निधी संकलनाच्या पॅनेलवर माझी नियुक्ती करून मला मोठी जबाबदारी दिली.

डॉक्टरांची काम करण्याची एक खास पद्धत होती. दुसर्‍याकडून शांतपणे काम करून घेण्यात ते तरबेज होते. तर कार्यक्रम/उपक्रम आयोजित करतांना कमीत कमी साधनांच्या आधारे जास्तीतजास्त परिणामकारकता साध्य करण्याची त्यांची हातोटी होती. या सर्व जबाबदार्‍या मुळे मला त्यांच्याबरोबर फिरण्याचा त्यांच्या सहवासात राहण्याचा व नकळत डॉ.श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, पुष्पा भावे, डॉ.नरेंद्र जाधव, विकास आमटे, प्रकाश आमटे, बाबा आढाव, तारा भवाळकर, साधना मासिक संबंधित आदरणीय व्यक्तींशी सहवास व त्यांचे आचार विचार ऐकण्याची जवळून संधी मिळाली.

अशा या थोर व आदरणीय डॉक्टरांचा एका वर्षातही खुनी सापडला नाही. शाहु, फुलेंचा पुरोगामी विचार पुढे नेणारा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणणारा महाराष्ट्र परंतु या महाराष्ट्रात या पुरोगामी विचारांचा झालेल्या खुनाचा आरोपी मिळू शकत नाही हे शल्य आजही आमच्या मनात आहे. डॉक्टर जरी आज आमच्यात नसले तरी त्यांचे विचार आजही आमच्यात जिवंत आहेत व असतील, या वैचारिक लढाईत त्यांचेच विचार आज कृतीतून पुढे येत आहेत म्हणून ओठावर एकच ओळ येते. होंगे कामयाब एक दिन… होगी जीत सच्चाई की…. होगी जीत सच्चाई की, ओ हो मनमें है विश्वास, पुरा है विश्वास।

संजय एस. कोले, इचलकरंजी